ऐलतीर–पैलतीर

या लेखात तुम्हाला ‘साठी’ पार केलेल्या पण आजही झेपेल तेवढे काम करणाऱ्या व या कामातून—किंवा विरंगुळ्यातून म्हणा हवे तर—आनंद अनुभवणाऱ्या वृद्धयुवांची ओळख करून देणार आहे. हे वृद्ध युवक किंवा युवावृद्ध ‘विज्ञानवाहिनी’ या संस्थेचे सदस्य आहेत; काही वास्तविक युवक/युवतीसुद्धा विज्ञानवाहिनीत आहेत.
या वृद्धांपैकी काही जणांचा तर ‘पैलतीर’ या संकल्पनेवरच विश्वास नाही. काहींचा असेल पण त्यांची मने ऐलतीरावरच आहेत. कदाचित बऱ्याच वेळा शालेय मुलांच्या संपर्कात असल्याने असे झालेले असेल. त्यांची वैयक्तिक ओळख करून घेण्याआधी त्यांना लाभलेल्या ‘विज्ञानवाहिनी’ या आनंदस्रोताची थोडी ओळख करून घ्यायला हवी.
‘विज्ञानवाहिनी’ या संस्थेची स्थापना पुष्पा देशपांडे व मधुकर देशपांडे या दंपतीने केली. मधुकर देशपांडे हा राष्ट्रसेवादलाचे संस्कार असलेला, ‘भूदाना’त महिनाभर सहभागी झालेला असा असामी. शालेय शिक्षण गुलबर्यात, महाविद्यालयीन शिक्षण हैद्राबादेत आणि पुण्यात, गणिताचा प्राध्यापक म्हणून नोकरी फर्गसन महाविद्यालय पुणे आणि पुणे विद्यापीठ येथे. त्यानंतर अमेरिकेत पीएच्.डी. आणि १९६५ ते १९९४ ही एकोणतीस वर्षे गणितात मार्केट युनिव्हर्सिटीत प्राध्यापकी. पुष्पा देशपांडे यांचे शालेय शिक्षण हैद्राबादमध्ये, महाविद्यालयीन शिक्षण हैद्राबाद व पुणे येथे. नंतर पुण्यात गणितातच प्राध्यापकी. दोघांची मैत्री हैद्राबादेतली, पुण्यात त्याची परिणती प्रेमविवाहात झाली. १९६६ ते १९९४ ही अठ्ठावीस वर्षे अमेरिकेत. त्यातली २२ वर्षे गणिताची शिक्षिका किंवा प्राध्यापिका!
१९९४ साली सर्व वैयक्तिक जबाबदाऱ्यांची पूर्तता झाल्यावर दोघांनी निवृत्ती स्वीकारली. जराशी लौकर निवृत्ती स्वीकारण्याचे कारण मधुकरच्या योजनेप्रमाणे दोघांनी भारतात परत येऊन शाळांमधून गणित-शिक्षणासाठी दौरे करावे असे होते.
पुष्पाने याला फार सुंदर पर्याय सुचवला—-फिरती प्रयोगशाळा निर्माण करून तिच्याद्वारे शाळांमधून विज्ञान शिक्षणाचा प्रसार करणे व उगवत्या पिढीत वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे. त्यानुसार दोघांनी ७/८ लाख रुपये पदरमोड करून काम सुरू करण्याचा निर्णय घेतला. “महाराष्ट्र सेवा समिती, कॅनडा’चे डॉ. जगन्नाथ वाणी यांनी देशपांड्यांना त्याच्या उद्योगाचे ‘प्रकल्पात’ रूपांतर करण्याचा सल्ला दिला व या प्रकल्पासाठी कॅनडा-मधील दोन संस्थांशी संपर्क साधून दिला. “कॅनडा इंटरनॅशनल डेव्हलपमेंट एजन्सी” व “वाइल्ड रोझ फाऊंडेशन’ या दोन संस्थांनी मॅचिंग ग्रँटस् दिल्या व सुमारे १७/१८ लाख रु. चा फिरती प्रयोगशाळा हा प्रकल्प कार्यान्वित झाला.
