प्रस्थापित व्यवस्थेचा इतका जबरदस्त पगडा समाजातील सर्वांवर—सामान्य जनांवर आणि त्यांच्या नेत्यांवर— असतो की ही सर्व मंडळी प्रस्थापित रीती व मूल्यांप्रमाणे वागत असताना, त्यातील दोष व चुका त्यांना दिसत असूनही, तो रुळलेला मार्ग सोडायला तयार होत नाहीत. प्रस्थापित व्यवस्थेमध्ये माणसे इतकी गुंतून राहण्याचे दुसरे महत्त्वाचे कारण असे की त्या व्यवस्थेने मान्य केलेल्या सुख-कल्पना, त्या कल्पनांतील सुखप्राप्तीची साधने/मार्ग आणि एकंदर जनरीती/जगरहाटी यांच्याशी सर्व माणसे एकरूप झालेली असतात. दुर्योधन भरसभेमध्ये द्रौपदीचा विनयभंग, तिची विटंबना करीत असता सारे पांडव आणि भीष्म-द्रोणादी त्याविरुद्ध आवाज उठवीत नाहीत याचे कारण त्यांनी— सर्वांनीच स्वीकारलेली प्रस्थापिताशी बांधिलकी, गुलामी! अमेरिका आणि युरोपातील संपन्न आणि समर्थ राष्ट्रे गरीब, अप्रगत आणि दुर्बल राष्ट्रांचे शोषण करीत असूनही, त्यांच्यावर घोर अन्याय करीत असूनही, त्या बड्या राष्ट्रांच्या विरोधात छोटी राष्ट्र बंड कस्न उठत नाहीत याचे कारणही सर्वांवरील प्रस्थापित व्यवस्थेची मगरमिठी हेच आहे.
सगळे प्रस्थापिताच्या चौकटीतीलच धर्मनिरपेक्ष इहवादी तत्त्वज्ञान आणि धर्माधिष्ठित इहवादी तत्त्वज्ञान, भांडवल-शाही आणि साम्यवाद, परंपरावाद/पोथीवाद आणि बुद्धिप्रामाण्यवाद, लोकशाही आणि हुकूमशाही, इस्लामी मूलतत्त्ववाद किंवा मूलतत्त्ववाद इत्यादी सर्व विचारसरणी प्रस्थापित व्यवस्थेच्या चौकटीतीलच असून त्या चौकटीतच अधिक वरचे किंवा मानाचे स्थान किंवा अधिकारपद मिळविण्यासाठी त्यांची परस्परांत जीवघेणी स्पर्धा चाललेली दिसते. या स्पर्धेमध्ये जय मिळविण्यासाठी, त्या त्या वेळच्या तात्कालिक लाभासाठी विविध पक्ष-पंथांचे नेते प्रसंगानुरूप तत्त्वशून्य तडजोडी करीत असतात. भूमिका घेत असतात. सत्ता हेच महत्त्वाचे उद्दिष्ट मानणाऱ्या प्रस्थापित व्यवस्थेमध्ये अशा तडजोडी करणे, भूमिका बदलणे, या चालींना मान्यता असल्यामुळे त्या व्यवहारात कुणालाच काही गैर वाटत नाही! प्रस्थापित व्यवस्थेमध्ये भौतिक वैभव आणि मोठ्या सामाजिक पदाची प्राप्ती हेच सर्व व्यक्तींचे आणि समूहांचे उद्दिष्ट असते. या दोन्ही गोष्टींची वासना अमर्याद आणि उपलब्धी मर्यादित अशी अवस्था असल्यामुळे या व्यवस्थेमध्ये व्यक्ती आणि समूह यांच्यातील संघर्ष अपरिहार्य असतो. प्रस्थापित व्यवस्थेमधील विषम ऐहिक लाभांच्या स्ढ पद्धतीमुळे शोषण, अन्याय, जुलूम ही अनिष्टेही त्या व्यवस्थेत अटळ असतात. स्वाभाविक आकांक्षा जगण्याची अभिलाषा ही स्वाभाविक मानली तर भौतिक संपन्नतेची आणि सत्तेची/श्रेष्ठ पदाची आकांक्षा या देखील काही प्रमाणात स्वाभाविकच मानाव्या लागतील. या आकांक्षांच्या उचित मर्यादा लक्षात घेऊन स्वाभाविक प्रवृत्तीच्या वर उठणे हे मानवाच्या उन्नतीचे लक्षण मानले पाहिजे. मानवाच्या उन्नतीसाठी