माणसांनी एकमेकांना मदत करावी का? ‘जगी जे हीन अति पतित, जगी जे दीन पददलित’ त्यांना जाऊन उठवावे का? जगाचे सोडा, एका देश नावाच्या रचनेपुरता तरी असा प्रकार करावा का? की हे वागणे अनैसर्गिक आणि आत्मघातकी आहे? इथे ‘अनैसर्गिक’ असे काही करता येते का? या प्र नाला टाळून पुढे जाऊ. एक मतप्रवाह असा —- कोणत्याही जीवजातीचे (Species चे) जीव भरपूर प्रमाणात असले की अखेर त्यांच्या गरजा पुरवण्यासाठी आवश्यक अशा वस्तूंचा तुटवडा पडतो. ही तोकडी संसाधने आपल्याला मिळावी यासाठी त्या जीवजातीतल्या व्यक्तींमध्ये स्पर्धा होऊ लागते. ती जीवघेणी होऊ लागते. आपल्या प्रतिस्पर्ध्याचा जीव घेणे नित्याचे होते. कधी एखादा जीव इतर एखाद्या ‘जीवावर’ जगतो. अशा बांडगूळ–यजमान संबंधात बांडगुळे यजमानाला जगायला मदत करतातही, पण हे स्पर्धेच्या मर्यादांमध्येच होते. हे सारे जगभरातल्या लोकांना अनेक वर्षांपूर्वीच जाणवले आणि ‘जीवो जीवस्य जीवनम्’, ‘nature red in tooth and claw’, ‘बळी तो कान पिळी’ असल्या वचनांमधून ते व्यक्त केले गेले. याचेच वैज्ञानिक रूप म्हणजे डार्विनचे Survival of the fittest उत्क्रांतीचे तत्त्व. अशा परिस्थितीत सहकार्य, परोपकार, दुसऱ्यावर विश्वास टाकणे, अनेकांनी एकाच हेतूने कामे करणे, हे अशक्य आहे, अनैसर्गिक आहे, असे करणारे स्पर्धेत मागे पडून अखेर नष्ट होतात, ते या अनैसर्गिक, अवैज्ञानिक वागणुकीमुळेच.
ह्या मतांच्या संचात तपशिलाची चूक आहेच पण तो उत्क्रांतीच्या तत्त्वावर फार अन्याय करणाराही आहे. डार्विन ना कधी Survival of the fittest म्हणाला, ना तो भाव त्याला कधी अभिप्रेत होता. गरजवंत जास्त, गरजा पुरवणारी संसाधने अपुरी, म्हणून संसाधनांसाठी स्पर्धा होणे, हे सारे खरे. निसर्गात सतत आणि निरपवादपणे दिसणारे. पण ही स्पर्धा इतर स्पर्धकांचा जीव घेण्याइतकी तीव्र होते, हे मात्र विवाद्य.
डार्विनने नैसर्गिक निवडीतून उत्क्रांतीचे जे सूत्र सांगितले, ते थोडक्यात असे सांगता येईल.
१. व्यक्तींना पिल्ले होणे ही प्रतिकृती बनण्यासारखी क्रिया आहे. पण या प्रतिकृती ‘हुबेहूब’ नसतात, त्यामुळे एकाच व्यक्तीच्या पिल्लांमध्ये विविधता दिसते, आणि पिढी-दर-पिढी ही विविधता वाढत जाते.
२. अशा त-हेने एकाच जीवजातीच्या व्यक्तींमध्ये क्षमतांचे फरक दिसू लागतात. कोणत्याही परिस्थितीत जगायला मदत करणाऱ्या क्षमतांचा संच म्हणजे परिस्थितीशी अनुरूपता. काही व्यक्ती जास्त अनुरूप असतात तर काही व्यक्ती कमी.
३. संसाधनांच्या मर्यादांमुळे स्पर्धा उपजते आणि जास्त अनुरूप व्यक्ती कमी अनुरूप व्यक्तींपेक्षा जास्त जगतात व जास्त प्रजा मागे सोडतात.
४. असे होत होत एखाद्या जीवजातीतील अनुरूप व्यक्तींचे प्रमाण वाढून जीवजातीचाच क्षमतांचा संच बदलतो.
