पत्रसंवाद

सत्यरंजन साठे, अ-५, श्रीराहुल सहकारी गृहरचना संस्था, ८३/१० एरडवन, पुणे — ४११ ००४
माझा साधना साप्ताहिकात प्रसिद्ध झालेला संघाचा फतवा हा लेख आपण पुनर्मुद्रित केलात याबद्दल धन्यवाद. लेखाबद्दल दोन प्रतिक्रिया आपण मला पाठविल्या. त्यावरील माझे भाष्य यासोबत धाडत आहे.
श्री. गंगाधर गलांडे यांची प्रतिक्रिया पाहू या. घटनासमितीने पंतप्रधान म्हणून वल्लभभाई पटेल यांची शिफारस केली होती असे ते आत्मविश्वासपूर्वक सांगतात. पण माझ्या वाचनात घटनासमितीने असा कुठलाही निर्णय कधी घेतलेला नव्हता. तसा घेणे हे घटनासमितीच्या कार्यकक्षेत येतच नव्हते. घटनासमिती ही पंतप्रधान कुणी व्हायचे हे ठरवणारी संस्था नव्हती तर पंतप्रधान कसा निवडला जावा हे ठरवणारी संस्था होती. लोकशाही प्रक्रियेत घटनासमिती व्यक्तिनिष्ठ निर्णय कधीच घेत नाही. माझ्या लेखाशी काहीही संबंध नसलेले अनेक मुद्दे ह्या प्रतिक्रियेत आहेत. उदा. महात्मा गांधींनी प्राणांतिक उपोषणाचे अस्त्र वापरून पंतप्रधानपदाची वस्त्रे नेहरूंना देवविली. हे विधान तर ऐतिहासिक असत्यच आहे. गांधी, पटेल, नेहरू, इंदिरा व राजीव आदि सर्वांनी अंत्यविधीसाठी हिंदू पद्धतीनुसार मंत्रोच्चार करून चिता पेटविली आहे याचा माझ्या लेखाच्या कुठल्याही मुद्द्याशी कसा काय संबंध जुळतो हे माझ्या लक्षात आले नाही. जातीय नसणे म्हणजे धर्म न मानणे असे होत नाही. महात्मा गांधी हे सनातनी हिंदू असण्यावर आमच्यासारख्यांनी टीका केलेली आहे. त्यांचे चातुर्वण्याचे समर्थन, आतला आवाज आणि एकंदरीनेच दलित प्र नाकडे बघण्याच्या भूमिकेवर खूप टीका झालेली आहे व होत राहील. हे मतभेद असूनही महात्मा गांधींचे योगदान मोठे होते. त्यांचे स्थानही ऐतिहासिक आहे हे कुठलाही सुबुद्ध माणूस मान्य करील. वंदे मातरम् का राष्ट्रगीत झाले नाही याच्या इतिहासात मी येथे जात नाही. पण वंदे मातरमचे फक्त पहिले कडवेच राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले जाऊ शकते.
महात्मा गांधींच्या अहिंसेबद्दल जे भाष्य श्री. गलांडे करतात ते ही मूळ मुद्द्याला सोडूनच आहे.
पाकिस्तानात हिंदूंना किंवा अल्पसंख्यकांना वाईट वागणूक मिळते ही नि िचतच निषेधार्ह गोष्ट आहे. पण म्हणून भारतातल्या मुसलमानांना तशीच मिळावी हा आग्रह माणुसकीला सोडून आहे. इतर अनेक मुद्दे जे श्री. गलांडे यांनी लिहिले आहेत. त्यांचा माझ्या लेखात उपस्थित केलेल्या मुद्द्याशी दूरान्वयेही संबंध नसल्याने त्यांच्या प्रतिक्रियेवर अधिक भाष्य करणे आवश्यक नाही. त्यांचे सर्व मुद्दे हे मुद्दे नसून त्यांची मते आहेत. ती त्यांना ठेवण्याचे व व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आहे.
डॉ. उषा गडकरी यांच्या लेखात अप्रत्यक्षपणे गुजरातमधल्या क्रूरतेचे समर्थन केले गेले आहे. गोध्यात जे घडले ते अतिशय अमानुष होते. त्याचा धिक्कार सर्व सेक्युलरवाद्यांनी केलेला आहे. पण गोध्यात निरपराध हिंदूंना मारले म्हणून अहमदाबादमधल्या निरपराध मुसलमानांना मारावे हे कुठल्याही तर्काशी सुसंगत नाही. महात्मा गांधींच्या खुनानंतर ब्राह्मणांवरील अत्याचार व इंदिरा गांधींच्या खुनानंतर त्यावेळी शिखांवरील अत्याचार हे समर्थनीय नव्हतेच. त्यांच्या निषेध अनेक धर्मनिरपेक्षवादी व्यासपीठांवरून झालेला आहे. प्रत्यक्ष संघाचे अपत्य असणाऱ्या भाजपाने देखील त्याचा निषेध केलेला आहे आणि त्याचे राजकीय भांडवलही केलेले आहे.
