आ.सु.च्या नोव्हें. २००२ च्या अंकांतील दोन तीन लेखांनी काही बहुचर्चित विषय हाताळले आहेत. माझ्या प्रतिक्रिया अशा :
नागपूरची एम्प्रेस मिल बंद होताच कामा नये, जंगले २०० वर्षांपूर्वी होती तशीच राहिली पाहिजेत, विशिष्ट जंगले फक्त भिल्लांच्याच मालकीची आहेत, नर्मदेचा परिसर तिथे पिढ्यान् पिढ्या राहणाऱ्या लोकांचाच फक्त आहे असे म्हटले तर मुंबई फक्त तिथल्या कोळी लोकांचीच आहे असेही म्हणावे लागेल. नर्मदेचे पाणी गुजरातपर्यंत नेणे चुकीचे असेल तर पंजाबचे धान्य इतर प्रांतांना देणेही चुकीचे ठरेल. रस्तारुंदीकरणासाठी खाजगी मालमत्ता ताब्यात घेणेही चुकीचे ठरेल.
कुणाच्याही परंपरागत हक्कांना धक्का न लागू देता सरकारने सगळ्यांची सर्व प्रकारची सोय केली पाहिजे ही कल्पनाच मला हास्यास्पद वाटते. सरकारने सगळ्यांची सर्व प्रकारची सोय केली पाहिजे अशी स्वतंत्र कल्पनासुद्धा हास्यास्पद वाटते.
शिक्षणाच्या बाबतीत मधुकर कांबळे सेप्टेंबर अंकात म्हणतात की सगळ्यांना शिक्षण देण्याचा हेतूच सरकारजवळ नव्हता; आणि मग ते विचारतात की ‘कोणत्या हक्काने भारत सरकार गोरगरिबांच्या शिक्षणावर गदा आणू इच्छिते?’ मी उलटा प्र न विचारतो की कोणत्या हक्काने गोरगरीब (किंवा इतर कुणीही) सरकारकडून शिक्षणाची किंवा स्वास्थ्यसेवेची किंवा प्रदूषणरहित शहरांची ‘मागणी’ करतात?
मीच हा प्र न विचारतो असे नाही. प्रसिद्ध विधिज्ञ श्री सत्यरंजन साठे यांनीही असाच प्र न निराळ्या संदर्भात उपस्थित केला आहे. Journal of Indian School of Political Economy च्या ऑक्टो. डिसेंबर १९९८ च्या अंकात त्यांनी लिहिलेल्या एका लेखात त्यांनी मांडलेले काही विचार मी पुढे देत आहे.
‘स्वातंत्र्य आणि अधिकार या दोन कल्पना वेगळ्या आहेत. मी काही करावे किंवा न करावे असे बंधन नसणे म्हणजे स्वातंत्र्य. हे स्वातंत्र्य स्वतःसिद्ध आहे. ती वस्तू कायद्याने दिलेली अशी नाही. त्या स्वतःसिद्ध स्वातंत्र्याला मर्यादा घालण्याकरता फक्त काय ती कायद्याची जरूरी आहे. न्यायिक दृष्ट्या, स्वातंत्र्य म्हणजे कर्तव्याचा अभाव. पण हक्क या कल्पनेत कर्तव्य ही कल्पना अनुस्यूत आहे. मला जर तुमच्याविरुद्ध काही हक्क असतील तर त्याचा अर्थ असा होतो की तुम्हाला माझ्याप्रति काही कर्तव्ये आहेत. हा फरक समजल्यावर मग असे म्हणता येईल की कायद्याच्या प्रक्रियेने फक्त काही प्राथमिक मानवी हक्कांचे संरक्षण होऊ शकते, ज्या हक्कांद्वारे सरकारवर किंवा इतर व्यक्तींवर एक विशिष्ट क्रिया न करण्याचे बंधन येते. उदाहरणार्थ सरकार कोणालाही बेकायदा अटक करू शकत नाही, कोणीही दुसऱ्याची संपत्ती बेकायदेशीरपणे हस्तगत करू शकत नाही. या प्राथमिक हक्कांच्या पलीकडे जाऊन कोर्टाने असे ठरवले की प्रत्येकाला स्वच्छ पाणी स्वच्छ हवा व निवारा मिळण्याचा हक्क आहे, तर तो निर्णय व्यवहारात उतरवता येईल का? (पहा JISPE, Vol X, No 4, पृ. ६०४ आणि ६१४) पण सुप्रिम कोर्टाने घटनेच्या, मुळात सीमित अर्थ असलेल्या कलमांचा व्यापक अर्थ लावून (सध्यातरी) अव्यवहार्य असलेल्या आदर्श तत्त्वाला अव्यवहार्य पायाभूत हक्कांचा दर्जा दिला आहे (मूळ वाक्य : “It will only amount to conversion of non-enforceable directive principle into a non-enforceable fundamental right”). सर्व भारतीयांना प्राथमिक शिक्षण मिळण्याचा मूलभूत हक्क आहे हे म्हणणे म्हणजे निव्वळ कल्पनारम्यता आहे. हवा, पाणी शिक्षण, रोजगार हे दुसऱ्या क्रमांकाचे ‘हक्क’ आहेत ते साध्य तेव्हाच होऊ शकतील की जेव्हा सरकार त्याकरता पुरेशी साधन-संपत्ती उपलब्ध करू शकेल.’
