संपादकीय

खेल खेल में दोन ‘गणिती’ कहाण्या सांगतो.
गणिताचे एक प्राध्यापक फळ्यावर एका सूत्रापासून दुसरे एक सूत्र सिद्ध करत होते. एका टप्प्यावर ते म्हणाले, “यावरून हे उघड आहे की . . .”, आणि त्यांनाच त्या टप्प्याच्या उघडपणाबद्दल (obviousness) शंका आली. फळा सोडून, टेबलखुर्ची गाठून त्यांनी वीसेक मिनिटे कागदावर काही गणित केले. शेवटी आनंदून उठत ते म्हणाले, “हो! ते उघड आहे!”
दुसरी कहाणी आहे, श्रीनिवास रामानुजन् इंग्लंडात होता तेव्हाची. रामा-नुजनचा गुरु जी. एच. हार्डी याने त्याला काही व्याख्याने ऐकायला पाठवले. व्याख्याता काही नवे निष्कर्ष ‘जाहीर’ करत होता. मध्येच त्याची नजर रामानुजनकडे वळली. रामानुजनच्या चेहेऱ्यावर एक मंद स्मित होते. “समजतेय ना, मी काय करतो आहे ते?’, व्याख्यात्याने विचारले. होकारार्थी मान हलवत रामानुजन् फळ्यावर गेला, आणि व्याख्यात्याचा युक्तिवाद पुढे कुठे जाईल ते दाखवले —- व्याख्याता पोचला होता त्याच्या अनेक पायऱ्या पुढेपर्यंत रामानुजन् गेला.
तर्कशास्त्र, गणित, विज्ञान, या क्षेत्रात वारंवार भेटणारे हे प्रकार. एकाला ‘उघड’ वाटते ते दुसऱ्याला कष्टसाध्य किंवा अगम्य. अमुक एका सूत्रापासून युक्तिवाद आवश्यक आणि पुरेशा तर्कशुद्धपणे दुसऱ्या सूत्रापर्यंत कसा जातो, हे समजण्याच्या लोकांच्या क्षमता खूपच वेगवेगळ्या असतात. अशा क्षमता काही प्रमाणात तरी वाढवता येतात, पण त्यासाठी तर्कशास्त्राशी कधीमधी ‘खेळणे’ आवश्यक असते पण पुरेसे नसते! (neccesary, but not sufficient!).
‘खेळातून विचार’ किंवा विचार करणे म्हणजेच खेळणे, हा एक बुद्धीला व्यायाम देण्याचा प्रकार आहे —- ‘थॉट अॅज प्ले’ नावाने ओळखला जाणारा. तो तर्कशास्त्र, गणित अशा क्षेत्रांत वापरणे भारतात तरी फार सवयीचे नाही. मागे एकदा ‘डिस्कव्हर’ मासिकाने वजने लटकवलेल्या दांडीचा समतोल, याबद्दलचे नियम बदलून वाचकांना असे खेळ खेळायला लावले. अशा दांड्यांच्या तोलनबिंदूच्या (fulcrum) दोन बाजूच्या वजनांच्या आणि त्या वजनांच्या तोलनबिंदू-पासून अंतराच्या गुणाकारांची बेरीज दोन्हीकडे सारखी असते, हा आपला अनुभव. यांत्रिकीतली अगदी प्राथमिक स्वरूपाची ही नियमितता. अनेकवार सिद्ध झालेली, तराजू या प्राचीन यंत्रात वापरलेली ही बाब. मग ‘डिस्कव्हर’ या प्रतिष्ठित मासिकाने त्या नियमात बदल करण्याचा खेळ का खेळावा?
हा ‘वजन गुणिले अंतर, दोन्हीकडे सारखे’, हा नियम आपल्याला जगायला मदत करतो. आपले खूपसे व्यवहार या तरफेच्या तत्त्वाप्रमाणे केले जातात—-उदा-हरणार्थ, भाजी तोलून घेणे, वजने हलवणे, वगैरे. अशा नियमांचा, तत्त्वांचा, सूत्रांचा ‘खरेपणा’ आपण मानून चालतो. हे ‘मानणे’ आपल्याला जगायला मदत करते. अशा नियमांची उतरंड आपल्याला विज्ञान-तंत्रज्ञान पुरवते. चुकीचे नियम, अपुरे नियम वापरणारे फशी पडतात.
