माणसाच्या मुलावर जन्मतःच धर्म लादला जातो, ही व्यथित करणारी घटना आहे. प्राण्यांच्या बाबतीत असे घडत नाही. त्यांना धर्म नसतो; निसर्गदत्त असा फक्त ‘स्वधर्म’ असतो. जगणे—-मैथुन आणि मृत्यू या जीवनचक्राबाहेर त्यांचे जीवन युगानुयुगे गेलेले नाही. प्राण्यांना नाही अशी एक महान गोष्ट माणसाला प्राप्त झाली आहे. ती म्हणजे विकसित आणि विकसित होणारा मेंदू. या मेंदूच्या जोरावर माणसाने मोठे भौतिक कर्तृत्व दाखविले आहे. तसेच अफाट कल्पनाशक्तीचेही वि व निर्माण केले आहे. विविध कलांचे नि साहित्याचे, मानवी जीवनातील दालन हे याचेच प्रगल्भ द्योतक आहे. ‘देवा’ची संकल्पना ही अशीच एक मानवाच्या उत्तुंग कल्पनाशक्तीतून साकार झालेली साहित्यिक संकल्पना आहे. देव नसला तरी देव आहे असे वाटावे; देव नसावा असे मनोमन पटत असतानाच, देव असावा असेही वाटावे; मानवाने ‘देवा’ची निर्मिती केलेली असली तरी देवानेच मानवाची निर्मिती केली आहे अशी श्रद्धा निर्माण व्हावी इथपर्यंत नि हजारो वर्षे मानवी मनावर पगडा बसवणारी देवाची संकल्पना हे मानवाचे शास्त्रज्ञान–तंत्रज्ञान विकासाइतकेच मोठे बौद्धिक कर्तृत्व आहे. देवाच्या संकल्पनेभोवतीच प्रामुख्याने धर्माची संकल्पना बांधली गेली आहे. त्यामुळे कल्पनाशक्तीचे विशाल रूप त्यामध्येही दृग्गोचर झालेले आहे. एवढेच नव्हे तर देवाच्या संकल्पनेइतकाच मानवी मनाचा ताबा, धर्माच्या संकल्पनेने घेतला आहे. देव जेवढा विशिष्ट समुदायाच्या मनात रुजला आहे, तेवढाच धर्म त्यांच्या सामाजिक नि सांस्कृतिक वागणुकीचे अधिष्ठान म्हणून व्यवहारात दाखल झाला आहे.
माणसाच्या नित्याच्या वागणुकीशी अशी धर्माची सांगड घातल्याने माणसाला तो आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे असे वाटू लागले. आणि त्याचे हे असे वाटणे समाजात परंपरेने रूढ केलेल्या देवळांसारख्या नि धर्मगुरू नि धर्मपीठांसारख्या व्यवस्थांनी अधिकाधिक घट्ट करत नेले. समाजातल्या कित्येक माणसांना, आपल्या जगण्याचे साधन असलेला व्यवसाय म्हणून या व्यवस्था टिकविणे, आणि शक्य झाल्यास वाढवणे गरजेचे वाटू लागले. त्यातून एका अलिखित कायद्याची निर्मिती झाली. धर्म ही गोष्ट माणसाच्या जन्माशी जोडली गेली. आई-बापांचा धर्म आपोआपच मुलांना दिला गेला; त्यांच्यावर लादला गेला. त्यामुळे आता आपला जन्मच मुळी कुठल्यातरी ‘धर्मा’तच होतो. आणि आपण या घटनेविषयी विचारच करत नसू तर आपले सारे जीवनच त्या विशिष्ट धर्मात व्यतीत होते. आणि आपला मृत्यूही धर्मांतर्गतच होतो. धर्म हा असा आपल्या जीवन-मरणाशी चिकटवला गेला आहे. ही अतिशय व्यथित करणारी गोष्ट आहे. धर्म हा असा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे. ही सामाजिकदृष्ट्या अतिशय क्लेशकारक घटना आहे.