श्री. साठे यांच्या वरील विवेचनावरून हे दिसेल की मनुष्याचे जे मूलभूत अधिकार आहेत ते स्वातंत्र्याच्या स्वरूपाचे आहेत. त्या स्वातंत्र्याच्या आड कोणी येऊ नये एवढीच त्याची व्याप्ती आहे. एखाद्या व्यक्तीला दुसऱ्याने काहीतरी दिले पाहिजे, त्याच्याकरता काहीतरी केले पाहिजे असा त्या पहिल्या व्यक्तीचा नैसर्गिक अधिकार नाही. गरिबांकरता, अबलांकरता इतरांनी काहीतरी केले पाहिजे हा एक नैतिक आदर्श आहे, नैतिक कर्तव्यही म्हणा हवे तर पण कायदेशीर हक्क किंवा कायदेशीर कर्तव्य नव्हे.
हे नैतिक कर्तव्य समाजाने करायला पाहिजे. ‘सरकार’ या ऐवजी मी ‘समाज’ असा शब्द मुद्दामच वापरला. सरकार नावाच्या यंत्रणेची ती जबाबदारी नव्हे. समाजाचे कार्यकारी अंग म्हणून सरकार काम करते, सरकारला एक कायदेशीर व्यक्तिमत्त्व आहे हे खरे; पण ती व्यक्ती आज कर्जबाजारी आहे. पैशाची नाटके करता येत नाहीत असा एक नेहमीचा वाक्प्रचार आहे. पैसा असला तरच हेतुपूर्ती होऊ शकते. गोरगरिबांच्या हक्काचा’ प्र न उपस्थित करून किंवा सरकारच्या नैतिक कर्तव्याची त्या संस्थेला जाणीव करून देऊन पैशांचा प्र न सुटणारा नाही. पैशाचा प्र न कसा सोडवायचा याचे उत्तर देणे विचारवंतांना शक्य असेल तर त्यांनी ते करावे. अन्यथा सरकारच्या नैतिक किंवा कायदेशीर जबाबदारी बद्दल बोलत न राहता खाजगी प्रयत्नांनी काय करता येईल याचे मार्ग सुचवावेत.
भ. पां. पाटणकर, ३-४-२०८ काचीगुडा, हैदराबाद — ५०० ०२७
समाजकार्य करणाऱ्यांना नेहमी अंधश्रद्धेचा मोठा अडथळा होतो, आणि तो दूर करणे केवळ कठीणच नव्हे तर अशक्य आहे असे वाटू लागते. धर्माने सांगितलेल्या अंधश्रद्धा (स्वर्ग, नरक, सद्गती) आणि परंपरेतून आलेल्या कर्मकांडातील अंधश्रद्धा, परान्नपुष्ट हितसंबंधितांनी प्रसारित केलेल्या आणि पुरोहित-शाहीने जपलेल्या अंधश्रद्धा, यांची पाळेमुळे मनांत अगदी खोलवर रुतलेली आहेत.
