“आज शाळेत जायचं म्हणून रडतो आहेस, उद्या शाळेत जाणार नाही म्हणून यापेक्षा जास्त रडशील.”
रवींद्रनाथांच्या लहानपणी त्यांच्या घरी येऊन शिकवणाऱ्या शिक्षकांनी त्यांना एक थप्पड मारून ही जी भविष्यवाणी उच्चारली तीच त्यांच्या शिक्षणविषयक अनुभवांतील पहिली पायरी म्हणायला काहीच हरकत नाही. रवींद्रनाथांचा भाऊ सोमेंद्रनाथ आणि भाचा सत्यप्रसाद हे त्यांच्यापेक्षा केवळ दोनच वर्षांनी मोठे. त्यामुळे ही तीनही मुले तशी एकत्रच वाढली. दोन वर्षांच्या वडिलकी-मुळे हे दोघे शाळेत जायला लागले. पण छोटा रवी मात्र अजून शाळेत जायच्या वयाचा झालेला नाही असे घरच्यांनी ठरवून टाकले होते. ही मोठी भावंडे रस्त्यावरच्या गंमती-जमती आपल्या छोट्या भावाला इतक्या रंगवून सांगत असत की कधीच घराबाहेर न पडलेल्या रवीला शाळेत जाण्याचा मोह होणे अगदी अपरिहार्य होते. त्यामुळे शाळेत जाण्यासाठी टाहो फोडून रडणे हाच मार्ग या मुलाजवळ शिल्लक राहिला. त्याने तो अनुसरला आणि घरी येणाऱ्या शिक्षकांनी एक जोरदार थप्पड मारून वर उल्लेखिलेली भविष्यवाणी उच्चारली.
रवीच्या बालहट्टापुढे नमते घेऊन त्याला लौकरच ‘ओरिएंटल सेमिनरी’त घाल-ण्यात आले. पण त्या शाळेत रवीचे मन फारसे रमले नाही. या शाळेत मुलांना शिकवलेले काही समजले नाही की हमखास एक उपाय योजला जाई. त्या मुलाला बाकावर उभे करून त्याचे दोन्ही हात पसरून स्लेटपाट्यांची चळत त्यावर ठेवली जाई. मोठेपणी हे आठवून लिहीत असता रवींद्रनाथांनी म्हटले आहे, “अशा प्रकारे धारणाशक्तीचा अभ्यास बाहेरून अंतरात घुसत असेल की नाही हे शहाण्या माणसांनी ठरवावे.’
‘ओरिएंटल सेमिनरी’तून रवीची रवानगी ‘नॉर्मल स्कूल’मध्ये झाली. त्या शाळेत मुलांनी शिकायला सुरुवात करण्यापूर्वी मनोरंजनासाठी गाणी म्हणण्याची पद्धत होती. पण गाण्याचे शब्द इंग्रजी असायचे आणि तालासुराचा तर पत्ताच नसायचा. रोजरोज तेच गाणे म्हणण्याचा मुलांना अगदी कंटाळा आला होता. पण तक्रार करायची कोणापुढे? ती ऐकणारे होते कोण? शाळेतील शिक्षक, अधिकारी वर्ग आपण मुलांसाठी गाणी शोधून काढली असे वाटून स्वतःवरच इतके खूष होते की त्यांना मुलांचा विचार करण्याची गरजच भासली नाही.
या गाण्यांविषयी रवींद्रनाथांनी लिहिले आहे, “या गाण्यांपैकी एका गीताची एकच ओळ मला आठवते. त्याचे शब्द होते, ‘कलोकी पुलोकी सिंगिलमेला लिंग मेरा लिंग.’ बराच प्रयत्न करून यातील बहुतेक शब्दांचे अर्थ मी जाणून घेतले पण ‘कलोकी’ म्हणजे कशाचे रूपांतर याचा मला कधीच पत्ता लागला नाही.’
