गेली कित्येक वर्षे मी स्वतःला rationalist म्हणवत आलो आहे. पण ‘rationalist’ या शब्दाच्या अर्थाची फोड मी अजून पुरेशी करू शकलो नाही असे मला वाटते. ती करण्याचा आणखी एक प्रयत्न मी करणार आहे.
त्या शब्दाची व्युत्पत्ति पाहता तो शब्द लॅटिन भाषेतील ‘ratio’ या शब्दापासून बनलेला आहे असे लक्षात येते. ‘Ratio’ म्हणजे reason; पण ‘reason’ म्हणजे काय हे सांगणे बरेच कठीण आहे. कारण ‘reason’ चे इंग्रजीत अनेक अर्थ आहेत, आणि त्या सर्वांच्या अर्थाचा शब्द मराठीत (किंवा संस्कृतात) नेमका सापडत नाही. ‘Reason’ च्या अर्थाचा चटकन् सुचणारा शब्द म्हणजे बुद्धि. तो स्वीकारून सामान्यपणे ‘rationalism’ला ‘बुद्धिवाद’ किंवा ‘बुद्धिप्रामाण्यवाद’ हे शब्द वापरण्याची प्रथा आहे. पण ‘बुद्धि’ म्हणजे काय हे सांगायचे राहतेच. म्हणून ‘बुद्धि’ शब्दाचे काही अर्थ तपासणे अवश्य आहे.
Reason’ चा प्रमुख अर्थ मनाचे ज्ञानेंद्रियांखेरीज एक ज्ञानसाधन; इंद्रियांना अप्राप्य असे ज्ञान मिळविण्याचे एक सामर्थ्य. डोळा, कान इत्यादि इंद्रियांचे विषय ‘हा रंग’, ‘तो आवाज’ असे एकवचनी पदार्थ असतात. सामान्याची किंवा प्रकाराची कल्पना इंद्रियांना असू शकत नाही. सामान्य किंवा जातिवाचक कल्पना प्राप्त करण्याचे बुद्धि हे साधन आहे. अनेक विशेषांच्या अनुभवापासून सामान्य किंवा जातिवाचक कल्पना बनविणे, भाषाव्यवहार करणे, अनेक शब्दांची बनलेली वाक्ये (किंवा विधाने) जुळविणे त्यांच्यात सत्यासत्य असा भेद करणे, इत्यादि क्रिया करणे —- या सर्वांचे साधन म्हणजे बुद्धि.
पण याखेरीज आणखी काही वेगळे अर्थही बुद्धि (reason) या शब्दाला आहेत. ‘कारण’, ‘हेतु’ हेही ‘बुद्धी’चे अर्थ आहेत. ‘अमुक कर्म तू का केलेस?’ त्याचे कारण काय? तू ते कोणत्या हेतूने केलेस? असे त्या ‘का’ शब्दाचे अर्थ आहेत. इंग्रजीत तोच प्रश्न Why? For what reason?’ असा विचारला जातो. अर्थातच हा अर्थ ‘बुद्धि’ शब्दाच्या वर सांगितलेल्या ‘सामान्य किंवा जातिवाचक कल्पना प्राप्त करण्याचे साधन’ या अर्थाहून फारच वेगळा आहे. पण ‘कारण’ शब्दही दोन भिन्न अर्थांनी वापरला जातो. इंग्रजीतील ’cause’ आणि reason’ या दोन शब्दांना ‘कारण’ हा एकच मराठी शब्द आहे. इंग्रजीत ’cause’ हा शब्द ज्याला संस्कृतमध्ये उपादानकारण म्हणतात त्या अर्थी स्थूलमानाने वापरला जातो, आणि ‘reason’ हा शब्द ‘हेतू’ किंवा ‘purpose’ या अर्थी रूढ आहे. एखादी वस्तु ज्या द्रव्याची बनलेली असते ते द्रव्य त्या वस्तूचे उपादानकारण, आणि ‘हेतु’ किंवा ‘purpose’ या अर्थाचा इंग्रजी शब्द म्हणजे ‘reason’. Reason’ चा आणखी एक अर्थ आहे. वैध (valid) अनुमानाची आधारवाक्ये (premises) आणि निष्कर्ष यांचा जो संबंध असतो त्याचा वाचक. आधारवाक्ये खरी असतील तर निष्कर्षही खराच असतो. या संबंधाला ‘ground’ आणि ‘consequent’चा संबंध असे म्हणतात.
