भारतीय संस्कृतीत स्त्रीचे स्थान अत्यन्त गौण मानले जाते. स्त्रियांना देवतेसमान मानले जाते हे नुसते काव्य— -कदाचित ढोंगच—-स्त्रीच्या गौण स्थानाचा गवगवा 1975 सालच्या सुमारास विशेष झाला. त्याला कारण त्यावेळी स्त्रीच्या गौण स्थानामुळे लोकसंख्येचा प्र न सुटण्यामध्ये अनेक अडथळे येत असल्याची तीव्र जाणीव झाली वरच्या वर्गातील मूठभर स्त्रियांनी सभा भरविल्या, लेख लिहिले, आंतरराष्ट्रीय सभांमधून या जाणिवेचा जयघोष केला. ह्या संदर्भात काही कायदे केले जातात, पण त्याची अंमलबजावणी न करण्याची परंपरा भारतात आहे. 1857 सालच्या बंडानंतर ब्रिटिशांनी कायदे करून समाज न बदलण्याचे किंवा स्थानिक धर्मात ढवळाढवळ केली जाणार नसल्याचे आश्वासन दिले व ते पाळले. स्वातंत्र्यानंतर भारतीय राजकारण्यांनी त्याचीच री ओढून कायदे करूनही त्याची अंमलबजावणी करण्याची खटपट कधीच केली नाही. एवढेच नव्हे, हे आपले काम आहे हेही राजकारणी बऱ्याच वेळी विसरलेले दिसतात. ही अंमलबजावणी करणे तसे अवघड असते. यापेक्षा कोणाकोणाचे वाढदिवस साजरे करणे, निषेधाच्या घोषणा करणे वगैरे कार्यक्रम करणे बरेच सोपे व कोणालाही करता येण्यासारखे असावे.
स्वातंत्र्य मिळाल्यावरही स्त्रीच्या स्थानात बदल झाला नाही, याची जाणीव लेखिकेला गेली 55 वर्षे शिरगणतीचे आकडे हाताळताना सहज होत असे. एवढेच नव्हे तर कोठेही आर्थिक किंवा सामाजिक पाहणी करताना कौटुंबिक माहितीत स्त्रियांचा उल्लेख बराच कमी होतो, त्यामुळे स्त्रियांचे प्रमाण पुरुषांशी तुलना कायमचे कमी आढळे. स्त्रीपुरुष जन्माला आल्यावर पुरुष नोंदी होत, स्त्री नोंद करण्याचा कंटाळा होई. मृत्यूचेही तेच. आजार पुरुषांचे जास्त नोंदविले जात व स्त्रियांचे कमी. त्यासाठी औषधोपचार करताना स्त्रियांपेक्षा पुरुषांसाठी नेहमीच जास्त खर्च होई. मुलींची हेळसांड जास्त होई, इतकी, की त्यांच्यात अनपेक्षित मृत्यू जास्त होत. आजच्या पुढारलेल्या देशांत –आज नव्हे–पूर्वीपासूनच—स्त्रीची आयुर्मर्यादा पुरुषांपेक्षा नेहेमीच जास्त असे. जीवशास्त्राचा तो निसर्गनियम असावा. भारतातील ही आयुर्मर्यादा बघण्यासारखी आहे.