‘कलोकी पुलोकी . . .’ या गीताचे खरे शब्द होते. ‘Full of glee, singing merrily, merrily, merrily.’ (फुल ऑफ ग्ली, सिंगिंग मेरिली, मेरिली, मेरिली.) पण हे आनंदमय शब्द आणि त्यांचा अर्थ मुलांपर्यंत पोहोचवावा असे काही एकाही शिक्षकाला वाटले नाही.
त्याच शाळेतील हरनाथ पंडित नावाचे एक शिक्षक मुलांना उद्देशून इतके घाणेरडे शब्द वापरत असत, की रवीने त्यांच्या कोणत्याच प्र नाला कधीच उत्तर दिले नाही.
रवींद्रनाथ टागोर यांनी मोठेपणी केलेल्या शैक्षणिक प्रयोगांचे बीज त्यांच्या लहानपणीच्या या नकारात्मक प्रयोगांत आहे असे वाटते. शिक्षण म्हणजे काय नसावे याचे भरपूर धडे रवींद्रनाथांना अगदी लहानपणी मिळाले. त्याचा खोल संस्कार त्यांच्या मनावर झाला आणि पुढच्या आयुष्यात या थोर शिक्षणतज्ज्ञाने मुलांना या प्रकारे न छळता त्यांना आनंददायी, सृजन-शिक्षण देण्याचा आटोकाट प्रयत्न केला.
रवींद्रनाथांच्या शैक्षणिक विचारसरणीतच केवळ नव्हे, तर एक माणूस म्हणून झालेल्या त्यांच्या जडणघडणीत त्यांचे वडील महर्षी देवेंद्रनाथ यांचा फार मोठा सहभाग आहे. आज जिथे शांतिनिकेतन उभे आहे ती जागा निवडून ते शिक्षणाचे पवित्र स्थान व्हावे ही कल्पना मूळची देवेंद्रनाथांचीच. देवेंद्रनाथांनी मनःपूर्वक चिंतिलेल्या आणि आचरलेल्या काही तत्त्वांचा उल्लेख रवींद्रनाथांनी वारंवार केला आहे. त्यातील एकदोन तत्त्वे येथे, शैक्षणिक संदर्भात मांडताना अगदी स्वाभाविक ठरतील असे वाटते.
रवींद्रनाथांनी आपल्या वडिलांच्या आठवणी सांगताना लिहिले आहे. “त्यांच्या अखेरच्या दिवसापर्यंत त्यांनी कोणत्याही प्रकारे माझ्या स्वातंत्र्याला बंधन घातले नव्हते. त्यांची रुची आणि मते यांच्याविरुद्ध मी पुष्कळ कामे केली. त्यांना वाटले असते तर ते मला शिक्षा करू शकले असते. पण त्यांनी कधीही तसे केले नाही.” वडिलांच्या या शिक्षा न करण्यामागे एक नि िचत तत्त्व होते. देवेंद्रनाथांना वाटायचे की जे सत्य आहे ते मुलाने अंतर्यामी पटून स्वीकारले पाहिजे. ते बाहेरून शिक्षा करून मुलांवर थोपता येणार नाही. सत्यापासून काही काळ दूर गेला तरी एक ना एक दिवस माणूस सत्याकडे वळेल असा त्यांचा विश्वास होता.
रवींद्रनाथांनी शांतिनिकेतनातून कडक, हिंसक, शाब्दिक, शारीरिक शिक्षांचे उच्चाटन केले त्यापाठीमागे वर उल्लेखिलेल्या तत्त्वांचीच ठाम बैठक होती. मारून, ओरडून मूळ सत्य स्वीकारता येत नाही. सृजनात्मक शिक्षणातून ते त्यांच्यापर्यंत पोचवावे लागेल. ही देवेंद्रनाथांची शिकवण त्यांना पटली होती.
