शिक्षणाबद्दल चर्चा ही बरीचशी ‘आंधळे आणि हत्ती’च्या गोष्टीसारखी होत असते. शिक्षणतज्ञ, शिक्षक, विद्यार्थी, पालक, समाज इ. प्रत्येक घटकाचा शिक्षणाकडे पाहण्याचा एक स्वतंत्र दृष्टिकोन आहे. शिक्षणाविषयीच्या चर्चेत सहभागी होणाऱ्या व्यक्ती आपापल्या दृष्टिकोनातून विषयाची मांडणी करत राहतात. एकमेकांशी संवाद साधण्याचा फारसा प्रयत्न होताना दिसत नाही. विज्ञान-शिक्षणाबाबत तर ही गोष्ट जास्तच प्रकर्षाने जाणवते. या संवादाच्या अभावामुळेच विज्ञान-शिक्षणाचा हेतू काय, या वरकरणी सरळ वाटणाऱ्या प्र नाचे उत्तर मात्र गुंतागुंतीचे होते.
भावी पिढीमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे, जिज्ञासू वृत्ती जोपासणे, या . . . उद्देशाने विज्ञान-शिक्षणाची आखणी व्हावी, अशी शिक्षणतज्ज्ञांची व समाजातील जबाबदार घटकांची अपेक्षा आहे. याउलट सर्वसामान्य पालक — — व काही प्रमाणात विद्यार्थीही —- विज्ञान-शिक्षणाकडे ‘चांगली’ नोकरी मिळवण्यासाठी आवश्यक पात्रता कमावण्याचे साधन म्हणून बघतात. हे दोन्ही गट शिक्षक व शिक्षणसंस्थांकडे आपल्या अपेक्षा पूर्ण करणारे घटक या दृष्टीने बघतात. या सर्व गोंधळातून आज विज्ञानाची एक अशी शिक्षणपद्धती अस्तित्वात आली आहे, की जी कोणाचेच समाधान करत नाही. या शिक्षणव्यवस्थेतून ‘तावून–सुलाखून’ बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये चार पैसे मिळवण्यासाठी लागणाऱ्या क्षमताही नसतात, आणि वैज्ञानिक दृष्टिकोनही नसतो. त्यामुळे एकीकडे दरवर्षी हजारो विज्ञान पदवीधर तयार होत असूनही भारतातील वैज्ञानिक व तांत्रिक व्यवसायांना सक्षम माणसांचा तुटवडाच जाणवतो आहे, वैज्ञानिक व तांत्रिक संशोधनाचा दर्जा सामान्यच राहिला आहे, आणि समाजावरचा आंधळ्या श्रद्धांचा पगडाही कमी होण्याऐवजी वाढतच चाललेला दिसतो. महाविद्यालयीन किंवा विद्यापीठीय पातळीपर्यंत विज्ञान-शिक्षण घेणाऱ्यांची ही गत आहे, तर जे केवळ शालेय पातळीपर्यंतच विज्ञानाचे शिक्षण घेतात, त्यांच्या बौद्धिक व वैचारिक जडणघडणीत या शिक्षणाचा भाग शून्य असणार, हे उघडच आहे.
मी पुणे विद्यापीठाच्या पदार्थविज्ञान-विभागात १९९४-९८ या काळात पीएच्.डी. करत असताना माझ्याबरोबर काम करणाऱ्या साधारण वीस विद्यार्थ्यांपैकी काही जण उच्च शिक्षणासाठी परदेशात गेले. जे भारतातच राहिले, त्यातल्या बऱ्याच जणांना वेगवेगळ्या तांत्रिक उद्योगांमध्ये नोकऱ्या मिळाल्या. त्यांचे काम मूलभूत संशोधनांचे नाही, तर तांत्रिक सल्लागाराचे आहे. अशा नोकऱ्यांसाठी अभियांत्रिकी पदवीधर जास्त लायक नव्हते का, असा प्र न तेव्हा आम्हा सर्वच विद्यार्थ्यांना पडला होता. याच काळात विद्यापीठ व पुण्याच्या आसपासचे उद्योगधंदे यांमध्ये सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीने आयोजित केलेल्या एका सभेत सहभागी होण्याचा योग आला. त्यावेळी एका उद्योजकाच्या भाषणातून या कोड्याचा उलगडा झाला. या उद्योजकाचे म्हणणे होते, की अभियांत्रिकीचे ज्ञान काम करताकरताही मिळवता येते, पण तांत्रिक समस्या सोडवण्यासाठी प्रयोग करून समस्येचे मूळ शोधून काढण्याची, तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता आवश्यक आहे. या दृष्टीने पोपटपंची करून अभियांत्रिकीचे पुस्तकी ज्ञान मिळवलेल्या माणसाला नोकरी देण्यापेक्षा वैज्ञानिक संशोधनाचा थोडाफार अनुभव घेतलेल्या माणसाला आवश्यक तितके तांत्रिक प्रशिक्षण देऊन कामासाठी तयार करणे जास्त उत्पादक ठरते, असा आमचा अनुभव आहे. याच सुमाराला संगणक-क्षेत्रातील एका प्रसिद्ध बहुराष्ट्रीय कंपनीनेही संगणक-अभियांत्रिकी पदवीधरांसाठी असाव्यात अशा नोकऱ्यांसाठी जाहिराती देऊन विज्ञान-शाखांतल्या संशोधक विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवायला सुरुवात केली. याच कंपनीने अलिकडे मोठ्या प्रमाणावर नोकरकपात केली, त्यावेळी काढून टाकलेल्या लोकांमध्ये सर्वजण अभियांत्रिकीचे पदवीधर होते. संशोधनाची पार्श्वभूमी असलेल्या एकाही माणसाला कमी करण्यात आले नाही.
