‘आमच्या शाळेत लैंगिक शिक्षणाचा कार्यक्रम करायचाय. इ. ८ वी / ९ वी च्या मुलांसाठी/मुलींसाठी, तर तुम्ही याल का?’, असा प्र न प्रत्यक्ष किंवा फोनने, आणि सोबत एक त्याच मजकुराचे पत्र ही माझ्यासाठी वारंवार घडणारी गोष्ट. मी येईन’ असे म्हणते आणि विचारते, ‘हा कार्यक्रम का आयोजित करावा असे वाटते आहे?’ या प्र नाच्या उत्तरात, ‘आम्ही दरवर्षी करतो/आम्हाला तसा आदेशच असतो’, अशी उत्तरे तरी असतात किंवा मुला मुलींचा या वयात पाय घसरू नये, त्यांना आजारांचा, गर्भारपणाचा धोका समजावा असा समस्यानिवारणाचा हेतू असतो.
माझ्या प्र नाला अपवाद म्हणून सुद्धा आजवर एकानेही मुलामुलींना स्वतःच्या लैंगिकतेची जाणीव होताना न्यूनगंड येऊ नये, मोकळेपणाने प्र न विचारायला अवकाश मिळावा, असे उत्तर दिलेले नाही. बरेचदा तर लैंगिक शिक्षण फक्त मुलींना देण्याची गरज त्यांना वाटत असते, म्हणजे पाळीबद्दल माहिती द्यावी एवढाच मुख्य हेतू असतो.
माहिती मिळणे आणि समस्या निर्माण न होणे असा हेतू शालेय शिक्षक मानतात, त्यांचा आपल्याला राग येत नाही, कारण आपल्या समाजात एकंदरीनेच लैंगिकता या विषयाबद्दल तो विषयच काहीतरी घाणेरडा, गुप्ततेचा आहे अशी निःशब्द समज लहानपणापासून आपल्याला मिळते. असे असले तरी समाजात अनैतिक मानल्या जाणाऱ्या लैंगिक संबंधांचे, समाजाला अमान्य असलेल्या विवाहपूर्व संततीचे, लिंग-सांसर्गिक आजारांचे प्रमाण भरपूर आहे, हेही आपल्याला दिसते.
शाळांमध्ये प्रेमचिठ्यांची छुपी देवाणघेवाण, एकतर्फी प्रेमाग्रहातून होणारे खून वगैरे प्र न शाळाचालकांना, शिक्षकांना दिसत असतात. त्यावर उत्तर म्हणून हे ‘लैंगिक शिक्षण’ कार्यक्रम योजण्याची त्यांची कल्पना असते. सहाजिकच वयात येणाऱ्या मुलामुलींना एकदा या ‘लैंगिक शिक्षण’ नावाच्या, ‘पुनरुत्पादन संस्थेची माहिती आणि कार्य’, ‘लैंगिक धोके व समस्या’ अशा विषयांच्या लेक्चरबाजीतून बुचकळून काढण्याची त्यांना घाई असते. व्यवस्थेच्या चौकटीतला ठाशीव-पणा आणि लैंगिकतेच्या मानवी जीवनातील सर्वस्पर्शी अस्तित्वाकडे होणारी डोळेझाक यामुळे असे घडत असले, आणि आपणही ‘चला मिळते आहे तेवढी संधी तरी घेऊ या’ असा विचार करून हे आमंत्रण स्वीकारत असलो, तरी आपल्या मनात स्पष्टता हवीच, की लैंगिकता हा मानवी मानसाचा आणि संपूर्ण अस्तित्वाचाच स्वाभाविक भाग आहे. तेव्हा लैंगिक शिक्षण केव्हा द्यायला हवे याचे उत्तर-अगदी लहानवयापासूनच, असेच आहे. तसे ते आपण दिले नाही तरीही मूल शिकतच असते. अर्थात वयाच्या प्रत्येक स्तरावर ते देण्याची पद्धत मुलाचे/मुलीचे आकलन, कल्पनाविश्वाचा अवकाश ध्यानी घेऊनच असायला हवी, हे स्पष्टच आहे. परंतु तो पद्धतीचा भाग झाला. मुळात आपला हेतू त्यामागे कोणता आहे हे सर्व काळासाठी एकच आणि पालक म्हणून वा शिक्षक म्हणून आपल्याला स्पष्ट असावे.