‘Reason’ शब्दाला आणखीही अनेक अर्थ आहेत. पण प्रस्तुत लेखाच्या दृष्टीने वर सांगितलेले अर्थ पुरेत. सत्य-असत्य, वैध-अवैध या बुद्धीच्या संकल्पना आहेत असे वर म्हटले. त्याची फोड करायची अजून राहिली आहे. ती आता करतो.
सत्य-असत्य ही विशेषणे वाक्यांची (विधानांची) आहेत, तर वैध-अवैध ही विशेषणे अनुमानांची आहेत. म्हणजे वाक्येच फक्त सत्य-असत्य असू शकतात, तर अनुमानेच फक्त वैध-अवैध असू शकतात. अनुमान वैध आहे याचा अर्थ जर आधारवाक्य सत्य असेल तर निष्कर्ष असत्य असू शकत नाही. वाक्य सत्य आहे याचा अर्थ त्यात वर्णिलेली स्थिती वस्तुस्थिती आहे; तर ते असत्य आहे याचा अर्थ वर्णन वस्तुस्थितीहून भिन्न आहे. ‘यथार्थ’ आणि ‘अयथार्थ’ हे शब्द सत्य आणि असत्य या अर्थाचे आहेत. ‘यथार्थ’ म्हणजे ‘यथा अर्थः’, जशी वस्तू आहे तसा (अर्थ = वस्तू).
आता जर अनुमान असे असेल की त्याचे साधक (आधारवाक्य) जर सत्य असेल तर निष्कर्षही सत्य असतो, असत्य असू शकत नाही, तर ते अनुमान वैध, एरवी अवैध.
हे सांगणारी शक्ती म्हणजे reason. या कठोर अर्थी आपण विवेक हा शब्द वापरू. आगरकरांनी ‘बुद्धिवाद’ किंवा ‘बुद्धिप्रामाण्यवाद’ या शब्दाऐवजी ‘विवेकवाद’ हा शब्द वापरला होता. ‘विवेक’ या शब्दाचे इतरही अर्थ आहेत, हे खरे. पण ‘reason’ या अर्थाचा अधिक नेमका आणि अर्थवाही शब्द ‘विवेक’ हा आहे. म्हणून ‘rationalism’ करिता आपण ‘विवेकवाद’ हा शब्द आपण वापरू.
आता पुढचा प्रश्न विवेकवादाचे स्वरूप काय हा.
विवेकवादाचा गाभा म्हणजे आपण केव्हाही सत्य विधानांचाच स्वीकार करावा. ज्याची सत्यता किंवा असत्यता आपल्याला माहीत नाही असे विधान सत्य म्हणून वापरणे निषिद्ध आहे. जे सत्य आहे की असत्य आहे हे आपल्याला माहीत नाही, त्या विधानाचा स्वीकार किंवा त्याग दोन्ही चूक आहेत. अशा विधानाविषयी अनुकूल किंवा प्रतिकूल कोणतेही मत बनविणे विवेकविरोधी होईल. पण कोणते विधान सत्य आहे हे ओळखायचे कसे? विधानांच्या सत्य-असत्याविषयी दोन प्रकारची प्रमाणे किंवा पुरावा (evidence) असतो. त्यापैकी एक पूर्ण निर्णायक आहे, तर दुसरा पुरावा कमी-अधिक निर्णायक (probable) आहे. म्हणजे काही विधाने नक्की खरी किंवा खोटी असतात, तर काही विधानांची सत्यता नक्की करता येत नाही. म्हणून पहिल्या प्रकारची विधाने असत्य असावीत. शंभर टक्के सत्य किंवा असत्य असणाऱ्या विधानांची जातच वेगळी आहे. त्यांना तार्किकीय सत्ये (logical truths) किंवा तार्किकीय (logical) असत्ये म्हणतात. त्यांची सत्यता किंवा असत्यता ठरविण्याकरिता इंद्रियानुभव अप्रस्तुत असतो. जगातील वस्तुस्थिती काय आहे हे लक्षात न घेता ती सत्य की असत्य ते आपण नक्की ठरवू शकतो. हे सर्व एक-दोन उदाहरणे देऊन स्पष्ट करता येईल. पण त्यापूर्वी विवेकाचे काही नियम पाहू.