पण नाठाळ कोण? काही माथेफिरूंनी केलेल्या कृत्यामुळे त्या धर्मातील असणारे सर्वच लोक नाठाळ कसे ठरतात? तुकारामांना हे अभिप्रेत असेल असे मला वाटत नाही. ज्ञाने वरांनी वर्णिलेले ‘सत्कर्मी रती वाढो’ हे वाक्य डॉ. गडकरी कुठल्या संदर्भात वापरतात? गुजरातमध्ये जे संतापलेल्या हिंदू जमातवाद्यांनी केले ते सत्कर्म होते असे त्यांना वाटते का? शेवटी तर डॉ. गडकरी माइन काम्फ मध्ये हिटरलने जो तोडगा सुचविला तेच फायनल सोल्युशन सुचवतात. तो म्हणजे ‘त्यांना या जगातून नष्ट करा’. यालाच इंग्रजीत जिनोसाइड म्हणतात. डॉ. गडकरी यांच्या प्रतिक्रियेमुळे हिंदू जमातवादाचे भीषण स्वरूपच ध्यानात येते. हा मार्ग कुठल्याही लोकशाही समाजाला मान्य होणार नाही. हा मार्ग पंतप्रधान वाजपेयी किंवा उपपंतप्रधान अडवाणी यांनाही मान्य नाही हे त्यांच्या अनेक वक्त्यांमधून स्पष्ट होते.
‘तथाकथित सेक्युलरवादी’ या शब्दांचा वापर करून सर्वच वैचारिक विरोधकांना बडवायचे ही संघीय लोकांची फार जुनी रीत आहे. या दोन्ही प्रतिक्रिया वाचल्यावर संघसमर्थकांचे नवीन जगाबद्दल आणि आधुनिक मानवी मूल्यांबद्दल किती अज्ञान आहे याची जाणीव झाली. हे विचार भारताच्या हिताचे तर नाहीतच पण हिंदूंच्याही हिताचे नाहीत. बहुसंख्य हिंदु हे मुसलमान द्वेषाने प्रेरित करण्याचे काम ‘तथाकथित हिंदुत्ववादी’ करीत आहेत. डॉ. गडकरी यांच्या लेखात अनेक मुद्दे सोडून देण्यात आले आहेत. ते अपुऱ्या माहितीवर आधारित आहेत. घटनेचा आढावा घेण्याच्या भाजपा सरकारच्या निर्णयावर जेवढा विरोध झाला त्यापेक्षा कितीतरी अधिक विरोध इंदिरा गांधी शासनाने केलेल्या आणीबाणीतील घटनादुरुस्त्यांना झाला होता. देवळाचा प्र न आज देशाच्या अनेक प्र नांपेक्षा आम्हाला महत्त्वाचा वाटत नाही. तो हिंदुत्ववाद्यांचे वैचारिक प्रेरक स्वातंत्र्यवीर सावरकर यांनाही वाटला नसता.
संघावर टीका करणारे हे काँग्रेसवर किंवा इतर पक्षांवर टीका करत नाहीत का? इंदिरा गांधींच्या आणीबाणीवर कठोर टीका ‘तथाकथित सेक्युलर’ वाद्यांनीच केली होती. काश्मीरी पंडितांचा प्र न हा शेवटी काश्मीरमधला अल्पसंख्यकांचा प्र न आहे. काश्मीरच्या सर्व प्र नांचा विचार करताना त्याचाही विचार करावाच लागतो. काश्मीरमधल्या पंडितांना जो वनवास भोगावा लागला त्यांचे कारण तिथला दहशतवाद आहे. पण दहशतवादाचा बीमोड दहशतवादाने होत नाही. काश्मीर धर्मनिरपेक्ष असणे हे भारताच्या हिताचे आहे. काश्मीरचे धर्माच्या आधारावर विभाजन होणे म्हणजे जीनांचा द्विराष्ट्रवादच पुन्हा लागू करणे आहे. असे केल्याने भारताची काश्मीरबाबतची बाजू आणखीच लंगडी होईल व पाकिस्तानच्या ते हिताचेच होईल. पण देशात इतरत्र ‘अल्पसंख्य’ ही संकल्पना न मानणाऱ्यांना फक्त काश्मीरी पंडितांचा विचार करताना ते केवळ हिंदू आहेत एवढेच महत्त्वाचे वाटते. पाकिस्तान व बांगला देश या देशांत अल्पसंख्यकांना चांगले वागवले जात नाही ही गोष्ट चांगली की वाईट? वाईट असेल तर तोच नियम भारतातील अल्पसंख्यकांनाही लागू होतो. असे म्हणणे हे हिंदुविरोधी कसे होते आणि ते मुस्लिमधार्जिणे कसे होते?
माझा असा अनुभव आहे की संघपरिवाराचे लोक तेच मुद्दे पुन्हा मांडत राहतात. शास्त्रीय भूमिकेवरून ते या प्र नाकडे बघत नाहीत. मुसलमानांच्या कायद्यात एका पुरुषाला चार बायका करता येतात पण किती पुरुष तसे करतात? सर्व हिंदू एकपत्नीक आहेत का? याबद्दलची आकडेवारी प्रसिद्ध आहे ती थोडी बघावी. याचा अर्थ मुसलमानांच्या कायद्यात सुधारणा होऊ नये असे नव्हे. पण महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजपा शासनाने सर्वांवर एकपत्नीव्रताची सक्ती करणारा जो कायदा केला त्याला केंद्राने अनुमती दिली नाही. आणि हे घडले तेव्हा केंद्रात भाजपाचीच सत्ता होती. मुस्लिम मूलतत्त्ववाद्यांचे तुष्टीकरण सर्वच राजकीय पक्षांनी केले आहे. शहाबानो निर्णय रद्द करणारा कायदा राजीव गांधी सरकारने केला त्याला सगळ्यात जास्त विरोध धर्मनिरपेक्षता मानणाऱ्यांनी केला. हिंदू तसेच मुस्लिम मूलतत्त्ववाद्यांचे तुष्टीकरण सर्व राजकीय पक्ष करीत आहेत. मतांच्या पेट्या फक्त मुसलमानांच्याच असतात असे नाही. त्या हिंदूंच्या करण्याचे प्रयत्न भाजपातर्फे मोठ्या प्रमाणावर झाले. पण काँग्रेसनेही सोयीचे होईल तिथे ते केले आहे.