इथे एक लक्षात ठेवावे की सारी भाषा क्षमतांच्या प्रमाणाची आहे. ते ‘सहायव्हल’ वाले वाक्य जर घडवायचेच असेल, तर ते होईल differentially greater survival of the progeny of the fitter individuals —- जास्त अनुरूप व्यक्तींच्या प्रजेचे प्रमाणाने जास्त तगणे एवढेच. त्यात स्पर्धा जीवघेणी होण्याचा, फिटेस्ट व्यक्तींनी अनफिट् व्यक्तींना नष्ट करण्याचा भाव मुळीच नाही.
तो भाव डार्विनवादात घुसवला हर्बर्ट स्पेन्सरच्या ‘सामाजिक डार्विनवादा’ने. सहायव्हल ऑफ द फिटेस्ट या जाहिरातबाज घोषणेचा जनकही स्पेन्सर डार्विन नव्हे. स्पेन्सरची काही काळ चलती होती. तो वसाहतवादाच्या भरभराटीचा काळ होता. युरोपीयांना इतर जगावर त्यांचा हक्क आहे, असे सांगणारे ‘तत्त्वज्ञान’ हवे होते. दुर्बळ ते जगण्याला नालायक. त्यांना मदत करणे म्हणजे निसर्गव्यवहारात ढवळाढवळ करणे. उत्क्रांती म्हणजे प्रगती. तिच्यात खीळ घालणारी इतरांबद्दलची सहानुभूती अवैज्ञानिक. अशी सारी स्पेन्सरप्रणीत मते असे तत्त्वज्ञान पुरवत होती.
पण उत्क्रांती म्हणजे प्रगती नव्हे, ते केवळ बदलत्या परिस्थितीशी जुळत्या होत जाणाऱ्या क्षमतांचे चित्र आहे, हे जसजसे जाणवू लागले तसतसा ‘सामाजिक डार्विनवाद’ मागे पडला. शेवटी आर्यवंशवादी नाझी, गोरे वंशवादी आफ्रिकेतले ‘अपार्टठ’चे पुरस्कर्ते, यांना काही काळ ‘आधार’ देऊन तो वाद संपला.
पण परोपकार, दुबळ्यांनाही मदत करण्याची इच्छा, यांचे काय? सहकार्याचे काय? माणसांच्या वागण्यात हे भाव, या क्रिया दिसतात. त्यांच्यामुळे जर अनुरूपता वाढत नसेल, तर ते उपजलेच कसे, मुळात? ते जर अनुरूपतेला काट मारणारे असले, तर ते नैसर्गिक निवडीच्या चाळणीने वेचून, त्यागून का टाकले नाहीत? या प्र नांवर बराच विचार झाला आहे. त्यांचे उत्तर येते आनुवंशिकतेच्या अभ्यासातून, जरा आडवळणाने. सोईसाठी आपण माणसांमधलीच उदाहरणे घेऊ – पण असे अभ्यास अनेकानेक जीवजातींबाबत झाले आहेत, आणि उत्तरे सगळीकडे सारखीच आहेत. एका जोडप्याला चार अपत्ये आहेत. प्रत्येकच अपत्य सरासरीने अर्धे गुण आईकडून व अर्धे वडलांकडून घेऊन जन्माला येते, पण कोणत्या अपत्याकडे कोणते अर्धे गुण येतील हे स्पष्ट नसते. बरे, अनुरूप असणे, ही सुद्धा एका गुणाची भानगड नाही, तर अनेक क्षमतांच्या संचाला दिलेले ते नाव आहे. एखादे अपत्य जीव वाचवण्यासाठी पळण्यात सर्वात ‘तेज’ असेल, एक वजने उचलण्याच्या शक्तीत, एक स्मरणशक्तीत तर चौथे तर्कशुद्ध विचारात. मग जर या चौघांपैकी दोनच जगण्यासारखी परिस्थिती असेल, तर कोणती दोन अपत्ये जगतील? अशा अभ्यासातून एक अधिक ‘खोलवरचे’ सूत्र सापडते, की नैसर्गिक निवडीतून अखेर व्यक्ती निवडल्या डावलल्या जात नाहीत, तर विशिष्ट गुणांचे संच निवडले जातात. आणि गुणांची नोंद होत असते जीन्सच्या रूपात, म्हणजे जीन्स निवडले जात असतात. अशा वेळी एखादे अपत्य स्वतःचा बळी जाऊ देते—-पण त्यातून इतर तीन भावंडे तगण्याला मदत होईल, अशा प्रकारानेच हा स्वार्थत्याग केला जातो. स्वार्थत्याग, परोपकार, हा असा नेहेमीच जीन्सच्या स्वार्थाच्या रूपात असतो! मी मरायला तयार आहे, पण त्या बदल्यात माझे जीन्स ज्यांच्यात आहेत अशा इतर व्यक्ती तगून राहण्याची शक्यता मात्र वाढायला हवी.
