महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुखे यांनी मराठा सेवा संघाच्या वतीने नव्या धर्माची स्थापना करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला असल्याची बातमी वर्तमानपत्रांतून काही महिन्यांपूर्वी प्रसिद्ध झाली आणि त्यावर उलटसुलट चर्चाही तेव्हापासून सुरू आहे. हे कार्य तसे प्रचंड मोठे आणि आव्हानात्मक आहे. धर्माचे तत्त्वज्ञानात्मक अधिष्ठान, पूजापद्धती वगैरे कृतिरूप अभिव्यक्ती आणि रीतिरिवाज, दंडक, नीतितत्त्वे, यमनियम, आदर्श, मर्यादा, सामाजिक संबंध वगैरेच्या स्वरूपातील समाजनियमनात्मक प्रणाली–अशा तिन्ही बाजूंनी उभारणी धर्मस्थापनेसाठी आवश्यक असते. डॉ. साळुखे यांचा अधिकार आणि अनुभव ध्यानात घेता ते एकटाकी पद्धतीनेही हे आव्हान पेलू शकतील याबद्दल शंका घेण्याचे कारण नाही. त्यांच्या जोडीला प्रा. जैमिनी कडू, डॉ. एस्. एस. भोसले, प्रा. प्रभाकर पावडे यांच्यासारखी मान्यवर मंडळीही धर्माच्या अभ्यासाला लागली असल्याचे वृत्त आहे. १२ जानेवारी २००५ हा दिवसही मराठाधर्माच्या दीक्षेसाठी मुक्रर करण्यात आला असून त्या दिवशी जगातील (पाच कोटी) लोक सामूहिकरीत्या दीक्षा घेणार आहेत,(१) असे समजले.
साळुखेप्रभृतींचे वय आणि व्याप पाहता एवढ्या कमी अवधीत शास्त्रशुद्ध धर्मसंकल्पना साकार होणे कठीण असल्यामुळे “सर्वसामान्य समाजातील सर्वसामान्य माणसांनी आपल्याला कसा धर्म पाहिजे याचा निर्णय करावा असे आवाहन मराठा सेवा संघाचे रा. पुरुषोत्तम खेडेकर यांनी एका लेखातून केले आहे.(२) मराठाधर्माची त्यांच्या मनातील संकल्पना भव्यदिव्य आहे. मराठा समाजाची पुढच्या पंचवीस हजार वर्षांत कशी अवस्था असेल? कदाचित ४-५ हजार वर्षांत एका स्वतंत्र ग्रहावर शंभर टक्के मराठाधर्मीयांसाठी राखीव वास्तव्यस्थान असेल अशा “सर्व विज्ञानवादी सत्य व कल्पना करता येणाऱ्या बाबींना सामावून घेणारा आपला मराठाधर्म असावा अशी संकल्पना आहे” असे खेडेकर म्हणतात. जिजाऊ रथयात्रेच्या माध्यमातून त्यांनी सुमारे १३० लाख समाजबांधवांपर्यंत नव्या धर्माच्या स्थापनेचा विचार नेला आणि त्यांच्या म्हणे असे लक्षात आले की “समाजमन नव्या मराठाधर्माच्या स्वीकृतीसाठी केवळ तयारच नसून, आतुर झालेले आहे.” समाजातील सर्व स्तरांतील लोकांनी संकाल्पित धर्मासंबंधी पुढील बाबींवर विचार व प्रस्ताव पाठवावेत असे आवाहनही त्यांनी केले आहे : धर्माचे नाव, दीक्षापद्धती, स्थापना व प्रसार, धर्मग्रंथ, देव, स्तोत्रे, सूत्र, प्रार्थना, मंत्र, स्त्री-पुरुष संबंध, दैनंदिन कर्मकांड, झेंडा, मंदिर, धर्मा-चार्य, धर्मबंधू भगिनी, संस्कार-पौरोहित्य-लग्नादी विधी, धर्मक्षेत्र, धर्मप्रचारक, धर्माभ्यासक, धर्मगीत, धर्मशुल्क, धर्मरूढी, धर्मवेष, धर्मभाषा, धर्मपीठ, धर्मन्याय, धर्मशासन, धर्मज्ञान-विज्ञान-तत्त्वज्ञान, धर्मयंत्रणा, धर्मशिक्षण-शिक्षक, धर्माज्ञा, धर्मदंड, धर्मपरीक्षा इत्यादी. धर्म सोपा असावा, क्लिष्ट नसावा, पाण्यासारखा निर्मळ असावा, त्यात पोटजाती नसाव्यात, (ब्राह्मण वगळता) कोणालाही तो स्वीकारता यावा–अशा त्यांच्या काही अपेक्षा आहेत. भटबंदी पूर्णपणे लागू करावी, सर्वत्र जिजाऊमंदिरे उभारावीत, समारंभात शाल-नारळा-ऐवजी जिजाऊ प्रतिमा द्याव्यात, जिजाऊ पूजन सुरू करावे—- अशा काही सूचनाही त्यांनी केल्या आहेत.
डॉ. साळुखे व अन्य अभ्यासकांच्या व्यासंगातून आणि वरील आवाहनाला बहुजनसमाजाकडून मिळणाऱ्या प्रतिसादातून संकल्पित मराठाधर्माचे स्वरूप नेमके कसे निष्पन्न होते हे यथावकाश स्पष्ट होईलच. नव्या धर्माच्या संस्थापनेच्या या खटाटोपामागे प्रचलित हिंदू धर्मातील ज्या विकृती व वैगुण्ये कारणीभूत ठरली असल्याचे सांगितले जाते त्यांबद्दल आक्षेप घेण्याचेही काहीच कारण नाही. त्या धर्माने पुरस्कारलेली विषम वर्णव्यवस्था, स्त्रीदास्य, अस्पृश्यता, त्याच्या नावाने बोकाळलेल्या अंधश्रद्धा व अपप्रवृत्ती या गोष्टी निषेधार्हच आहेत. जातिभेदांमुळे सामाजिक जीवनात माजलेले विषारी प्रदूषण आणि सप्तबंदींमुळे स्त्री-शूद्रातिशूद्रांच्या प्रगतीच्या पायात जखडलेल्या बेड्या यांचा गंभीरपणे विचार केलाच पाहिजे यावरही दुमत संभवत नाही. जातिविभक्त व स्तरीकृत समाजात धर्म काही प्रमाणात एकजूट, परस्परसहकार्य, कर्तव्यवाटणी व समूहभावना निर्माण करू शकतो याचेही ऐतिहासिक पुरावे देणे अशक्य नाही.