देवेंद्रनाथ मुलांना भारंभार खेळणी आणून देण्याच्या अगदी विरुद्ध होते. जे आई-वडील मुलांना भरपूर खेळणी आणून देतात त्यांची मुले हतभागी आहेत असे ते म्हणत. रवींद्रनाथांनीही मुलांना आयत्या वस्तू देण्याच्या धोरणाचा सदैव विरोध केला. कुंडीत रोपे लावताना त्या कुंड्यासुद्धा शिक्षक व मुलांनी स्वतःच्या हातांनी तयार केलेल्या असाव्यात यावर त्यांचा कटाक्ष असे. त्या कुंड्यांची असंख्य डिझाइन्स, आकार यांची योजना करण्यात विद्यार्थी आणि शिक्षक गढून जात. निर्मितीचा आनंद सारेच जण एकत्र उपभोगत.
रवींद्रनाथ शिक्षकांना सांगत, “उपकरणं भरपूर असली की मन आळसावतं. केवळ बाहेरच्या दिशेवर भार टाकून ते स्वस्थ बसतं. आनंदाच्या बाबतीत बाहेरच्यापेक्षा अंतरातलं अनुष्ठान फार मोठं असतं याचा त्या मनाला विसर पडतो. बालपणात मुलाला हे शिक्षण सहज, आपोआप मिळतं. त्यावेळी आतली पुंजी थोडी असते पण
आनंदाच्या लाभाच्या दृष्टीनं तीच खूप असते. या जगात ज्या हतभागी मुलाला भरपूर खेळणी मिळतात त्याचा सारा खेळच मातीमोल होऊन जातो.”
हे असे सृजन-आनंद शिक्षण रवींद्रनाथांना अगदी लहानपणीच लाभले. पाट्यांची चळत मुलाच्या हातावर ठेवण्याच्या शिक्षेची, शिक्षकांच्या शिवराळ भाषेची हकीगत देवेंद्रनाथांच्या कानावर गेली. वडिलांनीच मुलाला अशा शाळेच्या बंधनातून मुक्त केले आणि आपल्याबरोबर हिमालयात येण्याचे आमंत्रण दिले. हिमालयाच्या या प्रवासात आपल्या वागणुकीतून देवेंद्रनाथांनी शिक्षणाचे जे बाळकडू रवींद्रनाथांना पाजले ते केवळ अलौकिकच म्हटले पाहिजे. या प्रवासात आणि मुक्कामाला पोचल्यावरही वडील मुलाशी कितीतरी वेळ बोलत बसत, गोष्टी सांगत. याच वेळी वडिलांनी रवींद्रनाथांना आकाश बघायला शिकवले, ज्योतिषशास्त्राशी ओळख करून दिली. इंग्रजी, संस्कृतचे पहिले धडे इथेच गिरवले गेले. पण ही झाली प्रत्यक्ष शिक्षणाची गोष्ट. अप्रत्यक्ष शिक्षण तर यापेक्षाही जास्त झाले. रवींद्रनाथांनी त्यातील असंख्य छोट्या, छोट्या घटनांचा उल्लेख मोठ्या कृतज्ञतेने आपल्या ‘जीवन-स्मृती’त केला आहे.
प्रवासात पहिला मुक्काम बोलपूरला पडला. बोलपूरच्या मैदानात पावसाच्या पाण्याने माती वाहून जाऊन नाना प्रकारचे दगड मात्र साठले होते. छोटा रवी आपल्या ओच्यातून नाना प्रकारचे दगड आणून वडिलांपाशी देत असे. मुलाच्या या उपद्व्यापाला एकदाही न कंटाळता उलट ते त्या दगडांची आणि पर्यायाने मुलाची प्रशंसा करत. असे दगड तुला मिळतात तरी कसे. याची चौकशी करत. मुलगा उत्साहित होऊन अधिक दगड घेऊन येण्याची तयारी दाखवी. अशी उत्तेजना बहुधा सगळ्या गोष्टींत मिळत असल्याने मुलाला अतीव उत्साह वाटत असेल यात संशय नाही. सायंकाळच्या वेळी देवेंद्रनाथ बागेच्या समोर व्हरांड्यात बसत. रवींद्रनाथ समोर बसून संगीत ऐकवत राहत. रवींद्रनाथांनी एके ठिकाणी लिहिले आहे, “अत्यंत शांतपणे मान खाली घालून हात जोडून संगीत ऐकणारी त्यांची मूर्ती मला कायम आठवत राहील.” त्याच सुमारास रवींद्रनाथांनी ‘नयन तोमार पाय ना देखिते रे छो नयने नयने’ (ईश्वरा, मी माझ्या डोळ्यांनी तुला पाहू शकत नाही कारण तू तर माझ्या डोळ्यांतच राहतोस) ही कविता लिहिली.