भारतात 1872 पासून शिरगणती सुरू झाली ह्या वर्षातली शिरगणती एका त-हेने केवळ प्रयोगादाखल झाली. परंतु 1881 पासून 2001 पर्यंत, कधीही न चुकता, दर दहा वर्षांनी, शिरगणती झाली. 1921 पर्यंतच्या सर्व गणतीत स्त्रियांची नोंद या ना त्या कारणाने इतकी कमी असे की फक्त पुरुषांच्या आकडेवारीवर सर्व कृती आधारून त्यांच्या आयुर्मर्यादेचे कोष्टक उभारले जाई. स्त्रियांचे तसेच कोष्टक उभे करणे अपुऱ्या आकडेवारीवर अशक्य होई. त्यामुळे कॅनडा, ऑस्ट्रेलिया सारख्या देशांचा आधार घेऊन स्त्रीची आयुर्मर्यादा तेथे दिसलेली (स्त्री पुरुषांपेक्षा दोन वर्षे जास्त) धरून भारतीय स्त्रीचे वयवारी मृत्यूचे कोष्टक तयार करीत व त्यावरूनच स्त्रियांची आकडेवारी ठरवीत. हे काम करणारा प्रत्येक शिरगणतीत Census Actuary असे. 1921 पर्यंत तो ब्रिटिश असे. 1931 मध्ये प्रथमच भारतीय Census Actuary ने वयवारी मृत्यूचे कोष्टक बनविले व त्याने खात्रीपूर्वक सांगितले की पुढारलेल्या देशात स्त्रियांचे आयुर्मान पुरुषांपेक्षा जास्त असते तरी भारतात नि िचतपणे तसे नाही. जगातील इतर समाजांत जे हमखास होत होते ते भारतात होत नाही असे म्हणणे सोपे नव्हते. ते तसे धाडसाचे होते. पण ते 1931 साली भारतीय अॅक्चुअरीने ते सांगितले.
स्वातन्त्र्यानंतरही अत्यन्त नियमाने 1951 पासून शिरगणती होत राहिली. त्यांत स्त्रियांची आयुर्मर्यादा पुरुषांपेक्षा जास्त दिसली नाही. मात्र एक दिवस ही मर्यादा पुरुषांएवढी किंवा थोडी जास्त होण्याची आकांक्षा भारतीय शासन बाळगून राहिले. आता ती जवळ जवळ बरोबरीने आहे. मात्र पुढारलेल्या देशात स्त्रियांचे आयुर्मान पुरुषांपेक्षा पाचसात वर्षेहि पुढे गेलेले आहे. ह्या परिस्थितीत शिरगणतीची आकडेवारी हाताळणाऱ्यांना एक गोष्ट सतत सलत राहिली, ती म्हणजे हजार पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण भारतात हळूहळू कमी होते आहे. त्याला काय कारणे असावी हा एक अभ्यासाचा विषय होऊन आता तो आणखीच सतावू लागला आहे. 2001 साली हे प्रमाण हजार पुरुषांमागे 927 चे सुमारास होते. काही राज्यात ते विशेषच कमी दिसल्याने अभ्यासक त्याची कारणमीमांसा शोधताहेत.
आजही मुली नको आहेत. 2003 च्या संक्रातीनंतर म्हणजे 14 जानेवारीला पाथर्डीची बातमी होती. ह्या वर्षी संक्रान्त पांढऱ्या वस्त्रावर असून तिने एका महिलेला मांडीवर घेतले आहे. त्यामुळे आपल्या अपत्यावर संकट येऊ नये म्हणून लेकुरवाळ्या बायकांनी सव्वा किलो साखर दान म्हणून वाटावी. मुलगे दोन किंवा तीन असतील तर सव्वा किलोच्या पटीने महादेव, हनुमान अशा देवांना साखर दान करावी म्हणजे मुलगे सुरक्षित राहतील. मुली असल्यास देवीच्या मंदिरात दान करावे. यानंतर महादेव हनुमान या मंदिरात शेकडो किलो साखर जमली. देवीच्या मंदिरात काहीच जमली नाही. मुलींच्या सुरक्षिततेबद्दल समाजात काळजी नव्हती.
1970 नंतर अॅनिओसेंटेसिसने किंवा अल्ट्रासाउंडने स्त्रियांच्या गर्भारपणीच गर्भाचे लिंग समजू लागले. त्याचा वापर करणे तसे सोपे किंवा स्वस्त नसले तरी हळूहळू ते स्वस्त व जास्त प्रमाणात उपलब्ध होऊ शकेल. परंतु लोकसंख्येच्या अभ्यासकांना अशी शंका आहे की गर्भात स्त्रीबीज वाढत असले तर गर्भवती स्त्रिया गर्भपात करवून घेतात व त्यामुळे मुलींचे जन्म यापुढे समाजात कमी होण्याची शक्यता आहे.