काही महिन्यांपूर्वी अयोध्येत राममंदिर उभारले जावे म्हणून विहिंपने सामूहिक रामजपाचा कार्यक्रम राबविला होता. सामान्यांना राजकारण्यांपेक्षा प्रभुरामचंद्र हा देव वाटतो; आणि त्याचा जप करणे हे पुण्यकर्म वाटते. साहजिकच, ज्यांना पोटापाण्याची चिंता फारशी सतावीत नाही अशा संघपरिवारातल्या लोकांनी आणि रामाला देव मानणाऱ्या अनेकांनी ह्या कार्यक्रमांत भाग घेतला. सामान्यांना रामजपाचे पुण्य (?). विहिंपला आपला कार्यक्रम सफल झाल्याचे समाधान!
देव हा सर्वशक्तिमान आणि अमर असतो ही जनसामान्यांची श्रद्धा. बाबराने अयोध्येतील राममंदिर पाडून तिथे मशीद बांधली तेव्हा हा अमर आणि सर्वशक्तिमान राम त्या बाबराला अटकाव करू शकला नाही. भक्तांच्या मते (खरे म्हणजे त्यांना मतच नसते) देवाची चाल समजत नाही; तरी त्याच्या नामाचा जप केला की अयोध्येत राममंदिर उभे राहिलेच समजा. कारसेवकांनी जेव्हा मशीद पाडली तेव्हा अल्लानेही काही हालचाल केली नाही! “अल्ला के मर्जी बगैर पेड का एक पत्ता भी नहीं हिल सकता” असे श्रद्धापूर्वक मानणाऱ्या अल्पसंख्यकांना अल्लाच्या या निष्क्रियतेबद्दल आ चर्य वाटत नाही.
समजा, विहिंपने रामजपाऐवजी, “प्रत्येक हिंदूने शरयूतटी अन्नपाणी त्यागून ‘तप’ करण्यास बसायचे—- (आमरण),” असा कार्यक्रम राबविला असता तर? अरे बाप रे! हे जमणे कठीण—-अशक्यच. त्यापेक्षा आचरणात आणायला सोपा, सुटसुटीत, सुरक्षित असा मार्ग म्हणजे ‘जप’. असले फुकटचे पुण्यकर्म करायला जनता तयार! नाहीतरी “वदनिं कवळ घेतां नाम घ्या श्रीहरीचें, सहज हवन होतें नाम घेतां फुकाचें!’ फुकटचे रामनाम! कष्ट नाहीत. लगेच जेवण! पिढ्यानपिढ्या अन्नग्रहणातून ही फुकटेगिरी इतकी रोमारोमांत भिनली आहे की ती कोण उखडणार? मागे आपल्या भूतपूर्व पंतप्रधानांनी “आराम हराम है’ ही घोषणा जनतेला दिली. सध्या तर मोफत, फुकट, फ्री चा जमाना! तीन वड्या घ्या आणि एक फुकट! रामजप करा, अयोध्येत राममंदिर साकार!
भाविक लोकांना खरेखुरे मार्गदर्शन हवे आहे. अंधश्रद्धेच्या मूळ ढाच्याला धक्का न लावता त्यांना थोडेफार तरी कार्यप्रवण करण्याच्या हेतूने तयार केलेला एक लोक परवा एका मित्राने मला दाखविला, तो असा –
“वदनिं कवळ घेतां नाम घ्या मातृभूचें सहज स्मरण होतें आपुल्या बांधवांचे कृषिवल कृषिकर्मी राबती दीनरात श्रमिक श्रम करोनी वस्तू या निर्मितात स्मरण करून त्यांचे अन्न सेवा खुशाल
(उदरभरण आहे चित्त होण्या विशाल)” अंधश्रद्धेच्या मूळ ढाच्यावर केलेला हल्ला हा प्रखर विरोधाला आमंत्रित करतो. फुकटेपणाच्या आरामखोर वृत्तीला जाग आणण्यास वरील लोक मला बरा वाटला. विरोधाला तोंड देण्यात खर्च होणारी आपली शक्ती वाचविण्यास कार्यकर्त्यांना ह्याचा उपयोग व्हावा. नाही तरी क्विनाईनची गोळी शुगरकोटेडच असते की!