हिंदूंना फार सहन करावे लागते आहे वगैरे भावनिक मुद्दे मांडले जातात. त्याबाबतीत अधिक माहितीसाठी माझ्या खालील लेख वाचावा. ‘हिंदूंचे हित कशात आहे?’ (मिळून साऱ्याजणी, जून २००२). माझ्या मते हिंदूंमध्ये स्वतःची कीव निर्माण करण्याचे जे प्रयत्न हिंदू जमातवादी करत आहेत ते हिंदूंच्या हिताचे नाहीत.
हिंदू कोण हे कुणी ठरवायचे? संघावर टीका करणारे आम्ही हिंदूच आहोत. पण हिंदू असला म्हणजे तो संघाच्या विचारांचाच असला पाहिजे हे खरे नाही. चार्वाक-देखील हिंदूच होता. गांधीही हिंदूच होते व नेहरूही हिंदूच होते. पण भारतीयत्व हे हिंदू असण्यापेक्षा व्यापक असते आणि मानव्य हे त्यापेक्षाही व्यापक असते. ज्ञानेश्वरांनी वैश्विक पातळीवर विचार मांडला. विवेकानंदांनीही तसाच मांडला. त्यांचे हिंदुत्व हे मानवतावादाशी सुसंगत होते.
[डॉ. सत्यरंजन साठे गावाबाहेर गेले असल्याने गेल्या (सप्टें. २००२) अंकात आम्ही त्यांचा इतरत्र प्रसिद्ध झालेला लेख मिळून साऱ्याजणी मधून छापला. जास्त नेमके उत्तर वरील पत्राद्वारे साठ्यांनी दिले आहे. —- संपादक
भ. पां. पाटणकर, ३-४-२०८, काचीगुडा, हैदराबाद — ५०० ०२७

पत्र
१. आ.सु.चा शिक्षणविषयक विशेषांक मिळाला. अभ्यागत संपादकांचे लिहिणे आवडले. शुभदा जोशी यांचा लेख विशेष आवडला कारण कोट्यवधि मुलांना शिक्षण देण्याकरता जे प्रमाणीकरण आवश्यक आहे ते “अनेक अभ्यासानंतर, विचारांती’, केले गेले आहे, आणि जरी त्या प्रमाणीकरणामुळे ‘व्यक्तिसापेक्ष वैविध्याला कमी जागा मिळू शकते’, प्रत्येक बालकाची ‘सर्जनशीलता फुलवण्यावर’ मर्यादा येते तरी ते वास्तव त्यांनी मान्य केले आहे. त्या वास्तवाविरुद्ध जाण्याची भाषा त्या बोलत नाहीत. हीच वास्तवाची जाणीव ठेवून मीही माझे म्हणणे मांडतो.
२. प्रथमतः हे जाणवले की आ.सु.च्या या विशेषांकाची मजल first principles च्या पुढे, म्हणजे हेतूंच्या पुढे, फारशी सरकलेलीच नाही. हेतूंबद्दल नव्याने विचार करण्याची गरजच काय? संजीवनी कुळकर्णी यांनी ‘अनेकांना मान्य’ असलेले पाच हेतू नोंदवले आहेत आणि ‘शिक्षण धोरण ठरवणाऱ्यांपासून शिक्षक-पालकापर्यंत’ सर्वांना ते मान्य आहेत असे त्या मानतात. शुभदा वैद्य यांनी दिलेली तीन हेतूंची यादी, कोठारी कमिशनची चार हेतूंची यादी यावरही काही मतभेद असल्याचे दिसत नाही. आता या हेतूंच्या पुढचा प्रांत पहायला हवा.
३. प्रमाणीकृत शिक्षणव्यवस्थेत प्रत्येक टप्प्याची काही नेमकी लक्ष्ये असणार. जसे, प्राथमिक टप्प्यात मुलांनी लिहिणे, वाचणे व आकडेमोड यांची विशिष्ट पातळी गाठली पाहिजे. त्याकरता शिकवण्याचे तंत्र, त्यात प्रशिक्षित झालेले शिक्षक, शेवटी फलिताचे मूल्यमापन करणे याच्या प्रमाणित पद्धती आल्याच. त्या मुलांच्या हिताच्याच असायला हव्यात. त्याच दृष्टीने त्या आखण्याचा प्रयत्न असतो. मुलांच्या मनात भीती निर्माण होते (शिक्षा व परीक्षा यांनी) हा सर्वस्वी त्या पद्धतींचा दोष नाही. त्यांचा डोळसपणे उपयोग करता न येणाऱ्या किंवा फार भावुक असणाऱ्या शिक्षक-पालकांचा आहे, तुटवड्याच्या आर्थिक वातावरणात स्वाभाविकपणे निर्माण होणाऱ्या स्पर्धेचाही तो परिणाम आहे. सुबत्तेच्या परिस्थितीपेक्षा तुटवड्याच्या परिस्थितीतील पद्धती डाव्याच असणार हे लक्षात न घेणाऱ्यांचाही दोष आहे. या बाबतीत काही विचारवतांचे म्हणणे पुढे पेश करत आहे.