भारतीय संस्कृतीमध्ये मुलगे जन्मावे पण मुली नकोत असे मानते, व एकूणच मुलगे होण्याची इच्छा जितकी तीव्र असते तितकी मुली होण्याची इच्छा असत नाही. हा भारतीय संस्कृतीचा भाग संततिनियमनाचा प्रसार होण्याच्या मार्गात मोठाच अडसर असल्याचे गेली तीसएक वर्षे जाणवले व त्यावर बरीच चर्चा झाली. ही मुलगे असण्याची इच्छा अत्यंत जबर असल्याने मुली कितीही झाल्या तरी मुलगे होईतो पैदास करीत राहण्याची या समाजाची रीत आहे. ज्या जोडप्यांना मुलीच होतात त्यांतल्या स्त्रीला हरत-हेचे हाल सोसावे लागतात. जेव्हा स्त्रीला मुलगी होते त्यात पुरुषाचा वाटा असला तरी ती स्त्रीची चूक समजली जाते कारण समाज अज्ञानी आहे. या संदर्भातली जीवशास्त्राची माहिती लेखिका येथे देत नाही, परंतु मुली होण्यापायी स्त्रीचे हाल कसे होतात याचे एकच उदाहरण खाली देते.
एक स्त्री डॉक्टर आपल्याकडे बाळंतपणासाठी नोंदवण्यास आलेल्या स्त्रीला तपासत होती. गर्भवतीचे बाळंतपण जरा अडचणीचे असल्याने डॉक्टरची मदत आवर्जून हवी होती. डॉक्टरने विचारले,
“नाव काय बाई?” उत्तर आले, “भाग्यलक्ष्मी” “नवरा काय करतो?” यावर उत्तर आले, “सैन्यात अत्यंत उच्च पदावर अधिकारी आहे.” “ही कितवी खेप?’ यावर “सातवी’, असे सांगितले. “मुली किती?’, तर “सहा’ निघाल्या.
“मुलगे?’ “अजिबात नाहीत.” ह्यावर जवळच बसलेल्या सासूने सांगितले, “ही माझी सून खा खा खाते आणि मुली निर्माण करते.’ त्यावर स्त्री डॉक्टर म्हणाली, “असे म्हणू नका, कारण यात आपल्या मुलाचाही वाटा आहे.”
त्यानंतर बाळंतपणासाठी आलेल्या बाईभोवती तिच्या मुली गुन्हेगारासारख्या शरमिंद्या होऊन बसल्या. त्यांची कीव आली. त्यांना आपण जन्माला येऊन आईवडिलांच्या संसाराची नासाडी केली याची खंत होती. स्त्री डॉक्टरने त्याना सांगितले की त्यांच्या आईला जुळी मुले होणार आहेत. सगळ्यांनाच वाटले की यातले एक किंवा दोनही मुलगे असतील तर? सर्वच अपेक्षेने पहात होते. बाईची शुद्ध गेली. ती बाळंत झाली. शुद्धीवर येताच विचारले, “काय झाले? मुलगा की मुलगी?’ डॉक्टरने सांगितले, “तू सुदृढ आहेस, बाळंतपण पार पडले. आणखी काय पाहिजे?” जुळी झाली त्यात दोनही मुली होत्या.
भाग्यलक्ष्मीला आठ मुली! भाग्यलक्ष्मीला हे ऐकून वात झाल्या आणि ती भेसूर हसली. भाग्यलक्ष्मी ऐश्वर्याच्या शिखरावर बसून मुलग्याची भीक मागते आहे. ती मागता मागता जग सोडूनही जाईल.
अशा गोष्टी सतत कानावर येत असतात. अशा स्त्रीला आपल्या गर्भात दोन मुली वाढताहेत हे कळल्यावर गर्भपात करवून घेण्याची इच्छा झाली तर दोष कोणाचा? ही परिस्थिती सुशिक्षित स्त्रीलाही भोगावी लागते. जागोजाग भाग्यलक्ष्म्या आढळतात. कोणाला एक मुलगी किंवा दोन मुली, तीन मुली! त्यांची कीव करणे शक्य आहे का?
