वस्तुवादी इतिहास-मीमांसा
कार्ल मार्क्सने सामाजिक इतिहासाकडे पाहण्याचा जो एक विशिष्ट दृष्टिकोण बसविला आहे, त्याला ‘वस्तुवादी इतिहास-मीमांसा’ या नावाने संबोधणेच योग्य होईल. पण या ठिकाणी ‘वस्तू’ हा शब्द केवळ जडसृष्टी-पुरताच मर्यादित नाही. भौतिक परिस्थितीशी सुसंगत असल्यामुळे जन-मनाची पकड घेणाऱ्या विचारप्रवाहांचाही त्यात अंतर्भाव होतो. हा दृष्टि-कोण म्हणजे कुठल्याही देशातील कोणत्याही ऐतिहासिक घटनांचा हुकमी अन्वयार्थ लावण्याचा सांप्रदायिक गुरुमंत्र नव्हे. इतिहासाच्या शास्त्रशुद्ध अध्ययनाची ती सर्वसामान्य दिशा आहे. समाजजीवन हा निरनिराळ्या शक्तींच्या व प्रेरणांच्या संघर्षातून सिद्ध होणारा जिवंत प्रवाह आहे. त्याला एखाद्या ठरावीक साच्यात चपखल बसविता येईल ही कल्पनाच मुळी भ्रामक आहे. सामाजिक जीवनातील कोणत्याही कालखंडाचे, किंवा राज कारण, धर्म, तत्त्वज्ञान, साहित्य, कला इत्यादी अंगोपांगांचे परिशीलन करताना त्या त्या क्षेत्रातील साधनसामग्रीची स्वतंत्रपणे व साकल्याने पाहणी करणे आवश्यक आहे. वस्तुवादी विचारसरणीप्रमाणे आर्थिक हितसंबंध हीच सामाजिक परिवर्तनाची मूलभूत व प्रबलतम प्रेरणा आहे, यात अणुमात्र संशय नाही. परंतु याचा अर्थ समाजजीवनाची इतर अंगे परभृत व प्रेरणा-शून्य आहेत, त्यांचा परस्परांवर काहीच परिणाम होत नाही असा नव्हे.
[संतवाङ्मयाची सामाजिक फलश्रुति’ या गं. बा. सरदारांच्या ग्रंथातून वरील उतारा घेतला आहे.]
गं. बा. सरदार