स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतात सामाजिक स्वास्थ्य आणि रोगप्रतिबंध याकडे अधिक लक्ष दिले गेले व वर्षानुवर्षे या कार्यासाठी अधिकाधिक आर्थिक व्यवस्था करण्यात आली. कुटुंबनियोजन तसेच देवी निर्मूलन, मलेरिया, हत्तीपाय, कॉलरा, पोलिओ, कुष्ठरोग यासारख्या घातक संक्रामक रोगांविरुद्ध विशेष मोहिमा राबविण्यात आल्या. क्षयरोग, हिपॅटायटिस, एड्स यांसारख्या रोगांविरुद्ध प्रतिबंधात्मक योजना आणि जनमत जागृतीचे कार्यही चालू आहेच. हे सर्व झाले शासकीय स्तरावरील प्रयत्न. परंतु याचसोबत सामान्य जनतेतही मंद गतीने का होईना, आरोग्यविषयी जागृती होत आहे. स्वच्छ व शुद्ध पेयजल, भेसळरहित अन्न, समतोल आहार, व्यायामाचे महत्त्व, वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता, रोगप्रतिबंधात्मक उपाय याविषयी मुख्यतः नागर आणि शिक्षित जनतेची जाणीव वाढीस लागली आहे. दरडोई उत्पन्नात थोडी का होईना, वाढ झालेली आहे. या सर्वांचा परिणाम आता सरासरी अपेक्षित आयुर्मर्यादेमधील वाढ, बालमृत्यूचे व प्रसूतिका मृत्यूचे प्रमाण घटणे यामध्ये दिसू लागला आहे. नव्या पिढीच्या शारीरिक वाढीत झालेली उल्लेखनीय वृद्धी स्पष्टपणे जाणवते. हल्ली पौगंडावस्थेतील मुले व बऱ्याच प्रमाणात मुलीही आपल्या मातापित्यांहून उंच आणि सुदृढ असतात!
ही प्रगती शासकीय संस्थागत प्रयत्नांमुळे त्याचप्रमाणे जनसामान्यांच्या जाणिवे-मुळे झालेली आहे हे निःसंशय. मात्र एवढ्याच प्रगतीवर समाधान मानणे पुरेसे नाही. जगातील सर्व राष्ट्रांमध्ये सार्वजनिक आरोग्याबाबतीत भारताचा क्रमांक फार खाली आहे. भारताला २०२० पर्यंत विकसनशील राष्ट्रांच्या सूचीतून वर काढून एक विकसित राष्ट्र बनविण्यासाठी सार्वजनिक आरोग्यातील सुधारणा, मृत्युदरात घट आणि अपेक्षित सरासरी आयुर्मर्यादेत वाढ होणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक कुटुंबाने सतर्क राहून सतत प्रयत्न करीत राहणे अनिवार्य आहे. शिक्षणप्रसारामुळे जरी शिक्षितांची संख्या वाढली असली तरी या शिक्षितांचे आरोग्यविषयक ज्ञान तोकडेच आहे. डॉक्टर म्हणजे एक सर्वशक्तिमान जीवनदाता आणि औषधोपचार म्हणजे निसर्गावर मात, अशी काहीशी भ्रामक समजूत सामान्यजनांची असते.
सामाजिक स्वास्थ्य आणि आरोग्यविषयक माहिती देणारे भरपूर साहित्य पुस्तके, नियतकालिके या स्वरूपात इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे परंतु भाषेची अडचण आणि अशा साहित्यातील किचकट तांत्रिक माहितीमुळे हे साहित्य जनसामान्यांना निरुपयोगी आहे. मराठीमधूनही काही वैद्यकीय साहित्य पूर्वीपासूनच प्रसिद्ध होत असते परंतु त्याचा प्रसार इष्ट प्रमाणात झालेला आढळत नाही. जी काही जाणीव लोकांमध्ये निर्माण झालेली आढळते ती वृत्तपत्रे आणि नियतकालिकांतील लेखांमुळेच. सुमारे १० वर्षापूर्वी मराठीत ‘भारतवैद्यक’ या नावाने डॉ. श्याम अष्टेकर यांनी एक पुस्तक लिहिले होते. या पुस्तकाची तिसरी व विस्तृत सुधारित आवृत्ती या वर्षी मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केली आहे. मोठ्या आकाराचा (२८ सें. मि. X २१ सें. मी.) उत्तम पुठ्ठा व प्लॅस्टिक बांधणीचा हा सुबक ग्रंथ ४५३ पानांचा असून त्याची किंमत आहे सहाशे रुपये. या ग्रंथाचे लेखक डॉ. श्याम विनायक अष्टेकर हे पुण्याच्या बी. जे. मेडिकल कॉलेजचे सामाजिक व रोगप्रतिबंधक वैद्यकशास्त्राचे (PSM) पदव्युत्तर स्नातक (M.D.) असून गेली १६-१७ वर्षे सार्वजनिक स्वास्थ्यक्षेत्रात त्यांनी शासकीय तसेच अशासकीय संस्थांमधून (NGO) कार्य केलेले आहे. हल्ली ते नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथील ‘संजीवन हॉस्पिटल’ या संस्थेशी संबद्ध आहेत.
‘भारतवैद्यक’ हा ग्रंथ शिक्षित (म्हणजे पदवी समकक्ष) आणि मराठी भाषेची चांगली जाण असलेल्या वाचकांचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून लिहिलेला आहे. त्याचप्रमाणे डॉक्टरांखेरीज इतर वैद्यक व्यवसायातील कर्मचारी उदाहरणार्थ परिचारक/परिचारिका, स्वास्थ्यसेवक, प्राथमिक स्वास्थ्य केन्द्रातील कार्यकर्ते (Paramedical Staff) तसेच आधुनिक वैद्यकशास्त्राचे नियमित शिक्षण न घेतलेले वैद्यक व्यवसायी या सर्वांना हे पुस्तक उपयुक्त आहे. परंतु या ग्रंथाला ‘भारत’ हे पूर्वनाम का जोडले आहे हे कळत नाही व त्याबद्दल लेखक/प्रकाशक यांचा खुलासाही नाही.
