आजचा सुधारकचा यापुढील अंक हा ‘शिक्षणामागील हेतू’ या विषयावरील विशेष जोड अंक असेल. सुमारे ऐंशी पानांचा हा अंक जुलै-ऑगस्टचा अंक म्हणून प्रकाशित होईल.
या अंकासाठी अभ्यागत संपादक म्हणून संजीवनी कुलकर्णी आम्हाला लाभल्या आहेत. होमिओपॅथीचे शिक्षण घेतलेल्या संजीवनींचा त्रोटक परिचय असा —-
१९८७ मध्ये त्यांनी सतर्क व सजग पालकत्वासाठी ‘पालकनीती’ हे मासिक सुरू केले आणि आजवर त्याचे संपादन त्या करत आहेत.
एन. जी. नारळकर फाऊंडेशनने सुरू केलेल्या ‘अक्षरनंदन’ या शाळेच्या व्यवस्थापनात त्या सक्रिय असून गणित, नागरिकत्वाचे शिक्षण आणि एकूण शिक्षणपद्धतीत त्यांना विशेष रस आहे.
१९९९ मध्ये त्यांनी ‘शैक्षणिक संदर्भ’ हे विज्ञानशिक्षणाबाबतचे नियतकालिक सुरू केले आणि आजवर त्याचे संपादन त्या करत आहेत.
पालकनीती परिवार; आरोग्य, ऊर्जा, शिक्षण आणि पालकत्व यांच्याबाबत काम करणारी ‘प्रयास’ ही संस्था; ‘संदर्भ’; ‘प्रगत शिक्षण संस्था (फलटण)’, अशा संस्थांच्या संस्थापक विश्वस्त म्हणून त्या कार्यभार सांभाळतात.
१९९२ पासून एचआयव्ही/एड्स आणि लैंगिकता यांच्या संदर्भात संशोधन, भाषणे, कार्यशाळा, शैक्षणिक पारदर्शिका संच घडवणे, पुस्तिका व वृत्तपत्रीय लेख लिहिणे, अशा अनेक मार्गांनी त्या जनजागृती करत आहेत. याचाच भाग म्हणून एड्सग्रस्तांकडे पाहण्याची समाजाची दृष्टी कशी असावी (व नसावी) यावर त्या संशोधन करत आहेत.
महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ विदुपी दुर्गाबाई भागवत यांचे नुकतेच निधन झाले. त्या आजचा सुधारकच्या सुरुवातीपासूनच्या वर्गणीदार व हितचिंतक होत्या. आमच्या १.८ (नव्हेंबर १९९०) या अंकातील त्यांचे पत्र त्यांना आदरांजली म्हणून खाली देत आहोत.
आपला नवा सुधारक मला फार आवडतो. सप्टेंबरचा अंक उत्कृष्ट आहे. सॉक्रेटिसचा संवाद, विवेकवाद छान आहे. एवढेच नाही तर आपण अशिष्ट पत्राला दिलेले शिष्ट उत्तर फार महत्त्वाचे आहे. . . .