कविता ऐकल्यावर वडील म्हणाले, “देशाच्या राजाला देशाची भाषा कळली असती तर त्याने कवीला मोठा पुरस्कार दिला असता. देशाच्या राजाकडून हे घडण्याचा संभव नाही. तेव्हा हे काम मी करतो.’ एवढे बोलून त्यांनी पाचशे रुपयांचा चेक मुलाला दिला. देवेंद्रनाथांच्या विचारांनी रवींद्रनाथांच्या वैचारिक घडणीला आकार दिला. रवींद्रनाथांच्या चिरंजीवांचे म्हणजे रथींद्रनाथ टागोरांचे On the Edges of Time हे पुस्तक वाचताना याना प्रत्यय येतो. रथींद्रनाथ हे शांतिनिकेतनातील पहिल्या तुकडीतील विद्यार्थी. त्यांनी आपल्या या पुस्तकात रवींद्रनाथांनी शांतिनिकेतनात केलेल्या शैक्षणिक प्रयोगांबद्दल भरभरून लिहिले आहे. ते वाचताना जाणवत राहते की, सत्याचा जो अविष्कार आयुष्यात घडला तो इतरांपर्यंत पोचावा म्हणून रवींद्रनाथांनी शांतिनिकेतनाच्या माध्यमातून अखंड धडपड केली. रथींद्रनाथ म्हणतात, “शिक्षेचं उच्चाटन व्हावं, मुलं मुक्तपणे उमलावीत म्हणून वडिलांनी खूप प्रयत्न केले. पण त्याचा अर्थ आमची शाळा म्हणजे काही स्वच्छंदी-स्वैराचार नव्हता. ती एक तपोभूमी होती. तिथं स्वयंशिस्त होती. एका कलावंतानं उभारलेला तो जणू मंडप होता.” रवींद्रनाथांना निसर्गाचे प्रचंड आकर्षण. माणसाचे खरे शिक्षण निसर्गाच्या कुशीत होते असे त्यांना वाटे. त्या दृष्टीने खेड्यात राहणारी माणसे निसर्गाच्या अधिक सहवासात येतात, निसर्गाच्या उदात्त, विशाल दर्शनाने कळत नकळत त्यांचीही मने विशाल होतात असे वाटून त्यांनी बोलपूर इथे शांतिनिकेतनाची उभारणी केली. बंगालीत खेड्याला पल्ली म्हणतात. या ‘पल्ली संस्कृती’ची उभारणी शाळेत झाली.
या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे, हे असे का नाही आणि ते तसे का नाही याची पंचाईत इथे झाली नाही. जे जसे आहे ते मोठ्या आनंदाने स्वीकारत त्याला योग्य त-हेचे खतपाणी देण्याचा प्रयत्न इथे झाला. मुकुल दे यांच्यासारखा आंतरराष्ट्रीय कीर्तीचा चित्रकार इथे घडू शकला तो त्यामुळेच. केवळ चित्रांतच रमणाऱ्या या मुलाचे गणित, व्याकरण या विषयांत अजिबात मन रमत नसे. रवींद्रनाथांनी त्याच्यातले गुण हेरून त्याच्या हातात रंग, ब्रश, कागद सोपवले. गणित, व्याकरण या विषयांची जबरदस्ती करून एका चित्रकाराला मारून टाकले नाही. त्याला वाढवले, मोठे केले.
