चिनी बनावटीच्या गृहोपयोगी वस्तू पार केरळपर्यंत मिळायला लागल्याला आता काही वर्षे होऊन गेली. या सर्व वस्तू खासगी क्षेत्रातील उत्पादने आहेत. चिनी उत्पादक हे कसे करू शकले? आर्थिक उदारीकरणाची, खासगीकरणाची चीन व भारतातील प्रक्रिया जवळजवळ एकाच वेळी सुरू झाली. भारतामध्ये या प्रक्रियेची गती गोगलगाईची, तर चीनमध्ये गरुडझेपेची. भारतामधील या कमी गतीची अनेक कारणे दिली जातात. येथील लोकशाहीचे अस्तित्व हेही एक कारण दिले जाते. चीनमध्ये कामगार-कपातीचे भांडवल करून कामगार नेते भांडवलदार होत नाहीत, अशा कलाने त्या विचाराची मांडणी केली जाते. खरे तर लोकशाही समाजरचनेमध्ये लोकमान्यतेच्या पायावरती आर्थिक उदारमतवादाने जास्त गतीने पुढे जायला पाहिजे होते. भारताच्या पीछेहाटीची अन्य कारणेही पुढे केली जातात.
दोन्ही देशांमध्ये आर्थिक क्षेत्रातील उदारमतवादी धोरणाची सुरुवात साधारणपणे एकाच वेळी–एका तपापूर्वी झाली. या धोरणाला गती यायची तर भांडवलदार वर्ग, राजकीय नेतृत्व, मध्यमवर्ग, प्रसारमाध्यमे या सर्वांनी नेतृत्व देणे आवश्यक होते. दुर्दैवाने त्याच वेळी प्रमुख विरोधी पक्ष, मध्यमवर्ग आणि काही प्रमाणात प्रसारमाध्यमे यांनी आर्थिक क्षेत्रापेक्षा यात्रेकरूंचा झेंडा खांद्यावर घेतला. गेली दहा वर्षे भारतातील कृतिशीलतेचे सर्व प्रवाह या यात्रांसभोवार फिरत आहेत. कृतिशीलतेपेक्षा संन्यास–दिंडीला, विधायकतेपेक्षा विघातकतेला आणि आर्थिक विषयापेक्षा धार्मिक विषयांना राष्ट्रीय अजेंड्यावर प्राधान्य मिळाले. भारताच्या आर्थिक तसेच बौद्धिक शक्तीचे भांडवल उदारमतवादाच्या आधारे राष्ट्रीय विकासासाठी वापरण्याऐवजी पुराणमतवादाच्या आधारे समाजाला भूतकाळात नेण्यासाठी वापरले गेले. बुद्धिमान, कार्यक्षम अशा तरुणवर्गाने वैतागून आपल्या बौद्धिक शक्तीची गुंतवणूक परदेशात करणे जास्त उत्पादक मानले, तर उर्वरित तरुणवर्गाला भगवे पटके मिळाले. चीन पुढे गेला.