अर्थात, समस्या फक्त व्यावसायिक अभ्यासक्रमात आहे, आणि मूलभूत विज्ञानाच्या अभ्यासक्रमांत सर्व काही आलबेल आहे, असा मात्र याचा अर्थ नाही. विज्ञानाच्या विविध शाखांमध्ये जागतिक पातळीवर नावाजलेल्या संशोधन-नियतकालिकांत भारतीय संशोधना-वरील शोधनिबंध प्रसिद्ध होण्याचे प्रमाण नेहमीच नगण्य राहिले आहे, आणि गेल्या काही वर्षांत तर तेही घटत चालले आहे.
समाजात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव असल्याची उदाहरणे तर ठायी ठायी बघायला मिळतात. विज्ञान तंत्रज्ञानातील संशोधनाच्या क्षेत्रात उच्च पदांवर काम करणारे संशोधकही फलज्योतिष, वास्तुशास्त्र, आध्यात्मिक गुरु, इ. वर वेळ आणि पैसा खर्च करताना दिसतात. जागतिक कीर्तीचे नामवंत शास्त्रज्ञ कोणत्यातरी फुटकळ ‘बाबा’ आणि ‘माँ’ चे गुणगान करणारे लेख वर्तमानपत्रांत प्रसिद्ध करतात. यांसारख्या घटना सर्वांच्याच डोळ्यासमोर घडत आहेत, आणि तरीही त्यात कोणालाच विसंगती जाणवत नाही. यावरूनच आपल्या आजच्या शिक्षणव्यवस्थेला वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यात अपयश येत आहे, हे सिद्ध होते.
या सर्व अनुभवांच्या पार्श्वभूमीवर काही प्र न सतत सतावत राहतात—-शिक्षणतज्ञ व सर्वसामान्य पालक विद्यार्थी यांच्या विज्ञान शिक्षणाकडून असलेल्या अपेक्षा संपूर्ण शिक्षणव्यवस्थेचा बोजवारा उडावा इतक्या परस्परविरुद्ध खरेच आहेत का? की सर्वजण पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनातून विचार करत असल्याने ही समस्या निर्माण झाली आहे? विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला मारून केवळ पाठांतराला महत्त्व देणारी शिक्षणपद्धती आणि परीक्षापद्धती सर्वजण विनातक्रार का स्वीकारत आहेत? अशा निरुपयोगी परीक्षेतील यशाला पालक व विद्यार्थ्यांकडून इतके अवाजवी महत्त्व का दिले जाते? नोकऱ्या देणाऱ्या संस्थांनाही या परीक्षांतील गुणांमधला फोलपणा कळून चुकला आहे आणि त्यांनी आपले स्वतंत्र निकष (प्रवेशपरीक्षा, समूहचर्चा, प्रदीर्घ मुलाखती, इ.) लावायला सुरुवात केली आहे. यात काळाची पावले ओळखण्याचे व्यावहारिक शहाणपणही कुणालाच कसे सुचत नाही? की कळते पण वळत नाही (किंवा बसलेल्या व्यवस्थेत बदल नको, म्हणून सोयिस्करपणे कानाडोळा केला जातो) अशी परिस्थिती आहे?