‘मावळलेला’ सूर्य पहाट झाल्याशिवाय पुन्हा ‘उगवत’ नाही, हा एक असा अपुरा नियम. जेव्हा संध्याकाळी ग्रहण लागते, तेव्हा काही क्षणांसाठी झाकोळलेला सूर्य पुन्हा दिसू शकतो. जयद्रथ हे विसरला, आणि अर्जुनाच्या हातून मारला गेला. इंग्लंडच्या एका कॅन्यूट नावाच्या राजाला समुद्र ही व्यक्ती वाटली. व्यक्तींशी वैर असले तर त्यांना मारता येते. कॅन्यूटच्या सैन्याने भाले-बाण-तलवारींनी समुद्राची यथेच्छ ‘पिटाई’ केली —- परिणाम काहीच झाला नाही. असले चुकीचे, अपुरे नियम वापरणे जगण्याला मारक ठरू शकते.
आपण जगायला वापरत असलेले नियम बरोबर आहेत, ‘पूर्ण’ आहेत, याची खातरजमा करून घेणे, म्हणजे विवेकाने वागणे. तर्कशास्त्र वापरणे, विज्ञान घडवणे, त्याला गणिताची साथ देणे, हे सारे चिकित्सक आणि विवेकी व्यवहार. मग विज्ञानाला वाहिलेल्या ‘डिस्कव्हर’ मासिकाने विवेकाशी खेळ का खेळावा?
हा एक व्यायाम आहे. आपण नेमके कुठे आणि कसे नियम तोडतो आहोत, कोणते नियम तोडतो आहोत, कोणते नियम अबाधित राखतो आहोत, या साऱ्याची जाणीव करून देण्यासाठी हे खेळ खेळले जातात. हे खुंटा हलवून घट्ट करणे आहे. हे विवेकविरोधी तर नाहीच, उलट विवेकाची मूलभूत पातळी दाखवणारे आहे. ‘डिस्कव्हर’ ने वजन गुणिले अंतराचे नियम बदलले, पण समतोलाचा नियम कायम ठेवला. अशा मर्यादित, जाहीर ‘अविवेका’तून विवेकावरची पकड जास्त घट्ट होते, असे वाटून ‘डिस्कव्हर’ ने प्रयोग केला.
असे प्रयोग इतरही लोक करत असतात. बुद्धिबळ, गो, ब्रिज, ऑथेलो, माइन्स्वीपर, मास्टर–माइंड, हे खेळ तुम्हाला कृत्रिम आणि काल्पनिक विश्वे घडवून तर्कशास्त्र शिकवत असतात. तुमची विवेकाच्या क्षमतेला तिला व्यायाम देऊन ‘तेज’ करणारे हे खेळ. नेहेमीच या खेळांमुळे दैनंदिन आयुष्यात तुम्ही विवेकी होत नाही, पण बऱ्याच प्रमाणात तुमचे निगामी (deductive) तर्कशास्त्र या खेळांमुळे ‘पक्के’ होते.
सध्याचे उपलब्ध तंत्रज्ञान, त्यावर आधारित समाजव्यवस्था, सामाजिक संस्था, हे सारेही बदलून त्याच्याशी कल्पनेने खेळता येते. तंत्रज्ञानातले बदल कल्पनेने उभारले की विज्ञानकथा आणि विज्ञान-काल्पनिका बनतात. विज्ञान (कथा) साहित्याला पूर्वी इंग्रजीत ‘सायन्स फिक्शन’ म्हणत —- आजही म्हणतात. पण आज अशा साहित्याचे काही समीक्षक ‘स्पेक्युलेटिव्ह फिक्शन’ किंवा अनुमाने लढवणारे ललित साहित्य, असे वर्णन करतात —- लघुस्प SF हेच ठेवून.