खरे तर येथेच वैचारिक गंमत सुरू होते. स्वदेशीचा नारा देत भगवे पटके बांधून बेभान होणारा सामाजिक वर्ग कोणता? परदेशी सुबक, स्वस्त वस्तू खरेदी करत खूष राहणारा वर्ग कोणता? की स्वदेशीचा घोष करत परदेशी वस्तू घेणारा वर्ग एकच आहे? या वर्गाला मध्यमवर्ग या एकाच संबोधनाने उल्लेखिता येईल का? दुर्दैवाने या प्र नाचे उत्तर ‘होय’ असेच आहे. 40-45 वर्षांच्या समाजवादी आर्थिक धोरणामुळे येथे मोठा नोकरशहा मध्यमवर्ग निर्माण झाला. सुरुवातीला बहुतांशी उच्चवर्णीय असलेला हा वर्ग आता बहुवर्णीय मध्यमवर्ग झाला आहे. चांगले मासिक उत्पन्न, मर्यादित उत्पादनक्षमता, उदासीन, निष्क्रिय, नकारात्मक मनोवृत्ती आणि आपल्या कामापेक्षा आपल्या सुविधांसंबंधात चांगला अभ्यास असलेला हा वर्ग आहे. या वर्गाबद्दल दोन चांगल्या गोष्टी सांगता येतील. एक तर 20-25 वर्षांनंतर हा वर्ग संख्यात्मकदृष्ट्या नगण्य स्वरूपातच अस्तित्वात राहणार आहे. कारण शासकीय क्षेत्रातील नोकऱ्यांचे प्रमाण कमी होत चालले आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे निवडणुकीच्या संदर्भात या वर्गाचे अस्तित्व नोंद न घेण्यासारखेच असते. राजकारणावर जोरदार चर्चा करणाऱ्या या वर्गाचे टक्केवारीतले मतदान फारच कमी असते. देशभरातील शहरी भागातील मतदानाचे प्रमाण पाहिले तर हे स्पष्टपणे लक्षात येईल. राष्ट्रीय पातळीवर आणीबाणीनंतरची किंवा इंदिरा गांधींच्या हत्येनंतरची निवडणूक आणि राज्यपातळीवर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतरची, दिल्लीतील कांदाप्रकरणानंतरची, गुजरातमधील गोध्रानंतरची निवडणूक या काही अपवाद समजायला हव्यात. मतदानाच्या दिवशी सुट्टी उपभोगून दुसऱ्या दिवशी बोटावर शाईचा ठिपका तपासल्यास शहरी मतदानाचे आणि या वर्गाच्या राजकीय निष्क्रियतेचे प्रमाण कळेल.
काँग्रेस पक्षाने स्वीकारलेल्या आणि अंमलबजावणी केलेल्या समाजवादी कल्याणकारी धोरणांतून गेल्या 30 40 वर्षांत आणखी एक नवीन वर्ग उदयाला आला आहे. जमीनदारी नष्ट केल्यामुळे बऱ्याच मोठ्या ‘नाही रे’ समाजाला जमीन मिळाली, तसेच बँकांच्या राष्ट्रीयीकरणामुळे या वर्गाला काही प्रमाणात आर्थिक साहाय्यही मिळाले आणि या वर्गाला ‘स्व’ची जाणीव झाली. शेती करणारा, अनेक लहान-मोठे व्यवसाय करणारा हा वर्ग आहे. हा पांढरपेशा वर्ग नव्हे, कारण त्याचा पेशा त्याला रंगाने आणि पोशाखाने पांढरा राहू देणारा नाही. गाव, पंचक्रोशी, तालुका, जिल्हा पातळीवरील सर्व संघटनांशी, संस्थांशी त्याचा चांगला संबंध आणि सहभाग आहे. रिक्षाचालक संघटना, सहकारी पतपेढ्या, तालुक्यातील नवीन माध्यमिक शाळा, दूध-वर्तमानपत्र वितरण व्यवस्था, कुरियर सेवा, झेरॉक्स, टेलिफोन बूथ, उसाचे चरक, केबल, गॅस वितरण अशा अनेक व्यवसायांमध्ये तो शिरला आहे. स्वतः जास्त शिकलेला नसला तरी शिक्षणसंस्थांचा तो चालक आहे. चिंतन, मनन, मंथन अशा शब्दांचे त्याला वावडे आहे. या गोष्टींचे तो आऊट-सोर्सिंग करतो. विचारांपेक्षा आचार आणि कृती यांना प्राधान्य देणारा हा वर्ग सामाजिक तसेच राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण कार्य बजावणारा आहे. याच्याकडे अफाट संघटनशक्ती आहे. आर्थिक क्षेत्रातील वाढत जाणाऱ्या सेवाक्षेत्रांबरोबर वाढत जाणारा हा वर्ग अनेक धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक चळवळींमध्ये सातत्याने सहभागी असतो. खरे तर अशा कार्यक्रमांचे तो नेतृत्व करीत असतो. परंपरावादी, धार्मिक असलेला हा वर्ग आ चर्य म्हणजे विधायक अर्थाने धर्मातीत प्रवृत्तीचा आहे. भाषेने कमकुवत, परंतु विचाराने सधन आणि आचाराने कृतिशील, विधायक वृत्तीचा, कोणत्याही सामाजिक कार्यात झोकून देणारा, झपाटून कार्य करणारा आहे. शारीरिक आणि आर्थिक व्हेलॉसिटी हा त्याचा अंगभूत गुण आहे. व्याजाचे दर खाली आले की प्रस्थापित मध्यमवर्ग भयाकुल होतो, तर सबलता वाढणारा नवा वर्ग आनंदित होतो. आर्थिक आणि शारीरिक संपदा ही वापरण्यासाठी, गुंतवण्यासाठी असते, शिल्लक ठेवण्यासाठी नव्हे, अशी त्याची मानसिक ठेवण आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे प्रस्थापित मध्यमवर्ग संख्येने कमकुवत होत जात असताना हा नवमध्यमवर्ग वाढत आहे.
