“शिक्षण कशासाठी असते, त्यामागे कोणते हेतू असतात?’ असा प्रश्न जर मी आपल्याला विचारला, तर उत्तर देण्याआधी आपण प्रश्न विचाराल, “कोणते शिक्षण?’
लहान मूल बोलायला शिकते, शाळा-महाविद्यालयात विशिष्ट अभ्यासक्रम विद्यार्थी शिकतात, माणूस अनुभवातून शिकतो, मोटर चालवायला शिकतो, नवी भाषा शिकतो, कला महाविद्यालयात रंगमाध्यमाची काही कौशल्ये हस्तगत करतो, उत्तम कथा-कादंबऱ्यांच्या आकलनातून जीवनाचा अर्थ समजून घेऊ पाहतो, स्वतःला वा जवळच्या व्यक्तीला झालेल्या आजाराची माहिती पुस्तकांमधून जाणून तो, संगणकाकडून हवे ते काम करवून घ्यायला शिकतो, इ. इ. ही सर्व शिक्षणाचीच उदाहरणे आहेत, परंतु हेतूंचा विचार करता प्रत्येक ठिकाणी वेगळे उत्तर येऊ शकते. काही उदाहरणांत हेतूंचा विचार मनात नसतोच. तर काही ठिकाणी तो अतिशय स्पष्ट असतो.
शिक्षण या शब्दाचा अर्थ आपण अनेकदा “शिक्षण व्यवस्थेने दिलेले ते शिक्षण’ असा तो. यामध्ये शिकणाऱ्याहून शिक्षण देणारा महत्त्वाचा आहे. त्यामुळे हेतूंचा विचारही शिकणाऱ्यापेक्षा शिक्षण देणाऱ्यांच्या भूमिकेतून होतो. या अंकातील मांडणीतही व्यापक शिक्षण-विचाराचा आधार मानलेला असला तरी प्रामुख्याने “शिक्षणव्यवस्थेतून मिळणाऱ्या शिक्षणाचाच आढावा घेतलेला आहे. याचे कारण ते शिकणाऱ्याच्या हेतूंच्या अनुसार आखलेले नसून त्यात भरपूर गुंतागुंत आहे, हे आहे. शिक्षणधोरण ठरवणारे, अभ्यासक्रम निश्चित करणारे, शाळाचालक, स्वतः विषयशिक्षक आणि विद्यार्थ्यांचे पालक अशा सर्वांच्या मनात हे “हेतू’ असतात. प्रत्येकाचे वैयक्तिक दृष्टिकोण, हितसंबंध, राजकीय-सामाजिक जबाबदाऱ्या, अधिकार अशा सर्वांचा परिणाम त्याच्या हेतूंवर आणि पर्यायाने कार्यवाहीवर होतो.
औपचारिक शिक्षणव्यवस्थेच्या माध्यमैतून सर्वांना प्रमाणित अभ्यासक्रम शिकवला जातो. यामध्ये व्यक्तीचे स्वतंत्र अस्तित्व महत्त्वाचे नसून समाजाचा एक घटक यादृष्टीने त्याकडे पाहिले जाते. तरीही व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्व विकासाचाही विचार त्यामध्ये गृहीत आहे. म्हणजेच व्यक्ती आणि समाज यांच्यामधील परस्परपूरक व परस्परपोषक संबंध हे शिक्षणामागचे महत्त्वाचे, आधारभत उद्दिष्ट आहे. हा विचार जर मान्य केला तर “शिक्षण’ या गोष्टीच्या हेतूंचा, बऱ्यावाईट अवस्थेचा, परिस्थितीचा विचार समाजातल्या सर्व घटकांकडून सातत्याने होत राहणे आता जरूरीचे आणि सद्यपरिस्थितीत तर निकडीचेच वाटते. या अंकाच्या विषयाची निवड करण्यामागे आणि तो आवर्जून वाचण्यामागे आपल्या सर्वांच्या मनांत नेमके हेच आहे. शिक्षणाचा—किंवा शिक्षणामागचा हेतू हा काही नवाच विषय नाही. अनेकांनी या विषयावर तत्त्वचिंतन केलेले आहे. तरीही केवळ तत्त्वे मांडणे पुरेसे होणार नाही. आजच्या आपल्या शिक्षणवास्तवाकडे नजर टाकणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. ह्या दृष्टीने एकंदरीने शिक्षणातून काय साधायचे होते व प्रत्यक्षात काय साधले आहे हे पाहावे, तसेच काही विषय-शिक्षणामधून व आरोग्यशिक्षण, लैंगिकता शिक्षण यांसारख्या शाळेत शिकवल्या जाणाऱ्या किंवा न शिकवल्या जाणाऱ्या विषयांमधून काय पोचवायला हवे हेही मांडणे आवश्यक वाटले.
प्रार्थनेसारख्या सर्व शाळा-घरांतून संस्कार म्हणून शिकवल्या जाणाऱ्या शिक्षण-प्रकारांतून कळत नकळत काय मिळते, ते हवेसेच आहे की नाही या दुर्लक्षित मुद्द्याकडेही लक्ष वेधावेसे वाटले.
आजचा काळ हा माध्यमांच्या प्रभावाचा काळ आहे. ठरवून किंवा न ठरवताही आपल्या आसपास हे हवेसे वा नकोसे शिक्षण वावरते आहे. ह्याकडे दुर्लक्ष करणे परवडण्याजोगे नाही.
अंकाच्या पानांच्या मर्यादेत हे सगळे येताना मांडणीत विस्कळीतपणा येतो आहे. ह्याला अभ्यागत संपैदकाच्या वैयक्तिक क्षमतांच्या मर्यादाही कारणीभूत आहेत, हे मला मान्य आहे. तरीही या अंकाच्या वाचनातून शिक्षणामागच्या हेतूंकडे आपल्या विचारांचे सुकाणू वळवणे जर थोडेसे साधले असेल, तर मला तेवढे पुरेसे वाटते.
प्राथमिक शिक्षणाबद्दल आज शासनाच्या धोरणांनी मोठी विपरीत परिस्थिती आणलेली आहे. एका बाजूला सर्वांना शिक्षण ही घोषणा तर दुसऱ्या बाजूला वंचितांचे “तण’ शिक्षणव्यवस्थेच्या मार्गातून काढून टाकण्याची विविध प्रकारे तयारी, अशी ही नवीच क्लृप्ती आहे. पहिलीपासून इंग्रजी, तुटपुंज्या शिक्षणाचे गाजर समोर धरणाऱ्या आणि सर्वांना शिक्षण देण्याचे मृगजळ दाखवणाऱ्या वस्तीशाळा नवीन येऊ घातलेल्या इयत्ता चौथी ते सातवीच्या बोर्डपरीक्षा ही सर्व रूपे या विपरीत परिस्थितीचीच आहेत. अशा वेळी सुशिक्षित समाजाची त्यामध्ये दिशादर्शक भूमिका असावी लागेल, यासाठी आपले लक्ष त्याकडे वळवावे अशी कळकळीची विनंती.
अभ्यागत संपादकाची ही जबाबदारी माझ्यावर विश्वासाने टाकल्याबद्दल मासिकाच्या संपादक-मंडळाचे मी मनापासून आभार मानते.
प्रयास परिवार, अमता क्लैिनक, संभाजी पूल कोपरा, कर्वे रोड, पुणे – ४११ ००४