सामाजिक बाबतीतही सध्यापेक्षा वेगळे जग कल्पनेने उभे करता येते. जसे—कामव्यवहारांबद्दल खुलेपणाने बोलणारा, पण अन्नव्यवहाराबद्दल जाहीररीत्या बोलणे घृणास्पद मानणारा समाज असू शकतो का? आपल्या अनुभवात खाणेपिणे जाहीर आणि कामव्यवहार खाजगी मानला जातो. हे नियम डोक्यावर उभे कस्न कुसुमाग्रजांनी ‘कल्पनेच्या तीरावर’ ही कादंबरी रचली. हा खेळ पा चात्त्य साहित्यात शंभरावर वेळा खेळला गेला आहे. ‘नाइन्टीन एटीफोर’, ‘ब्रेव्ह न्यू वर्ल्ड’, ‘एअरव्हॉन’ ही प्रसिद्ध उदाहरणे आहेत, या कल्पनाविलासाची. असल्या कादंबऱ्यांना नावही आहे, ‘यूटोपियन’ कादंबऱ्या हे.
विज्ञानकथा, युटोपियन कादंबऱ्या, यांच्यासारखाच खेळ ल्युइस कॅरलने दोन प्रसिद्ध कादंबऱ्यांमध्ये खेळून दाखवला. ‘ॲलिस इन वंडरलँड’ आणि ‘श्रू द लुकिंग ग्लास’ ही त्याची पुस्तके आधी बालसाहित्यात धरली गेली. नंतर मात्र प्रौढ लोक, त्यातही गणितात आणि तर्कशास्त्रात रस असलेले लोक या कादंबऱ्यांच्या प्रेमात पडायला लागले. ल्युइस कॅरल (खरे नाव चार्ल्स लुट्विज डॉज्सन) हा पेशाने धर्मगुरू आणि वृत्तीने तर्कशास्त्री होता. त्याची अॅलिस-पुस्तके आवडून (म्हणे) महाराणी व्हिक्टोरियाने त्याची सर्व पुस्तके मागवली —- आणि त्यात अनेक गणिती कोड्यांचे संच पाहून राणी कष्टी झाली!
बोलणारे प्राणी, झाडे, पत्ते, बुद्धिबळातल्या सोंगट्या अशी पात्रे. अमुक खाऊन लहान होणे, तमुक पिऊन मोठे होणे, अशा ‘अविवेकी’ गंमती. प्रसिद्ध बालगीतांची विडंबने. कोट्या आणि लेष. आणि या साऱ्यांमध्ये भरपूर तार्किक विनोद. हसणारी मांजर क्रमाक्रमाने नाहीशी होते, आणि या क्रमात एका टप्प्यावर फक्त हास्यच उरते, मांजर नाही! बुद्धिबळातला राजा एका झाडाखाली झोपलेला असतो. राणी म्हणते, “त्याला उठवूया नको —- आपण सारे म्हणे त्याच्या स्वप्नातच खरे आहोत.” अशी ही कॅरलची ‘अॅलिस’ पुस्तके प्रौढांना ‘सापडली’. मग त्यांची मोहकता कशात आहे याची चर्चा व्हायला लागली. १८३२ साली प्रकाशित ॲलिस-वर १९६० साली मार्टिन गाईनर या गणिती तत्त्वज्ञाने ‘द अॅनोटेटेड ॲलिस’ हे सटीप पुस्तक लिहिले. पुस्तकांमधल्या तार्किक गंमती स्पष्ट केल्या. अगदी परमाणू पातळीपर्यंतच्या (आणि कॅरलच्या काळात अज्ञात असलेल्या) रचनांना समांतर गोष्टी गार्डनरला सापडल्या.