राजकारण
आक्रमक सार्वजनिकता, स्पष्ट खासगी आर्थिक हितसंबंध आणि अफाट संघटनशक्ती या गुणांमुळे बहुतांशी विधायक वृत्तीचा झालेला हा वर्ग या गुणांशी संबंधित राजकीय पक्षांशी जवळीक साधतो. या वर्गातील पाच-दहा टक्के लोकांना अजून आर्थिक हितसंबंध निर्माण करता आलेले नाहीत. हे पाच-दहा टक्के लोक बजरंग बनून कल्याणसिंग, कटियार, मोदी यांच्याबरोबर आहेत. त्यांना मूळ विधायक गटात आणणे अवघड नाही. त्यांच्या कृतिशील प्रवृत्तींना आर्थिक हितसंबंधांचा पाया द्यायला हवा. त्यांना सबसिडी नको. नेतृत्वाचा हिरवा सिग्नल हवा. कल्याणसिंगांनी विधायकतेचे कालवे काढून या वर्गाची उपक्रमशीलता नवनिर्मितीच्या सिंचनासाठी वापरली असती तर अयोध्येतील मशीद व्यवस्थित राहिली असती आणि भाजपाने पक्षातून काढून टाकले तेव्हा ते एकटे राहिले नसते. गुजरातमधील बजरंगांची ताकद जर सध्याच्याच मार्गाने जाणार असेल तर मोदींना कल्याणसिंगांच्याच अडचणींना तोंड द्यावे लागेल आणि ते एकटे पडतील. असे विधायकतेचे कालवे काढण्याचे काम महाराष्ट्रात शिवसेनेने केले आहे. बिहारमध्ये लालुप्रसाद यादव यांनी केले आहे. नवमध्यमवर्गाचे हितसंबंध या पक्षांनी जाणले आणि जोपासले. प्रस्थापित मध्यमवर्गाने निर्माण केलेल्या सभ्यतामापकांचा, पुस्तकी आकडेवारीचा वापर करून या वर्गाकडे पाहिल्यास वरील उदाहरणे अज्ञानी वाटतील, परंतु गाव, पंचक्रोशी, तालुका, जिल्हा पातळीवर मुक्काम टाकून लोकमानस पाहिले तर बौद्धिक विवेचनाचा पोकळ दर्जा लक्षात येईल. सहकारी बँका, साखर उद्योग, दूध सोसायट्या, बीजवितरण या सर्व क्षेत्रांत मग्रुरीने गोंधळ घालत स्टार्चच्या कपड्यांनी लोकांकडे जाणारा काँग्रेस पक्ष त्यांना आपला वाटत नाही. मराठा, रजपूत, जाट, एकूण क्षत्रिय वर्गीयांची अरेरावी आणि माजी जमीनदारांची मिजास याबद्दल या नव्या वर्गाला अॅलर्जी आहे.
मूळ प्र न राहतोच. स्वदेशीचा घोष करीत परदेशी वस्तूंची जोरदार खरेदी करणारा निष्क्रिय असा वर्ग जर मध्यमवर्ग म्हणून ओळखला जातो तर वरती उल्लेख केलेला वर्ग कोणता? या नव्या वर्गाचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय क्षेत्रांतील कार्यभाग पाहिला तर याला नवमध्यमवर्ग म्हणून संबोधिता येईल.
[लोकसत्ताच्या 26 जाने. 2003 च्या अंकातून]