गेले कित्येक महिने मी नैतिक वाक्यांसंबंधी बरीच चर्चा केली. या चर्चेतून हाती आलेले प्रमुख निष्कर्ष येथे संक्षेपाने नमूद करणे पुढील विचाराला साह्यभूत होईल असे वाटल्यामुळे ते खाली देत आहे.
१. नैतिक वाक्ये कथनात्मक (indicative) वाक्याहून अतिशय भिन्न असतात. कथनात्मक वाक्यात वस्तुस्थिति अशी-अशी आहे, किंवा ती तशी नाही असे सांगितले असते. पण नैतिक वाक्यांत वस्तुस्थिति कशी आहे किंवा कशी नाही हे सांगितले नसून एखादे कर्म करण्याचा सल्ला किंवा आदेश दिलेला असतो. हे करण्याकरिता नीतीच्या भाषेत विशेष प्रकारची वाक्यरचना आणि एक विशिष्ट शब्दसंग्रह यांचा उपयोग केलेला असतो. वाक्यरचना विध्यर्थी (करावे, करू नये अशी) असते, आणि शब्दसंग्रह ‘चांगला’, ‘वाईट’, ‘कर्तव्य’, ‘निषिद्ध’ हे किंवा या अर्थाचे अन्य शब्द यांचा बनलेला असतो.
२. नैतिक वाक्ये सत्य किंवा असत्य असू शकत नाहीत. कथनात्मक वाक्येच फक्त सत्य किंवा असत्य असतात. परंतु म्हणून ‘स्वीकरणीय’–‘अस्वीकरणीय’ असतात. सत्य-असत्य याऐवजी युक्तअयुक्त ही विशेषणे वापरता येतात.
३. अनुभववादी (empirical) आणि अतिक्रामी (transcendental), उपपत्ती. या दोन उपपत्तींपैकी अतिक्रामी उपपत्ति अतिभौतिक (metaphysical) म्हणून त्याज्य.
४. ‘चांगला’-‘वाईट’ यांचा अर्थ.
५. Intrinsically good काहीही असू शकत नाही.
६. विषयिनिष्ठता दोन प्रकारची: विशिष्टविषयिनिष्ठता आणि सामान्य-विषयिनिष्ठता.
या विषयावरील माझ्या शेवटच्या लेखात मी अशा निष्कर्षाप्रत आलो की नैतिक वाक्ये जरी सत्य/असत्य असू शकत नसली तरी त्यांच्यात स्वीकरणीय-अस्वीकरणीय किंवा युक्तअयुक्त असा भेद आपण करतो. पण युक्तअयुक्त म्हणजे काय? त्या शब्दांचे अर्थ काय आहेत? या गोष्टी अजून शोधायला हव्यात. अमुक गोष्ट चांगली आहे याचा अर्थ बोलणाऱ्याला ती आवडते, आणि ती वाईट आहे म्हणजे त्याला ती अप्रिय आहे असे मी म्हणालो. पण ही गोष्ट मला आवडते हे मत मन्निष्ठ आहे. म्हणजे ते व्यक्तिनिष्ठ आहे. पण ही गोष्ट चांगली आहे असे म्हणताना सामान्यपणे बहुतेकांना किंवा सर्वांना ते आवडते असा माझा अभिप्राय असतो. हे म्हणणे आपण पूर्वी स्पष्ट केलेल्या परिभाषेत मांडायचे तर ही गोष्ट चांगली आहे’ हे म्हणणे विषयिनिष्ठ असले तरी केवळ मन्निष्ठ किंवा विशिष्टविषयिनिष्ठ नाही, ते सामान्यविषयिनिष्ठ आहे. विषयिसापेक्ष असूनही ते कोणा विशिष्ट व्यक्तीच्या अपेक्षेने विषयिनिष्ठ नसून कोणाही व्यक्तीच्या अपेक्षेने विषयिनिष्ठ असू शकेल. उदा. ‘अहिंसा चांगली आहे’ हे सामान्यपणे सर्वच विषयींना मान्य असावे असे म्हणता येते; आणि ‘निरपराध मनुष्याला शिक्षा करणे वाईट’, हे मत सामान्यपणे सर्वांना मान्य असावे असे वाटते.
पण कोणते मत विशिष्टविषयिसापेक्ष आहे आणि कोणते नाही हे आपण कसे ठरवितो?
मला वाटते या प्र नाचे उत्तर ‘अनुभवाने’, ‘अनुभवाधारित उद्गगमनाने’, हे असावे. ‘अमुक गोष्ट चांगली आहे’ हे वाक्य समाजातील काही तुरळक व्यक्ती सोडल्या तर बहुसंख्य व्यक्तींना मान्य असेल, तर ते आपल्याला अनुभवाने कळू शकते. सामान्यविषयिसापेक्ष वाक्य व्यक्तिनिष्ठ नसून ते बऱ्याच प्रमाणात विषयिनिरपेक्ष वाक्यासारखे असते. ‘अमुक गोष्ट चांगली आहे’ हे वाक्य ती केवळ मला आवडते या अर्थाचे नसून ती बहुतेक सर्वांना ती आवडते या सार्विकप्राय अर्थाचे वाक्य असते.
