१. नुकत्याच आमच्या घरकामाच्या बाई काम सोडून गेल्या. त्या नववी पास झालेल्या होत्या. त्यांच्या जागी ज्या बाई आल्या त्या अक्षरशत्रू. त्यामुळे बरीच गैरसोय झाली आहे. पूर्वी बाई कामावर आल्या तरी मी घरी असणे आवश्यक नसे. कागदावर सूचना लिहून ठेवल्या की भागत असे.
माझ्याकडे कार्यालयात साफसफाई, झाडलोट करण्यासाठी एक शिपाई होता. पाच वर्षांनीपण कामाचे स्वरूप तेच राहणार. मग त्याच कामासाठी पगारवाढीच्या स्वरूपात मी दरवर्षी जास्त पैसे का द्यायचे? पण मी त्या शिपायाची उपयुक्तता वाढवली. त्याला मुंबईतले सर्व पत्ते शोधायला शिकवले. अगदी कागदावर नकाशा काढून देऊन. चहा कॉफी करायला शिकवले. कार्यालयाचा आठवड्याचा किरकोळीचा जमाखर्च लिहायला शिकवला, मशीनवर ब्लू प्रिंट काढायला शिकवले . . . अशा तऱ्हेने त्याची क्षमता वाढवत पगार वाढवत नेला.
परवा तळेगाव स्टेशनवर गाडीची वाट पाहात बसलो होतो. माझ्या शेजारी एक २१-२२ वर्षांची सुमन नावाची मुलगी बसली होती. तेवढ्यात एक साठीचे गृहस्थ आले.
“काय सुमन जमलं का कुठे?” ।
“नाही हो दादा. तात्पुरती २-३ महिन्यांसाठी बदली म्हणून मिळालीय नोकरी. पण नेहमीच्या बाई रजेवरून आल्या की परत रस्त्यावर. काय हो दादा शिकून उपयोग?” “धीर सोडून कसे चालेल? आणि काही झालं तरी अशिक्षित आईपेक्षा सुशिक्षित आई चांगली नाही का?”
हा किस्सा सर्वांनाच ठाऊक असेल. एक विद्वान पंडित पुरात नावेतून नदी पार करत होते. नावाड्याशी गप्पा मारता मारता त्यांनी विचारले, ‘काय रे, लिहिता वाचता येतं की नाही?’
नावाडी —- नाही हो दादा. विद्वान —- ‘हात लेका! पाव आयुष्य वाया गेलं तुझं. बरं पण हिशोब ठिशोब तरी येतात ना?’
नावाडी —- नाही हो दादा. कोण सांगणार आमाला?
अर्धं आयुष्य फुकट आहे तुझं. मग इतिहास, भूगोल, काही सांस्कृतिक . . .?
नावाडी —- (मान खाली घालतो.)
तुझे पाऊण आयुष्य बरबाद झालंय. एवढ्यात नावाड्याचा चेहरा एकदम गंभीर काळजावल्यासारखा होतो. त्याला एक जबरदस्त लाट येताना दूरवरून दिसते. तो विद्वानाला विचारतो —-साहेब पोहता येतंय ना? विद्वान —- नाही. का रे? नावाडी —- अरे रे! साहेब, तुमचे पूर्ण आयुष्य फुकट जाणार. ती पहा मोठी लाट येतीय. नाव तिच्यापुढे टिकणार नाही. मी उडी मारून पोहत किनाऱ्याला जातो. बराय. मागील शतकात अमेरिकेत गोऱ्यांचा आणि रेड इंडियन्सचा फार झगडा झाला. रेड इंडियन्स हटत गेले किंवा मारले गेले. अशातही काही गोरे सज्जन रेड इंडियनांचे हितचिंतक होतेच. रेड इंडियन्समधील होतकरू तरुणांना निवडून त्यांना शिक्षण द्यावे अशी ते खटपट करीत. आपण नाही का आदिवासींना असेच शिक्षण देत? अशाच एका NGO च्या कार्यक्रमाच्या प्रस्तावाला रेड इंडियन्सच्या प्रमुखाने दिलेले उत्तर मार्मिक आहे—-“आपल्या प्रस्तावाबद्दल धन्यवाद. तीन चार वर्षांखाली आपण असेच सहा तरुणांना प्रशिक्षित केले होतेत. ते तरुण परत आले ते अगदीच कुचकामी होऊन. त्यांना ससेहरणांच्या मागे धावता येईना, भाला फेकता येईना, चांगले दोर वळता येईनात, इतकंच काय, जाळ करून त्यावर साधे डुक्कर खरपूस भाजता येईना. त्यांचे हाल आम्हालाच पहावेत ना. म्हणून मग आम्ही त्यांना तुमच्याकडे न्यूयॉर्कला पाठवून दिले.