४. फिनले या इतिहासलेखकाने पूर्वीच्या व अलीकडच्या अशा दोन भ्रामक कल्पनांचे वर्णन केले आहे : (१) पूर्वीचा Utopia : पूर्वी समाजातील प्रत्येकाला जीवनाचा चांगला दर्जा देता येईल इतकी संपत्ती निर्माण करण्यायोग्य तंत्रज्ञान उपलब्ध नव्हते. गरिबी अपरिहार्यच होती. फक्त थोडे लोकच सुखवस्तू होऊ शकत होते. तेव्हा धर्माने असा Utopia निर्माण केला की ईश्वरनिर्मित व्यवस्थेशी निष्ठा ठेवून प्रत्येक जण जगला, वैयक्तिक नीतिमत्तेने वागला तर सर्वांचे मंगलच होईल. (२) अलीकडचा Utopia : अलीकडे विज्ञान-तंत्रज्ञान खूप वाढून संपत्तीची बेसुमार वाढ शक्य झाली पण भांडवलशाही व्यवस्थेत शोषित असा एक मोठा वर्ग तयार झालाच. तेव्हा नवीन कल्पना अशी निघाली की समाजाच्या सर्व व्यवहारांचे सार्वजनिक नियंत्रण केले की सर्व आलबेल होईल.
५. या दोन्ही भ्रामक कल्पनांचे भोपळे फुटल्यावर एका तिसऱ्या Utopia ने जनमनाची पकड घेतल्याचे मला दिसते. तो असा की मंत्र्यांपासून संत्र्यांपर्यंत सर्व शासक वर्ग भ्रष्ट झालेला असल्यामुळे लोकांनी ठिकठिकाणी NGOS बनवून शासनाशी संघर्ष करावा, शासनावर सतत दबाव ठेवावा, म्हणजे समाज सगळा आलबेल होईल.
६. आजचा बुद्धिवादी-बुद्धिजीवी वर्ग Utopia क्र. २ व ३ मध्ये दोलायमान होताना दिसतो. सार्वजनिक व्यवस्थेतून सर्व काही आलबेल होऊ शकते ही एक श्रद्धा आणि NGOs शासनव्यवस्थेकडून सर्व काही नीट करवून घेऊ शकतील ही दुसरी श्रद्धा. या श्रद्धांना मी भ्रामक एवढ्याकरता म्हणतो की सरकार जर खूप चांगले चालायचे असेल तर त्याकरता लागतील : (१) शिक्षणमंत्रिपदांसाठी सर्व पक्षांजवळ मिळून सात-आठ डझन उत्कृष्ट उमेदवार (२) हजारो योग्य प्रशासक (३) लाखो योग्य शिक्षक आणि (४) हजारो करोड रुपयांचे शिक्षणखात्याचे बजेट. NGOs नी संघर्ष केल्याने ही सामग्री तयार व्हायची नाही आहे. NGOs नी सरकारवर दबाव आणायचा म्हणजे देशभर विखुरलेले हजारो NGOs हवेत व त्यांच्याजवळ लाखोंच्या संख्येने जाणती, कार्यकुशल व निःस्पृह माणसे पाहिजेत. इतके कार्यकुशल NGOs सध्या तरी दृष्टिपथात नाहीत.
७. या संघर्षाच्या कल्पनेला आणखी एक बाजू आहे. ज्या आदर्शासाठी संघर्ष करायचा ते आदर्शच मुळात वास्तववादी आहेत का? ख्रि चन धर्मकल्पनांच्या माध्यमातून विचार करणाऱ्या काहींचे म्हणणे आहे की आजचा
समाज फार भावुक झाला आहे. कर्कश वास्तवाला समोर जायला तो कचरतो. भावुकतेच्या उन्मादात तो जे व्यक्त करतो ते त्याच्या मनात पक्के ठसलेले नसते त्यामुळे तो स्वतः जबाबदाऱ्या घेत नाही, कुठल्यातरी ‘व्यवस्थेवर’ ढकलतो. त्यांच्या पुस्तकाचे शीर्षकच आहे. ‘FAKING IT : The Sentimentalisation of Modern Society’ (संपादक : Digby Anderson & Peter Hullen : प्रकाशक : Penguin Books). मुलांना त्यांच्या कलाने वागू दिले पाहिजे या कल्पनेला (अर्थात अतिरेकाला) त्यांनी भावुकता म्हटले आहे.
८. मुलांचे शैशव जपायला पाहिजे, त्यांना बागडू द्यायला पाहिजे, त्यांना भीतिमुक्त शैक्षणिक वातावरण द्यायला पाहिजे हे खरे. पण काही गोष्टी त्यांच्यावर लादाव्याच लागतील. मुलांनी कितीही आरडा-ओरडा केला तरी आपण त्यांना लशी टोचवून घेतो, त्यांचे हातपाय गच्च धरून ठेवतो. त्याने त्यांच्यावर काही कायमचे मानसिक आघात होत नाहीत. इतर बाबतीतही त्यांच्यावर काही अप्रिय गोष्टी लादाव्याच लागतील. पुढच्या जीवनात अनेक अप्रिय गोष्टी, दुःखे, संकटे, इत्यादि पचवावी लागणार आहेत, Utopia कामाला येणार नाहीत, याची पूर्वतयारी त्यांच्या शालेय जीवनात व्हायला पाहिजे.