केवळ मार्काच्या साहाय्याने मुलांच्या व्यक्तिमत्त्वाचे संपूर्ण मूल्यमापन करणाऱ्या शिक्षकांचा रवींद्रनाथांना फार राग येत असे. ते म्हणतात, “शिकवणे म्हणजे सगळे काही समजावून देणे नव्हे. शिकवणे म्हणजे मुलांच्या अंतरंगाला हलकेसे हेलकावे देणे. त्या हेलकाव्यांनी त्यांच्या आत जे काही जागे होईल त्याचे वर्णन करून सांगायला जर एखाद्या मुलाला सांगितले, तर तो जे काही सांगेल ते कदाचित पोरकटपणाचे ठरेल. पण तो जे तोंडाने बोलेल त्यापेक्षा त्याच्या मनाला खूप काही जास्त जाणवेल. विद्यालयात शिक्षकाची नोकरी करून केवळ परीक्षेच्या द्वारेच जे सर्व गोष्टींचा निर्णय करू पाहतात ते अशा आंतरिक गोष्टींची दखल घेऊ इच्छित नाहीत. पण लहानपणीची आठवण झाली की मला जाणवते. तेव्हा आम्हाला अनेक गोष्टी कळत नसत पण अंतरात चांगल्याच जाणवत.”
आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ रवींद्रनाथांनी बालपणातले एक फार सुंदर उदाहरण दिले आहे. ते म्हणतात. “लहानपणी मला वडिलांनी Old Curiosity Shop नावाचं सचित्र इंग्रजी पुस्तक आणून दिलं होतं. त्यावेळी मला इंग्रजीचा गंधच नव्हता पण त्यातली चित्रं बघून, अडखळत वाचण्याचा प्रयत्न करत मी अनेक चित्रांनी गुंफलेलं स्वतःचं पुस्तक तयार करू शकलो. एखाद्या पंतोजींनी त्या चित्रांना एखादे वेळेस मोठ्या शून्याचा दर्जा दिला असता पण मी मात्र स्वतःला १०० पैकी १०० मार्क्स घेतले होते.’
मुलांची ही नैसर्गिक कल्पनाशक्ती फुलवण्याचा आटोकाट प्रयत्न करणे हाच रवींद्रनाथांच्या शैक्षणिक विचारांचा गाभा आहे. नक्कल, घोकंपट्टी, गुलामगिरी यांचा रवींद्रनाथांना अतिशय तिरस्कार वाटे. त्यांची ‘पोपटाची गोष्ट’ ही शाळांशाळांतून घोकंपट्टी करणाऱ्या असंख्य ‘पोपटांविषयी’ आहे.
पोपटाच्या गोष्टीत राजाच्या पोपटाचा जीवनप्रवास रंगवला आहे. आनंदाने नाचणारा, उडणारा हा आपला पोपट शिकत नाही याचं राजाला फार दुःख होतं. शेवटी विचारविनिमय करून पोपट शिकावा म्हणून त्याच्यासाठी रत्नजडित सोन्याचा पिंजरा तयार केला गेला. त्यात पोपटाला कोंडण्यात आले. पेरू किंवा डाळिंब यांऐवजी पिंजऱ्यात रात्रंदिवस पोथ्या-पुराणांचे कागद कोंबले गेले. पोपटाचा आवाज हळूहळू मंदावत गेला. शेवटी एक दिवस पोपट मेला. राजाने त्याची ती ध्यानमग्न अवस्था पाहून शेवटी एकदाचा तो अभ्यासाला लागला म्हणून निःश्वास टाकला. आज शंभर वर्षांनंतरही आमच्या लाखो पोपटांना ही गोष्ट तितकीच लागू पडेल.
रवींद्रनाथांचे शिक्षणविषयक चिंतन इतके अफाट आहे की त्यातले नेमके काय उचलावे हे तसे कोडेच आहे. पण तरीही या विचारांना एका पंचसूत्रीत गोवण्याचा प्रयत्न करते.