आणि माणसाच्या खऱ्या सुखासाठी अमर्याद भौतिक संपन्नता आणि बेबंद सत्ता यांची प्राप्ती या सदोष उद्दिष्टांचा आणि विषम ऐहिक लाभांच्या पद्धतीचा त्याग करण्याची गरज आहे. प्रस्थापित व्यवस्थेतील ही मान्यताप्राप्त पण सदोष उद्दिष्टे आणि विषम ऐहिक लाभांची समाजात खोलवर रुजलेली पण चुकीची पद्धती यांचा त्याग करण्याची तयारी हे व्यक्ती आणि समाज यांच्या दृष्टीने उच्चस्तरीय मानवतेकडे जाण्याचे महत्त्वाचे पाऊल मानावे लागेल. सचोटीने आणि निकोप मनाने असे पाऊल टाकणाऱ्या व्यक्ती आणि समूहांमध्ये स्पर्धेचे, परस्पर संघर्षाचे कारण असणार नाही. त्यांच्यामधील व्यवहारांत शोषण, विषमता, जुलूम यांचे अस्तित्व राहणार नाही. जगण्याप्रमाणे जगविण्याची अभिलाषाही स्वाभाविकच!
जगण्याची इच्छा ही जशी माणसाची स्वाभाविक प्रेरणा आहे तशीच इतरांना जगविण्याची प्रेरणा—-त्यासाठी आवश्यक त्या प्रेम, त्याग, करुणा या प्रेरणाही स्वाभाविक आहेत तसे मानायला जागा आहे. आजची मानवजात प्रस्थापित व्यवस्थेअंतर्गत संघर्षा-मध्ये गुंतून पडलेली दिसते. परिणामतः भिन्न मानवी व्यक्ती आणि समूह यांच्यामध्ये द्वेष, वैर, हिंसा, शोषण, विषमता, अन्याय, जुलूम यांच्यावर आधारलेले हितसंबंध सर्वत्र आढळतात. या व्यवस्थांतर्गत संघर्षाच्या पलिकडे म्हणजेच उन्नत मानवते- कडे जाण्याचे ज्या वेळी काही व्यक्ती आणि समूह निर्धाराने ठरवतील त्यावेळी एक वेगळा संघर्ष उभा राहील. व्यवस्था मानणाऱ्यांमधील आणि ही व्यवस्था त्यागून त्या व्यवस्थेच्या वर उठू मागणाऱ्यांमधील असा हा संघर्ष असेल. या संघर्षाला आपण व्यवस्थाबाह्य संघर्ष असे म्हणू. आज व्यवस्थांतर्गत संघर्षामध्ये गुंतलेल्या व्यक्ती आणि समूह यांच्यामध्ये हुकूमशाहीवादी, भांडवलशाहीवादी, मूलतत्त्ववादी हे व्यवस्थेचे कट्टर समर्थक म्हणता येतील. या उलट लोकशाहीवादी, समाजवादी, साम्यवादी, मानवतावादी, धर्मनिरपेक्षतावादी हे असहायतेने, प्रवाह-पतिततेने, नेमके काय करावे हे लक्षात न आल्याने या व्यवस्थांतर्गत संघर्षात गुंतून पडलेले दिसतात. त्यांना प्रस्थापित व्यवस्थेतील दोषांचे कमीअधिक प्रमाणात भान आहे. ते दोष दूर व्हावेत
अशी त्यांची इच्छाही दिसते. म्हणून व्यवस्थाबाह्य संघर्षाला ज्यावेळी सुरवात होईल त्यावेळी या दुसऱ्या गटातील शक्ती —व्यक्ती आणि समूह—-उन्नत मानवतेच्या दिशेने झेप घेऊ मागणाऱ्यांना साथ देतील असा बराच संभव आहे. मला तसा विश्वास वाटतो. त्यासाठी व्यवस्थाबाह्य संघर्षाला निर्धाराने आणि ठोसपणे सुरवात करून वरील अनुकूल ठरणाऱ्या गटांना सहकार्यासाठी आवाहन करण्याची गरज आहे. पुढील चळवळीची दिशा ज्या व्यक्ती आणि समूहांना उन्नत मानवतेकडे झेप घेण्याचे हे आवाहन पटेल आणि पचेल अशा सर्वांनी एकत्र येऊन उन्नत मानवतावादाच्या खालील तत्त्वांच्या/विचारांच्या आधारे कामाला लागण्याची नितांत आवश्यकता आहे.