९. मी वर जे विवेचन केले आहे तेही first principles च्या स्वरूपाचेच आहे. त्याच्या पुढचा प्रांत पहायला हवा असे मी म्हटले आहे. त्यातले काही मुद्दे मी परिच्छेद ३ मध्ये नमूद केले आहेत. त्यांची चर्चा अनुभवी शिक्षणतज्ज्ञ करत असतात व करत राहतील. आ.सु.मध्ये अशी चर्चा प्रसिद्ध झाल्यास मी ती समजून घेण्याचा प्रयत्न
करीत. तूर्तास मी शिक्षणव्यवस्थेबाहेरच्या एका घटकाकडे लक्ष वेधू इच्छितो.
१०. संजीवनी कुळकर्णी यांनीच म्हटले आहे की पालक, शिक्षक आणि समाज यांनी शिक्षणासाठी पूरक काम करायला हवे. हे घटक एकमेकांपासून विभक्त नाहीत. एकच व्यक्ती पालक, शिक्षक आणि समाजकार्य करणारीही असू शकते. तेव्हा संजीवनी कुळकर्णी यांच्या विधानाचा अर्थ असा घ्यायला पाहिजे की प्रत्येक व्यक्तीने स्वतः व्यक्तिशः काही जबाबदारी उचलली पाहिजे. आ.सु.च्या विशेषांकात लेखक म्हणून जे सहभागी झाले आहेत, ते ही वैयक्तिक जबाबदारी आपापल्या परीने पार पाडत आहेत. त्याबद्दल मी त्यांचे अभिवादन करतो. ‘एक दीप दुसऱ्यास चेतबी, ऐसे होती अनेक’ असे त्यांचे कार्य वाढो अशी मी त्यांना शुभेच्छा देतो. एका दुसऱ्या दिशेनेही कार्य आवश्यक आहे ते म्हणजे पालक आणि शिक्षक यांना त्यांची वैयक्तिक जबाबदारी सांगणे आणि समजावणे, त्यांच्यात जाणतेपणा यावा म्हणून त्यांना मार्गदर्शन देणे. आ.सु.ने हे कार्य अंगीकारल्यास मला आनंद होईल,
शासनाशी संघर्ष, शासनावर दबाव यावर जरा कमी भर द्यावा म्हणजे वैयक्तिक जबाबदाऱ्यांवरचे लक्ष कमी होणार नाही.
वैयक्तिक जबाबदाऱ्यांवर भर द्यायचा म्हणजे पालकांनी प्रथम शिक्षणाचे हेतू समजून घ्यायचे, आत्मसात् (internalise) करायचे व ते साध्य होतील अशा रीतीने पूर्वप्राथमिक शिक्षणातील जबाबदारी स्वतः उचलायची. शिक्षकांनी सुद्धा अशाच त-हेने आपल्या शालेय पाल्यांना शिकवायचे. व्यापक कार्य करणाऱ्या व्यक्तींनी आणि संस्थांनी केवळ स्वतःच्याच संस्थांकडे न बघता इतरांनाही आपल्या कार्याची माहिती द्यायची, त्यांच्याकडून अशीच माहिती घ्यायची व विचारांचे प्रवाह सर्व दिशांनी सतत चालू ठेवायचे. थोडक्यात म्हणजे एक विचारमंच तयार करायचा.

रवींद्र द. खडपेकर, नारायण आश्रम, ता. कणकवली, कोळोशी — ४१६ ६१०, जि. सिंधुदुर्ग
आ.सु. जून च्या मुखपृष्ठावर छापलेले पक्याचे सगळे म्हणणे बिनचूक आहे. फक्त त्याने केलेल्या शेवटच्या प्र नांत तो स्वतः फसलेला आहे व शेपूट तुटलेल्या कोल्ह्याप्रमाणे जगाला फसवायला निघालेला आहे. तो विचारतो; “१५ वर्षे शिकल्यानंतर तरुण पोरांना तुमच्या शिक्षणामुळे महिन्याला २० हजार रुपये मिळणार आहेत?”
प्रत्येकाची धडपड महिना २० हजार मिळवण्यासाठीच आहे हे त्याला कोणी सांगितले? त्याने स्वतः होऊनच ठरवले! सगळे जग त्याच्याचसारखे आहे असे तो समजतो आहे. काही मोजके का होईना पण द्रव्याच्या लोभापासून दूर असलेले लोक आहेत. त्यांना पक्या लक्षावधी रुपये मिळवतो हे ठाऊक आहे. पण पक्या किंवा त्याचे साथीदार आज ना उद्या आरक्षींच्या (पोलिसांच्या) किंवा आपसांतील टोळीयुद्धाच्या गोळ्यांना बळी पडणार आहेत याचेही त्यांना नि िचत भान आहे. पक्या त्याबाबत धूर्तपणे गप्प आहे.