लैंगिकता शिक्षण हे आपल्या दृष्टिकोणांपासून वेगळे ठेवता येत नाही. त्यामुळे लैंगिकता शिक्षणाचे हेतू स्वतःला पटतात ना, हेही बघावे लागेल. एक उदाहरण बघू, समजा दीड दोन वर्षांची छोटी मुलगी अंगात कपडे विशेषतः चड्डी न घालता घरात पाहुणे बसलेले असताना तिथे आली. तर पाहुण्यांशी गप्पा मारणाऱ्या, चहा करणाऱ्या आईचे काय होते? तिचे लक्ष त्या कामातून उडते. ती अस्वस्थ होते, आणि घाईने तिला आत खेचून फ्रॉक चड्डी अडकवून सोडते. बाह्य लैंगिक अवयव ही झाकूनच ठेवण्याची बाब आहे हे शिक्षण मुलीला यातून मिळते. एवढ्या लहान वयात हे इतक्या आक्रमकपणे शिकवायला हवे का? समाजाच्या चौकटीत वाढणाऱ्या एरवी सामान्य मुलामुलींना हे साध्या अनुकरणातून शिकता येते. मातृभाषा शिकतात तितक्या सहजपणे. समजा आपण काहीही म्हणायचे, दर्शवायचे नाही असे ठरवले तरी ९-१० वर्षांची मुलगी/मुलगा परक्या माणसासमोर कपडे न घालता येतच नाही.
तीच गोष्ट शू च्या जागेला हात लावण्याबद्दल. त्या जागेला काही विशेष संवेदनशीलता आहे, स्पर्शाने वेगळेच छान वाटते, हे कळतेच. शरीराच्या विविध भागांबद्दल कुतूहल असतेच तशात शू-शी च्या निमित्ताने तिथे हात जातो. आकारांबद्दल औत्सुक्य वाटते. पण तीन-चार वर्षांपासूनच्या मुलाने/मुलीने ‘शू’ ला हात लावला की पालकांचा मस्तकशूळ उठतो. ‘पुन्हा हात लावलास तर खबरदार . . ., . . . ., हाताला डाग देईन’ पर्यंत वेळ येते. मूल तरीही ऐकत नसले तर ‘तज्ज्ञांचा सल्ला’ घेतला जातो. हे तज्ज्ञ बरे असले तर बरे. नाहीतर मूल बिचारे बिचारे होऊन जाते. सामाजिक शिष्टाचारात हे बसत नाही, म्हणून शू, शी, आंघोळीसारखे ते खाजगीपणे करायला हवे हे सांगावेच, पण त्या कृतीत काहीतरी भयंकर आहे असे पोचवण्याची गरज नाही. मूल सतत–अगदी सारखेच तसे करत असेल तर, त्याला खूप कंटाळा येतोय का, लक्ष वेधून घेण्याचा तो प्रयत्न आहे का, त्याचे मन उदास आहे का, किंवा शू च्या जागी काही चावले आहे का, खाज येते का, हे पाहावे. आपल्या नकारांमुळे शरीराबद्दलची एक नकारात्मक भावना मुलामुलींपर्यंत पोहोचते. हस्तमैथुन हे संपूर्णपणे निर्धोक असते असे शाळा कॉलेजात किंवा प्रौढांनाही सांगितले, तरी ते पटवून घेताना काहींना त्रास होतो. मुलामुलींना बाह्य लैंगिक अवयवांना—-स्वतःच्याच हात लावणे हे हवेसे आणि त्याच वेळी गैर वाटत राहते. ही मनाची घालमेल संपत नाही.
स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव होतानाच आपण मुलगा आहोत की मुलगी याची जाणीव बालकांना होते. आपण मुलगा-पुरुष आहोत किंवा मुलगी-स्त्री आहोत म्हणजे नेमके काय, हे समजताना आसपासच्या पुरुष/स्त्री प्रतिमांचा परिणाम त्यावर होणे अपरिहार्यच आहे. अशा परिस्थितीत पुरुषप्रधान समाजरचनेत तशाच प्रतिमांशी स्वतःला ताडून बघत जुळवून घेत मुलेमुली वाढतात. मग त्यात पुरुषी मर्दानगी, आक्रमक वागणूक, शिरजोरी आणि स्त्रीचे मार्दव, जिव्हाळ्याने काळजी घेणे, पडती बाजू स्वीकारणे, नाजूकपणा वगैरेही आपसूक येते. लैंगिकता शिक्षणात वैयक्तिक लैंगिकता, नातेसंबंधातील लैंगिकतेचे आणि लैंगिक संबधातील नात्यांचे भान आणि या सर्वांवर परिणाम करणारी सामाजिक परिस्थिती अशा तीनही घटकांचा विचार असावा लागतो.
स्त्री आणि पुरुषपणात शारीरिक भेदांचे स्पष्ट स्वरूप सोडले तर इतर कोणतेही पुरुषत्वाचे वा स्त्रीत्वाचे व्यवच्छेदक लक्षण नाही हे स्पष्ट करणे हा लैंगिकता शिक्षणाचा एक महत्त्वाचा हेतू आहे.
स्वतःच्या शरीराबद्दल, स्त्री वा पुरुष असण्याबद्दल, दिसण्याबद्दल लाज बाळगणे, एवढेच काय दुसऱ्या कुणाबद्दलचे विचार मनात येण्याबद्दल स्वतःला कमी किंवा उच्च समजणे ह्या सर्वातील चूक समजावी ही या शिक्षणाकडून आपली अपेक्षा आहे. मात्र ‘मी जो/जी आहे तसाच/तशीच सुंदर आहे’, हा आत्मविश्वासही मनामध्ये जागा व्हायला हवा.