१. जीवितध्येय आणि शिक्षणध्येय वेगळे असता कामा नये
रवींद्रनाथ म्हणायचे, शिक्षण म्हणजे सर्व प्रकारच्या बंधनांपासून मुक्ती आणि अंतिम सत्याचा आविष्कार. पण मुलांना वर्गाच्या चार भिंतींत कोंडून, माहितीची उतरंड रचून हे ध्येय साध्य होणार नाही. मुलांना सृष्टीची विविध रूपे दाखवत, भाषेचा रसास्वाद घेतच हे साध्य करायचे आहे.
जीवितध्येय आणि शिक्षणध्येय एक आहे हे प्रत्यक्षात उतरवणारे शिक्षणतज्ज्ञ म्हणून रवींद्रनाथांना याचे श्रेय देता येईल. त्यांनी भूगोल नेहमीच पाना-फुलांच्या, आकाशाच्या निरीक्षणाने मुलांना शिकवला. इतिहासाच्या तासाला पुस्तक हातात न धरता नाटुकली करून मुलांच्या अंतःकरणात तो रुजवला. श्रीनिकेतन इथे शेतीविषयक प्रयोगशाला चालवून शेतकऱ्यांच्या प्र नांना सामोरे जाणारे विद्यार्थी घडवले.
२. जीवनाला अंतर्बाह्य सुंदर करणे म्हणजे शिक्षण
रवींद्रनाथांच्या मते संस्कृतीच्या कल्पनेत सौंदर्याचा अंतर्भाव असतोच. आदि-मानवाने आपल्या गुहांतून प्राण्यांची चित्रे काढली. पोकळ बांबूतून कुंकर मारल्यावर ध्वनी निघतो म्हणून बासरी बनवली. रवींद्रनाथांनी निरनिराळ्या ऋतूंचे उत्सव वैयक्तिक राहू न देता त्याला सार्वजनिक रूप देऊन सौंदर्याचा सोहळा साजरा केला. वर्षामंगल, हलकर्षण, वृक्षारोपण या उत्सवांनी या महामानवाने नैसर्गिक घटनांचे स्वागत करण्याचा परिपाठ बंगालात पाडला.
३. शिक्षण ही मानवाला मिळालेली देणगी आहे
शिक्षणाचे क्षेत्र ही शासनाची मक्तेदारी बनू नये असे मत रवींद्रनाथ ठामपणाने मांडत. ते म्हणायचे, “शिक्षणाची आस्था असणाऱ्या माणसांनी छोट्या, छोट्या शाळा काढून त्या चालवल्या पाहिजेत. पूर्वी आपल्याकडे अशा प्रकारच्या शाळांतून शिक्षणाची परंपरा राखली जात होती. समाज शिक्षण ही आपली जबाबदारी समजत होता. हळूहळू त्याचे उत्तरदायित्व शासनावर गेले आणि सर्वच काही बिघडत गेले.’
रवींद्रनाथ त्या काळात अखंड भ्रमण करायचे. खेड्यापाड्यांतून त्यांचा मुक्काम असे. अशा वेळी कंदिलाच्या उजेडात कीर्तने, कथा-पुराणे यांमधून दिली जाणारी शिकवण त्यांनी पाहिली होती, अनुभवली होती. त्यांनी लिहिले आहे, “जिथे कधी वर्तमानपत्राची सळसळ ऐकू जाणार नाही तिथेसुद्धा शिक्षणाची ही गंगा अखंड वाहते आहे.”
४. हस्तव्यवसायांना खूप महत्त्व
शिक्षण जीवनाभिमुख असावे, शिक्षणाने माणसाला स्वावलंबी बनवावे यावर रवींद्रनाथांचा कटाक्ष होता. शाळेला आवश्यक जवळजवळ सगळ्या गोष्टी शाळेतच तयार होत. तरीही एक त्रुटी राहिली होती. शाळेतली मुले आपले अन्न स्वतः रांधत नसत. एकदा गांधीजी शांतिनिकेतनात मुक्कामाला आले असता त्यांनी हे गुरुदेवांच्या निदर्शनाला आणले.