प्र न एवढाच आहे की नव्या धर्माच्या स्थापनेद्वारे अपेक्षित बदल घडवून आणणे शक्य आहे काय? हिंदूधर्माचे सर्व संस्कार समूळ नष्ट करून त्याजागी नवे संस्कार ठरवून रुजवणे कितपत शक्य होईल? धर्माची संकल्पना, धर्मसंस्थेची उत्पत्ती व विकास, धर्माचे समाजशास्त्रीय संदर्भ, धर्मप्रसाराचे मार्ग व प्रभावक्षमता इत्यादी मुद्द्यांवरचे पूर्वानुभव काय सांगतात? आजच्या काळात अपेक्षित सामाजिक उद्दिष्टे पदरात पाडून घेण्याचा नवधर्मसंस्थापनेखेरीज दुसरा मार्गच नाही काय? या प्र नांना उत्साहाच्या भरात डावलले जाऊ नये असे वाटते. धर्मसंकल्पनेचा उत्क्रांतिक्रम ऐतिहासिक कार्यकारणांच्या आधारे समजून घेतल्यास नवधर्मस्थापनेच्या खटाटोपातील वैयर्थ्य लक्षात आल्यावाचून राहात नाही. जोतीराव फुल्यांनी स्थापन केलेला सार्वजनिक सत्यधर्म, डॉ. आंबेडकरांनी पारंपरिक व जागतिक बौद्ध परंपरेपेक्षा वेगळा अन्वयार्थ सांगून लक्षावधी पूर्वास्पृश्यांना ज्याची दीक्षा दिली तो बौद्ध धम्म ही आपल्या इतिहासातील दोन ठळक उदाहरणे आणि मानवजातीचे ऐक्य, वि वशांतता, स्त्री-पुरुष समानता, धर्म-विज्ञान एकात्मता, आर्थिक समस्यांचे आध्यात्मिक समाधान, अनाढ्यता व निर्धनता यांच्या आत्यंतिकतेचे निराकरण–या आणि अशा अनेक आश्वासनांसह जगापुढे आलेले अक्षरशः डझनोगणती पंथ व संप्रदाय यांचा अनुभव आपल्याला काय सांगतो?
जोतीराव फुले यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक पारंपरिक वैदिक धर्माचे ब्राह्मणधार्जिणे स्वरूप स्पष्ट केले, हिंदूंच्या धर्मग्रंथांचे व पुराणांचे ‘कृत्रिमी’ अंतरंग लोकांपुढे ठेवले, पुरोहितशाही नाकारली, चातुवर्ष्याला सोडचिठ्ठी दिली. सकारात्मक अंगाने त्यांनी बहुधार्मिक कुटुंबरचनेची कल्पना मांडली, सार्वजनिक सत्यधर्माची बत्तीसकलमी आचारसंहिता सांगितली, दैनंदिन जीवनात लागणारे नवे विधी व कर्मकांडे रचली. काही काळ काही लोकांनी तो धर्म आचरणातही आणला, काही विवाह सत्यधर्माच्या विधीनुसार साजरे झाले, अब्राह्मण पंडित-पुरोहित थोडेफार दिसले. पण या धर्माचा प्रभाव त्या पलीकडे झाला वा टिकला असे मात्र म्हणता येणार नाही. डॉ. आंबेडकरांच्या प चात त्यांच्या धम्मकल्पनेला उभा छेद देणाऱ्या अनेक गोष्टी शिरलेल्या आपण आज पहातो. परदेशांतील संघटित व सधन बौद्ध व्यासपीठांनी बाबासाहेबांच्या अनुयायांना आपल्याकडे आकर्षित करण्याची जणू स्पर्धाच आज चालवली आहे. जोतीरावांनी नवा धर्म स्थापन केला, तर नवधर्मस्थापनेचा काळ इतिहासजमा झाला आहे हे ओळखून आंबेडकरांनी उपलब्ध धर्मांपैकी जो आधुनिक काळाशी सुसंवादी व नव-मूल्यांशी मिळता जुळता धर्म त्यांना वाटला तो स्वीकारण्याचा आदेश आपल्या लक्षावधी अनुयायांना दिला. पण आज त्या दोन्ही पर्यायांच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत.
व्यक्तींनी ज्या धर्मात जन्म घेतलेला असतो तो अनेक परींनी त्यांच्या मनोविश्वाचा अविभाज्य भाग होऊन बसलेला असतो. धार्मिक संस्कारांचा त्यांच्या मनांवर झालेला प्रभाव बराच खोल आणि प्रबळ असल्यामुळे त्यांच्यावरचा जरासाही आघात जिथे त्यांना सहन होत नाही तिथे एका धर्माचे संस्कार संपूर्ण पुसून मनाच्या कोऱ्या पाटीवर अगदीच नवे संस्कार बिंबवणे अशक्यच म्हणावे लागेल. कानांवर लहानपणापासून पडणारे असंख्य धर्मसंबद्ध ध्वनी, मिथके, कहाण्या, पोथ्या-पुराणे, कीर्तनवचने, विधिउत्सव अशा असंख्य माध्यमांतून व्यक्तींच्या धर्मभावनांची जडणघडण झालेली असते. संघटित धर्मसंस्था आपापल्या यंत्रणांमधून व समाजनियमनाच्या आघाड्यांद्वारे या भावना टिकवत-फुलवत असतात. धर्माची कोणतीही व्याख्या जरी आपण घेतली तरी सामान्य माणसांपेक्षा मोठ्या, बलवत्तर, चिरंतन, सर्वव्यापी व सर्वसाक्षी अशा एका अलौकिक शक्तीचे संकल्पन त्यात असतेच. त्या शक्तीच्या ठायी माणसाचे भले वा बुरे करण्याची शक्तीही सामान्यतः गृहीत धरलेली असते. या शक्तीचे जनमानसावर असलेले दडपण पूर्णत्वे नष्ट करणे किंवा त्या शक्तींच्या जागी नव्या तत्सम पर्यायी शक्तीची प्रतिष्ठापना करणे ही गोष्ट सहज शक्य नसते. धर्मांतरांनंतरही अनेक पिढ्यांपर्यंत आधीच्या धर्मांचे अवशेष त्यामुळेच धर्मांतरितांच्या धार्मिक वर्तनात दिसून येतात. प्रयोगशाळेत तज्ज्ञांनी निर्माण केलेली नवी दैवते अशा प्रकारे स्वीकारली जाणे केवळ अशक्य दिसते. व्यक्तींच्या मनात, दृष्टिकोनांत, स्वभावात आणि वर्तनात ज्यांचे आंतरीकरण पक्के झाले आहे अशा धार्मिक अवशिष्टांचे निराकरण पर्यायी धर्मव्यवस्थांकरवी होण्याची अपेक्षाच त्यामुळे अनाठायी ठरते.