आपल्या असंख्य व्यक्तिात, सामाजिक आणि राजकीय प्र नांचे मूळ या धर्मकल्पनांचा आपल्या मनावर जो पगडा बसलेला आहे त्यात दडलेले आहे. आज जगातील बहुसंख्य लोकांचा फार मोठा वेळ, शक्ती नि पैसाही तथाकथित धर्मकारणासाठी नि त्यातून निर्माण झालेल्या विविधांगी प्र नांच्या सोडवणुकीसाठी वाया जात आहे; एवढेच नव्हे तर देव नि धर्म यांचा मनाला होणारा जाच कित्येकांच्या बाबतीत वैयक्तिक कार्यक्षमतेला नि कर्तृत्वाला बाधा ठरत आहे.
असाही अनुभव येतो की धर्मकल्पनेशी जखडलेल्या अवस्थेत माणसाची स्वतंत्रपणे विचार करण्याची शक्तीच हळूहळू लोप पावू लागते. जो विचार करावयाचा, मग तो स्वतःविषयीचा असो, आजूबाजूच्या समाजाविषयीचा असो अथवा राष्ट्राविषयीचा असो, तो धर्मांतर्गतच संकुचित केला जातो. धर्मापल्याड जाऊन मानवी समुदायाचा, मानवी जीवनाचा विचार करण्याचे सामर्थ्यच तो गमावून बसतो.
धर्म हा मानवी समाजाचा एक अविभाज्य घटक झाला असला तरी तो आवश्यक घटक नाही, हे पटवून घेणे माणसाला कठीण जाते आहे; ही खरी माणसाच्या भविष्याविषयी चिंता करावी अशी गोष्ट आहे. मनाला धर्मबंधनात जखडून ठेवले की धर्माशी फारकत घेण्याचा विचार सुचत नाही; सुचला तरी तो पटत नाही; आणि पटला तरी तो अंमलात आणण्याचे धाडस होत नाही. आणि मग असेही घडते की एक व्यावहारिक शहाणपण म्हणून आपण तो विचार सोडूनच देतो.
विचार हासुद्धा स्वतंत्रतेच्या वातावरणातच फुलतो नि फळतो. व्यक्तिात किंवा सामाजिक जीवनात परिवर्तन घडवून आणायचे असेल, तर माणसाने स्वतंत्र विचार करण्याची आपली शक्ती दूषित होऊ देता कामा नये. आपण धर्मसंकल्पनेशी बांधलेल्या आपल्या मनाच्या साखळ्या जरा जरी सैल केल्या तरी स्वतंत्र विचारशक्तीचे वारे आपल्याभोवती खेळू लागते. पाऊस पडून गेल्यानंतरच्या उन्हासारखे निर्मळ नि ताजतवाने वाटू लागते. भूतकाळातील माणसाने आपल्या अफाट कल्पनाशक्तीच्या जोरावर धर्मकल्पनेला जन्म दिला; त्याच कल्पनाशक्तीच्या उत्तुंग भरारीने आता धर्मातीत अशा मानवी जीवनाची संकल्पना आपण खचितच जन्माला घालू शकतो.
आपण स्वतःपासून सुरुवात करू शकतो. आपण स्वतःला धर्मातीत मानू शकतो; नव्हे आपण स्वतःला धर्मातीत नेऊ शकतो. या धर्मातीत होण्याच्या प्रवासात आपल्याबरोबर आणखीही कोणी येतील अशी खात्री बाळगू शकतो. धर्म असलेल्या जीवनाकडून धर्म नसलेल्या जीवनाकडे सारा समाज वाटचाल करील असे स्वप्न आपण पाहू शकतो.
आता, धर्मातीत समाजाच्या संस्थापनेसाठी आपण प्रस्थान ठेवू या.
सुगंध, विजयानगर कॉलनी, २११८ सदाशिवपेठ, पुणे — ४११ ०३०