निसर्गाचे नियम सार्विक निरपवाद नियम असतात. परंतु ते तसे आहेत ही उद्गमनाने ज्ञात होणारी गोष्ट आहे, आणि उद्गमन कधीही पूर्ण नसते, किंवा पूर्ण होऊ शकत नाही; ते सदैव संभाव्य, अतिशय संभाव्य एवढेच असू शकते. तरी ते आपण केवळ संभाव्य नसून सार्विक आहे असे समजतो.
‘अमुक गोष्ट चांगली आहे’ या वाक्याचीही अवस्था उद्गामी सार्विक विधानासारखीच आहे असे दिसते.
पण निसर्गनियम ज्या अर्थाने संभाव्य असतात नैतिक वाक्ये त्याच अर्थाने संभाव्य असतात हे खरे असेल तर पूर्वी जे म्हणालो आहोत की नैतिक वाक्ये सत्य किंवा असत्य नसतात त्याचे काय? आणि नैतिक वाक्ये कथनात्मक नसून उपदेशक किंवा आदेशपर असतात असे जे आपण म्हणालो त्याचेही काय? नैतिक वाक्ये एकवचनी किंवा सार्विक असतात, आणि त्यांचे अर्थ ‘हे मला आवडते’ आणि ‘हे बहुतेक सर्वांना आवडते’ असे असतात. पण ही दोन्ही कथनात्मक वाक्ये आहेत, आणि म्हणून ती सत्य किंवा असत्य असली पाहिजेत. आणि नैतिक वाक्ये उपदेशक किंवा आदेशपर असतात हा ती आणि कथनात्मक वाक्ये यांच्यातील भेद आहे असे जे आपण वर म्हणालो त्याचे काय? मला वाटते नैतिक वाक्ये शुद्ध कथनात्मक वाक्यांपेक्षा अधिक संमिश्र अर्थाची असतात, हे वरील प्र नाचे उत्तर असावे. नैतिक वाक्यांच्या अर्थात शुद्ध कथनाच्या जोडीला एक कर्मोपदेशक अंगही असते. हे कर्मोपदेशक अंग आपण काय करावे हे सांगणारे असते. कथनात्मक अंगामुळे आपल्याला वस्तुस्थिति काय आहे ते कळते आणि उपदेशक अंगामुळे वस्तुस्थिति आपल्याला अनुकूल आहे की प्रतिकूल ते कळते आणि कर्मोपदेशक अंगानुसार आपण वागावे असा त्याचा भावार्थ असतो. पण आपण कसे वागावे, काय करावे, हे सांगणे शक्य आहे काय? आपण स्वतःला ते सांगू शकतो काय? आपण काय करावे हे आपण ठरवू शकतो काय? आपले हित कशात आहे हे आपण ओळखू शकतो हे समजावून सांगण्याची गरज नाही. प्राप्त परिस्थितीत आपण काय केले असता आपल्याला जास्तीत जास्त सुख प्राप्त होईल ह्याचा अंदाज आपण करू शकतो. आपण अमुक कर्म करावे की नाही हे ठरविणे म्हणजे कोणत्या कर्माने आपल्याला महत्तम सुख होईल याचा अंदाज बांधणे. हे आपण करू शकतो ही उघड गोष्ट आहे. आपण अनेक शक्य कर्मांपैकी एक निवडतो ही गोष्ट सिद्ध करण्याची गरज नाही.
पण एवढ्याने अनुभववादी नीति बरोबर आहे हे सिद्ध होत नाही. आक्षेपकांना अनेक वजनदार आक्षेप सुचतील. एक म्हणजे “नैतिक वाक्यांचे एक प्रमुख उद्दिष्ट अस्पृष्टच राहिले आहे. नैतिक वाक्ये ‘हे चांगले आहे’ आणि ‘हे वाईट आहे’ या एकाच प्रकारची आहेत असे आपण धरून चाललो आहोत असे म्हटले जाईल. नैतिक वाक्यांचे प्रधान कार्य कर्मोपदेश (action-guiding) हे आहे. ‘खरे बोलावे’, ‘परोपकार करावा’, ‘हिंसा करू नये’, इ. वाक्ये कथनात्मक काही सांगत नाहीत. या अंगाची अनुभववादी उपपत्ती तुम्ही अजून दिलेली नाही.’ दुसरे असे की “नीतीचे प्रधान उद्दिष्ट आपण आपले सुख महत्तम कसे होईल तेवढे पाहावे हे सांगण्याचे नसते. आपण इतरांशी कसे वागावे हे सांगणे तिचे प्रधान कार्य आहे. पण त्याबद्दल तुम्ही काहीच बोलला नाही. त्यामुळे नीतीशी असंबद्ध प्र नांतच तुम्ही गुंतून पडला आहात’, असा आक्षेप घेतला जाईल. या आक्षेपांना आपण काय उत्तर देणार आहोत?
वरील आक्षेप रास्त आहेत हे मान्य केले पाहिजे. त्यांना समर्पक उत्तरे देऊनच अनुभववादी उपपत्ती सिद्ध करता येईल. पण हा विषय फार मोठा असल्यामुळे त्याचा विचार पुढील लेखापर्यंत रोखून ठेवणे इष्ट होईल असे वाटते. म्हणून इथे लेखाला विराम देतो.
कर्मयोग, प्लॉट नं. ४, बलराज मार्ग, धंतोली, नागपूर — ४४० ०१२