“वृथा अहंकार किंवा गर्वामुळे माणूस ईश्वराचे अस्तित्व कसे नाकारायला लागेल हे मला अजिबात समजू शकत नाही. एखाद्यास जर पात्रता नसताना अमाप लोकप्रियता मिळाली असेल तर तो दुसऱ्या कुणा थोर माणसाचे थोरपण नाकारू शकेल हे समजू शकते. पण मुळात आस्तिक माणूस अहंकारापोटी ईश्वराचे अस्तित्व नाकारू शकेल हे पटत नाही. असे दोनच कारणांनी घडू शकते. एकतर हा अहंकारी माणूस स्वतःस देवाचा प्रतिस्पर्धी तरी समजत असेल किंवा स्वतःसच देव मानीत असेल. पण मग त्यापैकी कोणत्याही बाबतीत तो खऱ्या अर्थाने नास्तिक असू शकत नाही. स्वतःला देवाचा प्रतिस्पर्धी मानणारा माणूस देवाचे अस्तित्व नाकारीत नसतोच. स्वतःत देवत्व पाहणारा सुद्धा सृष्टीच्या सर्व व्यवहारांचे नियंत्रण करणाऱ्या एका व्यक्त्यधिष्ठित शक्तीवर विश्वास ठेवीतच असतो. ती शक्ती स्वतःमध्ये आहे की दुसऱ्या एखाद्या ठिकाणी आहे हा फक्त तपशिलाचा भाग झाला. त्यामुळे कुणीही माणूस केवळ
अहंकारापोटी नास्तिक होऊ शकत नाही. —- सरदार भगतसिंग
[फाशीची शिक्षा मिळण्याचा फक्त उपचार शिल्लक होता त्याही वेळी भगतसिंग हा पक्का नास्तिक होता. “तुला मिळालेल्या लोकप्रियतेमुळे ईश्वराचे अस्तित्व नाकारण्याइतका अहंकार तुझ्यात निर्माण झाला आहे” असे त्याच्या नास्तिकतेने दुखावलेल्या बाबा रणधीर सिंग या तुरुंगातल्याच स्वातंत्र्य सैनिकाने सरदार भगतसिंगास म्हटले त्याच्या उत्तरादाखल लिहिलेल्या विस्तृत निबंधातील एक परिच्छेद. हा मधुकर देशपांडे यांनी आमच्याकडे पाठवला.
— संपादक