[“त्युन्साबरो माकीगुची’ या जपानी शिक्षणतज्ज्ञाची ओळख त्यांच्या ‘एज्युकेशन फॉर क्रिएटीव लिव्हिंग’ या पुस्तकातून होते. शिक्षणशास्त्राच्या अभ्यासकांपैकी काहींनी कदाचित माकीगुचींचे नाव ऐकले असेल. १९४४ साली म्हणजे जपानमधील अणुसंहारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. माकीगुचीना कधीही फारशी प्रसिद्धी मिळालेली नाही. प्रस्थापित शिक्षणव्यवस्थेशी, आणि धर्मव्यवस्थेशी त्यांनी जन्मभर लढा दिला. एज्युकेशन फॉर क्रिएटीव लिव्हिंग वाचताना त्यांच्या संवेदनशील, बालककेंद्री शिक्षणविचारांची ओळख होते, तेव्हा त्यांच्या सखोल विचारांची प्रदीर्घ अनुभवांची आणि विलक्षण प्रेमळ, प्रसन्न स्वभावाची जाणीव होते. शिक्षण आनंदासाठी हवे, असे म्हणणाऱ्या माकीगुचींच्या व्यक्तिगत जीवनात मात्र आनंद अभावानेच आढळतो. तीन वर्षांच्या या मुलाला पोटाशी बांधून आईने समुद्रात उडी घेऊन आत्महत्या केली. जेन्हायू माकीगुची नावाच्या काकाने या मुलाला वाचवले आणि संभाळले. गरिबी इतकी की शाळेतले शिक्षण अशक्य होते. चौदा-पंधराव्या वर्षांपासून पोलिसात भरती होऊन तिथल्या सरकारी परीक्षा देत मॅट्रिकच्या दर्जाची परीक्षा पास होऊन ते महाविद्यालयात गेले. पुढे शिक्षक, मुख्याध्यापकही झाले. अखेर राज्यघोषित शिन्टो धर्माला विरोध केल्याबद्दल त्यांना कारावास घडला. त्या कारावासात उपवास घडून त्यांना मृत्यू आला.
त्या काळातली जपानी समाजस्थिती कारखानदारी, बेकारी, युद्धाची छाया यांनी व्यापलेली होती. स्वार्थी राजकारणाने बोकाळलेली होती. तिचे वर्णन अगदी आपलेसे वाटते. माकीगुचीही काळाने आणि अंतराने लांबचे वाटत नाहीत, आजही आणि इथेही आवश्यक वाटतात.ट
कुठे पोचायचे हे ठरले की त्या दिशेने कसे जायचे याची पद्धत ठरवता येते. अस्पष्ट लक्ष्याच्या दिशेने मारलेल्या बाणाची शाश्वती कशी देणार? हेच नेमके शिक्षणात होते आहे. आणि बिचारी मुले त्यात भरडली जात आहेत.
शिक्षणामागचे ध्येय, किंवा हेतू तात्त्विक चर्चेने ठरवता येत नाही, तो रोजच्या जीवनातून वर आला पाहिजे. संपूर्ण मानवी जीवनाचा विचार त्यात जरूर हवा, पण त्याचवेळी कुटुंब, समाज, देश यांच्या अपेक्षांचाही त्यात अंतर्भाव हवा. या दृष्टीने शिक्षणामागचा हेतू शोधायला निघालो तर आपण आनंद हाच शिक्षणाचा केंद्रबिंदू असला पाहिजे, इथे येऊन पोहोचतो. माझ्या विचारांची, मांडणीची हीच आधारशिला आहे की आनंदाची जाणीव हीच शिक्षणाची दिशा असली पाहिजे. त्याच दृष्टीने शैक्षणिक कार्यक्रम आखले गेले पाहिजेत.
आता आनंद म्हणजे नेमके काय, हा प्र न समोर येतो. याचा शोध घेताना मी जीवनाकडे, त्यातील घटना, रोजची कामे, अपेक्षा यांच्याकडे बघतो आहे. मला वाटते की शिक्षणाचे हेतू ठरवताना समाजातील माणसांचे जीवनामागचे हेतू काय असतात हे बघू या. शिक्षणामागचा हेतू हा त्याच दिशेने पण अधिक मोठा असायला हवा.
माणसाचे व्यक्तिमत्त्व नेमके कसे घडते, हे अजून आपल्याला पुरते उमगलेले नाही, पण सगळे आधीपासून ठरून आपण इथे येत नाही, हेही खरे आहे. माझ्या आज-वरच्या अनुभव, निरीक्षणातून माझे मत बनलेले आहे की जीवनाला आकार देणारे काही तरी आपण बरोबर घेऊन आलेलो असतो आणि ते जे काही असते ते जीवनाच्या ध्येयाकडे आपल्याला घेऊन जाते. पण त्याशिवायही काहीतरी आहे, सर्वांसाठी समान असे.
