माणूस जसा वागतो तसा तो का वागतो, ह्या प्र नाचे उत्तर शोधण्याच्या प्रयत्नातूनच मानवी वर्तन (आणि प्राणि-वर्तनसुद्धा) समजून घेण्याच्या शास्त्राचा, म्हणजेच मानसशास्त्राचा जन्म झाला आहे.
मानवी मन हे आजही माणसाला पडलेले कोडे आहे व ते सोडविण्याचे अनेक मार्ग व पद्धती मानसशास्त्रज्ञांनी शोधून काढलेल्या आहेत.
आजही मानसशास्त्र का निवडले असा प्र न जर विद्यार्थ्याला विचारला तर त्याचे स्वाभाविक उत्तर ‘समोरच्या व्यक्तीचे वर्तन/मन समजून घेता यावे’ म्हणून असे असते. आणखी विचार करून उत्तर द्या असे म्हटले तर चांगले जगता यावे म्हणून असे उत्तर मिळते. ‘चांगले जगणे’ म्हणजे काय, हे स्वतःला समजून घेता आले, इतरांना समजून घेता आले, एकमेकांशी व्यवहार करताना एकमेकांना समजून घेता आले तरच शक्य आहे असेही त्यांना मनापासून वाटते व ह्याचा मार्ग मानसशास्त्राच्या अभ्यासाने मिळेल असे त्यांचे उत्तर असते.
माणसाच्या मूलभूत प्रवृत्ती व त्यांतून निर्माण होणाऱ्या मूलभूत गरजा, त्या भागविताना होणारा संघर्षवाद/संवाद, व्यक्तिमत्त्वाची वेगवेगळ्या संस्कारांमुळे व वातावरणाने बनलेली जडणघडण, वातावरणातील विविध समस्यांना तोंड देण्यासाठी लागणारी प्रतिकार-शक्ती, ह्या सर्वांचा परिणाम मनःस्वाथ्यावर व पर्यायाने शरीरस्वास्थ्यावरही होतो.
मन व शरीर ह्यांचा एकमेकांवर पडणारा प्रभाव आधुनिक वैज्ञानिक संशोधनातून सर्वांपर्यंत आज पोहोचवलेला आहे. त्यातूनच Behavioural Medicine औषध-वर्तनोपचार हे शास्त्र जन्माला आले आहे.
औषधाने शारीरिक आजार बरे होतात परंतु मनाच्या आजाराचे काय? मनाच्याही आजारांवर आता औषधे मिळू लागली आहेत. परंतु ज्या ‘कारण-घटकांमुळे’ (causal factors) ते निर्माण होतात त्यांच्यासाठी मात्र औषधे नाहीत, त्याचे काय?
सदोष वातावरणामुळे, सदोष जीवनशैलीमुळे, सदोष दृष्टिकोनांमुळे मनःस्वास्थ्य जेव्हा बिघडते तेव्हा त्यासाठी मात्र औषधे नाहीत.
ह्या आणि अशा प्रकारच्या विचारमंथनातून, संशोधनातून जीवनाशी चांगले समायोजन करता यावे म्हणून किंवा लेखकाच्याच शब्दांत सभ्यता, समतोल, समाधान व संयम शिकविणाऱ्या काही पारंपारिक पद्धतीबरोबरच नवीन पद्धती, उपचारपद्धती मानसशास्त्रात आज उपलब्ध आहेत, त्यांतीलच एका आधुनिक उपचारपद्धतीवर आधारित प्रस्तुत पुस्तक ‘स्वभाव/विभाव’ लिहिले गेले आहे. लेखक आहेत डॉ. आनंद नाडकर्णी स्वतःच्या वैयक्तिक अनुभवापासून ते सर्वसामान्यांच्या वाट्याला येणाऱ्या अनुभवांचे वर्णन करणारी एकूण सत्तावीस प्रकरणे ह्यात आहेत.
ह्या विविध अनुभवांतून/घटनांमधून विवेकनिष्ठ विचारांची सूत्रे मांडण्याचा एक प्रयत्न लेखकाने केला आहे व तो प्रयत्न यशस्वी/प्रभावी ठरला आहे असे म्हणायला हरकत नाही. स्वभाव म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा भावनांचा स्वाभाविकपणे आविष्कार म्हणजेच विचार+भावना+वर्तन (विभाव) ह्यांतून प्रगट झालेला स्वभाव, असे डॉ. नाडकर्णी म्हणतात. आणि ह्या उपचारपद्धतीचे नाव आहे ‘विवेकनिष्ठ भावनिक वर्तनोपचार पद्धती’ (Rational Emotive Therapy-RET). ह्या पद्धतीमध्ये ‘माझे आत्ताचे विचार-भावना’ ह्यावर भर दिलेला असतो. ह्या ठिकाणी हे सांगणे जरुरीचे आहे की फ्रॉईडने मनोविश्लेषण-उपचारात ‘भूतकाळातील घटना व संघर्ष’ ह्याला महत्त्व दिले होते, तसे ह्यात नाही. विवेकनिष्ठ उपचाराचे जनक आहेत डॉ. अल्बर्ट एलिस. डॉ. एलिस ह्यांच्या मते ही उपचारपद्धती नसून विचारपद्धती आहे.