“विज्ञानवाहिनी’ या संस्थेची धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी झाली. आयकर खात्याने 80 G खाली परवाना दिला.
संस्थेच्या पहिल्या दोनतीन वर्षांच्या कारभारात डॉ. जगन्नाथ वाणी व त्यांची धुळ्यातील का. स. वाणी प्रतिष्ठान ही संस्था यांनी फार मदत केली. १९९४–९५ च्या डिसेंबर-जानेवारीमध्ये या फिरत्या प्रयोगशाळेच्या संकल्पनेची चाचणी म्हणून ११ शाळाभेटी झाल्या. त्यांच्या समाधानकारक प्रतिसादानंतर ग्रामीण भागातल्या विनाअनुदान शाळांमध्ये हा प्रकल्प राबवण्याचा निर्णय झाला.
१९९५ मार्च ते जून या चार महिन्यांत पुष्पा देशपांडे यांनी जवळपास एकटीने हव्या तशा प्रयोगशाळेची बांधणी करून घेतली आणि संस्थेच्या कामाला १४ जुलै १९९५ ला सुश्री शबाना आझमी यांनी केलेल्या उद्घाटनानंतर सुरुवात झाली.
या फिरत्या प्रयोगशाळेचा ‘शाळादिवस’ असा असतो. शाळेतल्या ८० विद्यार्थ्यांना प्रबोधन आणि त्यांनी स्वतः केलेल्या प्रयोगांद्वारे विज्ञानाचे शिक्षण देणे.
मुलांच्या व शाळेच्या स्टाफच्या प्रतिसादावरून हे काम छान चालले आहे असे वाटते. १९९७ पासून प्रकल्पाचा निधी एखाद्या वर्षातच संपेल अशी अवस्था आली होती. तोपर्यंत संस्थेत १५/१६ स्वयंसेवकांचा संवाद व कृतिगट निर्माण झाला होता. विश्वस्त व संवाद व कृतिगट हे संस्थेच्या कारभाराचे निर्णय घेत असत व आजही घेतात. संस्थेचा सुमारे चार लाख रुपयांचा वार्षिक खर्च आम्ही व्यवस्थितपणे करू शकू एवढा कायमनिधी भारतीय व विदेशी नागरिकांकडून जमा झाला आहे. टक्केवारी सुमारे भारतीय ६०%, विदेशी ४०%.
एकूण ११ विश्वस्त व त्यांच्यासह एकूण २३ जणांचा संवाद व कृतिगट असे संस्थेचे सध्याचे स्वरूप आहे. निर्णयप्रक्रिया दरमहाच्या बैठकी व एक वार्षिक बैठक यांच्यात सहमतीने होत असते.
‘विज्ञानविचार’ हे एक पाण्मासिक, सहा फिरती वाचनालये, वार्षिक विद्यार्थीशिबिर, ७/८ विज्ञानशिक्षक शिबिरे असे कामाचे स्वरूप आहे. ग्रामीण भागात एक विज्ञान केंद्र उभारण्याची खटपट चालू आहे.
अहमदनगर जिल्ह्यात श्रीगोंदा तालुक्यातल्या ‘सुरोडी’ या सुमारे ७०० लोकवस्तीच्या गावात ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या धर्तीवर सुरोडीग्रामस्थ व विज्ञानवाहिनीचे अशोक रुपनेर एक प्रकल्प राबवीत आहेत. यासाठी निधी विज्ञानवाहिनीने मिळवला आहे. ग्रामस्थांचाही निधि-संकलन व श्रमदान याला फार मोठा प्रतिसाद आहे. ‘ग्रामसभा’ ही गावाच्या हिताचे निर्णय घेते आणि ग्रामसभेचे काम एकमताने आणि पारदर्शीपणे चालले आहे. ग्रामसभेत आणि प्रकल्पात स्त्रियांचा फार मोठा वाटा आहे. वेगवेगळे १२ लहानमोठे बांध व भरीस शासनाने बांधलेले ४ बांध यामुळे ‘शेतीचे व पिण्याचे पाणी’ या प्र नाची सुमारे ४०% सोडवणूक झाली आहे. वनखात्याने गावच्या गायरानात सुमारे ३१,००० वृक्षांची लागवड केली आहे. अशा या संस्थेतल्या ‘वृद्धयुवांचा’ परिचय आता करून घ्यायचा आहे.
