विवेकवादाचा अर्थ, गेल्या लेखात सांगितल्याप्रमाणे कदाचित त्याचा प्रधान अर्थ, कोणतेही विधान निर्णायक पुराव्यावाचून खरे न मानणे, आणि पुराव्याच्या प्रमाणात त्याच्यावर वि वास ठेवणे; निर्णायक पुरावा असेल तर विधान पूर्णपणे स्वीकारणे आणि नसेल तर जो पुरावा असेल त्याच्या प्रमाणात स्वीकारणे. अनेक वाचकांच्या दृष्टीने हे म्हणणे बरोबर नाही; ते म्हणतील की विधान स्वीकारण्याची ही अट अवश्य विधाने सोडल्यास इतर कोणत्याही विधानाचा पुरावा निर्णायक असू शकत नाही. परलोक, ई वर, मरणोत्तर अस्तित्व इत्यादि विषयांचा पुरावा देण्यासारखा नसतो, ती विधाने आपण श्रद्धेने स्वीकारतो.
पण हा आक्षेप घेणाऱ्या लोकांना विवेकवादाचा अर्थ समजलाच नाही असे म्हणणे भाग आहे. विवेकवाद हा श्रद्धेचा कट्टा शत्रू आहे. कोणतेही विधान केवळ श्रद्धेने स्वीकारणे विवेकवादाला मान्य नाही. कारण थोडक्यात सांगण्यासारखे आहे.
आपल्या लौकिक जीवनात एखादे विधान आपण खरे म्हणून स्वीकारतो आणि त्या विधानावर वि वास ठेवतो. पण ते खरे कशावरून? अशा या ‘कशावरून’ला एकच उत्तर आहे, ते म्हणजे पुरावा. त्या विधानाला पुरावा असेल तर आपण त्याचा शोध करतो. म्हणजे पुराब्यावाचून काहीही खरे मानण्यास आपण तयार नसतो. लौकिक विषयासंबधीचा हा निकष अलौकिक विषयासंबंधीही खरा आहे.
यावर परलोकवादी म्हणतील की ई वर, परलोक इत्यादि-विषयक गोष्टींचा तुम्ही म्हणता त्या प्रकारचा ऐहिक, आनुभविक (empirical) पुरावा मिळणे अशक्य आहे. कारण त्या बोलून चालून ऐहिक गोष्टी नाहीत. त्यांचा प्रांत श्रद्धेचा आहे. त्यांच्याविषयी इंद्रियानुभव काहीही सांगू शकत नाही हे खरे आहे. म्हणून तर ‘प्रमेयसिद्धि: प्रमाणात् हि’ (प्रमाणावाचून प्रमेयसिद्धि नाही) असे म्हणणारा ई वरकृष्ण हा सांख्यतत्त्वज्ञ पारलौकिक गोष्टींचे लौकिक प्रमाण नाही हे मान्य करतो आणि त्यांचे प्रमाण आप्तवचन हे आहे असे म्हणतो.
हे आप्तवचन म्हणजे ज्याला अन्य दर्शने शब्दप्रमाण म्हणतात ते. ‘आप्त’ म्हणजे यथार्थवक्त म्हणजे सर्वदा सत्य बोलणारा. तो जर म्हणाला की अमुक गोष्ट अशी आहे तर ते सत्यच असले पाहिजे, ते असत्य असू शकत नाही. पारलौकिक गोष्टींचे अस्तित्व इंद्रियांनी सिद्ध होऊ शकत नाही; आणि ते अनुमानाने सिद्ध होऊ शकत नाही. म्हणून आप्तवचन हे प्रमाण मानावे लागते असे परलोकवादी म्हणतात. त्यांच्या मताने आप्तवचन किंवा शब्द हे प्रमाण आहे म्हणजे ते ज्ञानसाधन आहे. म्हणजे शब्दाने आपल्याला कळते ते मिथ्या असू शकत नाही.
पुराव्यावाचून, म्हणजे इंद्रियानुभव आणि त्याच्या आधाराने केलेले अनुमान यांवाचून, कोणतेही विधान स्वीकारणे किंवा ते खरे मानणे हे विवेकवादाच्या प्रधान दंडकाच्या विरुद्ध जाणे आहे हे उघड आहे. विवेकवादाचा आग्रह धरणाऱ्या लोकांना श्रद्धावादाचे खंडन करणे हा एकच मार्ग शिल्लक आहे. त्याकडे आता वळू.
पहिला मुद्दा हा आहे की निर्णायक पुराव्यावाचून कोणतेच विधान खरे मानायचे नाही या नियमाचा त्याग करण्याचे कारण काय? प्रमेयाची सिद्धी प्रमाणावाचून होत नाही. ई वरादि गोष्टींचे प्रमाण काय? आप्तवचन किंवा शब्द हे प्रमाण आहे हे खरे आहे काय?