स्थापना करताना काळजीपूर्वक समतेच्या अधिष्ठानावर उभारलेल्या धर्मात पुढे विषमता आणि शोषण शिरणार नाही याची हमी तर कोणीच घेणार नाही. तो नवा धर्म ज्या सामाजिक-आर्थिक चौकटीत क्रियान्वित होईल तिचा परिणाम त्याला टाळताच येणार नाही. राजकीय व आर्थिक व्यवस्थांत झालेल्या बदलांचा धार्मिक व्यवस्थेवर अपरिहार्यतः प्रभाव पडतो. महायुद्धे, वर्गविग्रह, साम्राज्यसत्ता, वंशद्वेष, राष्ट्राराष्ट्रांतील स्पर्धा, तज्जन्य फॅसिझम, साम्यवादी राज्यव्यवस्थांचे उदयास्त, उदारीकरण-जागतिकीकरण, दहशतवाद, सांप्रदायिकता या व अशा कित्येक कारणांनी सर्वच धर्मांच्या कार्यपद्धतीतच नव्हे तर एकूणच मानवी भावविश्वात प्रचंड खळबळ घडवून आणल्याची उदाहरणे जगात सर्वत्र दाखवता येतील. आपल्याकडची गावगाड्याची बंदिस्त व्यवस्था आपल्या धर्माधिष्ठित रीतिरिवाजांना, श्रम व श्रमिक यांच्या विभागणीला, नीतिन्यायाच्या संकेतांना कशी आधारभूत झाली हे आपण पाहतोच आहोत. तेव्हा विशिष्ट टप्प्यावर कितीही विचारपूर्वक धर्मव्यवस्था घडवली (आणि जरी समजा ती अमलातही आली) तरी भोवतालच्या परिस्थितीमुळे तीत विषमता, अन्याय, अंतर्गत विग्रह, अनिष्ट रूढी वगैरे अरिष्टे उद्भवणार हे उघडच आहे. दुसरे असे की धर्माचे संदेश किंवा सिद्धान्त, विधी किंवा नीतिनियम प्रत्यक्षात राबवायचे तर त्यासाठी संघटना ही लागणारच, संस्थापकांना श्रेष्ठत्व येणारच, धर्मगुरु व पुरोहितवर्ग प्रबळ होणारच, कालांतराने नवा अर्थ लावणारे पुढे येतील त्यांचा छळ आणि त्यांच्याकरवी विद्रोह होणारच, धर्माधिकारी सांगतील त्यापेक्षा वेगळे सांगणारे पाखंडी ठरवले जाणारच तसेच संपत्ती व दर्जा यांतील तफावत, सामाजिक-सांस्कृतिक भिन्नीभवन, आणि भिन्न दृष्टिकोन उद्भवणारच. या सर्व बाबतींत नवा धर्म आजपर्यंतच्या धर्मांबाबत जे घडले त्याला अपवाद असेल, हे कशाच्या आधारावर गृहीत धरायचे? सबब नवधर्मस्थापनेचा उपक्रम हा अव्यापारेषु व्यापार ठरतो.
नवधर्माची प्रतिष्ठापना काही निवडक विचारवंत, जनसामान्यांकडून आलेल्या शेकडो सूचना ध्यानात घेऊन (आणि विशिष्ट समाजाला जन्माच्या आधारे धर्मदीक्षेत अपात्र ठरवण्याचा अतार्किक निर्णय आधीच घेऊन) करू शकतील काय हाही प्र नच आहे. “धर्मश्रद्धा ही विश्वव्यापक(च) होती आणि आजवर ज्यांना आपण धर्म, धर्मपंथ, धार्मिक भावना व आचार म्हणून ओळखत आलो त्यांना विश्वसमावेशक श्रद्धेची बैठक होती असे आपणास आढळून येईल”(३) हे दि. के. बेडेकरांचे निरीक्षण वस्तुनिष्ठ व महत्त्वाचे आहे. जोतीराव फुल्यांचा सत्यधर्मही ‘सार्वजनिक’ होता. त्यात कोणत्याच समूहाची मिरास वा विशेषाधिकार नव्हते, जात-लिंग-वर्ण वगैरे आधारांवर पक्षपात नव्हता, तो सर्वांसाठी खुला होता, त्यात व्यक्तिवादी धर्मकारणाला मुळीच स्थान नव्हते, गोपनीय असे तर काहीच नव्हते. “समाजातील सर्व स्त्री-पुरुषांसाठी समान न्याय, समान संधी, समान दर्जा, सारखेच व अविच्छेद्य हक्क आणि त्यांचा विनाव्यत्यय उपभोग मिळण्याची हमी देणारी समाजव्यवस्था सत्यधर्मपालनातून साकार होणे जोतीरावांना अभिप्रेत होते.'(४) नवसंकल्पित मराठाधर्माची दीक्षा ब्राह्मण म्हणून जन्माला आलेल्यांना घेताच येणार नाही अशी जी भूमिका संस्थापक घेत आहेत ती त्यामुळेच चुकीची वाटते. खरे तर जोतीरावांनी मांडलेल्या धर्मकल्पनेत फारशी नवी भर आजही घातली जाण्याची शक्यता तशी कमीच आहे. मग नवधर्मस्थापनेचा खटाटोप करण्यापेक्षा सत्यधर्म अमलात न आल्याची ऐतिहासिक कारणे शोधून, ती टाळण्याची शर्थ करणेच अधिक श्रेयस्कर व कमी त्रासाचे ठरू शकते. साळुखेप्रभृतींनी त्या दिशेने विचार करावा किंवा नवा धर्म अमलात येणे अशक्य असल्याने जुनाच पण त्यातल्या त्यात बरा म्हणून बौद्ध धर्माची दीक्षा त्यांनी घ्यावी व आपल्या प्रभावाखालच्यांना द्यावी, असे सुचवावेसे वाटते.