नुकतेच मरण पावलेले भा. रा. भागवत यांनी अॅलिसला मराठीत आणायचा प्रयत्न केला (‘जाईची नवलकहाणी’ आणि ‘आरसेनगरीत जाई’). पण खूपशी तार्किक गंमत भागवतांसारख्या सक्षम लेखकालाही ‘पकडता’ आली नाही. पण जो भाग भागवतांच्या हातून निसटला तो मराठी बाल–प्रौढांना स्चला असता की नाही, हाही प्र नच आहे. आपण मराठी लोक ‘तितके’ खेळकर नाही, बहुधा!
सध्या जे. के. राऊलिंग या लेखिकेची ‘हॅरी पॉटर’ या काल्पनिक नायकावर बेतलेली पुस्तके कॅरलपेक्षा दुबळेपणाने, बाळबोधपणाने कॅरलचीच वाट चालत आहेत.
हरी हा जादूगार आईबापांचा मुलगा. तो अगदी तान्हा असतानाच व्हॉल्डेमॉर्ट या दुष्ट जादूगाराशी लढताना आईबाप आणि व्हॉल्डेमॉर्ट मरतात. हॅरीही मरायचाच, पण आईच्या (प्रेमळ!) कौशल्याने कपाळावर एक जखम होऊन हॅरी वाचतो. जादूगार नसलेल्या आणि जादूचा तिटकारा असलेल्या नातलगांकडे बालपण काढल्यावर हॅरीला हॉगवॉर्ट्स या जादूगारांच्या ‘पब्लिक स्कूल’मध्ये प्रवेश मिळतो. आजवरची चार पुस्तके शाळेतल्या एकेका वर्षाची कथा सांगतात.
जादूगारांच्या विश्वाचे एक काटेकोर तर्कशास्त्र आहे. शाळेतले विषय साध्या शाळातल्या विषयांना समांतर आहेत. मंत्रतंत्र (Spells, भौतिकी!), जादुई द्रव्ये (Potions, रसायनशास्त्र), व औषधीशास्त्र (Herbology, वनस्पतिशास्त्र) जादुई प्राण्यांची निगा (Magical Animal-care, प्राणिशास्त्र), जारणमारणापासून तारण करायचे शास्त्र (Defense against Dark Arts, नीतिशास्त्र!), वगैरे. गंमत म्हणजे, रमलशास्त्र (Divination) हा विषय ऐच्छिक, विद्यार्थ्यांमध्ये नावडता आणि बेभरवशाचा आहे —- माननीय मुरली मनोहर जोशी टु नोट!
शाळेतल्या इतर बाबी मात्र साध्या शाळांसारख्याच आहेत. मैत्र्या आणि हेवेदावे, ‘कुल’ पद्धती, क्विडिच या खेळाची अपार लोकप्रियता, खोड्या आणि शिक्षा, शिक्षकांमधले लाडकेदोडकेपण, आणि भल्याबुऱ्याचा झगडा, सारे काही आहे!
पण इथल्या मारामाऱ्या जादूच्या कांड्या आणि मंत्रतंत्रांनी होतात. गुप्तपणाने काही करण्यासाठी ‘अदृश्यता देणाऱ्या शाली’ पांघरल्या जातात. विशेष अभ्यासासाठी जादूगार नसलेल्या (Muggles, मगल्स) लोकांच्या चालीरीती निवडता येतात. जादू-शिवाय, म्हणजे वीज आणि वाहने वापरून जगण्याबद्दल कुतूहल आणि आ चर्याचा भाव असतो.
अॅलिसची चांगली समीक्षा व्हायला सव्वा शतक जावे लागले. हॅरी पॉटरबर ‘आचार्यपदे’ येत्या दशकातच दिली जातील —- कारण राऊलिंग ठामपणे एकविसाव्या शतकातली आहे. ती, तिचे प्रकाशक, हरीवर चित्रपट काढणारे निर्माते, सारे लोक सध्याच्या माध्यम-गाजावाजातले (Media Hype) तज्ज्ञ आहेत. आजच हॅरीच्या चाहत्यांच्या – —आणि चाहते–विरोधकांच्या —- संस्था आहेत. इंटरनेटवर हॅरी आहे. हॉलिवुडमध्ये आहे. राऊलिंगचे बँकखाते तर हॅरीने इंग्लंडातल्या उच्चासनाजवळ नेऊन ठेवले आहे!