आ.सु.च्या वाचकांना/लेखकांना असे काही सुचल्यास त्यांनी जरूर लिहावे, समाजकार्यकर्त्यांना त्याची मदत होईल असे वाटते.
द. रा. ताम्हनकर, ६७५ गव्हे, पो. दापोली, जि. रत्नागिरी नाम घेतां फुकाचे
महाराष्ट्र विज्ञान परिषद पत्रिकेच्या नोव्हेंबर २००२ अंकामध्ये ‘आयुर्वेदिक भस्म’ आणि आनुषंगिक विषयांबाबत चर्चा आहे.
“कित्येक वर्षे भस्माच्या प्रणालीविरुद्ध कोणी आवाज उठविला नव्हता कारण (त्यावेळी) ही भस्मे निर्धोक (दुष्परिणामविरहित) होती . . . त्यानंतर आयुर्वेदिक औषधे बनविणाऱ्या कंपन्या बाजारात आल्या . . . भस्मात विषारी धातु शिल्लक राहू लागले . . . रुग्णांच्या मूत्रपिंडांत जमा होऊ लागले.” अशी अधिकृत भूमिका संपादकीया-मध्ये मांडलेली आहे.
परंतु ह्या संपादकीयानंतरच्या पहिल्याच लेखात डॉ. आठवले म्हणतात, “आयुर्वेदाच्या औषधांना दुष्परिणाम (साईड इफेक्ट) नसतात ही एक चुकीची समजूत आहे.” त्याच पानावर ते पुढे म्हणतात की, “आयुर्वेदिक औषधे विषारी नाहीत असे नाही. क्रूड असल्यामुळे त्यातील अॅक्टिव्ह इन्ग्रेडियंट कमी प्रमाणात असतो. त्यामुळे त्याचे दुष्परिणाम कमी होतात, पण परिणामही कमी होतात.’ ‘भस्मांना यापूर्वी दुष्परिणामच नव्हते’ असे विधान अशास्त्रीय आहे.
आयुर्वेदाच्या या दुष्परिणामामध्ये आता प्रचंड वाढ झाली आहे असे संपादकांना म्हणावयाचे असले तर ती आयुर्वेदाच्या आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत चिंतेची बाब आहे. आधुनिक वैद्यकाची औषधांची उत्पादने करणाऱ्या असंख्य कंपन्या फार पूर्वीपासूनच बाजारात आहेत. पॅरासिटॅमॉल, ॲस्पिरिन इत्यादि वेदनाशामके; जेल्युसिल सारखी अॅसिडिटीनाशके; खोकल्याची औषधे यांच्या जाहिराती प्रसिद्ध होतात. परंतु आधुनिक वैद्यकाच्या औषधांमध्ये असे घातक घटक शिल्लक उरत नाहीत. कमी दर्जाच्या/घातक आयुर्वेदिक औषधांचा बाजारात असा सुळसुळाट झाला आहे असे जर संपादकांचे मत असेल तर म. वि. प. ने अन्न आणि औषध-प्रशासन, पोलिस, आरोग्य विभाग यांच्याकडे याबाबत पाठपुरावा केला पाहिजे, तसेच ग्राहक चळवळ आणि इतर स्वयंसेवी संस्थांच्या सहाय्याने या औषधांच्या दुष्परिणामांबद्दल लोकजागृती अभियान हाती घ्यावे.
आयुर्वेदिक चिकित्सापद्धती म्हणजे काय?’ या लेखात डॉ. व्ही. बी. आठवले म्हणतात, “(आयुर्वेदात) दुसरा एक चांगला दृष्टिकोन आहे–पूर्वजन्मातील पापे, रोग-रूपाने ह्या जन्मात येतात.” मराठी विज्ञान परिषद या ‘विज्ञान’ प्रसारास वाहून घेतलेल्या संस्थेच्या मासिकात असे विचार कोणत्याही टीका-टिपण्णीशिवाय प्रसिद्ध व्हावेत ही चिंतेची बाब आहे. सजीव आणि निर्जीव यांमध्ये सुस्पष्ट सीमारेषा आहेत अशी पूर्वी समजूत होती. याला विषाणू (व्हायरस)च्या शोधामुळे एक मोठा धक्का बसला. प्रियॉनचा शोध लागल्यानंतर तर सजीव कोण आणि निर्जीव कोण हे वर्गीकरणच अशक्य झाले आहे. सजीव आणि निर्जीव यांत फरकच करता येत नाही. या परिस्थितीत (निः’जीव वस्तुमाना-तून ‘स’जीवाचा) जन्म, आत्मा, पुनर्जन्म, ईश्वर या अनेक संकल्पनाच अग्राह्य होतात.