गर्भपात करविणे म्हणजे भयंकर गुन्हा मानण्याचे निदान आज तरी कारण नाही. इतर देशांचा थोडासा इतिहास पाहिला तर हे समजण्यासारखे आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर जपानमध्ये अत्यंत हलाखीची स्थिती निर्माण झाली होती. त्यांच्या बऱ्याचशा वसाहती गेल्या. बेकारी आली व मुले होणेच परवडेना. त्यामुळे बव्हंशी जोडपी मुले होऊ नयेत म्हणून गर्भपात करवून घेण्याकडे वळली. प्रथमतः जपानी शासनाने याला आळा घालण्याचा प्रयत्न केला परंतु जनतेने त्या शासनाला सत्तेवरून खाली ओढले. नव्या शासनाने जनतेचा कल पाहून गर्भपाताला मंजुरी दिली. लोकांनी सहस्रावधी गर्भपात करवून घेतले. सातआठ गर्भपात करवून घेणाऱ्या स्त्रिया बऱ्याच होत्या. पंचवीसच्या पुढेही गर्भपात करवून घेणाऱ्या स्त्रियांची अनेक उदाहरणे होती. ह्या गर्भपातामागे मुले होऊ न देणे हा मुख्य हेतू होता. 1947 साली हजार लोकसंख्येमागे 34 जन्म होत असलेल्या या देशात 1954 म्हणजे केवळ सात वर्षांत हजारी 17 जन्म होऊ लागले. थोडक्यात गर्भपाताचा आधार घेऊन लोकांनी जन्मदर खाली आणला. सर्व पुढारलेल्या जगाने जपानची निंदा केली. परंतु जपानमधील परिस्थितीच अशी होती की त्याला अघोरी उपाय योजूनच उत्तर द्यावे लागले. एकदा आपत्ती टळल्यावर लोकही शहाणे झाले—-भानावर आले. ते केवळ थोड्या काळासाठी गर्भपातावर अवलंबून राहिले. त्यांनाही गर्भपाताच्या थोड्याफार अनिष्ट परिणामांची कल्पना होती. नंतर योग्य पद्धतीचा वापर करण्याकडे ते वळले व गाडी सुदृढतेच्या रुळावर आली. गर्भपाताचा विकृत व्यवहार फार काळ टिकला नाही.
याच सुमारास पूर्व युरोपात व कम्युनिस्ट राज्यांत जन्मसंख्या आवाक्यात आणण्यासाठी गर्भपातावर बरेच अवलंबून राहिले गेले. एकूण जनतेच्या या कृतीमुळे गर्भपाताची संख्या जशी वाढली तसेच गर्भपात करण्याचे मार्गही बरेच सुधारले. गर्भपात कोणीही चोरून करवून घेत नव्हते. ह्या सर्वाचा परिणाम म्हणून म्हणा किंवा जन्मसंख्या आटोक्यात आणणे एरवी जमत नव्हते म्हणून म्हणा, भारतीय आरोग्य शासनानेही गर्भपाताचे कायदे 1963 नंतर शिथिल केले. परंतु त्यांचा उपयोग भारतात जपान किंवा पूर्व युरोपासारखा झाला नाही. त्याला कारणे दोन. एक म्हणजे त्यासाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध नव्हत्या व दुसरे म्हणजे मुले नकोत किंवा कमी असू दे, ही जाणीवच समाजात तितकी तीव्र नव्हती. ही भावना तीव्र असायला परिस्थितीची जाण असण्याची एक विशिष्ट पातळी लागते, तीही भारतात नव्हती व अजूनही काही भागात तीच परिस्थिती आहे.
चीनमध्ये तर जपानपेक्षाही अघोरी मार्गाने थोडा काळ का होईना उपाय योजून परिस्थितीवर मात केली गेली. जगाने नावे ठेविली तरी त्याकडे दुर्लक्ष करावे लागले.
भारतात आणखी काही नव्या प्रकारचा मार्ग निघतो का पाहायचे. (अपूर्ण) ‘ऋणानुबंध’, भांडारकर रोड, पुणे — 411 009