(१) जगण्याच्या इच्छेपेक्षा जगविण्याची इच्छा अधिक श्रेष्ठ आणि मानवो-चित आहे.
(२) प्रेम, करुणा, त्याग, न्याय, समता यांच्या आधारे समाजहित साधणे हे स्वार्थाधारे स्वहित साधण्यापेक्षा अधिक श्रेष्ठ आणि मानवोचित आहे.
(३) प्रत्येक व्यक्तीने जीवनोपयोगी आणि समाजोपयोगी असे उत्पादक श्रम पुरेशा प्रमाणात आणि मनापासून केले पाहिजेत. त्या श्रमांचा/कामाचा ‘माफक’ मोबदला स्वीकारण्याची तयारी ठेवली पाहिजे. अशा कामांत श्रेष्ठ आनंदाचा अनुभव येईल.
(४) जीवनाच्या सर्व अंगोपांगांतून विषम ऐहिक लाभांच्या पद्धतीचा कटाक्षाने त्याग केला पाहिजे.
(५) ऐहिक जीवनातील सर्व प्र न संयम, नैतिकता आणि विवेक यांच्या आधारेच सोडविण्याचा वसा घेतला पाहिजे.
(६) सर्व सामाजिक व्यवहारांमध्ये कष्टाळूपणा आणि सचोटी यांना महत्त्व दिले पाहिजे.
(७) मी आणि तो हे जीवनातील स्वाभाविक वास्तव टाळता येणे शक्य नसले तरी ‘मी चांगला—तो वाईट’, ‘मी श्रेष्ठ—तो नीच/कनिष्ठ’, ‘मी सुष्ट—तो दुष्ट’ हे स्वाभाविक नसलेले विचार नाकारण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
(८) सामाजिक विषमता अव्हेरली पाहिजे. असमानता ही सृष्टीतील स्वाभाविक वास्तवता आहे. पण विषमता मानवनिर्मित आहे. निकोप मनाला खुपणारी असमानता म्हणजे विषमता. हत्ती आणि मुंगी यांच्या आकारा-मध्ये, सामर्थ्यामध्ये असमानता आहे हे उघड आहे. पण आपण या असमानतेला विषमता म्हणत नाही. विषमता या शब्दाच्या अर्थामध्ये एक प्रकारची अनुचिततेची, अनैतिकतेची छटा असते. अनुचितता—-अनैतिकता, नैतिक—-अनैतिक, उचित-अनुचित या कल्पना ही मानवी मनाची खासियत आहे. त्याचप्रमाणे चांगला—वाईट, सुष्ट–दुष्ट, उच्च–नीच, आवडता–नावडता इत्यादी कल्पनाही मानवी मनाचीच निर्मिती होत. भावनोद्रेकी बाबी जात, धर्म, वंश, भाषा या बाबी मानवी जीवनामध्ये अधिक भावनोद्रेक घडवून आणू शकतील अशा आहेत. समाजजीवनात जेव्हा या बाबींमुळे संघर्ष उद्भवतात तेव्हा हिंसक उद्रेक होण्याचा मोठा धोका असतो. सामाजिक दुरवस्थेची मूळ कारणे आज पृथ्वीतलावर असणाऱ्या सर्व मानवी जीवांच्या रास्त गरजा भागून त्या सर्वांना सुखासमाधानाने राहता येईल इतक्या प्रमाणात विज्ञान-तंत्रज्ञानाची प्रगती आणि