“पण तुमच्या चांगुलपणाला प्रतिसाद म्हणून आम्ही आपल्याला विनंती करतो की तुमचे सहा जवान आमच्याकडे दोन वर्षांसाठी पाठवा. आम्ही खात्री देतो की दोन वर्षांत आम्ही त्यांचे व्यवहारनिपुण मर्द करून परत पाठवू (We will make men out of them).”
आता हा शेवटचाच किस्सा. उत्तरेत एक म्हण आहे. “थोडसे शिकला की शेती सोडून देतो. शेतावर काम करायची लाज वाटते. आणखी थोडे शिकला की गाव सोडून शहरात जातो. आणि आणीकच जास्त शिकला की देश सोडून जातो.” मला यात दोन गोष्टी दिसतात. एक म्हणजे प्रत्येक शिक्षणाला संदर्भ असतो. आणि या गोष्टीकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले तर असे दिसते की स्थितिशील समाज बदलाला सहज प्रवृत्त होत नाही, पाय ओढत ओढत खेचला जातो.
२. मुळात “शिकवून तयार केलेला समाज’ (A Schooled Society) ही संकल्पना गेल्या दोन तीन शतकांतलीच आहे. आणि औद्योगिक (industrial society) समाजाची गरज म्हणून ती आली. कारखान्यात सर्वांबरोबर काम करायचे तर काही कौशल्ये व त्यांचे प्रशिक्षण आवश्यकच होते, काही मानसिक तयारीची सुद्धा गरज होती. स्वतंत्रपणे गवंडीकाम, सुतारकाम करणे वेगळे आणि एका मोठ्या यंत्रणेचा भाग म्हणून काम करणे वेगळे. कामाच्या यायच्या-जायच्या वेळा काटेकोरपणे पाळणे, सर्वांत मिळून मिसळून काम करणे, वरिष्ठांचे ऐकणे, हाताखालच्याला बरोबर घेऊन काम पुढे नेणे, असे अनेक अंगानी वळण देणे जरूरी होते आणि शिक्षणाचा हाच मुख्य उद्देश होता—-आज्ञाधारक, कसून मेहनत करणारा कामगार घडवणे.
आपल्याकडे इंग्रज राज्यकर्त्यांनी मुळातली हीच शिक्षणपद्धती इकडे आणली. फक्त त्यांच्या इकडच्या गरजा वेगळ्या होत्या. इतक्या दूर अंतरावरून त्यांना इथला राज्यकारभार चालवायचा होता. त्यासाठी एक आज्ञाधारक, स्वतःचे डोके फारसे न चालविणारी, वरिष्ठांच्या हुकुमाची तामिली करणारी, इंग्रजी भाषेचे ज्ञान असणारी अशी एक एतद्देशीयांची नोकरशाही व्यवस्था त्यांना हवी होती. शेवटी राज्यकर्ते आणि प्रजा यांच्यात काही एक कमीत कमी संभाषण तरी हवेच ना? याशिवाय या शिक्षणाच्या माध्यमातून इंग्रजांच्या चालीरीती, त्यांचे आचार विचार, त्यांची संस्कृती, वाङ्मय इत्यादींचा मोठेपणा येथील प्रजेवर ठसला तरीही हवाच होता. १८५७ च्या अनुभवानंतर येथील जातिभेद, धार्मिक श्रद्धा, भ्रम, अंधश्रद्धा, सरंजामी-वतनदारी वृत्ती अशा गोष्टींपासून इंग्रज दूर राहिले जोपर्यंत त्यांचा व्यापार अप्रतिहतपणे इथे चालणार होता, येथील नैसर्गिक साधनसंपत्ती विनायास मिळणार होती तोपर्यंत सर्वसामान्य न्याय आणि सामाजिक सुरक्षा व्यवस्था यापलिकडे त्यांनी फारशी फिकीरच केली नाही. मुळातली तीच व्यवस्था त्यांच्या जागी आलेल्या सावळ्या साहेबांनी चालू ठेवली आहे. इतकी की इंग्रजांनी त्यांच्या हवामानाचा, सुट्यांचा विचार करून ठरवलेले अभ्यास वर्ष (academic year) गेल्या पन्नास वर्षांत गैरसोयीचे असूनही आम्ही बदललेले नाही. उच्च शिक्षणात नेहरूंनी स्वतःच लक्ष घातले पण प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण तसेच राहिले.