आज हे तत्त्व ‘स्वार्थी जीन तत्त्व’ म्हणून ओळखले जाते. ही क्रिया जाणीवपूर्वक, अक्कलहुषारीने व राजीखुषीने होत नाही. ती आपल्या आनुवंशिक गुणांमध्ये रुजलेली असते. हे सूत्र इतके ठामपणे जडवादी/इहवादी आहे, की त्याला विरोधही जबर झाला. ‘सोशिओबायॉलजी’ या पुस्तकाद्वारे हे तत्त्व जाहीर करणाऱ्या इ. ओ. विल्सनवर प्रखर हल्ले झाले. आज मात्र परोपकाराचे मूळ जीन्सच्या स्वार्थात आहे, हे बहुमान्य झाले आहे. रिचर्ड डॉकिन्स (‘द सेल्फिश जीन’ व इतर), रॉबर्ट राईट (‘द मॉरल अॅनिमल’), व इतर अनेक लेखक माणसांच्या (व इतर सजीवांच्या) वागणुकीतले आकृतिबंध कसे उपजले असावे ते सोप्या भाषेत सामान्य वाचकांपर्यंत पोचवत आहेत.
आता प्र न असा, की उत्क्रांतीतून शरीररचना, शरीरातले जैवरासायनिक व्यवहार (anatomy व physiology) यांची अनुरूपतेच्या कसोटीवर निवड होते, हे ठीक—-पण वागणुकीचे, मानसिकतेचे (psychology चे) काय? याचे उत्तर असे की वागणुकीचे आकृतिबंधही उत्क्रांतीने निवडले जातात, कारण वागणूक शारीर व्यवहारांमधूनच उद्भवते! भारतात जडवाद/इहवादाला विरोध तीव्र रूपात आहे. इतर अनेक धर्मांपेक्षा हिंदुधर्म चिद्वादी (idealistic) आहे. औषधांनी रोग बरे होतात आणि शुद्ध हवापाणी–अन्नाने रोग कमी होतात. हे मानणारेही ‘मन स्वच्छ हवे’ असे म्हणून आधीच्या दोन जडवादी मतांना काट मारतात.
उत्क्रांतीतून निघालेल्या मानसशास्त्राचा उल्लेख एका चर्चेत करताच तुच्छतेने उत्तर आले, “हे स्वतःला सोईस्कर असे (self-serving) मत आहे!’ (आणि पुढे “XX असे कधी म्हणाले नाहीत”, हे विधान पुराव्यादाखल मांडले गेले!) पंचाईत अशी की आज मानसशास्त्रही उत्क्रांतीच्या तत्त्वाचा आणि स्वार्थी जीन तत्त्वाचा आधार घेतल्याशिवाय व्यवहारात उपयोगी असे काही सांगू शकत नाही. मग रोख बदलून उत्क्रांतीच्या निवडीची चाळणी स्वतःला तगवणारे (self-serving) गुण कसे निवडू शकेल, असा प्र न उपस्थित होतो. याचे उत्तर तसे सोपे आहे. आजच्या प्रत्येक माणसाची वंशावळ कैक अब्ज पिढ्या एकपेशीय जीव म्हणून, काही कोटी पिढ्या प्राणी म्हणून, काही कोटी पिढ्या सस्तन प्राणी म्हणून, सुमारे साडेसतरा लक्ष पिढ्या माकड म्हणून आणि लाखभर पिढ्या माणूस म्हणून रेखता येते. एकपेशीय इतिहास सोडून दिला तरी अनेक कोटी पिढ्यांच्या आवर्तनांमधून आपली वागणूक घडली आहे आणि यात सहकार्य, एकदिली, परोपकार (खरे तर परस्परोपकार) हे सारे ‘गुण’ अंगी बाणवण्याची क्षमता आहे.