पद्माकर जोग हे आमच्यातले सर्वांत ज्येष्ठ कार्यकर्ते. वय ७२ वर्षे, चेहऱ्यावर स्मितहास्य आणि उत्साह युवकाचा! फर्गसन कॉलेजमध्ये प्राध्यापकी केल्यावर काही वर्षे भौतिकशास्त्राचे व गणिताचे क्लासेस चालवले. आता त्यातूनही निवृत्त! पण विज्ञानवाहिनीतले त्यांच्या वाट्याचे काम त्यांना अपुरे वाटते. त्यामुळे ‘बीड’ जिल्ह्यातल्या ‘डोमरी’ येथील दीनदयाळ गुरुकुलात वर्षातून ४/५ आठवडे मुलांना गणित आणि विज्ञान शिकवण्यासाठी जाऊन राहतात.
मधुकर व पुष्पा देशपांडे यांचा परिचय आधी आलाच आहे. श्रीनिवास ताटके हे आर्मामेंटस् रिसर्च डिव्हि. एक्स्प्लोझिव्हज् याचे डेप्युटी डायरेक्टर म्हणून निवृत्त झाले. १९७४ च्या पोखरण अणुस्फोट चाचणीत महत्त्वाचा सहभाग. तिथल्या श्रेयनामावलीत त्यांचे नाव कोरलेले आहे. निवृत्तीनंतर विज्ञानवाहिनीत सहभाग. याशिवाय मेळघाटसाठी निधी जमा करणाऱ्या ‘मैत्री’ या संस्थेतही ते आहेत. सुषमा केळकर या साधना विद्यालय, शीव येथून विज्ञानशिक्षिका म्हणून निवृत्त झाल्या. उत्तम शिक्षिका. त्यामुळे शाळेतले सर्वात नाठाळ विद्यार्थ्यांचे वर्ग त्यांच्याकडे दिले जात आणि त्यांना शिक्षणाची गोडी लावणे हे त्यांच्याकडून अपेक्षित असे. विज्ञानवाहिनीत त्यांचा प्रथमपासून सहभाग आहे. डॉ. मनोहर दीक्षित हे भाभा अणुशक्ति केंद्रातून निवृत्त झाले. पुष्कळ परदेशवाऱ्या व शोधनिबंध. पण विज्ञानवाहिनीमध्ये शालेय विद्यार्थ्यांना शिकवण्यात विलक्षण रस त्यांच्या कानडी-ढंगाच्या मराठीतून हे चालणार, पण विद्यार्थी खूष आणि हेहि खूष!
मुकुंद भडभडे हे टेक्स्टाइल एंजिनियर. खटावमधील संशोधन विभागाचे प्रमुख. विज्ञानवाहिनी आवडली, आणि विनोदप्रिय आणि हजरजबाबी स्वभावामुळे मुलांमध्ये आणि आमच्यातही सगळ्यांना प्रिय झाले.
शरद गोडसे हे ६२ वर्षांचे पण तरीही तरुणाचा उत्साह आणि कामाचा प्रचंड उरक. मुंबईत ब्रास्को एक्स्ट्रजन्स लि. या कंपनीचे जनरल मॅनेजर म्हणून बरीच वर्षे काम केले. त्यानंतर पुण्यात कन्सल्टंट म्हणून स्थिरावले. आता विज्ञानवाहिनीचे उत्साही कार्यकर्ते.
जयंत दीक्षित हे खडकवासल्याच्या सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशनमधून असेच उच्चपदावरून निवृत्त झालेले. ‘सुरोडी’ गावचा ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ मोहिमेचा सर्व्हे त्यांनी केला. विज्ञानवाहिनीतले काम अपुरे वाटते म्हणून जोगांप्रमाणे हेही वर्षातून ४/५ आठवडे डोमरीच्या दीनदयाळ गुरुकुलात विद्यार्थ्यांबरोबर असतात.