आपल्या आजूबाजूच्या विश्वाचे जैविक, रासायनिक व भौतिक स्वरूप समजावून घेण्याचा माणसाचा प्रयत्न म्हणजे विज्ञान. संशोधक नवे प्रयोग करत जातात, आणि उपलब्ध सिद्धान्तांची व्याप्ती वाढवण्याचा प्रयत्न करतात. यातूनच वैज्ञानिक ज्ञानात भर पडत जाते. आधी विकसित झालेल्या संकल्पनांच्या मदतीने नवीन अनुभव किंवा घटना समजावून घेण्याच्या प्रयत्नांतून एकतर जुन्या संकल्पनांचा पडताळा मिळतो, किंवा त्यांच्या मर्यादा स्पष्ट होऊन नव्या संकल्पना मांडण्याची गरज निर्माण होते. विज्ञानाचे शिक्षणही याच पद्धतीने होऊ शकते. स्वतः प्रयोग करून नवे अनुभव घेणे, या अनुभवांवर विचार करणे, यांतून मनात वैज्ञानिक संकल्पना आकार घेत जातात, तसेच नव्या कल्पना, नवे विचार सुचत जातात. याउलट शिक्षकाने ठोकळेबाजपणे वर्गात व्याख्यान द्यायचे, विद्यार्थ्यांनी यांत्रिकपणे पाठ्यपुस्तकातील मुद्दे पाठ करायचे आणि परीक्षेत ते जसेच्या तसे उतरवून काढायचे, या प्रकारच्या व्यवस्थेत विज्ञानाचेच काय, कोणत्याच विषयाचे शिक्षण होऊ शकत नाही. विशेषतः विज्ञानाच्या बाबतीत शिकवण्याच्या या पद्धतीमुळे विज्ञानाभोवती उगाचच एक गूढतेचे वलय निर्माण होते. आपल्या दैनंदिन जीवनाशी याचा काहीही संबंध नाही, अशीच भावना रुजते आणि वाढत जाते. आपल्याला नेमके हेच टाळायचे आहे. आपल्या समाजाच्या भावी घटकांना विज्ञान आपलेसे वाटावे, डोळसपणे त्याची शक्तिस्थळे आणि मर्यादाही ओळखता याव्यात, तर्कशुद्ध विचार करून, प्रयोग करून निष्कर्ष काढण्याची वैज्ञानिक पद्धत त्यांनी दैनंदिन आयुष्यातही वापरावी, आणि विज्ञान तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांना उदरनिर्वाहही करता यावा, अशी जर सर्वांची इच्छा असेल, तर स्वानुभवातून विज्ञान शिकण्याला पूरक अशा शिक्षणव्यवस्थेला पर्याय नाही.
भारतातील सर्व शिक्षणावर शासनाचे नियंत्रण आहे. पण याबाबत शासनाकडून काही हालचाल होण्याची अपेक्षा करणे भोळसटपणाचे ठरेल. आपल्या देशात लोकशाही शासनव्यवस्था आहे, आणि आपल्या सर्वच राजकीय पक्षांना लोकांच्या डोळ्यांत धूळफेक करून सत्ता हस्तगत करायची चटक लागलेली आहे. अशा ‘सोयिस्कर’ व्यवस्थेला आंधळेपणाने विश्वास ठेवणारे नागरिकच हवे आहेत. डोळसपणे विचार करू शकणारे, भावनेपेक्षा तर्काला महत्त्व देणारे नागरिक निर्माण होतील अशी शिक्षणपद्धती कोणत्याच राजकीय पक्षाला नको आहे. तेव्हा आजची परिस्थिती बदलण्यासाठी शिक्षक आणि शिक्षणसंस्थांनाच पुढाकार घ्यावा लागेल. स्वतःच्या हाताने प्रयोग करून त्यातून वैज्ञानिक संकल्पना शिकताशिकवता येतात. हे अनेक शैक्षणिक प्रयोगांतून सिद्धही झाले आहे. मात्र आजवर झालेले हे प्रयोग मर्यादित स्वरूपाचे आहेत. या प्रयोगांची व्याप्ती वाढवायची असेल, तर शिक्षक आणि शिक्षणसंस्थांच्या मनोभूमिकेत बदल व्हावा लागेल. शिक्षकांना आळस झटकून वर्गात, प्रयोगशाळेत मेहनत करण्यासाठी मनाची तयारी करावी लागेल. दुर्दैवाने बहुसंख्य शिक्षक आणि शिक्षणसंस्थाही सध्याच्या शिक्षणव्यवस्थेतल्या निष्क्रियतेतून येणाऱ्या आरामाला चटावलेले आहेत. त्यामुळे समाजाच्या दबावाचा रेटाच ही परिस्थिती बदलू शकतो. यासाठी करावे लागणारे समाजप्रबोधन अवघड असले, तरी ते करणे गरजेचे आहे. विज्ञान-शिक्षणाच्या व्यवस्थेचा उद्देश विज्ञान-पदवीधरांना बौद्धिक आरामाच्या नोकऱ्या देणे हा नसून भावी पिढीला वैज्ञानिकदृष्ट्या साक्षर आणि सुजाण बनवणे, हा आहे, हे ठणकावून सांगण्याची वेळ आता आली आहे.