आर्थिक विकास झालेला असूनही अब्जावधी माणसे उपासमार, कुपोषण, रोगराई, निरक्षरता, अज्ञान यांनी ग्रस्त आहेत. दारिद्र्य आणि बेरोजगारी हे त्यांच्यापुढील भीषण प्र न आहेत. सुखाविषयीच्या विकृत कल्पना; कमालीची स्वयंकेंद्री वृत्ती–स्वार्थ; पैसा, पद (आणि काही प्रमाणांत तंत्रज्ञान) यांना देण्यात येणारे अवाजवी महत्त्व; किमान कष्टाने कमाल फळ पदरात पाडून घेणे म्हणजे शहाणपण अशी विकृत कल्पना; सृष्टीतील संतुलनाबद्दलची कमालीची उपेक्षावृत्ती आणि समाजात दृढपणे रुजलेली विषम ऐहिक लाभांची पद्धती अशा भयानक दोषांना गुण मानणारी विकृत प्रस्थापित व्यवस्था समाजात प्रतिष्ठेने नांदत आहे. या विकृत व्यवस्थेला, त्या व्यवस्थेच्या मुळाशी असलेल्या वरील भयानक दोषांसह, व्यापक लोकमान्यता लाभलेली आहे. या भयानक सामाजिक दुरवस्थेचे चटके ज्यांना बसतात ती अब्जावधी माणसे आणि ज्यांच्यामुळे ही विकृत प्रस्थापित व्यवस्था चालते, टिकते आणि दिवसेंदिवस मजबूत होते ती शोषक, अन्यायी, जुलमी माणसे यांच्यापैकी कोणीच या दुरवस्थेच्या मुळाशी घाव घालण्याचा प्रयत्न प्रभावीपणे करीत नाहीत. शोषक, जुलमी मंडळी असा प्रयत्न करणार नाहीत हे सरळच आहे. पण शोषित मंडळी आणि त्यांचे नेतेही असा प्रयत्न करीत नाहीत ही खरी शोकांतिका आहे. प्रस्थापित व्यवस्थेचा जनसामान्यांसह सगळ्यांवरच असलेला जबरदस्त पगडा हे या शोकांतिकेचे कारण लेखाच्या सुरवातीलाच नमूद केलेले आहे. या प्रस्थापित व्यवस्थेच्या मुळावर प्रहार व्हायला हवा तोच होताना दिसत नाही. याचाच अर्थ असा की परिवर्तनासाठी आज सुरू असलेले प्रयत्न अपुरे आहेत एवढेच केवळ नाही तर त्या प्रयत्नांची दिशाही चुकलेली आहे. म्हणून सध्याच्या प्रयत्नांची दिशा बदलली पाहिजे. प्रस्थापित दुरवस्थेच्या मूळ कारणांवर थेट आणि जोरदार हल्ला करून, उन्नत मानवतेकडे झेप घेण्याचे उद्दिष्ट ठरवून व्यक्ती आणि समाज यांची जीवनाच्या सर्वच अंगोपांगांमध्ये—राजकारण, अर्थकारण, शिक्षण, शासन, साहित्य, संस्कृती, कला, क्रीडा, कुटुंबजीवन, धर्म/अध्यात्म, प्रसार व प्रचार माध्यमे इत्यादी सर्व अंगोपांगांमध्ये या नव्या चळवळीचे झेंडे रोवले पाहिजेत.
१६६८-३, रामलिंग खिंड, बेळगांव – ५९० ००२