शासनाने सर्वांसाठी आखलेल्या शिक्षणव्यवस्थेत देशाला शिक्षितांकडून नेमके काय हवे आहे, ते पाहिलेले असते, पण देशाची परिस्थिती काळानुसार बदलते, त्यानुसार शिक्षणात बदल होत नाहीत. व्यक्तिविशेषांच्या क्षमता आणि देशाच्या गरजा यांचीही सुसंगती साधता येत नाही. आपला प्र न अधिक गंभीर आणि निकडीचा बनत जातो.
समाजाला शिक्षणाकडून नेमके काय हवे आहे, ते हवे तर प्रथम पाहून घेऊ. या अपेक्षांचे दोन भाग पडतात (१) पालकांच्या मुलांकडून—-त्यांना मिळणाऱ्या शिक्षणातून असलेल्या अपेक्षा, (२) समाजाच्या नव्या पिढीकडून अपेक्षा. अर्थात, स्वतःची उरलेली स्वप्ने मुलांमार्फत पुरी करून घेणाऱ्यांना, मुलांनी आमचे सुख पाहावे अशी अपेक्षा करणाऱ्यांना मी यात गृहीत धरलेलेच नाही. मुलांच्या भविष्याबद्दल प्रेम असणारे पालकच मी ध्यानात घेतले आहेत. त्याचप्रमाणे समाजानेही त्या मुलांच्या आनंदाचा, स्वास्थ्याचा विचार करायलाच हवा. समाज जर फक्त ‘आपला फायदा काय?’ असा विचार करत असेल तर ते योग्यच नाही.
प्रत्येकाचे स्वतःचे एक ध्येय असते आणि समाजाप्रति काही जबाबदारीही असते, या दोन्हीचा एकत्रित विचार मुलांना करता यावा, असे शिक्षणाने काहीतरी दिले पाहिजे. हे सगळे पटण्यासारखे असले तरी त्याचा गंभीर विचार पालक अजिबात करत नाहीत आणि अर्थहीन शिक्षण देणाऱ्या शाळांमध्ये बिनदिक्कत मुलांना धाडून देतात.
मुलांच्या जीवनात आनंद यावा, म्हणूनच ना आपण त्यांना वाढवतो, शिकवतो? यावर तर आपले एकमत आहे. आनंद म्हणजे काय यावर थोडे मतवैविध्य असू शकेल. पण तरीही मुलांचे हित साधावे, भले व्हावे, याच दिशेचे आपले उत्तर निचित आहे. यातला अर्थ समजून बरेच लोक शिक्षण ही भावी जीवनाची पूर्वतयारी असे म्हणतात. शिवाय शिक्षणाबद्दल ते जीवनाशी सुसंगत नसते अशी तक्रारही ऐकू येते. समजा, तीही बाजूला ठेवू. कदाचित मोठे झाल्यावर त्या शिक्षणाचा मुलाला उपयोग होणार असेल, पण आजचे काय? आज तर त्याला कंटाळवाणे, जीवनाशी फटकून असलेलेच शिकावे लागते आहे ना? अनेक शिक्षक भावी जीवनात लागणारी माहिती मुलांच्या डोक्यात भरत आहेत. मग मुलांना शिक्षण आनंददायी, वेधक वाटले नाही तर त्यात नवल कोणते?
लहान बाळाला न पचणारे अन्न जबरदस्तीने भरवले तर काय होते? न पचता दुसरीकडून बाहेर येते. ते तरी बरे, नाहीतर आतड्यात कुजत राहून जाते. आणि माणूस आजारी पडते–तेच येथेही होते. दुर्देवाने मानसिक बौद्धिक अजीर्ण झाल्याचे लगेच लक्षात येत नाही. जेव्हा लक्षात येते तेव्हा कशामुळे झाले हे कळत नाही. कारण आपण ह्या मुलाच्या आयुष्यात काहीतरी गोंधळ घातला आहे हेच पालक-शिक्षकांना कळलेले नसते. त्यांचा मूळ हेतू तसा नसतोच.
शिक्षणव्यवस्थेतून भावी आयुष्यासाठी शिदोरी मिळते की नाही हा प्र न वेगळा, पण जर त्यातून लहानपणातला आनंद नष्ट होत असेल तर त्या मुलाच्या व्यक्तिमत्त्वावर थोडातरी ओरखडा उमटतोच. तो भावी आयुष्याला घातकच आहे. त्यामुळे शिक्षणाचा हेतू असाच हवा की या शिक्षणामुळे माणूस समाजाचा जबाबदार, प्रसन्न घटक बनेल, समाजाच्या आनंदासाठी प्रयत्न करेल आणि त्यायोगे त्याच्या स्वतःच्या जीवनात अर्थपूर्ण प्रसन्नतेला बरकत येईल.
माझे हे म्हणणे अनेकांना पटत नाही. आनंद याचा अर्थ त्यांना स्वार्थी मौजमजा असा वाटतो. माझ्या दृष्टीने तो विश्वमांगल्याचा विचार आहे. एका माणसाचा आनंद हा त्याच्यापुरता राहत नाही, सर्व समाजाच्या आनंदाचाच तो एक भाग असतो.