एक गंमत आहे. जगभरचा असा अनुभव आहे की तुम्ही काहीही शिकवा, कसेही शिकवा, साम्यवाद शिकवा, भांडवलशाही दृष्टिकोनातून शिकवा, नाहीतर आणिक काही करा, एकदा माणसांना लिहिता वाचता यायला लागले, थोडीफार आकडेमोड जमायला लागली की ती स्वतंत्रपणे विचार करायला लागतातच. म्हणून तर आपण ५०% लोकांना निरक्षर आणि आणिक २०-२५% ना अर्धसाक्षर ठेवले नाही ना, असा विचार मनात आल्याशिवाय राहात नाही.
रोजगार विनिमय केंद्रात नोंदणी केलेले बेरोजगार (५० वर्षातील वाढ)
वर्ष बेरोजगारांची संख्या
१९५२ ४.३७ लाख
१९६७ २७.४० ”
१९७६ ९३.२६ ”
१९८७ ३०१.०० ”
१९९५ ३८१.०० ”
२००० ४०६.९८ ”
(श्रममंत्रालय, भारत सरकार)
बेरोजगारी निर्देशांक (डॉ. राम अहुजाकृत)
वर्ष निर्देशांक
१९५२ १००
१९७१ ११६७
१९८५ ६०१८ साठपट वाढ
१९९० ७६४३
१९९५ ८७१८ सत्याऐंशीपट वाढ
देशातील बेरोजगारी
वर्ष घोषित रिकाम्याजागा नोंदणीकृत बेरोजगार
१९९० ४,९०,००० ३ कोटी ४६ लाख
१९९१ ४,५८,००० ३ कोटी ६३ हजार
१९९२ ४,१९,००० ३ कोटी ६७ हजार
१९९५ ३,८५,००० ३ कोटी ६७ हजार
१९९८ ३,५८,००० ४ कोटी ८९ हजार
१९९९ ३,२८,००० ४ कोटी ३ लाख ७१ हजार
(वरील तिन्ही तक्ते साप्ताहिक महाराष्ट्र — काल, आज, उद्या ८ एप्रिल, २००२, बेरोजगारी विशेषांकावरून)
३. शिक्षण हे वैयक्तिक उन्नयनासाठी आहे, सुसंस्कृत, सुबुद्ध नागरी समाज निर्माण करण्यासाठी आहे. माणसांकडे संसाधन (Resource) म्हणून पाहू नये. त्यांना शिक्षणव्यवस्थेने वस्तू म्हणून, नग म्हणून न समजता सर्जनक्षम अमर्याद उत्क्रांत होण्याची क्षमता असलेले जितेजागते व्यक्तिमत्त्व म्हणून पाहावे असा विचार टागोरांपासून ते अरविंद, कृष्णमूर्ती यांच्यापर्यंत अनेकांनी मांडला आहे. त्यांनी निर्माण केलेल्या शिक्षणसंस्था या फक्त निवडक लोकांसाठीच आहेत. वार्षिक रु. ८५,००० ते रु. १,००,००० फी कोणाला परवडणार? ‘पब्लिक स्कूल्स’ म्हणून (डेहराडूनची शाळा) निघालेल्या शाळाही त्यातल्याच आहेत. तिथले विद्यार्थी आम जनतेपासून केवळ तुटलेले नाहीत, ते आमजनतेला मागास, घटिया समजतात. त्यांना आम जनतेची सावलीसुद्धा नकोशी होते. अरविंदांच्या जाणिवांच्या उच्च उच्चतम पातळ्यांच्या उत्क्रांतीवर पूर्णपणे विश्वास असलेला माझा एक मित्र मला एकदा म्हणाला होता, “माझे काही आम जनतेशी वैर नाही. पण अगदीच डुकरांच्या पातळीवर असलेल्यांच्या सहवासात माझ्या मुलांनी का वाढावं? उत्क्रांतीत जो जिथं आहे तिथं आहे.” त्याची मुलगी पाँडिचेरीच्या अरविंदांच्या आश्रमाच्या शाळेत शिकते. थांबा, एकदम उसळू नका. “जाणिवांची उत्क्रांती” वगैरेचे सोडा पण नगरपालिकांच्या शाळांत, त्या तसल्या मुलांच्या आणि शिक्षकांच्या सहवासात शिकायला आपली मुले न पाठविणारे अनेक आहेत. त्या नगरपालिकेच्या, जिल्हा परिषदांच्या, आदिवासींच्या आश्रमशाळांतील शिक्षणाच्या दर्जाविषयी न बोलणेच बरे. सेंट्रल स्कूल्स या नावाने चालविल्या जाणाऱ्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे अभ्यासक्रम, सुट्यांचे दिवस हे सुद्धा निराळे असतात. का?
पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनीने उच्च बुद्ध्यांकाच्या मुलांचीच निवड करून जाणीवपूर्वक समाजाला नेतृत्व देण्याऱ्यांची फौज उभारण्याचा प्रयत्न गेली २५ वर्षेतरी चालविला आहे. फलित?
जात्याच बुद्धिमान मुलांना गरिबीमुळे संधी नाकारली जाऊ नये म्हणून महाराष्ट्रात “सैनिकी शाळा” सरकारने काढल्या. माझ्या माहितीतल्या एक बाई सातारच्या सैनिकी शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झाल्या. त्यांचा अनुभव असा की काटेचमच्यांनी जेवायला शिकणारी ही मुले आपल्या कुटुंबापासून दुरावतात. आपल्या अशिक्षित, अर्धशिक्षित गरीब आईबापांच्या घरी सुटीत देखील जायला ती नाखूष असतात. कोणाच्या डोक्यातून या असल्या कल्पना निघतात कोण जाणे!
४. चातुर्वर्ण्याधिष्ठित समाजामध्ये अंगमेहनतीला प्रतिष्ठा प्राप्त व्हावी; लोकांनी हाताने काम करायला शिकावे असा विचार महात्मा गांधींनी नई तालीमच्या माध्यमातून आग्रहाने मांडला. काम करता करता, कामातूनच शिकत जा, माणूस केवळ डोळ्यांनी आणि कानांनीच शिकत नाही, हातांनीपण शिकतो हा पियाजेचा विचार घेऊन डॉ. कलबाग पाबळला १७ वर्षे काम करत आहेत. या समाजावर याचा परिणाम होत नाही.
रयत शिक्षण संस्थेच्या वसतिगृहात राहून पूर्वी दोन तास शेतावर काम करावे लागत असे. आज ते मागे पडत असल्याचे ऐकतो. राजगुरुनगर येथील आवटे कॉलेजच्या प्राचार्य पानवळांनी ५२ एकर जमिनीवर वृक्षलागवडीचा, फळबागांचा, पाणलोटाचा प्रकल्प राबवला, स्वतःच्या एकट्याच्या हिमतीवर. १०००–११०० विद्यार्थ्यांमधून त्यांना १०-१५ विद्यार्थीपण काम करायला मिळाले नाहीत. पुण्याच्या विद्यार्थी साहाय्यक समितीच्या होस्टेलवर राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी आठवड्याला १० तास काम करावे अशी अपेक्षा असते. समिती त्यासाठी सर्वतोपरी सहाय्यही करते पण विद्यार्थी याला फारसे उत्सुक नसतात. काही वर्षांपूर्वी Investment in Man या संस्थेने नळकाम, गवंडीकाम, फिटरकाम, असे शिक्षणक्रम महिना रु. १००/- पाठ्यवेतन देऊन राबविण्याचा प्रयत्न ३-४ वर्षे चालविला व प्रतिसादाअभावी बंद केला. आम्ही गरिबीत जन्मलो हा आमचा दोष नाही, त्यामुळे समाजानेच आमची काळजी घ्यावी अशी वृत्ती होते आहे. काही वर्षांपासून ‘कार्यानुभव’ नावाची संकल्पना माध्यमिक शाळांत राबविली जात आहे. विलेपार्ले येथील नावाजलेल्या शाळांमधूनही कार्यानुभवाचा (!) मजकूर शिक्षक वर्षाअखेरीस तोंडी सांगतात आणि मुलांच्या कार्यानुभवाच्या वह्या तयार होतात. आपण समाजाला घडविण्याचा प्रयत्न करतो आहोत की व्यक्ती घडविण्याचा? असे वेगवेगळे शक्य असते.
शिक्षणाचा उद्देश काय? हा प्रश्न कोणाला विचारत आहे? पालक विचारताहेत का शिक्षकांना की तुम्ही आमच्या मुलांना काय आणि कशासाठी शिकवता आहात? शिक्षक विचारताहेत का पालकांना की बावांनो तुमची मुले आमच्याकडे कशाला पाठवता आहात? आम्ही त्यांचे काय करायचे? प्रौढ, सुशिक्षित व्यक्तीतरी स्वतःलाच हा प्रश्न विचारतेय का की मी कशासाठी शिकलो, माझे शिक्षण अजून चालू आहे का, की एकदाचा मी शिकून शहाणा झालो?
६, सुरुची, संत जनाबाईपथ, पूर्व विले पार्ले, मुंबई — ४०० ०५७