वैद्यकात ‘भारत’ असा काही प्रकार आहे काय?
ग्रंथात आधुनिक वैद्यकशास्त्राच्या विस्तृत माहितीसोबत आयुर्वेद, होमियोपॅथी, बाराक्षार पद्धती, अॅक्युपंक्चर, अॅक्युप्रेशर, मालीश इत्यादी अन्य मान्यताप्राप्त उपचार-पद्धतींबद्दल माहिती जुळविली आहे. ग्रंथाच्या ४४ प्रकरणांतून शरीररचना, शरीरक्रिया, विकृती, आरोग्य, आहार व सुपोषण, व्यायाम व क्रीडा यांसंबंधी चर्चा आहे. व्यसने, हिंसा, न्यायवैद्यक, ग्राहक संरक्षण, मानसिक आरोग्य, लैंगिक विकार, प्रसूतिशास्त्र, वृद्धावस्था या सारख्या वैद्यकाशी संलग्न आणि उपयुक्त विषयाबद्दलही माहिती आहे.
ग्रंथाच्या मुख्य भागात आजार म्हणजे काय, आजाराची कारणे, आजाराचे निदान, विविध तपासण्या याविषयी सोप्या भाषेत परंतु मूलभूत विवेचन आहे. शरीरातील विविध संस्था आणि अवयव यांच्या रचना, कार्य, विकृती, आजार, चाचण्या आणि उपचार याबद्दल भरपूर माहिती आहे. गरोदरपण, प्रसूतिशास्त्र याबद्दलही माहिती आहे.
ग्रंथामध्ये असंख्य तक्ते, आकडेवारी, रेखाकृती व अतिशय उत्कृष्ट रंगीत प्रकाशचित्रे दिलेली असल्याने ग्रंथाला भारदस्तपणा लाभला आहे. एकूणच सामान्य वाचकाला, आपले शरीर ही निसर्गाची केवढी प्रचंड किमया आहे व हे शरीर निरोगी ठेवणे किती महत्त्वाचे आहे याची खोलवर जाणीव होते. आजार होतो म्हणजे नेमके काय होते? डॉक्टर त्याचे निदान कसे करतात? रुग्णालयात आणि पॅथॉलजी प्रयोगशाळेत कोणत्या चाचण्या व कशासाठी करतात? रोगाचा उपचार कोणत्या तत्त्वांवर अवलंबून असतो? चांगले डॉक्टर हे उपचार, बुद्धी व अनुभव वापरून शहाणपणाने व दक्षतेने कसे करतात (अथवा करत नाहीत!) याबद्दल सामान्य वाचकाला सम्यक् दृष्टी देण्याचे कार्य करण्यास हा ग्रंथ समर्थ आहे.
हा ग्रंथ जरी सामाजिक स्वास्थ्य व रोगप्रतिबंधन या विषयांपुरता मर्यादित असला आणि वैद्यकीय महाविद्यालयातील या विषयाच्या अभ्यासक्रमावरून बेतलेला असला तरी या ग्रंथात, हल्ली वाचकांच्या कानावर पडणाऱ्या एंजीओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास, ऑर्गन ट्रान्सप्लान्ट, एम्. आर. आय., व्हेंटिलेटरवर ठेवणे, मॅरो दु ट्रान्सप्लान्ट, कृत्रिम सांधे (Prosthesis) बसविणे, जयपूर फूट, प्लास्टिक सर्जरी, टेस्ट ट्यूब बेबी यासारख्या संज्ञाविषयी जुजबी माहिती असती तर सामान्य वाचकांचे थोडे प्रबोधन झाले असते.
ग्रंथामध्ये अॅलोपॅथिक, आयुर्वेदिक, होमियोपॅथिक व बाराक्षार चिकित्सापद्धती-तील निवडक औषधांची नावे, उपयोग, मात्रा यांचे तक्ते दिले आहेत. या माहितीवरून ही औषधे अधिकृत डॉक्टरांच्या सल्ल्यावाचून घेणे कितपत योग्य आहे असा आक्षेप घेता येतो. वस्तुतः हे तक्ते दिले नसते तरी पुस्तकाची सामान्य वाचकांसाठी (वैद्यक व्यवसायी-साठी नव्हे) उपयुक्तता मुळीच कमी झाली नसती. औषधांच्या या नावांमुळे त्यांचा दुरुपयोग वा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
एकूण जनसामान्यांना आणि वैद्यकक्षेत्रातील कर्मचाऱ्यांना (Paramedical Staff) अतिशय उदबोधक आणि उपयुक्त ग्रंथ उपलब्ध करून दिल्याबद्दल लेखकाचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे. ग्रंथाची किंमत बरीच अधिक असली तरी बांधणी, पृष्ठसंख्या, आकृत्या, रंगीत प्रकाशचित्रे यांचा विचार करता किंमत रास्तच आहे. प्रत्येक शिक्षित व बहुश्रुत होण्यास धडपडणाऱ्या मराठी कुटुंबाने एखादी महागडी साडी विकत न घेता अथवा सहकुटुंब ढाब्यावर जेवणासाठी न जाता त्याऐवजी या ग्रंथाची प्रत विकत घेणे नि िचतच सुज्ञपणाचे ठरेल!
१०२, उत्कर्ष-रजनीगंधा, खरे टाऊन, धरमपेठ, नागपूर — ४४० ०१०