ह्या पद्धतीला ‘तर्कसंगत भावनिक उपचार पद्धती’ असेही म्हटले जाते; परंतु लेखकाच्या मते तर्कातील ‘भावनिक तटस्थता’ विवेकनिष्ठ विचारात नाही तर ह्यात सुखदुःखाचा प्रामाणिकपणे स्वीकार आहे. दोन्ही भावना माझ्या आहेत व त्यांना विधायक रीतीने हाताळण्याची, स्वीकारण्याची जबाबदारीही माझी आहे, असे विवेकनिष्ठ पद्धत मानते. विवेकनिष्ठ विचारपद्धतीची आधारभूत वैचारिक बैठक अशी आहे की मुळात कोणतीही घटना चांगली किंवा वाईट असत नाही. आपला त्या घटनेकडे बघण्याचा दृष्टिकोन ती घटना चांगली की वाईट हे ठरवीत असतो.
जीवनात घडणाऱ्या घटनांकडे बघण्याचा दृष्टिकोन (विचार करण्याची सवय) आपल्या वैयक्तिक अनुभवातून तयार होतो किंवा असेही म्हणता येईल की एखादी घटना घडल्यानंतर तिचा जो ‘भावनिक परिणाम’ होतो त्यावर आपला दृष्टिकोन ठरत असतो.
हा भावनिक परिणाम जेव्हा विपरीत (ऋणात्मक किंवा negative) असतो तेव्हा स्वाभाविकच व्यक्ति अस्वस्थ होते. ह्या ‘भावनिक-अस्वस्थतेचे ओझे’ जर दूर करायचे असेल तर त्या भावना सर्वप्रथम ‘माझ्या’ आहेत, त्या कोणीही माझ्यावर लादलेल्या नाहीत हे स्वीकारायला पाहिजे.
म्हणजेच आपल्या दुःखाची प्राथमिक व अंतिम जबाबदारीही आपलीच आहे. नकारात्मक भावना माझ्या आहेत ही प्राथमिक व त्या दूर करण्याची जबाबदारी माझीच ही अंतिम . . .
आपले भावनिक उद्दिष्ट काय, हेही स्पष्ट झाले पाहिजे . . . उदा. आनंदी, सुखी, समाधानी, राहायचे आहे की दुःखी, उदासीन, तक्रारखोर, ‘आपल्यावर सतत अन्याय होत आहे’ . . . असे दुःखी राहायचे आहे?
डॉ. नाडकर्णी म्हणतात विवेकनिष्ठ विचारांत भावनिक हिताला महत्त्व देणे, जपणे त्याचे संवर्धन करणे अभिप्रेत आहे. भावनिक हिताला जपणे म्हणजे स्वार्थी असणे नव्हे, हे पटणे कठिण जाते, परंतु आस्तित्ववादाची ती गरज आहे. ‘स्वहित जपावे, परहित जाणावे’ हा विवेकनिष्ठ विचारपद्धतीचा मूलभूत पाया आहे—-ऋणात्मक, नकारात्मक विपरीत भावनांचे रूपांतर धनात्मक, सकारात्मक करण्याचा मार्ग म्हणजेच विवेकनिष्ठ भावनिक वर्तनोपचार पद्धती होय.
स्वभावविभाव ह्या पुस्तकात अनेक प्रकरणे आहेत. प्रत्येक प्रकरण एका दैनंदिन जीवनातील अशा छोट्या वाटणाऱ्या समस्येतून सुरू होते, जिचे आस्तित्व एका क्षणात येणाऱ्या विचाराच्या मळभाचे आहे—-परंतु जिची व्याप्ती मात्र संपूर्ण जीवनाला अंधारून टाकण्याएवढी आहे.
थोडक्यात काय तर स्वतःच्याच दुःखाचे, अडचणींचे, वैफल्याचे अपयशाचे गाणे सतत गाऊन प्र न सुटत नाही कारण त्यात गाण्याची चाल लोकांनी लावलेली असते किंवा त्याची चाल आपण त्यांना लावायला देतो. स्वतःचे दुःख दूर करण्याची जबाबदारी टाळतो.
दुःखाची प्राथमिक व अंतिम जबाबदारी स्वीकारल्यानंतर, ज्या गोष्टींवर आपले नियंत्रण आहे त्यांचा वापर केल्यास भावनिक अस्वस्थता कमी होते, देवत्वाचा ध्यास सोडल्यास त्रागा कमी होतो, आपले भावनिक उद्दिष्ट काय हे समजल्यास आपल्या भावनांना आपण योग्य त-हेने हाताळू शकतो, असे लेखक स्वानुभवावरून सांगतात.
आजचे युग हे संगणक-युग आहे. ह्या संगणक-युगात घटना घडण्याच्या प्रक्रियेला, प्रक्रियेच्या वि लेषणाला महत्त्व आहे. माहिती प्रक्रिया वि लेषण हे संगणकाचे आधारतत्त्व आहे. त्यातूनच ‘बोधात्म’ जाणीव (cognition) ही भाषा आली व वर्तनाचे स्पष्टीकरण देण्यासाठी बोधात्म–सिद्धान्तांचा Cognitive Theories, उपचारपद्धतीमध्ये समावेश आला.
स्वतःच्या वर्तनाचे मूळ कारण आपण स्वतःच शोधून काढायचे म्हणजे वर्तन-समस्येचा गुंता सुटतो हे सांगणारी, जाणवून देणारी विवेकनिष्ठ-भावनिक-उपचारपद्धती किंवा लेखकाच्या भाषेत विचारपद्धती सांगते. ह्या ठिकाणी सल्ला देणारा व सल्लार्थी ह्या दोन्ही भूमिका RET च्या आधारांवर स्वतः व्यक्तीच करू शकते ही एक महत्त्वाची उपलब्धी ह्या आधुनिक उपचारपद्धतीमुळे आज आपल्याला मिळाली ह्यात शंकाच नाही.
मेहेर, गोकुळपेठ, नागपूर — ४४० ०१०