सर्व वैद्यकीय शास्त्रांमध्ये सर्वांत पुरातन सर्वांत सनातन असणे हा आयुर्वेदाचा मुख्य ‘गुण’विशेष असल्याचे सांगितले जाते. याबाबत डॉ. सुहास पुरोहित म्हणतात, “अॅस्पिरिनचा शोध लागून १०० वर्षे झाली, तरीदेखील त्यावर संशोधन सुरूच आहे. आयुर्वेदिक औषधांवर असे संशोधन होत नाही.’ (म. टा. दि. ०८–०५–२००१)
उपलब्ध ज्ञानावर वेळोवेळी संकल्पना/सिद्धान्त/निष्कर्ष मांडले जातात. कोणतेही ज्ञान अंतिम नसते. त्यात कधीही बदल/भर/काटछाट शक्य असते. वापरातील संकल्पना/सिद्धान्त/निष्कर्ष या बाबी सद्यःकालीन परिस्थितीशी किती सुसंगत आहेत याची वारंवार तपासणी आवश्यक असते. जळणाऱ्या वस्तूतून ‘फ्लॉजिस्टॉन’ हे द्रव्य निघून जाते त्यामुळे वस्तूचे वजन वाढते असा सिद्धान्त पूर्वी प्रचलित होता. प्रीस्टलेने आणि इतरांनी सातत्याने प्रयोग केले आणि सद्यःकालीन ज्ञानाशी अधिक सुसंगत सिद्धान्त मांडले. त्यातून ऑक्सिजनचा शोध लागला. बदलत्या परिस्थितीत जुनाट कल्पनांना चिकटून राहणे घातक असते. डॉ. पुरोहित नमूद करतात की, “१० हजार वर्षांपूर्वीच्या पोथ्या व लोक पाठ म्हणून ब्रह्मज्ञानाचा आव आणणाऱ्यांचा संशोधनात काडीइतकाही सहभाग नसतो.” (म. टा. दि. २८– ०३–२००२)
आजाराचे मूळ ‘कफ, पित्त, वात’ या दोषांत आहे असा सिद्धान्त पुरातन काळी मांडला गेला. पुरातन ज्ञानावर असा सिद्धान्त मांडला जाणे यात काहीच चूक नाही. ग्रीक प्रणालीतसुद्धा हेच दोष चतुर्दोष या स्वरूपात मांडले गेले. परंतु पा चात्त्य वैद्यक त्या कल्पनांना आंधळेपणाने चिकटून राहिले नाही. आता इतर शास्त्रशाखां मधील प्रचंड प्रगतीचा वैद्यकशास्त्राला लाभ होऊ शकतो. ‘कफ, पित्त, वात’ या आणि इतर संकल्पनांची वारंवार आणि तपशीलवार तपासणी शक्य आणि आवश्यक आहे. आयुर्वेदातील संकल्पना ‘टेस्ट ट्यूब’च्या तपासणी पलिकडील आहेत असा समज असेल तर तो बिनबुडाचा आहे. दुसरे असे की, वैद्यकशास्त्राच्या संशोधनात ‘टेस्ट ट्यूब’ मधील–इन व्हिट्रो–शरीराबाहेरील परिणाम पाहिले जातात इतकेच नव्हे तर, ‘टेस्ट ट्यूब’ बाहेरील–इन व्हायवो–शरीरातील परिणामसुद्धा तपासले जातात.
पु रातन काळाबाबत वृथा अभिमान बाळगण्याचे दुष्परिणाम आपण भोगत आहोत. कोणीही भगवे/हिरवे कपडे इत्यादी घालून वावरावे, प्राचीन परंपरांचा विषय घेऊन भावनांना भडकवावे, यामुळे विज्ञान-प्रसाराच्या चळवळीपुढे मोठी आव्हाने निर्माण होत आहेत. वैज्ञानिक मनोवृत्तीला विरोध करण्याला कायद्यात पायबंद नाही, परंतु वैज्ञानिक मनोवृत्तीच्या प्रसारापुढील धोक्यांची दखल न घेता भावना दुखविल्याच्या कांगाव्याबाबतसुद्धा कायदा संवेदनशील आहे.