आज वागणुकीतले आकृतिबंध कसे घडतात हे सांगणाऱ्या ‘गेम थिअरी’ या गणित शाखेच्या विषयात संशोधन करणाऱ्या जॉन नॅशला (अर्थशास्त्राचे!) नोबेल पारितोषिक मिळाले आहे. त्याच्या आयुष्यावरच्या चित्रपटाला ‘ऑस्कर’ मिळाले आहे. ‘मोरॅलिटी बाय अॅग्रीमेंट’ नावाचे गेम थिअरीवर आधारित नीतितत्त्वाबाबतचे पुस्तक लिहिले गेले आहे. पण ‘नाही-माणूस म्हणजे नुसता जीन्स आणि त्यांच्या क्षमतांचा संच नव्हे’, असे म्हणून म्हाताऱ्या कोंबडे झाकीतच आहेत.
तर आज परोपकार, दुर्बळांना मदत करून त्यांच्यातही काही जीवनोपयोगी गुण असतील याची दखल घेणे, हे सारे ठामपणे विज्ञानाच्या पद्धती वापरून उपयोगी ठरत आहे. हे इतरांच्या स्वार्थाला जपत स्वतःचाही स्वार्थ साधण्याचे गुण माणसांत आहेत तसेच इतर जीवांमध्येही आहेत. अगदी वनस्पतींमध्येही असे ‘परोपकारी’ गुण सापडतात. एका झाडावर कीड पडताच ते झाड वेगवेगळी रसायने हवेत सोडू लागते. त्यांपैकी काही किडींना मारक असतात, तर काही मूळ झाडाच्या जीवजातीच्या इतर झाडांना कीड अवरोधक द्रव्ये घडवायची सूचना द्यावी तशी असतात. माणसांमधील रोगांपासून रक्षण करणाऱ्या प्रतिरक्षाव्यवस्थेसारखा (immune system) हा प्रकार असतो.
पण सरासरी मराठी-भारतीय माणसे या नव्या घडामोडींची, नव्या ज्ञानाची दखल घ्यायला फारशी उत्सुक नसतात. कोणत्याही प्र नाच्या खोलात जाण्याऐवजी, नव्याने शास्त्रे जाणून घेण्याऐवजी शाळकरी ज्ञानावर तात्कालिक वर्तमानपत्री माहितीचे कलम करणे पुरेसे मानले जाते. ‘डिस्कव्हर’ या विज्ञानविषयक मासिकाची वर्गणीदारांची यादी एका कोटीजवळ आहे. सर्व मराठी वृत्तपत्रे मिळून एवढे वर्गणीदार नाहीत! एक मात्र खरे, की मोठाले सामाजिक अन्याय आणि प्रचंड विषमता ‘पचवून’ कोणताही समाज विकास करू शकलेला नाही. टिकूनही राहू शकलेला नाही. आपल्या काही भागांना मारून किंवा मरू देऊन इतर समाज वाचण्यास मदत होईल का, हे आपण आपल्यालाच विचारून पाहायची गरज आहे. उपयोगितावादाने जास्तीत जास्त लोकांचे जास्तीत जास्त सुख कमावणाऱ्या कृती करण्यावर आग्रह धरला, तो याचमुळे. अशा सुखाच्या कल्पना, मोजमापाचे निकष, यांवर चर्चा व्हायला हवीच, पण ‘अ’ चे सुख ‘ब’ च्या सुखाइतकेच महत्त्वाचे मानण्याच्या न्यायाच्या कल्पनेला मात्र पर्याय दिसत नाही.
आणि यासाठी सर्वांचे हित साधण्यासाठी काय करावे याचा विचार करतच राहावा लागणार.
—- नंदा खरे