पण आपल्यामुळे एकूणच धर्माचा विचार किंवा बुद्धिप्रामाण्याचाही विचार ऐतिहासिक चौकटीत ठेवून फारसा केलाच जात नाही. त्यामुळे एकतर तो अत्यंत अनैतिहासिक स्वरूपात पुढे येतो किंवा मग एखाद्या जोतीरावांचा, आगरकरांचा, आंबेडकरांचा किंवा मार्क्सचा म्हणून मांडला जातो,(५) ही खरी अडचण आहे. ऐतिहासिक दृष्टीने तपासल्यास कोणत्याही धर्माच्या विकासक्रमातील नित्यता व परिवर्तनशीलता आपल्या सहज ध्यानात येऊ शकेल. आपल्या हेही ध्यानात येऊ शकेल की मानवी जीवनाची ज्ञानात्मक, भावनात्मक आणि क्रियात्मक ही जी तीन अंगे असतात त्यांची जोपासना करण्याचे व त्यांच्यात अर्थपूर्णता आणि एकसूत्रीपणा राखण्याचे कार्य विज्ञानपूर्वकाळात धर्माद्वारेच होत असे. पण आज परिस्थिती बदलली आहे. धर्मग्रंथांपेक्षा राज्याचे संविधान श्रेष्ठ मानले जात आहे आणि सांविधानिक तरतुदींशी विसंगत भाग धर्मग्रंथात असला तरी तो अवैध ठरेल अशी आजची परिस्थिती आहे. गावगाड्यात अंगभूत असलेल्या अनेक वाईट गोष्टी मोडीत काढण्याच्या क्षमता सांविधानिक उपबंधांना माणसाने दिल्या असून त्यात काळानुसारी बदल करण्याची सोयही करून ठेवली आहे.
जनसामान्यांची सत्ता वाढवत सर्वांना समान प्रतिष्ठेची हमी देणे, संकुचित निष्ठा, अस्मिता व दुरभिमान यांच्यावर मात करणाऱ्या व्यापक निष्ठा जोपासणे, डोळसपणा, विवेकबुद्धी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांच्याद्वारे अंधश्रद्धा, अनिष्ट समजुती, दुष्ट व्यवहार यांचे निर्मूलन करणे या दिशेने सांविधानिक लोकशाहीची वाटचाल सुरू झाली आहे. वाटेत येणारे अडथळे, निहित हितसंबंधीयांनी उपस्थित केलेले कुटिल डावपेच आणि भ्रम यांच्यावर मात करीत आपण पुढे जात आहोत. या प्रक्रियेत कायदा-संविधानाचे क्षेत्र विस्तारत जाणे आणि धर्माचे कमी होत जाणे क्रमप्राप्तच आहे. ही एकंदर परिस्थिती पाहता नवा धर्म स्थापन करून त्याच्याकरवी इष्ट सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याची आकांक्षा बाळगणे हे इतिहासाची पाने उलटी फिरवणेच ठरते. “पारायणे लावायचीच झाली तर ती राज्यघटनेची लावा’ असे आवाहन पहिल्या शिवधर्म परिषदेच्या प्रसंगी खुद्द पुरुषोत्तम खेडेकर यांनीच उस्मानाबादेत केल्याची बातमी प्रसिद्ध झाली आहे.(६) ते त्यांचे आवाहन रास्तच आहे. पण एकीकडे ते आवाहन करतानाच, स्वभावतःच विचारशीलतेला व स्वयंनिर्णयाला वेसण घालणाऱ्या धर्मसंस्थेचा आधार सामाजिक उद्दिष्टांसाठी ते कसा काय घेऊ पाहतात हेच समजत नाही.
डॉ. साळुखे यांच्यासारख्या विद्वानाकडून कोणीही साधारण अशीच अपेक्षा ठेवील की त्यांनी इतर कोणत्याही सामाजिक संस्थेप्रमाणेच धर्मसंस्थेचाही मानवी विकासाच्या विवक्षित अवस्थेच्या संदर्भात वस्तुनिष्ठ दृष्टीने व कार्यकारणात्मक अन्ययार्थ लावावा. धर्माला सपशेल नकार किंवा सर्वच सामाजिक प्र नांची केवळ धार्मिक उपपत्ती व उपाय अशा टोकाच्या भूमिका न स्वीकारता समतोल भूमिका घ्यावी. पाहिजे तर प्रामाणिक धर्मश्रद्धेला किंवा दि. के. बेडेकरांनी जिला धर्मप्राय श्रद्धा म्हटले आहे तिला पर्याप्त वाव ठेवून धर्मनिरपेक्षतेची कास धरावी. धर्माचेही धर्मनिरपेक्ष परिशीलन करावे. धर्माच्या प्रभावी प्रचारयंत्रणेला व सूक्ष्म संस्कारांना शह देईल अशी धर्मनिरपेक्षतेची मांडणी करून आपल्या प्रभावाखालच्या व्यक्तींना विचारप्रवृत्त करावे, नैतिक प्रेरणा द्याव्यात, विवेचक सामाजिक मूल्यभाव शिकवावा, सम्यक् दृष्टी द्यावी. मात्र तसे करण्याऐवजी नवा धर्म स्थापन करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना अपेक्षित फलश्रुती हाती येण्याची तर शक्यताच नाही, पण तो प्रयत्न सामाजिक दृष्ट्या अंगलट मात्र आल्यावाचून राहणार नाही. जनसामान्यांचे जीवन जातीपातीच्या जाचातून मुक्त, सामाजिक सुरक्षायुक्त आणि सफल-संपन्न व्हायचे तर आजतरी त्याचा मार्ग धर्मसंस्थेचा नसून जातिधर्मनिरपेक्ष व इहलौकिक परिवर्तनाचाच आहे यावर दुमत संभवत नाही.