(१) तर्कशास्त्राचा एक नियम असा आहे की एकच विधान सत्यही आहे आणि असत्यही आहे असे असू शकत नाही. त्याला व्याघातनियम (Law of Contradiction) असे नाव आहे.
(२) दुसरा नियम असा आहे की एखादे विधान सत्य असेल तर आणखी एक किंवा अधिक विधाने सत्य असतात. या नियमाला व्यंजननियम (Law of Implication) म्हणतात. उदा. ‘सर्व मनुष्य मर्त्य आहेत’ हे जर खरे असेल तर सॉक्रेटीस हा मनुष्यही मर्त्य आहे हेही खरे असावे लागेल.
आता वर केलेल्या सार्विक विधानांच्या निर्णायक आणि संभाव्य (probable) सत्य यांची काही उदाहरणे पाहू. पुढील दोन सार्विक विधाने पाहा :
(१) कोणत्याही त्रिकोणाच्या कोनांची बेरीज दोन काटकोन असते. (२) सर्व कावळे काळे असतात.
पहिले विधान पक्केपणी सत्य आहे. ते असत्य असण्याची शक्यता शून्य आहे. काही व्याख्या आणि काही स्वतःसिद्ध प्रमाणे यांच्यावरून ते निष्पन्न होते. हे आपण कशावरून म्हणतो? कारण ते विधान असत्य आहे असे म्हणणे म्हणजे व्याघात स्वीकारणे होते. (१) हे विधान सत्य आहे कारण ते असत्य आहे म्हणणे आत्मव्याघाती आहे. पण (२) या विधानाची गोष्ट वेगळी आहे. कावळा काळ्याहून वेगळ्या रंगाचा असण्याची शक्यता मुळीच आत्मव्याघाती नाही. जर काळा असण्याची व्याख्या ‘कावळा’ या शब्दाच्या व्याख्येतच समाविष्ट असेल तर जो काळा नाही असा पक्षी असू शकेल हे अशक्य आहे. कारण तो काळा नसेल तर तो कावळाच असू शकत नाही. म्हणून केवळ व्याघातनियमाने ‘सर्व कावळे काळे असतात’ हे विधान सिद्ध होऊ शकत नाही, आणि संपूर्ण निर्णायक असण्याकरिता आपल्याला कावळ्यांच्या निरीक्षणाची जरूर नाही.
परंतु (२) या विधानाची सत्यता ठरविण्याकरिता वस्तुस्थिती काय आहे ते पाहावे लागत नाही. पहिल्या प्रकारच्या विधानांना निगामी (deductic) विधाने म्हणतात, तर दुसऱ्या प्रकारच्या विधानांना उद्गामी (inductive) विधाने म्हणतात. निगमन म्हणजे एक विधान खरे असेल तर आणखी काही विधानेही खरीच असतात, उलट उद्गमन म्हणजे एखाद्या प्रकारच्या व्यक्तींच्या काही उदाहरणांत अमुक गुण आहे म्हणून त्या प्रकारच्या सर्व व्यक्तींच्या ठिकाणी तो गुण असला पाहिजे असे म्हणणे. काही उदाहरणांवरून त्या प्रकारच्या सर्व व्यक्तींच्या ठिकाणी अमुक एक गुण आहे असे अनुमान करणे. ‘काही’ वरून सर्वांविषयी अनुमान करणे हे पुष्कळदा, खरे म्हणजे सर्वदा, चुकीचे असते. आपण निरीक्षिलेल्या सर्व उदाहरणांत अमुक एक गुण आहे म्हणून आपण न निरीक्षिलेल्या उदाहरणांतही तो गुण असला पाहिजे अशी अपेक्षा करणे अर्थात् चूक आहे. मात्र निरीक्षिलेली उदाहरणे जितकी जास्त तितकी न निरीक्षिलेल्या उदाहरणांतही अमुक एक गुण असण्याची शक्यता अर्थातच जास्त असते. पण अपवादात्मक उदाहरणे नाहीतच असे म्हणण्याचा अधिकार आपल्याला आहे असे म्हणणे चुकीचे असते.