त्यामुळे प्राचीन परंपरा इत्यादींबाबत विज्ञान प्रसाराच्या चळवळीने अधिक जागरूक राहणे आवश्यक आहे.
[जोशींनी हे पत्र मराठी विज्ञान परिषदेला लिहिले, पण ते आ.सु.च्या वाचकांनाही उपयुक्त आहे. —- संपादक
राजीव जोशी, “Tattvabodh” Near Check-Naka, Highway, Neral (Raigad) 411101
श्री. श्याम कुळकर्णी यांच्या माझ्या “भारतीय संस्कृती आणि स्टेम सेल्स’ या लेखावरील आक्षेपांबद्दल.
१. मानवी समुदायाच्या प्रथमावस्थेत मानव कसा होता याबद्दल निरीक्षण असूच शकत नाही. त्याबद्दल कल्पनाच करता येतात, व या कल्पना तर्कसुसंगत आहेत की नाहीत एवढेच पाहावयाचे असते. प्रथमावस्थेत व्यवसायांचे विशेषीकरण झाले नसल्याने प्रत्येकाला आपली हत्यारे, घरे, वस्त्रे (कातडी कमावणे) व अन्न कमावणे साठवून ठेवणे वगैरे सर्व गोष्टी स्वतःच्या स्वतःलाच कराव्या लागत होत्या, ही कल्पना माझ्या मते तर्काला धरून आहे.
मूळ भारतीय व्यवसाय-बद्धतेचा परिणाम उच्चशिक्षित व्यक्तींमध्ये व शहरांमध्ये अलिकडच्या काळात क्षीण झाला आहे यात वादच नाही. मी भारतीय संस्कृतीबद्दल विधाने केली आहेत ती गेल्या हजार–दोन हजार वर्षांबद्दल, खेड्यांतील व अल्पशिक्षित व्यक्तींबद्दल अधिक खरी आहेत. अलिकडे, शिक्षणामुळे, (पा चात्त्य संस्कृतीच्या प्रभावाने?) अनेक व्यक्तींनी आपले व्यवसाय बदलले आहेत यात शंका नाही. पण समजा दलित समाजातील व्यक्ती डॉक्टर झाली, तर ती फक्त डॉक्टर होते—-आपल्या बाकीच्या क्षमता—-कातडी कमावणे, जनावरे सोलणे वगैरे सोडून द्या—-पण रोजच्या जीवनातील हत्यारांची दुरुस्ती, सुतारकाम, प्लंबिंग वगैरे क्षमताही मिळवत नाही.
“व्यवसायांची जातींशी घट्ट गाठ मारल्यामुळे भारतीय समाजात कालपरवा पर्यंत (व खेडेगावांत बऱ्याच प्रमाणात आजही) व्यवसाय बदलणे अवघड होते. त्यामुळे समाजाचे बांधीव स्तरीकरण (Rigidity) झाले, लवचीकपणा नष्ट झाला, बदलास परिस्थिती प्रतिकूल राहिली” हे माझ्या लेखातील मध्यवर्ती सूत्र आहे. हे कुळकर्णी यांना मान्य आहे की नाही?
योगायोगाने डिसेंबर २००२ च्या अंकात पृष्ठ क्र. ३३४ वर गुहा व गाडगीळ यांनी “पेशांचे जातीरूप झाल्याने’ हे परिणाम दाखवले आहेत. मला त्यापलीकडे जाऊन “बलुतेदारीमुळे” केलेले काम, त्याची गुणवत्ता व मिळणारा मोबदला यांच्यामधील थेट संबंध तुटला व त्यामुळे सर्व समाजाच्या कार्य-संस्कृतीवर परिणाम झाला, मानसिकताच बदलली व विविध व्यवसायांमधील तंत्र-सुधारणा थांबली असे “विधान’ करावयाचे आहे. या मध्यवर्ती संकल्पनेविषयी आजचा सुधारकच्या वाचकांकडून प्रतिसाद मिळावा. आजही सरकारी नोकर व कामगार संघटना यांची मागणी कामाची गुणवत्ता व आकार-प्रमाण (Quality and Quantity) यांच्यात व वेतनात संबंध असू नये हीच असते.