संदर्भ टिपा:
१. पुरुषोत्तम खेडेकर, ‘मराठा धर्माची संकल्पना’, मराठामार्ग, जुलै २००२, पृष्ठ २५ २. कित्ता, पृ. १७
३. दि. के. बेडेकर, धर्मश्रद्धा : एक पुनर्विचार, पृ. ४१ ४. भा. ल. भोळे, महात्मा जोतीराव फुले : वारसा आणि वसा, पृ. १४६ ५. जी. पी. देशपांडे, फिलॉसफीकल डिसकोर्स इन मॉडर्न मराठी, इकॉनॉमिक अँड पोलिटिकल वीकली, २५ मे २००२, १९८९ ६. महाराष्ट्र टाइम्स, १० सप्टेंबर २००२, पृ. १०
पुस्तक परीक्षण आशेविण आशा : सुजाता खांडेकर, विद्यागौरी खरे,सुजाता खांडेकर ह्या तरुण इंजिनियर मुलीने तुर्भे येथील वस्तीमध्ये—- झोपडपट्टीमध्ये—-केलेले साक्षरता प्रसाराचे काम म्हणजे ‘आशेविण आशा’ हे पुस्तक अशी ह्या पुस्तकाची ओळख करून देणे हे अपुरे, अन्यायाचे आणि थोडी दिशाभूल करणारे ठरेल. तुर्भे येथील वस्तीमध्ये तिचा प्रवेश जरी त्या निमित्ताने झाला असला आणि पुस्तकात प्रामुख्याने वस्तीत केलेल्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची चर्चा असली तरी हे पुस्तक आपल्याला प्रभावित करते ते लेखिकेच्या रुंदावत गेलेल्या जाणिवांमुळे. ह्या वस्तीमध्ये काम करायची संधी मिळाल्यामुळे सुजाताला माणूस म्हणून आपण समृद्ध झालो असे वाटले आणि तिच्या ह्या वाटण्यामागचा प्रवास, त्यामागची कारण परंपरा मला फार अर्थपूर्ण वाटली.
एका मध्यमवर्गीय पण पुरोगामी घरातून आलेल्या व्यक्तीने आपल्या संस्कारांची, सामाजिक संकेतांची, कौटुंबिक नातेसंबंधांची ओळखीची चौकट ओलांडून एका अपरिचित जगात प्रवेश केल्यावर ज्या वेगळ्या अनुभवांनी तिला “ओहोटीच्या परत जाणाऱ्या लाटेसारखं खेचून घेतलं.” त्याने लेखिकेच्याच शब्दांत तिला “भंजाळायला’ झाले. जात, वर्ग, धर्म, आर्थिक आणि शैक्षणिक स्तर, मूल्य संकल्पना ह्या सर्व पातळ्यांवर एक वेगळे जग तिच्या जगाला खेटून उभे होते ज्यात वावरायला लागल्यावर तिचे त्याच्याबद्दलचे आणि स्वतःबद्दलचे अनेक भ्रम गळून पडायला लागले. लेखिका म्हणते:
घटना घडली की तिच्या पार्श्वभूमीवर मी ‘वर्ग’ म्हणून जोपासलेल्या माझ्या संकल्पना तपासायची. किती वेळा लक्षात यायचं, गुणात्मक फरक फारसा नव्हताच. फरक मुलाम्याचा होता. हळूहळू लक्षात आले, शक्य होतं, आपण afford करू शकत होतो म्हणून जोपासलेल्या संकल्पना, भावना; corner झालं की उघड्यानागड्या व्हायच्या. कर्जाची वसुली झाली नाही म्हणून एक बाई दुसऱ्या बाईला, ‘माझ्या नवऱ्याजवळ येऊन राहा. तेवढेच पैसे फिटतील’ असं सहज म्हणाल्याचं पाहिलं तेव्हा सुरुवातीला मी तीन दिवस झोपू शकले नाही.
आपल्याला टोकाची, भडक, crude वाटणारी अशी उदाहरणे जागोजागी येतात आणि सभ्य–असभ्य, नैतिक–अनैतिक, चांगले-वाईट, ह्या सगळ्या आपल्या मध्यमवर्गीय कल्पनांची मांडणी फक्त आरास वाटायला लागते. आपल्याला परवडते म्हणून आपण चारी चौफेर जेवतो, घरं बांधतो, गाड्या घेतो, मुलांना चांगल्या शाळेत घालतो, आपल्याला परवडते म्हणून आपण सभ्यपणे, नैतिकतेने चांगले वागतो. मध्यमवर्गीय संस्कारांमुळे आपल्यापेक्षा वेगळ्या अशा इतरांकडे पाहताना येणाऱ्या ह्या मर्यादा सुजाताने प्रामाणिकपणे तपासल्या आणि शब्दांचे अर्थ नव्याने समजून घेतले, हे ह्या पुस्तकाचे वेगळेपण आहे.
वस्ती आणि तिथले उघडे वास्तव हे मराठी साहित्याला अनोळखी नाही. माहीमची खाडी, चक्र सारख्या कादंबऱ्यांमधून, नारायण सुर्वे, नामदेव ढसाळ ह्यांच्या कवितांमधून आपण ते वाचलेले आहे–पण नेहेमीच एक सुरक्षित अंतर ठेवून. ते आपल्याला माहीत आहे म्हणजेच आपल्याला सामजिक जाणीव आहे अशी स्वतःची समजूतही आपण करून घेतली आहे. अशा वस्तीमध्ये सुजाता खांडेकरने ‘कोरो फॉर लिटरसी’ ह्या संस्थेतर्फे जवळजवळ दहा वर्षे एक साक्षरता प्रकल्प राबवला. साक्षरते-बरोबरच वस्तीतील सर्व प्र न सोडवण्यासाठी मदत करण्याचे काम ‘कोरो’चे कार्यकर्ते करतात. प्रामुख्याने ही मदत लोकांनी आपले प्र न आपणच कसे सोडवावेत ह्याचे मार्गदर्शन करणे ह्या स्वरूपाची आहे. हे मार्गदर्शन व्यक्तिगत पातळीवर होते, तसेच सामूहिक पातळीवरही होते, आणि मार्गदर्शन करणाऱ्या कार्यकर्त्यांचा ह्या अडचणी सोडवण्यामागे सक्रिय सहभाग असतो—-केवळ चार युक्तीच्या गोष्टी सांगणे अशा प्रकारचा तो नसतो.
‘कोरो’चे काम किती अवघड आहे हे ‘आशेविण आशा’ वाचताना सारखे जाणवत राहते. भविष्यात काही बद्दल होईल, काही चांगले होईल असा अजिबात वि वास नसलेल्या ह्या वस्तीतल्या लोकांना मदत करणे सोपे नाही आणि भविष्याबद्दल त्यांना वाटणारा अवि वास अजिबात चूक नाही हे ‘कोरो’च्या कार्यकर्त्यांनी अनुभवले आहे. बायकांच्या अत्याचारांच्या संदर्भात काम करताना तर हा हताशपणा सुजाताने पुन्हा पुन्हा भोगला आहे. कुठलेच दोर ह्या बायकांच्या हाती असत नाहीत—-ना शिक्षण, ना पैसा, ना माहेरची मदत. ९०% केसेसमध्ये नवरा बेकार आणि दारुडा किंवा कमावणारा आणि दारुडा असतो. पदरी २-३ मुलं असतात. कधी तो दुसरा घरोबा करतो, कधी बायकोवर संशय घेतो, कधी पैशासाठी छळणूक करतो. सुजाता लिहिते, “बाई ही मारण्यासाठी, जाळण्यासाठी, धोपटण्यासाठी, मुलं जन्माला घालण्यासाठी, मुलांना वाढवण्यासाठी, स्वयंपाक करण्यासाठी आहे हे बायकांसकट सगळ्यांच्या डोक्यात पॅक आहे . . . ‘खुंटण मिरची जाशील कैशी’ या बायकांच्या खेळातल्या सारखं वाटतं. धावेल तिथे तिच्यासमोर अभेद्य भिंती. आयुष्यभर बायका यातल्या कुठल्यातरी भिंतीवर डोकं आपटत बसतात . . . हताशपणा वाटतो तो यामुळे. ‘अन्यायमुक्त समाज’ वगैरे वल्गना वाटतात. अन्यायाची दाद मागायला तयार करणं, प्रोत्साहन देणं एवढंच हातात असतं.”