मुरलीधर ओक हे इंडस्ट्रीमधले. पण साठाव्या वर्षानंतर आपली इंडस्ट्री मुलाच्या ताब्यात देऊन निवृत्त झाले आणि विज्ञानवाहिनीत दाखल झाले.
माझे नाव जयंत फाळके. १४ वर्षे भाभा अणुशक्ति केंद्रात नोकरी केली. तेथे राजीनामा देऊन २२/२३ वर्षे विज्ञानसाहित्याच्या विक्रीचा व्यवसाय केला. सध्या विज्ञानवाहिनीत बरीच लुडबुड करीत असतो. मला वाटते मी बरेच काम करतो. इतरांना काय वाटते माहिती नाही. पण मी मात्र एन्जॉय करतो आहे.
इतक्या वेगवेगळ्या पार्श्वभूमी असलेल्या या मंडळीत विज्ञानाची आवड, शिकवण्याची आवड व साधेपणा या गोष्टी मात्र समान आहेत. त्यामुळे इतर तरुण मंडळी आणि हे युवावृद्ध यांचे एक छान रसायन तयार झाले आहे. साधारणपणे वयाच्या साठीपर्यंत माणसाने बरेच जग पाहिलेले असते आणि तो व्यवहारी, सावध असावा अशी अपेक्षा असते. पण गटबाजी, हेवेदावे आणि अहंभाव यांपासून अलिप्त असलेली ही ‘आनंदी’ मंडळी या बाबतीत अपेक्षाभंग करतात. यांचे वर्णन ‘अव्यवहारी पूर्णांक’ असे करायला हवे.
आम्ही एका आठवड्यासाठी फिरती प्रयोगशाळा घेऊन महाडला गेलो होतो. तेथे ५/७ उत्साही, तरुण डॉक्टर्स प्रयोगशाळा पाहायला आले. त्यांना सर्व काही दाखवून झाल्यावर त्यांनी असा उपक्रम इथे सुरू करण्यासाठी काय करायला पाहिजे म्हणून विचारले. त्यांना म्हटले, “तुम्ही निधिसंकलन, लोकसंपर्क वगैरे सर्व कराल पण हे काम चालू राहण्यासाठी आमच्यासारखे ५/७ वेडे लोक हवेत.” पण महाडला फिरती प्रयोगशाळा होऊ घातली आहे. मधुकर देशपांड्यांपासून स्फूर्ति घेऊन आणि त्यांच्या आणि विज्ञानवाहिनीच्या मदतीने गुलबर्गा (कर्नाटक) इथे फिरती प्रयोगशाळा एका स्थानिक संस्थेने उभारली आहे. ही एका दृष्टीने विज्ञानवाहिनीच्या यशाची पावती आहे असेच म्हणायला हवे!
अव्यवहारीपणात मधुकर आणि पुष्पा देशपांडे तोडीस तोड आहेत. नर्मदा बचाव आंदोलन हा मधुकरचा weak point तर विज्ञानवाहिनी हा पुष्पा देशपांड्यांचा! प्रकल्पाचा निधी संपत आल्यावर त्यांची ही offer होती, “आपण देणग्या मिळवू पण खर्चाला पैसे कमी पडले तर मी वैयक्तिकरीत्या भरपाई करीन.”
२ ऑक्टोबर २००० ला सेवासदन, पुणे या संस्थेने पुष्पा देशपांड्यांचा सत्कार केला व ‘जी. के. देवधर स्मरणार्थ चषक’ आणि रोख रु. दहा हजार पारितोषिक म्हणून दिले. दुसऱ्या दिवशी त्यांत हजार रु. ची भर घालून रक्कम विज्ञानवाहिनीला देणगी म्हणून दिली. आम्ही विद्यार्थ्यांना विज्ञान शिकवण्याचा प्रयत्न करतो. यामागची आमची भूमिका काय आहे?
