(उंबेर्तो इको ह्या इटालियन लेखकाच्या द नेम ऑफ द रोज ह्या पुस्तकातील हा उतारा. पुस्तक वरकरणी गुन्हा तपासाच्या कादंबरीसारखे आहे. चौदाव्या शतकात एक ‘धर्मगुरू व त्याचा एक शिष्य एका मठात पोचतात आणि तिथे घडणाऱ्या एका खुनांच्या मालिकेचे रहस्य उलगडतात. धर्मगुरू विल्यम हा रॉजर बेकनचा शिष्य, आणि बेकन हा काही लोकांच्या मते ‘पहिला’ वैज्ञानिक, आणि स्फोटक दारूचा संशोधक. युरोपच्या ‘अंधाऱ्या युगातली’ ही कथा.
युनिकॉर्न हा काल्पनिक प्राणी आहे. श्रद्धा (फेथ), आशा (होप) आणि औदार्य (चॅरिटी) ही ख्रिस्ती धर्मशास्त्रातली गुणांची त्रयी आहे.)
आड्सो : पण मग युनिकॉर्न खोटा आहे का? तो तर ख्रिस्ताचे आणि शुचितेचे प्रतीक असलेला उमदा प्राणी.
एखादी कुमारिका जर वनामध्ये विहरत असली तर म्हणे तिच्या सोज्वळ सुगंधाने ओढला जाऊन युनिकॉर्न तिच्या मांडीवर डोके ठेवतो. त्याला पकडायचे हेच तंत्र आहे. विल्यम : असे म्हणतात खरे. पण खूप जणांना युनिकॉर्न ही पाखंडी दंतकथा वाटते. म्हणजे तो प्राणी असेलही, पण एखादवेळी आपल्या ग्रंथांमधल्या चित्रांसारखा नसेल. एक व्हेनिसचा व्यापारी म्हणे आफ्रिकेत गेला असताना त्याला एकशिंगी प्राणी दिसला. पण तो ओबडधोबड आणि काळाढुस्स होता. बहुधा आपल्या ऋषिमुनींनी तेच जनावर पाहून वर्णन केले असेल. त्यांची वर्णने बिनचूक आणि यथातथ्य असायची. पण मध्ये अनेकांनी सांगोवांगीने, हस्ते-परहस्ते ऐकत, आपापल्या कल्पना घुसडत त्याला पांढराशुभ्र, नाजुक आणि देखणा बनवला. आड्सो! जर कधी युनिकॉर्न आला असे ऐकलेस तर कुमारिकेसोबत तिकडे पळू नकोस—तो व्हेनिशियन प्रवाशाचा प्राणीच निघायचा! आड्सो : पण ऋषिमुनींना देवाने युनिकॉर्नचा साक्षात्कार घडवला. विल्यम :
साक्षात्कार नाही—-प्रत्यक्ष दाखवला असणार, कधीतरी. आड्सो : मग आपण प्राचीन पोथ्या आणि ग्रंथांमधल्या ज्ञानामागे का लागतो? जर त्यांच्यातल्या अनेक गोष्टी ऐकणाऱ्या आणि लिहिणान्यांच्या चुकांमुळे आणि कल्पनाशक्तीतून असत्य झाल्या असतील, तर —- विल्यम :
पुस्तके वाचताना नुसत्या विश्वासावर जाऊ नये. त्यांना तपासावे. त्यांच्यात काय म्हटले आहे, त्याचा काय अर्थ असणार, हे पहावे. सगळ्या पवित्र ग्रंथांचे अभ्यासक हेच ठसवतात. आता युनिकॉर्नच्या वर्णनात एक नैतिक सत्य आहे, एक रूपकासारखे सत्य आहे, एक समांतर उदाहरणाचे सत्य आहे — – आणि ग्रंथांमधली ही सत्ये बदलत नाहीत. शुचिता हा एक सद्गुण आहे, हे बदलत नाही. पण ज्या शब्दशः वर्णनावर ही तीन्ही सत्ये आधारली आहेत त्या वर्णनाचा आधार जो मुळातला प्रत्यक्ष । पाहण्याचा अनुभव, तो आपण तपासायलाच हवा. अशा तपासाने इतर तिन्ही सत्यांना इजा होत नाही. एका पोथीत लिहिले होते की बोकडाचे रक्त लागल्याने हिरा भंगतो. नाही घडत, तसे. माझे गुरू रॉजर बेकन असे करून पाहायचे, वाचलेले. हिरा नाही फुटत, रक्ताने. पण काहीतरी उच्च संबंध सांगायचा प्रयत्न, की चांगल्या गोष्टी वाईटाने बिघडतात, तो टिकून राहतोच. आड्सो : म्हणजे ग्रंथ वाचताना श्रद्धेने नाही वाचायचे? श्रद्धा हा तर सद्गुण आहे ना? विल्यम : इतरही दोन सद्गुण आहेत ना, श्रद्धेबरोबर! काय काय करणे शक्य आहे ह्याबद्दलची आशा. आणि त्या शक्यतांवर श्रद्धा बाळगणाऱ्यांबद्दल औदार्य. (Umberto Eco, “The Name of The Rose”, Vintage १९८३)