शरीररचना आणि कार्य यांचा अभ्यास हा दहाव्या-बाराव्या वर्षी सुरू होईल. आपले शरीर हे कसे सुंदर संपूर्ण यंत्रही आहे हे शिकवताना त्याबद्दलची घाणेरडेपणाची भावना पुसून जाऊन वेधक विज्ञानदृष्टीने पाहाता यावे, समजून घ्यावे अशी आपली त्यामागची दृष्टी आहे. मासिक ऋतुस्रावाबद्दल—-पाळीबद्दल—-अमंगळ रक्त शरीर बाहेर टाकते, आणि ह्या चार दिवसात देवळात जायचे नसते, सावली पडली तर फुले उमलत नाहीत अशा भंगड अंधश्रद्धा काढून प्रत्येक वेळी नव्या उल्हासाने नवनिर्मितीचे कौतुक शरीरात फुलून येते याकडे लक्ष वेधायला हवे. स्वतःच्या लैंगिक ओढीची नेमकी जाणीव ८-९ व्या वर्षांपासून पुढे वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळ्या वयात येते. समाजमान्यता फक्त भिन्नलिंगी ओढीला असते. त्यामुळे समलिंगी व उभयलिंगी आकर्षण वाटणे विकृत आहे की काय असा प्र न तशी ओढ असणाऱ्यांना आणि नसणाऱ्यांनाही पडतो. भिन्नलिंगी ओढीचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे जे सामान्य ते योग्य असा नियम बनवला जातो. इथे समाजमतांशी फटकून असलेले वैज्ञानिक तथ्य —- या सर्व ओढी-आकर्षणे त्या त्या व्यक्तींसाठी नैसर्गिक आहेत आणि त्यामुळे त्यांना योग्यायोग्यतेचे निकष लागत नाहीत – — हे स्पष्ट करायला हवे. त्या संदर्भातील अंधश्रद्धाही दूर व्हायला हव्यात. हे एवढे सगळे वैयक्तिक लैंगिकतेमध्येच येते.
शालेय पातळीवर विशेषतः वैयक्तिक लैंगिकतेबद्दल जास्त चर्चा होते. लैंगिक नातेसंबंधांचा विचार त्यांना वेधून घेतो, पण अद्याप त्यावर मोकळी चर्चा करण्याचा उल्हास नसतो. महाविद्यालयीन पातळीवर ह्यात फरक झालेला दिसतो. तरीही त्यातली ओढ, शरीरांची साथ, संवाद, विश्वासाचा आधार ह्या मूळ मुद्द्यांबद्दल मुलांच्या/मुलींच्या मनांतल्या विचारांमध्ये तरंग उठवण्याचा हेतू साधता येतो. पुढील शिक्षणासाठी योग्य पुस्तकांची नावे सांगून शिक्षणप्रक्रिया पुढे सुरू ठेवण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांवर सोपवताही येते. या विषयाकडे दुर्लक्ष’ करण्याची, टाळण्याची जशी अडचण असते, तसाच विलक्षण जिज्ञासेचा आधारही असतो. आपल्या चर्चेत जिज्ञासा जागी झाली तर फायदा होतो, मात्र पुस्तकांची निवड काळजीपूर्वकच करावी.
कोणत्याही स्तरावर लैंगिकता शिक्षणाचा विचार करताना समाजाची लैंगिक सुदृढता, सुंदरता मनात ठेवून दोन महत्त्वाचे हेतू आपण साधायचे असतात.
१. परिणामांची जाणीव . . आपण करत असलेल्या कृतीचे ताबडतोबीचे वा दीर्घकालीन परिणाम कोणते आहेत याची जाणीव करून घेणे आणि त्यांना तोंड देण्याची, ते पेलण्याची शक्ती व्यक्तीच्या ठायी येणे.
२. स्वतःच्या आणि इतरांच्या स्वातंत्र्याचा आदर राखणे–बळजबरी केव्हाही, कुठेही, कशीही गैरच असते. ती करायची नाही, करून घ्यायचीही नाही. ह्या हेतूंना समोर ठेवून आपल्या मार्गाची दिशा शोधली आणि राखली तर समाज लैंगिकतेच्या संदर्भात निरोगी असावा ही इच्छा पूर्ण होऊ शकेल. हे निरोगीपण म्हणजे आजारांचा अभाव नव्हे, तर प्रत्येक व्यक्तीला आपली लैंगिकता शारीरिक, भावनिक मानसिक आध्यात्मिक आणि सामाजिक पातळ्यावर निकोपपणे व्यक्त करता येण्यासाठीचे सुंदर वातावरण.
प्रयास परिवार, अमृता क्लिनिक, संभाजी पूल कोपरा, कर्वे रोड, पुणे — ४११ ००४