झाले, दुसऱ्या दिवसापासून गांधीजींच्या मार्गदर्शनाखाली मुलांचे ‘स्वयंपाकाचे प्रयोग’ सुरू झाले. गांधीजींनी स्वच्छतेपासून स्वयंपाकापर्यंत सारे काही शास्त्रीय दृष्टि-कोनातून मुलांना शिकवले. स्वयंपाक करणे हे तसे वेळखाऊ काम. त्या काळात मुलांचा अभ्यास थोडा मागे पडला. पण या अभ्यासाचे महत्त्व जाणून तीन महिने हा प्रयोग चालू राहिला.
५. मुलांना मातृभाषेतून शिकवावे
रवींद्रनाथांच्या मते इंग्रजी भाषेचा आपल्या भाषेशी कोणत्याच बाबतीत मेळ बसत नाही. त्या भाषेतले भाव, विचार हेही आपल्या मुलांना तसे सर्वस्वी अपरिचित असतात. त्यामुळे त्या भाषेत वाचताना मुलांच्या मनापुढे कसलेच चित्र साकार होत नाही. ती बिचारी सुरुवातीपासून शेवटपर्यंत अंधारात चाचपडत राहतात.
मुले जर मातृभाषेतून शिकत राहतील तर निदान रामायण-महाभारत तरी वाचतील असे त्यांना वाटायचे. ती जर काहीच शिकत नसतील तर निदान ती खेळत-बागडत राहिली असती असे ते म्हणत. पण इंग्रजी शिकण्यापायी ना शिक्षण ना खेळ अशी त्यांची गत होते, याची हळहळ कविहृदयाच्या या शिक्षणतज्ज्ञाला जाळत राहिली.
शिक्षक कसा असावा यांचेही मोठे मार्मिक वर्णन गुरुदेवांनी केले आहे. तेही एका चतु:सूत्रीत बांधता येण्याजोगे आहे. रवींद्रनाथ सांगतात —-
१. शिक्षकाला मुलांविषयी जिव्हाळा वाटला पाहिजे. शिक्षकाचे पहिले ‘क्वालिफिकेशन’ म्हणजे त्याला मुले आवडली पाहिजेत.
२. शिक्षक हा अखंड विद्यार्थी असायला हवा. नित्यनूतन शिकण्याची तयारी असणाराच शिक्षक या पदवीला योग्य असतो.
३. ‘मुलात मूल’ होण्याची हौस शिक्षकाला असावी. त्याला प्रसंगी नाचता यायला हवे तर कधी सोंगाड्या बनण्याची त्याची तयारी असली पाहिजे.
४. शिक्षक अतिरिक्त शिस्तीचा भोक्ता तर असू नयेच, पण आपण तसे आहोत याचा त्याला अभिमान असणे तर अधिक धोक्याचे आहे.
रवींद्रनाथांनी शिक्षणपद्धतीचे वि लेषण करताना जे उद्गार काढले आहेत त्यांनीच या लेखाचा शेवट करावासा वाटतो. ते म्हणतात, “ज्या प्रकारचे जीवन आम्हाला जगायचे आहे त्याला योग्य ठरेल असे शिक्षण आम्हाला दिले जात नाही. ज्या समाजातच आम्हाला आमचा जन्म काढायचा आहे त्या समाजाचा कोणताही उच्च आदर्श आमच्या साहित्यात आढळून येत नाही. ज्यात आमचे आकाश, आमची धरणी, आमची निर्मल प्रभात आणि सुंदर संध्या यांचे कोणतेही संगीत ध्वनित होत नाही असे हे शिक्षण आहे. जे शिक्षण प्राप्त करून आम्हाला शेवटपर्यंत आयुष्य घालवायचे आहे ते शिक्षण आम्हाला फक्त कारकुनी करायला किंवा एखादा धंदा करायलाच लायक बनविणारे आहे. जीवनात जर यथार्थता साधायची असेल तर आमच्या ह्या शिक्षणाशी जीवनाचे सामंजस्य साधता आले पाहिजे.”
अंतर्नाद मे २००० मधून साभार.