पण मुळात पक्या असा सगळ्यांना फसवायला धजतोच कसा, तर त्याचे तत्त्वज्ञान आपण (अर्थात् मोजके सन्माननीय अपवाद वगळून) आधीच स्वीकारलेले आहे म्हणून! ‘सतत वाढते राहणीमान’ हे आता आमचे जीवनमूल्य बनलेले आहे. इतक्या राहणीमानासाठी जे काही करायला लागते त्याला आम्ही भ्रष्टाचार म्हणायला तयार नाही. वीस हजारांचे पोट शाबूत ठेवून आम्हाला भ्रष्टाचार निपटायचा आहे हे चतुर पक्याला पक्के ठाऊक आहे. त्यामुळे तो निर्धास्तपणे मोबाईलवर बोलत आम्हाला त्याचे तत्त्वज्ञान ऐकवीत आहे. सैनिकाने म्हणायचे ‘मी रणांगणात लढून पराक्रम करायला उत्सुक आहे. पण त्याचबरोबर संचलनासाठी पहेनलेल्या पँटची कडक इस्त्री आणि टोपीवरचा कुर्रेबाज तुरा शाबूत राहीलच हेहि मी पाहणार!’ हे शक्य आहे का? आपण असे विसंगत वागत, बोलत असल्यावर पक्या मोगॅम्बो खूष!
राहणीमान वाढते ठेवण्यात वाईट काहीच नाही. पण त्यासाठी आपण किंमत काय देत आहोत?
ज्याला पक्याला पराजित करायचे आहे त्याने शिक्षण हे केवळ वाढत्या पोटासाठी नसून उन्नत मस्तकासाठीही आहे हे पक्याला आपल्या वर्तणुकीतून दाखवून द्यायला हवे. मला वाटते कदाचित् पक्याला सुद्धा त्याचा हा असा पराभव आवडेल. कारण त्याचे शेवटचे बोलणे सोडले तर आधीचे सगळे बोलणे विचारशील आहे.
[जुलै-ऑगस्ट २००२ च्या विशेषांकाआधी त्या विषयावर वाचकांची नजर वळवायला ‘पक्या’ला आणले होते —‘ट्रेलर’ सारखे! त्याने त्याचे काम केले! —-संपादक]

मधु तळवलकर, मधुबन अपार्टमेंटस् ३६ भुसारी कॉलनी, पौड रोड, पुणे — ४११ ०३८
जुलै-ऑगस्टचा विशेषांक-शिक्षणामागील हेतू–वाचनीय व अंतर्मुख करणारा आहे. सर्वांसाठी शिक्षण—शुभदा जोशींचा लेख—माहितीपूर्ण आहे. वस्तीशाळा किंवा महात्मा फुले शिक्षण हमी योजना या अपरिहार्यपणे स्वीकारल्या गेल्या आहेत. काहीच नसणाऱ्यांना थोडे तरी मिळते आहे हा मुद्दा थोडा उत्साह देणारा आहे. या योजना काही कायमचा पर्याय म्हणून स्वीकारला जाऊ शकत नाहीत. वस्त्यांवरील शाळांतून दलित, मागासवर्गीय, वंचित घटकांतली मुली-मुले अक्षर-शिक्षण घेत गाणी म्हणत, हसत खिदळत एकत्र येत आहेत. याचे महत्त्व कमी लेखता कामा नये. सरकारकडे निधी नसल्यामुळे या योजनात सुधारणा होण्याची शक्यता कमीच आहे. आज माझ्या युवा मुलाने सांगितले की भारताला म. गांधी पेलवला नाही. यातच आपण प्रतिगामी शक्तींशी टक्कर देण्यात किती कमी पडतो हे स्पष्ट होते. तुमच्या लढाईत आम्ही आहोतच.

निखिल जोशी, ‘तत्त्वबोध’, हायवे चेकनाक्याजवळ, (रायगड) — ४१० १०१
आ.सु. जून २००२ मधील माझ्या पत्रावरील श्रीधर दामोदर मेहेंदळे यांची प्रतिक्रिया आ.सु. सप्टें. २००२ च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. परंतु माझ्या शंकांना उत्तरे मिळालेली नाहीत.
‘उपयोगात येणारी वस्तू औषध नाही हे माहिती असूनही ती वस्तू (Placebo) घेणाऱ्यालासुद्धा औषधासारखा फायदा होतो’ याचा पुरावा म्हणून मेहेंदळे यांनी पुन्हा एकता एकलव्य आणि पार्वती ही असत्य उदाहरणे दिली आहेत. त्यातही पार्वती गण-पतीला जिवंत करून आंघोळीला गेली. त्या गणपतीने शंकराशी खरोखरची मारामारीसुद्धा केली. त्यात Placebo चा संबंध नाही. कारण स्वतः Placebo शरीरावर काहीही
परिणाम घडवत नाही. दुसरा आक्षेप असा की पार्वतीला दिलासा होता की बाहेरून येणाऱ्याला तिथे खरा पहारेकरी आहे, की पुतळा आहे हे समजू शकणार नाही. बुजगावणे पक्ष्यांसाठी Placebo असते, शेतकऱ्यासाठी नव्हे. गणपती शंकरासाठी Placebo होता, पार्वतीसाठी नव्हे.
संख्याशास्त्रीय पद्धती (Statistical Methods) मेहेंदळे यांना माहीत असतीलच. एकलव्याची कथा खरी मानली तरी ‘मूर्तीमुळे लाभ झाला असे त्याला भासले’ एवढेच म्हणता येईल. (गणपतीत प्राणप्रतिष्ठापना करतात तेव्हा त्याला सजीव समजतात तसेच एकलव्याचेही प्रामाणिक मत असेल अशीही एक शक्यता आहे.) काही जणांनी द्रोणाचार्यांच्या निर्जीव मूर्तीसमोर सराव करावयाचा आणि काहींनी त्यावाचून. ह्या दोन गटांच्या गुणवत्तेत लक्षणीय फरक (significant difference) पडत असेल तरच मूर्तीचा परिणाम ग्राह्य धरला जातो.