आप्तवचन हे प्रमाण आहे असे मानणारे श्रद्धावादी म्हणतात की आप्तवचन म्हणजे आप्ताचे वचन. ‘आप्त’ याचा अर्थ यथार्थवक्त या मतासंबंधी अनेक आक्षेप उद्भवतात. एक प्र न म्हणजे एखादा मनुष्य यथार्थवक्त आहे हे आपल्याला कसे कळते? श्रद्धावादी म्हणतील की आपण अनेक व्यक्तींना ज्या कारणास्तव विश्वसनीय मानतो त्याच कारणासाठी अमुक मनुष्य यथार्थवक्त हे आपल्याला कळू शकते. पण त्यावर असा प्र न उद्भवतो की हे उत्तर पुरे नाही. आपल्याला यथार्थवक्त्याची जी ओळख असते ती अनुभवाने. परंतु आपली यथार्थवक्त्याची जी ओळख असते ती लौकिक गोष्टींसंबंधी. पण तेवढ्यामुळे तो अलौकिक गोष्टींविषयीही यथार्थवक्त आहे हे सिद्ध होत नाही. आप्त हा यथार्थवक्त असतो असे श्रद्धावादी म्हणतात. पण ते त्यांना कसे कळते हा प्र न टाळता येत नाही. कारण लौकिक गोष्टीविषयी एखादा मनुष्य यथार्थवक्त आहे की नाही हे आपले सर्व जीवनच लौकिक पातळीवरच असल्यामुळे कोण यथार्थवक्त आहे हे अनुभवाने ठरवू शकतो. पण अलौकिक पातळीवर काय सत्य आहे हे आपण ठरवू शकत नाही.
दुसरी गोष्ट ही आहे की यथार्थवक्त असण्याकरिता यथार्थ किंवा सत्य काय आहे हे माहीत असावे लागेल. पण आप्ताला सत्य माहीत आहे हे आपण लौकिक अनुभवात कसे ठरवितो? अलौकिक सत्याची ओळख नसणाऱ्या आपल्याला अमुक गोष्ट अलौकिक सत्य आहे हे अंधविश्वासावाचून कळू शकत नाही. म्हणजे आप्तवचन प्रमाण होऊ शकत नाही.
आणखी एक गोष्ट म्हणजे आप्तवचन प्रमाण मानणारे सांख्यदर्शन हे एकटे नाही. अन्य दर्शनेही आप्तवचन मानतात; फक्त ती त्याला ‘शब्दप्रमाण’ या नावाने ओळखतात. पण आप्तवचन किंवा शब्द जर प्रमाण असेल तर त्याचे सर्व दर्शनांनी एकच वर्णन केले पाहिजे. पण असे आढळत नाही. केवळ भारतापुरते पाहिले तर दर्शनागणिक वेगळी वर्णने आढळतात. सांख्य म्हणतात की आप्तवचन द्वैती तत्त्वज्ञानाला अनुकूल आहे, तर वेदान्ती अद्वैती तत्त्वज्ञानाचा आग्रह धरतात. नैयायिक म्हणतात की अंतिम सत्य बहुप्रकारक आहे. असेच कितीतरी मतभेद आहेत
आणि त्या सर्वांना आप्तवचनाचा आधार आहे.
भारताबाहेरची आप्तवचने पाहिली की वरील मुद्द्यांची आणखी परस्पर-विरुद्ध उदाहरणे सापडतात. मुसलमानांचे कुराण आणि ख्रिस्त्यांचे बायबल ही दोन्ही परमेश्वराचा हवाला देतात; पण परमेश्वर परस्परविरुद्ध गोष्टी सत्य म्हणून कशा सांगतो हे मति गुंग करणारे आहे. सारांश आप्तवचन किंवा शब्द ही अनिर्णायक गोष्ट आहे. अर्थात् ते प्रमाण नाही हे निष्पन्न होते. सर्वच धर्म अतीन्द्रियाचे ज्ञान लैकिक मार्गांनी होऊ शकत नाही, ते श्रद्धेने स्वीकारावे लागते असे म्हणतात. परंतु श्रद्धेने मिळणारे ज्ञान हे ज्ञान नव्हे, तो केवळ भ्रम आहे. ख्रिस्ती, इस्लाम इत्यादि धर्मांचे अनेक सिद्धान्त हिंदू धर्मातही आहेत. सर्वच धर्म श्रद्धेची भलावण करतात, पण त्या सर्वच धर्मांच्या श्रद्धा एक नाहीत. परमेश्वर, परलोक, मरणोत्तर अस्तित्व याबाबतींत सर्वच धर्मांचे सांगणे ‘श्रद्धा ठेव’ यांपुरतेच एक आहे; पण त्यांचे तपशील भिन्न आणि परस्परविरुद्ध आहेत. पण मग ज्याचा कोणत्याही धर्मावर विश्वास नाही, त्याने कसे वागावे? आपल्या धर्मपुस्तकावर विश्वास ठेवावा असे श्रद्धावादी म्हणतात. पण या उत्तराने आपल्या अडचणीची सोडवणूक होत नाही, कारण श्रद्धावादी म्हणतात तसे शब्दप्रमाणाचे स्वरूप असेल तर ते धर्मपरत्वे भिन्न आहे असे म्हणणे प्रमाणाच्या स्वरूपाचे विडंबन करणारे आहे. निसर्गाचे नियम धर्माप्रमाणे बदलतात हे म्हणणे जसे हास्यास्पद आहे तसेच हेही होईल. ईश्वर असेलच तर तो सर्व जगाचा एकच आहे असे म्हणणे सयुक्तिक दिसते. ईश्वराचे अस्तित्व, सत्य-असत्य आणि चांगले वाईट यांचे स्वरूप धर्माच्या भिन्नतेमुळे सापेक्ष होते हे म्हणणे फारच अनाकलनीय आहे. अलौकिक गोष्टींविषयी भिन्न आणि परस्परविरुद्ध गोष्टी सांगतात हे धर्म भ्रामक असतात असे मानण्याचे हे एक महत्त्वाचे कारण आहे. या पुरुषांचा उपयोग तरी काय? (What are Men Good for?)