२. जनुकीय बदलांनी भारतीय मुलांच्या क्षमता नष्ट झाल्या असा माझा दावा नव्हता. जन्मताना क्षमता असतातच; पण संस्कृतीमुळे–संस्कारांमुळे त्यांच्या विकास फक्त एकाच दिशेने होतो, व इतर क्षमतांचा पुरेसा विकास होत नाही.
३. अमेरिकन कामगाराच्या व्यवसायाचे आत्यंतिक विशेषीकरण झाले, पण त्याच्या स्व-व्यवसाय सोडून इतर क्षमता शाबूत राहिल्या. त्यामुळे पेशाबद्दल, स्थान-बदल, सामाजिक–स्तर–बदल सहज शक्य होते व आहेत.
४. विशेषीकरण हानिकारक आहे असा माझा दावाच नाही. जाती-व्यवस्था व बलुतेदारी यामुळे स्पर्धा व लवचीकपणा नष्ट होऊन विशेषीकरणही नीट झाले नाही असा माझा दावा आहे.
५. आजचा सुधारक वाचणारे सुंदर गार्डन मध्ये राहणारे (बहुधा उच्च-विद्याविभूषित) कुळकर्णी व त्यांचे कुटुंबीय/मित्र मंडळी सर्वसाधारण भारतीय माणसाचा (आजच्या व कालच्या) नमुना (Sample) म्हणून योग्य नाहीत. पुणे शहरातील रस्त्यांवर सहज दिसणारी कॅशिया (काशीद) ताम्रशिंगी (पेल्टोफेरम) बहावा (अमलताश) नीलमोहर (जकरांडा) व कोंबडा (स्पॅथोडियम) ही पाच झाडे आहेत. श्री. श्याम कुळकर्णी यांनी रस्त्यावरून जाणाऱ्या अनोळखी १० माणसांना थांबवून या झाडांची नावे विचारावी. माझे निरीक्षण आहे की त्यातील एकालाही यांची नावे सांगता येणार नाहीत.
६. श्रीकृष्ण सांगतो ते चूक आहे, असे सांगणाऱ्या लेखकांचा व पुस्तकांचा शोध घेण्यासाठी मोठे संशोधनच करावे लागेल. कुळकर्णी यांनाही गोरे व आठले ही दोनच नावे सांगता आली यात सर्व काही आले.
७. स्टेमसेल्सपासून मूळ वृक्षच निर्माण व्हावा अशी अपेक्षा आहे. माणसाच्या स्टेमसेल्सपासून मानवी अवयव निर्माण व्हावेत अशीच अपेक्षा आहे—-त्यापासून कुत्री, मांजरे, वाघ निर्माण व्हावे अशी अपेक्षा नाही. चांभार व रेल्वे मंत्री, ब्राह्मण व सेनाधिकारी, क्षत्रिय व संगणकतज्ञ, शेतकरी व क्षेपणास्त्रतज्ञ व राष्ट्रपती, या माणसाच्याच प्रती आहेत. त्यांच्यामध्ये आंबा, वड व पिंपळ इतका “जैविक’ (Biological Species) फरक आहे असे श्री श्याम कुळकर्णी यांना वाटते हादेखील भारतीय संस्कृतीचाच परिणाम आहे.
८. मेकॉलेच्या शिक्षणपद्धतीविषयी, त्यापूर्वीच्या शिक्षणाविषयी व त्यानंतरच्या शिक्षणाविषयी अपूर्ण क्रांति हे श्री. रा. भा. पाटणकर यांचे पुस्तक वाचावे. म्हणजे बरेच गैरसमज दूर होतील.
९. आधुनिक शिक्षण, शहरीकरण, औद्योगिक संस्कृती, परदेशांचा संपर्क यामुळे, (व आजचा सुधारकमुळे) भारतीय संस्कृतीत बदल होत आहेत हे मान्य.
सुभाष आठले, २५ नागाळा पार्क, कोल्हापूर — ४१६ ००३