एखादी वर्तणूक चांगली आहे असे सिद्ध झाल्याशिवाय ती आदर्श होत नाही—-मग ती कोणाचीही असो. मात्र वर्तणूक चांगली आहे याची खात्री पटली तरी ते त्या वर्तणुकीपुरतेच मर्यादित असते, संपूर्ण व्यक्तिमत्त्व चांगले असेलच असे नाही. किंबहुना सरसकट चांगले असे काहीच नसते. आदर्शाला व्यक्तिरूप देण्यात ‘अमुक अमुक कृती, आदर्श माणसाची आहे म्हणून ती नक्कीच आदर्श असणार’ असा निकष लावण्याचा प्रयत्न असतो. कोणीच आदर्श नाही, असला तरी त्या व्यक्तीविषयी भविष्यात काय नवे सत्य उघडकीस येईल याची खात्री नाही, अशी परिस्थिती असल्यामुळे वरील निकष निरुपयोगी ठरतो. तो निकष वाईटही आहे. कारण आदर्शाना (उगीचच) व्यक्तिरूप दिले जाते तेव्हा ‘विचार करायला शिकणे’ हा मूळ उद्देश बाजूला पडतो. विचार करण्याची जबाबदारी आदर्श व्यक्तीवर टाकणे वैचारिक पंगुपणा आहे.
विंदा करंदीकर कवितेत पहिल्याच ओळीत स्वतः वेडा खुळा असल्याचे नमूद करतात. मग बोलणेच खुंटले. विवेकवाद हा आ.सु.चा गाभा आहे. खुळ्यांना आ.सु. मध्ये जागा नाही. स्वतःच्या ‘चित्ता’मध्ये सद्भावना असेल तर बाह्योपचार अनावश्यक आहेत, आणि तसे नसेल तर बाह्योपचार निरुपयोगी आहेत हे लक्षात घ्यावे. ह्या कवितेत कोणत्याही स्व-उन्नतीचा दावा नाही. तसेच कवितेतील भावना हे काही प्रत्यक्ष घटना किंवा उदाहरण नाही आणि ‘भावनां’च्या आहारी जाण्याचे तोटे विवेकवादी पूर्णपणे जाणून आहेत.
मेहेंदळ्यांनी बहुजनसमाजाच्या मते राम, कृष्ण आदर्श असल्याचे म्हटले आहे. बहुजनसमाजाची मान्यता असणे किंवा नसणे हे विवेकवादी आ.सु.च्या दृष्टीने गैरलागू आहे. बहुजनसमाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भावुक lesser mortals ची अशी श्रद्धा (१) समाज ‘आपल्या’साठी किती धोकादायक आहे याची निदर्शक आहे? — की — (२) राम, कृष्ण यांच्या आदर्शपणाचा पुरावा आहे?
इटंरनेट हा अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा कळस असल्यामुळेच, तेथे ‘छापलेले’ सगळे सत्य असेलच असे नाही. किंबहुना ज्यांना वैज्ञानिक कसोट्यांवर टिकता येत नाही ते प्रसिद्धीसाठी अधिक प्रयत्न करतात. म्हणूनच (जेव्हा प्रत्यक्षप्रमाण नसेल तेव्हा अधिकार-वाणी असलेल्याची [authority] मदत घ्यावी लागते.) मानवी जीवशास्त्रात इंटरनेटपेक्षा अधिक अधिकारवाणी मेडिकल कौन्सिलची आहे. रेकी, शाप, वरदान, कुंडलिनी इ. सिद्धींना मेडिकल लची मान्यता नाही. ‘संख्याशास्त्रीय प्रयोगांमध्ये रेकी, शाप, वरदान, कुंडलिनी इ. सिद्धी खऱ्या ठरतात’ असे (१) माझ्यासमोर सिद्ध होणे (= प्रत्यक्षप्रमाण), किंवा (२) मेडिकल कौन्सिलसमोर सिद्ध होणे, यांपैकी एकतरी घटना घडल्याशिवाय रेकी, शाप, वरदान, कुंडलिनी इ. सिद्धींवर विश्वास ठेवणे शक्य नाही. इंटरनेट तितके विश्वासार्ह नाही कारण ते अनिर्बंध आहे. त्यात quality control नाही, किंवा standardization ही नाही. ‘बाजारा’त अनेक ‘यंत्रे’ विकाऊ असतात. N-Rays किंवा वनस्पतीपासून पेट्रोल अशी अनेक ‘संशोधने’ हिरिरीने मांडली गेली. इंटरनेटवरील एका वेबसाईटवर चुंबकीय एकध्रुव तयार केल्याचा दावा आहे. त्याचा आराखडादेखील आहे. (विश्वाच्या सुरुवातीला असतील किंवा नसतील, मला माहीत नाही, पण चिरंतन यांत्रिकीमध्ये चुंबकीय एकध्रुव बनवण्याचा दावा खोटाच असतो. त्याला कोणीही आक्षेप घेतला नाही.) कोणतीही संशोधने शास्त्रीयदृष्ट्या नियंत्रित (scientifically controlled) प्रयोगांनी सिद्ध होणे आवश्यक असते. कोणतेही यांत्रिक (mechanical) बल न वापरता केवळ मनातल्या इच्छेने इच्छित फल (desired output) देण्याची यंत्राची क्षमता statistically singificant असल्याचे सिद्ध झाले आहे काय? Stephen Hawking सारख्या अपंगांनी अशा यंत्राला प्रसिद्धी दिली आहे काय? newsletter@mindfitness.com हा एक e mail address दिसतो. माहिती देणारी एखादी web site आहे काय?