एखादा ‘कलाकार’ लेखक, सर्जनशील लेखक आपल्याला नेहेमीच्याच विश्वा-कडे ‘ताज्या’ नजरेने पाहायला लावू शकतो. पाय फाकून उभे राहून, डोके खाली करून, पायांमधून जग पाहिले तर ते मजेदार वाटते. ते आपले नेहेमीचेच जग आहे, हे जरा उशीराने उमगते. कॅरलला हे जमले. ‘मीडिया’च्या कुबड्या घेऊन (का होईना) राऊलिंगला ते जमते आहे. ९६-९७ मध्ये पहिले पुस्तक निघाले, आणि तेही सात पुस्तकांचा आराखडा लेखिकेच्या मनात घडल्यावर. पण त्याला प्रसिद्धी मिळाली ९९-०० मध्ये, चौथ्या पुस्तकासोबत. माध्यमांवरची पकड घट्ट असल्याची ही खूण आहे. असले खेळ सर्जनशील ठरू शकतात, पण त्यासाठी विचारी खेळकरपणा लागतो. जॉन कॉन्वे हा गणिती केंब्रिज विद्यापीठात असे खेळ खेळत असे. ‘सेल्युलर ऑटोमॅटा’ या संकल्पनेवर बेतलेला एक ‘लाईफ’ नावाचा खेळ त्याने घडवला. तीन साध्या नियमांवर बेतलेला हा खेळ दाखवतो की साध्या, शाळकरी वाटणाऱ्या नियमांचा पुनरावृत्त (recursive) वापर अगदी संगणकांइतक्या क्लिष्ट रचनांना (कधी कधी स्वैरपणातूनही) जन्म देऊ शकतो. सजीव सृष्टी घडायला ‘चैतन्य’ नावाचा घटक लागतो की नाही, या एका ‘तात्त्विक’ प्र नावर कॉन्वेचा ‘लाईफ’ काही अस्वस्थ करणारी (आणि इहवादी/जडवादी) उत्तरे देतो. ___ एका साध्या ‘लॉजिस्टिक इक्वेशन’ नावाच्या समीकरणावर बेतलेल्या मँडेल-ब्रॉट सेट (Mandelbrot Set) नावाच्या आकृतीचे वर्णन ‘सर्वांत क्लिष्ट मानव-निर्मित वस्तू’ असे केले गेले आहे. त्या आणि त्यासारख्या ‘खेळण्यांमधून’ घडलेली दोन शास्त्रे, गोंधळशास्त्र (Chaos Theory) आणि क्लिष्टताशास्त्र (Complexity Theory) आज नवनवी ज्ञानक्षेत्रे उजळत आहेत. जगातले इतर तत्त्वज्ञ, इतर ‘नागरिक’ या सगळ्या खेळांमधून होणाऱ्या नव्या ज्ञानाची दखल घेत आहेत. भारतात हे अजून घडायचे आहे.
आपल्या दारिद्र्यामुळे म्हणा, इतर कशामुळे म्हणा, आपला खेळकरपणा, आपली विनोदबुद्धी कमी पडते आहे. हॅरी पॉटर ‘प्रकरणा’ने अस्वस्थ होणाऱ्यांना दिलासा मिळेल अशी एक घटना सांगतो.
नागपुरात नुकतेच एका बाराचौदा वर्षांच्या मुलीने प्रौढांसमोर हॅरी पॉटर पुस्तकांवर एक भाषण दिले. शेवट करताना ती म्हणाली, “पण अशी जादुई दुनिया पाहताना पुस्तकावरून नजर वर उचलली जाते—-आणि नेहेमीचे, जादू नसलेले जग दिसते.” तिला हॅरी पॉटरची मजा नेमकी कशात आहे ते कळले —- आणि ती मजा अविवेकात नाही, तर खेळकरपणात आहे, हे जाणवले!

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.