जपानमध्ये तुमचा स्वतःचा उद्योग होता, इमानदार आणि कर्तव्यनिष्ठ. तुमच्या उत्पादनांमध्ये दोष दाखवायला जागा नव्हती. मग तुमच्या देशावर एक खोटेपणाची लाट येऊन आदळली, व्यापार म्हणजे व्यापारच आणि इमानदारी म्हणजे फक्त एक चांगले धोरण, असे मानणाऱ्या प्रदेशातून ही लाट आली. शहरी क्षेत्रे काबीज करून आता इमानदारीने मेहेनत करणाऱ्या क्षेत्रावर हल्ला करणाऱ्या खोट्या आणि अतिशयोक्त जाहिरातींकडे स्वागत करणाऱ्या गिरिशिखरांवरही आता हल्ला होतो आहे. आपल्या कुरूप आणि रानवट सजावटींमधून घेणारा हा वाणिज्यवाद सर्व मानवजातीवर महा-अरिष्ट आणतो आहे, कारण कौशल्यावर तो ताकदीचे ‘आदर्श’ कलम करतो आहे. आपल्या नागड्या बेशरमपाणाने आत्ममग्न भावाचा उदोउदो करतो आहे. हिंसक कारवाया आणि कर्कश, बेसूर आरडाओरडा करत सर्वनाशाकडे नेत आहे. आपल्या पायाभूत मानवतेलाच विकृत करत आहे. आनंदाचे मोल घेऊन पैसा कमावण्यात हा गर्क आहे. युरोपच्या सध्याच्या संस्कृतीवर या सैतानाचे एकछत्री सम्राज्य आहे.
[बातमी : कोक-पेप्सीच्या हिमालयातील खडकांवरच्या जाहिरातींना पर्यावरणवाद्यांनी आक्षेप घेतल्याने सर्वोच्च न्यायालयाने तपासणीपथक पाठवले!
वरील उतारा रवींद्रनाथ टागोरांनी काही जपानी विद्यार्थ्यांपुढे दिलेल्या भाषणातील आहे. भगतसिंगांच्या रोजनिशीत (शहीदे आजम की जेल नोटबुक, परिकल्पना प्रकाशन, १९९९) तो नोंदलेला आहे.]