पण ही अन्यायाची दाद मिळणे सोपे नसते—खरे तर अशक्यच असते. सुजाता लिहिते, “कायद्याची मदत कणखर, बलवान लोकांना होते. आधीच असहाय्य, दीनवाणे असणाऱ्यांना मुळात कायदा कुठे माहीत असतो? माहीत झाला तरी न्याय मिळवण्यासाठी हिंमत लागते ती कुठून आणायची? आणि प्रयत्नपूर्वक कोणी धैर्य गोळा केले तर कायद्याची कारवाई, दिरंगाई ही हिंमत बरोबर जिरवते. . शिवाय वस्तीतील परिस्थितीच अशी की कायद्याचा उपयोग फारसा होत नाही. उदाहरणार्थ पोटगीचा कायदा. अगदी असे स्वप्नरंजन जरी केलं, की आज दाखल झालेल्या केसमध्ये सर्व शहानिशा करून उद्या बाईला पोटगी मंजूर झाली. पण घ्यायची कोणाकडून? रोजंदारीवर काम करणाऱ्याच्या स्वतःच्याच कामाचा ठिकाणा नाही, त्याच्याकडून पोटगी वसूल करणं अवघड–नव्हे अशक्य आहे.”
ही सगळी वस्तीच एका दुष्टचक्रात अडकल्याची भावना पुस्तक वाचताना मनात प्रबळ होत असली तरी हे पुस्तक मला कोणत्याच टप्प्यावर निराशावादी वाटले नाही, ह्याचे महत्त्वाचे कारण लेखिकेची ह्या कामाकडे, प्रकल्पाकडे पाहण्याची स्वच्छ दृष्टी. ह्या दृष्टीमुळे कशाला प्राधान्य द्यायचे हे तिला काम करता करता, इतरांबरोबरच्या चर्चेतून, संपर्कातून समजत गेले. उदाहरणार्थ, संघर्ष की विधायक विकास हा वाद एका टप्प्यावर जेव्हा तीव्र झाला तेव्हा साक्षरता-प्रसाराचे जाणिवा विकसित करणारे विधायक कार्य हे जास्त महत्त्वाचे आहे हे आपल्या काही सहकाऱ्यांसमवेत सुजाताने आग्रहाने मांडले. भावनिक आव्हानाचा वापर करून, अडाणी लोकांच्या विचारशक्तीला बधिर करणे सोपे असते. अशा वेळी शिक्षणच वाचवू शकते, तारून नेऊ शकते. शिक्षणाबद्दल कोरोच्या कार्यकर्त्यांना वाटणारा हा वि वासच मला आशादायक वाटला. आणि हा वि वास खोटा नाही ह्याचे पडताळेही ह्याच पुस्तकातील घटनांमध्ये, व्यक्तींमध्ये मिळत गेले.
संघर्ष, मोर्चे, घेराव ह्यात भाग घेणारी सामान्य माणसे ते जाणीवपूर्वक, विचार-पूर्वक करत नाहीत, समूह करतो म्हणून करतात. साक्षरतेच्या चळवळीत सामील होणारे आणि टिकणारे कधीतरी, कुठल्यातरी टप्प्यावर हा निर्णय स्वतःसाठी घेत असतात. तोपर्यंत त्यांना मदत करणे, त्यांचा निर्धार टिकवून ठेवणे हे काम त्या मोहिमेतील कार्यकर्त्यांना करावे लागते. झोपडपट्टीत राहणाऱ्यांना संघर्षापासून दूर राहताच येत नाही, पण हा आपला हक्क आहे आणि हा आपल्याला नाकारला गेला आहे हे समजण्यासाठीही शिक्षणाची गरज आहे.
‘कोरो’चे काम करताना सुजाताला जाणवले की वस्तीतील लोकांना शिक्षणाची गरज वाटत नाही. ‘शिक्षण इथे का रुजत नाही’ ह्या प्र नाचा शोध घेण्याचा प्रयत्न पुस्तकभर आहे. साक्षरतेचा प्रसार म्हणजे प्रौढ निरक्षर व्यक्तींना लिहाय–वाचायला शिक-वायचे काम. शिकणारे लहान मूल निरक्षर असते आणि अज्ञानीही. पण निरक्षर प्रौढ व्यक्ति अज्ञानी नसते. आयुष्यातली इतकी वर्षे निभलेली असतात. त्यांना साक्षर-तेची गरज वाटत नाही. त्याची अडचणच वाटते आणि ती अनेक पातळ्यांवर वाटते. सुजाता म्हणते, “हातात पेन्सिल घेऊन थरथरत ती कागदाला लावणं ही कृतीच जिथं एका महत्त्वाच्या सांस्कृतिक बदलाची नांदी आहे, तिथं बदलाची परिमाणं, मापदंड नि िचत करणं अवघड आहे. या थरथरीमागे इतिहास आहे, प्रतारणा आहे, नाकार-लेल्या हक्कांची घुसमट आहे. . . . यातल्या यांत्रिक कौशल्यापेक्षा मानसिकतेचा भाग महत्त्वाचा आहे.”