समर्थांनी म्हटले आहे की क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे. हे विज्ञानाला फारच लागू आहे. विज्ञानात नुसती संकल्पना सांगून भागत नाही; त्या संकल्पनेचा पडताळा प्रयोगांनी घ्यायचा असतो—-क्रिया करायची असते—-आणि ज्या संकल्पना प्रयोगक्रियेच्या कसोटीला उतरत नाहीत त्या सोडून द्यायच्या असतात. शाळेत मुलांना शिकवताना व प्रयोग करून घेताना ही मानसिकता शब्दांनी सांगितली न जाता प्रत्यक्ष क्रियेतून निर्माण व्हावी या उद्देशाने विज्ञान शिकवितो. विज्ञान आणखी एक गोष्ट करते. स्वतःच्या बुद्धीने विचार आणि विचाराला धरून आचार यांचे महत्त्व मुलांच्या मनावर ठसवते. एका दिवसाच्या या वैज्ञानिक प्रयोग-प्रबोधनातून काय साधता? तुम्हाला कायमस्वरूपी परिणाम हवे असतील तर एकाच शाळेला वारंवार भेटी द्यायला हव्यात. मान्य! शिक्षणखात्याचे extension म्हणून काम करायचे असेल तर असेच करायला हवे. पण . . .
आमचा उद्देश मुलांच्या डोक्यात विज्ञानाचे contents भरण्याचा नाही, तर वैज्ञानिक पद्धतीची व विचारांची तोंडओळख करून देण्याचा आहे. आणि साधारण हुषार विद्यार्थीसुद्धा—-त्याला पाठांतरासारख्या वाईट सवयी लावल्या नाहीत तर—-ता वरून ताकभात ओळखू शकतो.
आमचा विद्यार्थी हा ग्रामीण भागातल्या विनाअनुदानित—-म्हणजे हलाखीत असलेल्या —-शाळांमधला आहे. पण त्यांच्यापैकी एकाने विचारलेल्या प्र नावरून त्यांच्या क्षमतेची कल्पना येईल.
आपल्यापैकी बऱ्याच जणांना न्यूटनचा गुरुत्त्वबलाचा नियम,माहिती आहे. एका मुलाने विचारले, “सूर्य जेवढे आकर्षक बल पृथ्वीवर प्रयुक्त करतो तेवढेच आकर्षक बल पृथ्वी सूर्यावर प्रयुक्त करते. मग पृथ्वीच का सूर्याभोवती फिरते? सूर्याने पृथ्वीभोवती का फिरू नये? भल्याभल्यांना चक्रावून टाकील असा प्र न आहे. यातून मुलांमध्ये मुळातच असलेली चिकित्सक बुद्धी दिसते. आमचे काम या बुद्धीला उजाळा देण्याचा प्रयत्न करणे! कित्येक वेळेला आपण करीत असलेल्या प्रयत्नांचा फारसा उपयोग नाही असे दिसते. आम्ही मंडळी तात्पुरती निराश होतो. पण कित्येक वेळी काहीही संसाधने नसलेल्या शाळांमधून ‘तयार’ आणि ‘विषय’ समजणारे विद्यार्थी आढळतात आणि प्रसन्न वाटते. नसरापूर, मारुंजी, शिक्रापूर–कोयाळी या गावांमधल्या विनाअनुदान शाळांचे S.S.C. चे निकाल ९५ ते १००% असतात. हे पाहिले की चांगल्या शाळा खेड्यांमध्ये आहेत की शहरांमध्ये, हा प्र न पडतो.
आम्ही ज्या शाळांमधून जातो तिथे बऱ्याच वेळा ‘सांगता समारंभ’ घेतात. मुख्याध्यापक, शिक्षक ही मंडळी “हे सेवाभावी काम, समर्पित वृत्ती, फलाची अपेक्षा न ठेवणारी मंडळी’ असे वापरून गुळगुळीत झालेले वाक्प्रचार वापरतात, तेव्हा अवघडल्यासारखे होते. सेवाभाव, समर्पित वृत्ती यांचे उदंड पीक आपल्याकडे गेल्या ५०/६० वर्षांत आलेले आहे. त्याची कडू फळे आज आपण चाखतो आहोत. तेव्हा तिकडे आम्हाला लोटू नका असे सांगावेसे वाटते.