(माझ्या दि. ०९-०९-२००२ च्या पत्रास पुरवणी १६-०९-२००२ 🙂

Bionics विषयी इंटरनेटवर मेहेंदळेंनी दिलेल्या आणि इतर पत्त्यांवर शोध घेतला. त्या वेबसाईटस्चा कोणत्याही आधिभौतिक (Paranormal, Metaphysical) गोष्टींचा दावा नाही. मानवी शरीर थेट संगणकाला जोडणे एवढाच त्यांचा उद्देश आहे. त्याची सुरुवात बहुदा पेसमेकर आणि श्रवणबधिरांच्या यंत्राने झाली. आता त्यात डोळ्यांऐवजी कॅमेरा, अंतःकर्णाऐवजी माईक, आणि बोटांच्या मज्जातंतूंना कीबोर्ड जोडणे इ. गोष्टींचा समावेश आहे. त्यात मेहेंदळे यांना अभिप्रेत शाप, वरदान, रेकी, कुंडलिनी इ. चा उल्लेख नाही. Bionics कदाचित E.E.G. चे वाचन करून आदेश ऐकणारा संगणकही बनवेल. पण त्यात काही विशेष (धक्कादायक, प्रचलित विज्ञानाला अनपेक्षित) नाही. मेहेंदळेंनी उल्लेख केल्याप्रमाणे केवळ इच्छाशक्तीने वस्तू हलविणे तेथे शक्य नाही. इलेक्ट्रोडच्या सहाय्याने यंत्राला आदेश देणे सोपे होते, पण त्या यंत्राला भौतिक उर्जास्रोत लागतोच. डोंबिवलीमुळेच कदाचित मेहेंदळेवर रेकी, कुंडलिनी इ. चा प्रभाव असावा.
एकूण, Bionics मध्ये नवे विज्ञान नाही — तंत्रज्ञान आहे. काही paranormal दावा असेल तर तो डोळे मिटून स्वीकारू नये, कारण आजवर असले सर्व दावे खोटे ठरले आहेत.
केशवराव जोशी, ‘तत्त्वबोध’, हायवे, नेरळ, (रायगड) — ४१० १०१
लोकसभेच्या ५२४ जागांपैकी फक्त ७० मतदारसंघांत २०% हून अधिक मतदार मुस्लिम आहेत आणि त्यांचा प्रभाव पडू शकतो. इतर ४५४ मतदारसंघांत एकाही मुसलमानाचे मत मिळाले नाही तरी जयपराजयावर परिणाम होत नाही. न्या. बहारी यांनी ९-६-९३ रोजी असा निर्णय दिला आहे की, ‘मुसलमानांचे लांगूलचालन केले जात नाही’. जनगणनेच्या आकडेवारीनुसार बहुपत्नीकत्व बौद्धांमध्ये ८.१३% हिंदूंमध्ये ५.०६% आणि मुसलमानांमध्ये ४.३१% आहे. हिंदूंमध्ये ४.५% पदवीधर आहेत, तर मुस्लिमांमध्ये ०.८% आहेत.
ता. ०४–०१–२००१ रोजी कलकत्त्याला जागतिक इतिहास परिषद भरली होती. अफगाणिस्तानातील इतिहासकार हसन दाणी यांनी परिषदेत सांगितले की, “अफगाणिस्तानाच्या उत्तर भागात, आठव्या शतकात कल्लार वेका भीमपला हा शिवभक्त हिंदू राजा होता.” इतिहासकार सिंघल म्हणतात, “इ. स. च्या सहाव्या शतकापर्यंत भारतीय व्यापारी ग्रीसला जात, ग्रीक भाषेत बोलत. त्यांनी तेथून अनेक मुली भारतात आणल्या.” त्या काळात ऋषिमुनी ब्राह्मणसुद्धा गोमांस खात. इतिहासात इ. स. सहाशे ते अठराशे ह्या काळास ‘तमोयुग’ म्हणतात. तेव्हापासून गाईला गोमाता म्हणू लागले. ह्या तमोयुगातील रीतिरिवाज आज हिंदूंकडून पाळले जातात.
पूर्वीच्या काळी आर्यानी हरप्पा मोहोंजोदारो नष्ट केले. खांडववन जाळून नागांची हत्या केली. बौद्धविहार नष्ट केले. भिडूंना ठार मारले. हर्षदेव राजाने देवळे लुटली. देवळात सोने असते म्हणून ती लुटली जात. मराठ्यांनी १७९१ मध्ये शृंगेरीचा मठ लुटला तेव्हा टिपू सुलतानने मठास संरक्षण दिले. वाचकांनी अभ्यास करून पत्रे लिहावीत. विशेषतः राजकारणी काय सांगतात त्यावर विश्वास न ठेवता विद्यापीठांची मान्यता असलेल्या गोष्टीच सत्य मानाव्यात.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.