सुजाताचे दुसरे निरीक्षण महत्त्वाचे आहे. आपल्या घरातली आजची भौतिक सुबत्ता कुठल्यातरी पिढीत शिक्षणामुळे आली आणि रुजली. शिक्षणाचे लक्ष्य हे नेहेमीच भौतिक सुखसोयींशी निगडित राहिलेले आहे. सुजाताच्या मते वस्तीत ही पार्श्वभूमी नसल्याने शिक्षण असून रुजलेले नाही, त्याची गरज तयार झालेली नाही. आयुष्यातील कुठलीही सुखसोय ही आपल्या करता नाहीच अशी वस्तीत राहणाऱ्या प्रत्येकाची जणू खात्रीच आहे. शिक्षणामुळे आयुष्य बदलू शकेल असा वि वासच नाही कारण तसा अनुभव नाही. पुस्तकाच्या धड्यांमधून चितारलेले जग वस्तीतल्या मुलांना कधी दिसतच नाही—-दारात येऊन टाटा करणारे आईबाप, वस्तूंनी भरलेली घरे, पेपर वाचणारे वडील—-आणि आपली मुले पुस्तकातला डॉ. आंबेडकरांवरचा धडा ऑप्शनला टाकणार! दोन जगां-मधल्या ह्या वाढत चाललेल्या दरीबद्दल वाटणारी चिंता ह्या पुस्तकात जागोजागी व्यक्त होते. निरुद्देश आयुष्य जगणारे तरुण-तरुणी वस्तीभर दिसतात. आज, आता जे आहे ते खरे, उद्याचे माहीत नाही, अशी सगळ्यांचीच मानसिकता असल्याने कुठलीच धडपड करताना कोणी दिसत नाही. महानगरपालिकेत झाडूखात्यात कायमस्वरूपी नोकरी मिळवण्या-करताच फक्त धडपड, ज्या कामासाठी शिक्षणाची गरज नाही. प्रत्यक्षात उतरू शकेल असे स्वप्न हे एवढेच.
वस्तीमध्ये शिक्षण न रुजण्याचे तिसरे महत्त्वाचे कारण म्हणजे समाजाची आणि प्रामुख्याने शिक्षकांची पूर्वग्रहदूषित दृष्टी. महानगरपालिकेच्या शाळेत मुलांना पोचवायला जाणारे पालक दार ओलांडून आत जायला धजावत नाहीत इतका त्यांना न्यूनगंड आहे आणि तो आपण दिलेला आहे. त्यांचे गावठी बोलणे, चालणे; त्यांची जात, धर्म ह्या सगळ्यांची मनातल्या मनात बेरीज वजाबाकी करतच आपण त्यांच्याशी बोलतो. सुजाताचे असे निरीक्षण आहे की ह्या समाजातून शिकून जी मंडळी पुढे गेली त्यांचेही समाजाशी काही नाते शिल्लक राहत नाही. दलित शिक्षकही दलित मुलांकडे, त्यांच्या शिक्षणाकडे असं वेदन-अक्षमतेने बघताना आढळतात.
सर्वच आघाड्यांवर इतक्या अडचणींना तोड देत जेव्हा कोरोने साक्षरता-प्रसाराचे कार्य सुरू केले तेव्हा प्रत्यक्ष शिकवण्याला सुरुवात करण्याआधी शिक्षणाची गरज निर्माण करणे जास्त निकडीचे झाले. हे करण्याकरता तिथले अग्रक्रम, तिथले प्र न जाणून घेणे आणि त्याची शिक्षणाशी सांगड घालणे ह्याचा विचार करावा लागला. १९८८ च्या सुमारास राष्ट्रीय साक्षरता मिशनने ‘साक्षरतेसाठी जनआंदोलन’ ही कल्पना मांडली. ह्या उद्दिष्टाच्या मुळाशी लोकांना “स्वतःच्या स्थितीची जाणीव करून देणे व ती बदलण्यासाठी प्रवृत्त करणे’ हा महत्त्वाचा विचार होता. हा विचार प्रत्यक्षात उतरवण्याचे प्रयत्न तुर्भे-चेंबूरच्या वस्त्यांमध्ये कोरोच्या कार्यकर्त्यांनी निष्ठेने केले. साक्षरतेचा अर्थ त्यांनी केवळ अक्षर-आकडे शिकवण्यापुरता मर्यादित ठेवला नाही. सुजाता म्हणते :
“आम्हाला कधीच स-अक्षरता हे साध्य वाटले नाही, ते साधन आहे. अक्षर हा आधार आहे—-माणसाला स्वतःची परिस्थिती समजून घेण्याचा आणि ती बदलण्याचा प्रयत्न करावा असे मनापासून वाटायचा. माणसात विश्वास तयार करण्याची ही प्रक्रिया आहे, स्वतःबद्दल आणि दुसऱ्याबद्दलही. माणसांना समजून घेण्याचा आणि बदलायचा प्रयत्न करण्याचा हा प्रयास आहे. जिथे माणसाच्या बदलाचा प्र न येतो तिथे तिथे काम अवघड होतं. निरक्षर कोणती अक्षरे शिकतो याइतकेच महत्त्वाचे वाटते ते तो त्या अक्षरांचा उपयोग काय करतो आणि कसा करतो?
. . . कोणताही बदल घडवू शकणाऱ्या मोहिमेने स्वप्ने पाहिली पाहिजेत आणि ती इतरांना दाखवता आली पाहिजेत. . . . मोहिमेतील स्वप्ने आपली आहेत असा वि वास स्वप्ने दाखवणाऱ्यांना आणि पाहणाऱ्यांना वाटला पाहिजे. यातून तयार झालेले भावनिक रसायन स्वप्नांच्या पूर्तीला वेळ लागला तरी सर्वांना एकसंध ठेवू शकेल. . . . साक्षरतेचा कार्यक्रम हा Welfare कार्यक्रम नाही. हा पुनर्रचनेचा कार्यक्रम आहे. हा धर्मादाय कार्यक्रम नाही; याला बदलाचं परिमाण आहे. माझ्या मते, ही मोहीम इतरांना नव्हे स्वतःला मुक्त करण्याची आहे, म्हणूनच जास्त अवघड आहे.”