आम्ही सामान्य माणसे आहोत. बुद्धीला पटणाऱ्या गोष्टी इतरांना सांगाव्या, त्यांच्या बुद्धीला आवाहन करावे आणि विज्ञानाच्या आधारे आचार आणि विचार या दोन्ही बाबतींत स्वतःच्या पायावर उभी राहणारी मुले निर्माण करण्याचा प्रयत्न करावा एवढाच आमचा उद्देश आहे. विज्ञान शिकणे आणि शिकवणे ही एक आनंददायी अनुभूति आहे असे आम्हाला वाटते आणि विज्ञानातून निर्माण होऊ शकणाऱ्या आनंदाची पुसटशी ओळख आमच्या विद्यार्थ्यांना करून देता आली तर आम्हाला धन्य वाटेल.
वल्लभ पटाडे या आमच्या विद्यार्थी शिबिरात आलेल्या एका विद्यार्थ्याच्या पत्रात असे लिहिले आहे—-“तुम्ही आम्हाला आजच्या प्रगत व आ चर्यकारक विज्ञानाच्या अभ्यासाची सुवर्णसंधी दिलीत . . . . . कुणी विचारले तुझ्या यशाचे कारण काय तर माझे उत्तर असेल विज्ञानवाहिनी.”
पत्र खूप लांब आहे; खूप अलंकारिक भाषा आहे. पण त्यातून प्रतीत होणारी भावना आमच्या दृष्टीने फार मोलाची आहे. एका दृष्टीने आमच्या कामाची ही पावती आहे. वल्लभ पटाडेला आमच्या सर्वांच्या वतीने शाबासकी!
वल्लभ पटाडेने काय करायला हवे होते ते सांगण्याचा मोह टाळता येत नाही. म्हणून Ayn Rand या लेखिकेच्या Fountainhead या कादंबरीतील एक प्रसंग सांगतो.—- एंजिनिअरिंगची डिग्री घेऊन कॉलेजातून बाहेर पडलेला पण आपल्या आयुष्याचे काय करायचे या संभ्रमात असलेला एक युवक सायकलवरून फिरतफिरत एका अति-सुंदर पर्यटनस्थळाशी येतो. सायकल थांबवून १५/२० मिनिटे तो वेगवेगळ्या वास्तूंचे सौदर्य डोळ्यांनी साठवून घेत असतो. आपल्या बाजूला एक व्यक्ती येऊन उभी आहे असे त्याला जाणवते. पाच मिनिटांनी तो वळतो आणि त्या व्यक्तीला विचारतो —- “कुणी बांधलं हे सर्व?’ ती व्यक्ती उत्तरते —- “मी”. क्षणभर तो विद्यार्थी त्या व्यक्तीला न्याहाळतो आणि सायकलवर टांग मारून जाण्याच्या आधी दोनच शब्द उच्चारतो, “थक यू”.
या दोन शब्दांमध्ये भावनांचे एक विश्व दडलेले आहे. “आधी माझ्या आयुष्याचं काय करावं हा माझ्यापुढे प्र न होता. पण तुझी निर्मिती पाहिल्यावर माझ्या प्र नाचं उत्तर मिळालं आहे. मला ‘जीने का सामान’ मिळालं आहे. माझ्या क्षमतांचा जास्तीत जास्त विकास करून त्यांचा आनंदनिर्मितीसाठी मी उपयोग करीन” एवढे सगळे त्या ‘बैंक्यू’ मध्ये आहे.
आमच्या घडणाऱ्या वल्लभ पटाडेंकडून असे “बँक यू’ ऐकायला मिळाले तर आम्हाला धन्य वाटेल; कारण असे म्हणणारा वल्लभ हा विचारांनी आणि आचारांनी परिपक्व अशी पूर्णरूप व्यक्ती असेल.
द्वारा डॉ. मधुकर देशपांडे, ७०१ बी, क्षितिज, सहकारनगर नं. २,पुणे – ९

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.