वरील विवेचनावरून असे म्हणता येईल की सत्याचे दोन भिन्न प्रकार आहेत. वर दिलेली दोन्ही उदाहरणे सार्विक असून दोन्ही सत्य आहेत असे आपण म्हणतो. परंतु त्या विधानांत भेद आहे. ‘त्रिकोणाच्या कोनांची बेरीज दोन काटकोन असते’ हे विधान पक्केपणाने सत्य आहे. त्याला अपवाद असू शकत नाही. कारण ते व्याख्या आणि स्वयंसिद्ध विधाने यावरून केलेले वैध अनुमान आहे. उलट (२) या अनुमानाला अपवाद असू शकतो, म्हणजे अपवाद आत्मव्याघाती होत नाही. पण मग दुसरे उदाहरण सत्य कशावरून? कारण त्याचा जो आपला अनुभव आहे, तो सगळा त्याच्या सत्यतेला अनुकूल आहे. विरोधी उदाहरण आपल्याला एकही सापडले नाही. आपण पाहिलेले सर्व कावळे काळे होते, म्हणून न पाहिलेले कावळेही काळेच असावेत असे म्हणणे रास्त दिसते. पण म्हणून त्या दोन विधानांचा भेद नाहीसा होत नाही. पहिल्याला अपवाद असणे अशक्य आहे, तर दुसऱ्याला अपवाद असणे शक्य आहे. म्हणजे अपवाद आत्मव्याघाती होत नाही. पहिले उदाहरण तार्किकीय (logical) आहे, तर दुसरे आनुभविक (empirical) आहे. पहिले सत्य आहे हे जाणण्याकरिता इंद्रियानुभवाची गरज नाही; पण दुसरे पूर्णपणे अनुभवाश्रित आहे. पहिल्याची सत्यता तार्किकीय आहे, तर दुसऱ्याची सत्यता अनुभवावर आधारलेली आहे.
आपण ‘reason’ या शब्दाचा एक कठोर अर्थ पाहिला. पण त्या शब्दाचा आणखी एक अर्थ आहे, आणि तो कठोर नाही, सौम्य आहे. हा अर्थ ‘rational’ नसून, ‘reason’ पासून बनलेला ‘reasonable’ हा आहे. ‘Rational’ आणि ‘reasonable’ हे शब्द सामान्यपणे एकाच अर्थाचे नाहीत. ‘Reasonable’ म्हणजे ‘rational’ नव्हे. एखादा मनुष्य अगदी एककल्ली असेल किंवा अतिशय स्वार्थी असेल, आपण त्याला म्हणतो, ‘अरे, जरा विवेक कर’. आप्ताच्या मृत्यूमुळे शोकविव्हल झालेल्या मनुष्याला आपण समजावतो : “तुला खूप वाईट वाटले हे खरे आहे. पण ‘मरणं प्रकृतिः शरीरिणाम्’ हे लक्षात घे. मरणापासून कोणीही सुटला नाही. थोडा विवेक कर. अतिशोक करणे व्यर्थ आहे. आता शोक आवर आणि दैनंदिन कामाला लाग.” त्याला ‘जरा विवेकी हो’ असे म्हणताना आपण त्याला ‘rational हो’ असे म्हणत नसतो. आपण त्याला ‘reasonable’ हो असे म्हणत असतो.
ज्याप्रमाणे इंग्रजीत ‘rational’ प्रमाणे ‘reasonable’ हा शब्द आहे तसाच मराठीतही ‘विवेक’ हा शब्द दोन अर्थांनी वापरला जातो. त्याअर्थी ‘विवेकी’ शब्दही ‘rational’ आणि ‘reasonable’ या अर्थांनी रूढ आहे हे आपल्या दृष्टीने सोयीचे आहे. परंतु आपण rationally वागावे असे म्हणताना आपण reasonably वागावे याहून वेगळी गोष्ट सांगतो आहेत हे लक्षात ठेवले पाहिजे. अतिशय reasonable असलेली माणसे irrational असू शकतात. पूर्ण स्वार्थी असणारा आणि त्याप्रमाणे वागणारा मनुष्य अतिशय reasonable असेल; पण तो अतिशय irrational असू शकतो हे लक्षात ठेवणे अवश्य आहे.