अशा स्वप्नाने झपाटून जाऊन कोरोच्या कार्यकर्त्यांनी राहुलनगर ह्या वस्तीला संपूर्ण साक्षर व्हायला मदत केली. रात्री १० नंतर हे वर्ग सुरू व्हायचे. साक्षरतेच्या ह्या वेडाचे फार सुंदर वर्णन सुजाता करते. लोकांच्या वागण्यात ह्या एकत्र येण्याने पडलेले बदल कौतुकाने नोंदते. प्रत्येक गल्लीत लागलेला मोठा बल्ब आणि त्याखाली अभ्यास करणारी बायका-मुले हे एखाद्या आदर्शवादी सिनेमातले दृश्य असावे असे वाटते—-पण ह्या सगळ्याचा संबंध त्यांच्या रोजच्या जगण्याशी जोडला गेला होता आणि हे कोरोचे वेगळेपण होते. उदा. रेशनिंगबाबत वस्तीतल्या । लोकांना होणारा त्रास लक्षात घेऊन त्यासंबंधात लोकांना लेखी तक्रार करता यावी या दृष्टीने शिकण्याचे साहित्य तयार केले. साखर, तांदूळ, घासलेट, हे साक्षरतेचे प्राथमिक धडे झाले आणि ‘ताई कमळ बघ’ची जागा ‘घासलेट फेसात मारतो’ ह्या धड्याने झाली. सुजाता लिहिते, “लोकांचा आत्मविश्वास वाढणं, त्यांनी अन्यायाविरुद्ध संघटित कृती करणं, त्यांच्या जाणिवेच्या कक्षा रुंदावणं, त्यांनी निर्णयप्रक्रियेत सहभागी होणं याबाबतींत साक्षरता-मोहिमेचा जास्त प्रभाव झाला आहे.” कोरोच्या कार्यकर्त्यांनी निर्माण केलेला विश्वास आणि त्यांचा सतत संपर्क हा महत्त्वाचा आधार मिळाल्यामुळे हे शक्य झाले असले तरी सुजाताला वाटते ही त्यांच्या ‘स्व’ची प्रचीती आहे. हा स्व जेव्हा सक्षम होईल तेव्हा त्यांना बाहेरचा आधार लागणार नाही. वस्तीतील विकासाच्या कामासाठी वस्तीतील लोकांचेच नेटवर्क निर्माण करायचे हेच कोरोचे ध्येय आहे, आणि ते फार महत्त्वाचे आहे. लोकांना आर्थिक मदत देऊन परावलंबी आणि लाचार करणाऱ्या संस्थापेक्षा हे वेगळे आहे आणि त्यातूनच कोरोची लोकांबद्दल वाटणारी कळकळ व्यक्त होते.
‘शिक्षण इथे का रुजत नाही’ ह्या प्र नाचा शोध घेण्याच्या प्रयत्नात ‘आशेविण आशा’ हे पुस्तक लिहिले गेले. हा शोध घेताना स्वतःचा आणि इतरांचा शोध घ्यावा लागणेही अपरिहार्य होते कारण सुजाता करता तो एक मुक्तीचा प्रवास होता. मुंबईतील वस्त्यांवर लिहिलेले ‘अर्धी मुंबई’ हे पुस्तक किंवा ‘कैलासवासी मुंबई’ हे पुस्तक आणि ‘आशेविण आशा’ हे पुस्तक ह्यात महत्त्वाचा फरक लेखकाच्या दृष्टिकोनाचा, भावनिक गुंतवणुकीचा आहे. सुजाता हे तिच्या लोकांबद्दल, त्यांच्या धडपडीबद्दल, त्यांच्या औदासीन्या-बद्दल त्यांच्या पराक्रमाबद्दल लिहिते आहे हे सतत
जाणवत राहते. त्यातले प्रेम आणि काळजी पुस्तकभर झिरपत राहते. एका महत्त्वाच्या प्रक्रियेचा भाग होता आले, एक हेवा वाटण्याजोगे नाते एका वस्तीशी जोडता आले ह्याचे समाधान सुजाताकरता केवढे मोलाचे आहे हे आपल्याला दिसते. ह्या पुस्तकाचे महत्त्व ह्यासाठी आहे की ते एका तळमळीच्या, बुद्धिमान आणि संवेदनशील व्यक्तीने लिहिले आहे. साक्षरतेसारख्या एका महत्त्वाच्या कामाचे वि लेषण करण्यासाठी ही तिन्ही परिमाणे आवश्यक होती आणि ती एकाच व्यक्तीमध्ये केंद्रीभूत होणे जवळपास अशक्य होते. पण इथे ते घडले आहे.
वस्तीला जाणून घेण्यासाठी वस्तीचाच एक भाग होऊन सुजाता जगली. वस्तीचा अभ्यास केवळ निरीक्षणातून न करता स्वतःला त्यात झोकून देऊन केला. समाजाच्या ह्या दोन वेगवेगळ्या स्तरांवरचे आयुष्य जगताना तिला काय तडजोडी कराव्या लागल्या. त्याचा किती मनस्ताप झाला ह्याचा तपशील ह्या पुस्तकात नाही. काम करणाऱ्या व्यक्तीचे विचार हे कृतीत परिवर्तित होण्यासाठी असतात, स्वतःचे समर्थन करण्यासाठी नसतात हेही त्यामागचे कारण असेल पण जे त्रोटक उल्लेख येतात त्यावरून लक्षात येते की, ह्या दोन्ही स्तरांमध्ये सुजाताला जे फरक जाणवले ते वरवरचे. भाषेचा कर्कश्शपणा, केवळ जिवंत राहाण्याकरता सगळी धडपड, त्यामुळे वागण्या-बोलण्यात कुठलाच गुळगुळीतपणा–सोफिस्टिकेशन नाही, सगळं उघड, रोखठोक–असे वस्तीतील आयुष्य. उलट संस्कृतीच्या मुखवट्याआड दडलेले मध्यमवर्गीय आयुष्यही मुखवटा बाजूला केले तर तसेच आहे ह्याची वरचेवर जाणीव सुजाताला होताना दिसते. आपल्या वयस्कर सहकारी अधिकाऱ्याच्या तब्येतीची लहान बाळासारखी काळजी घेणाऱ्या त्याच्या बायकोला सुजाताने त्यावरून चिडवल्यावर जेव्हा ती अनवधानाने म्हणून जाते, ‘तुझं बरं आहे बाई, तू स्वतः नोकरी करतेस’ तेव्हा सुजाताला तिच्या जागी वस्तीतील बाईचे उद्गार ऐकायला येतात, ‘अरं मुडद्या, पोरांच्या आणि माझ्या पोटाला काय दगड घालू का?’ समाजाच्या दोन भिन्न स्तरांवर असलेल्या घटकांमधील हे समांतर मुद्दे जाणवण्याकरता वृत्तीचा प्रामाणिकपणा लागतोच पण मनाचे झालेले conditioning ही जागरूकपणे ओळखून दूर करावे लागते. ‘माणसे सगळीकडे सारखीच असतात’ हे ज्ञान सतत तपासून बघायचा छंदच सुजाताला लागल्याचे दिसते. त्यामुळेच कोरोचे हे साक्षरता प्रसाराचे काम तिच्याकरता एक मुक्तीचा प्रवास झाला आहे असे आपल्याला जाणवते.