दिल्लीस्थित आयुर्विज्ञान संशोधनसंस्थेत डॉक्टरला झालेली मारहाण आणि लगेच दोन दिवसांनी ठाण्यात आनंद दिघे ह्याच्या निधनानंतर सिंघानिया रुणा-लयाची झालेली मोडतोड आणि जाळपोळ ह्या दोन घटना वैद्यकीय व्यवसाय
आणि समाज ह्यांच्यातील अस्वस्थ संबंधांवर प्रकाश टाकतात. एकेकाळी समाजाच्या मानास प्राप्त असलेल्या ह्या व्यवसायाला समाजाच्या रोषास सामोरे जावे लागत आहे. प्रतिपरमेश्वर अशी असलेली त्यांची प्रतिमा मलिन झाली आहे. या अस्वस्थ आणि अहितकारक अशा संबंधाचा विचार समाजाने, विशेषतः वैद्यकीय व्यवसायिकांनी, करणे आवश्यक आहे. ___ मारपीट, मोडतोड, जाळपोळ अशा किंवा अशासारख्या हिंसक घटना ह्या सामान्यतः लोकांच्या मनातील असंतोष, अपेक्षाभंग, वैफल्य आणि राग ह्याच्या निदर्शक असतात वैद्यकीय व्यवसायासंबंधी असणारी नाराजी आणि डॉक्टरकडून वारंवार होणारा अपेक्षाभंग हा समाजमनात साठत जातो आणि कुठल्या तरी निमित्ताने (उदा. आनंद दिघे ह्यांचे निधन) त्याचा उद्रेक होतो. सामान्य माणसाच्या वैफल्यभावनेचा, नाराजीचा, हतबलतेचा आणि अपेक्षाभंगाचा तो एक आविष्कार असतो. हतबल झालेल्या परिस्थितिशरण अशा सामान्य माणसाचा हा खदखदणारा राग समूहात हिंसेत रूपांतरित होतो. (हिंसेचे किंवा अशा घटनांचे कोणत्याही प्रकारे समर्थन करणाचा हेतु हे लिहिण्यामागे नाही.)
साधारणतः सामान्य माणसाचा असा समज झालेला असतो की विज्ञान-तंत्रज्ञान इतके प्रगत झालेले आहे की सणाला दवाखान्यात नेऊन सोडले की तो बरा झालाच पाहिजे. त्यापेक्षा काही विपरीत झाले तर ते डॉक्टरच्या चुकीमुळे किंवा निष्काळजीमुळे. विज्ञान-तंत्रज्ञानावरची ही एक प्रकारे अंधश्रद्धाच आहे. शतकाच्या सुरवातीस सुरू झालेल्या सूक्ष्मजंतुशास्त्राचा अभ्यास आणि प्रतिजैविकांचा शोध ह्यामुळे मृत्युदर मोठ्या प्रमाणात कमी करण्यात डॉक्टरांना फार मोठे यश येत गेले. प्लेग, देवी, इन्फ्लुएन्झा, कॉलरा, मलेरिया अशा रोगांमुळे हजारो लोक मृत्युमुखी पडत. त्यात एकदम सुधारणा होऊन माणसाचे आयुर्मान वाढले. त्यानंतर झालेल्या आणि होत असलेल्या विज्ञान संशोधनाने इतकी आघाडी मारली की सामान्य माणूस तर सोडाच पण वैद्यकीय व्यावसायिकांनादेखील वैद्यकशास्त्र परिपूर्ण आहे असे वाटू लागले. कोणताहि रोग हा बरा झालाच पाहिजे असा गैरसमज दररोज येणाऱ्या वैद्यकशास्त्रातील प्रगतीच्या बातम्या वाचून सामान्य माणसाच्या मनात निर्माण झाला. वैद्यकीय शास्त्राच्या मर्यादांचे ज्ञान लोकांपुढे ठेवण्यास तो व्यवसाय कमी पडला. बऱ्याच स्थितीमध्ये आपण काहीही करू शकत नाही हे सत्य वैद्यकीय व्यावसायिकांनी समाजापुढे ठेवले नाही. निदान लोकमानसावर परिणाम होईल अशा रीतीने समाजापुढे ठेवले गेले नाही. परिणामी आनंद दिघेसारख्या सणाचा सणालयात मृत्यू होतो तेव्हा पहिली गोष्ट लोकांच्या मनात येते ती डॉक्टरांच्या चुकांची किंवा निष्काळजीपणाची. डॉक्टर व सणांतील (किंवा त्याच्या नातेवाइकांतील) संवादाचा अभाव हे त्यांच्यातील अस्वस्थ संबंधाचे कारण असल्याचे अनुभवाने व शास्त्रीय पुराव्याने सिद्ध झाले आहे. वेळेच्या अभावी किंवा संवादशास्त्राचे महत्त्व न शिकवले गेल्यामुळे बऱ्याच वेळा डॉक्टर आपल्या सणाशी सुसंवाद, निदान संवाद, साधण्यास असमर्थ ठरतात. सणाच्या आजारासंबंधात व उपचारासंबंधात सविस्तर आणि सत्य माहिती (त्यातील धोके आणि विकल्प ह्यांच्यासह) सणाला आणि त्याच्या जवळच्यांना सांगितली गेली तरी त्यांच्या संबंधातील निर्माण होणारे तणाव पुष्कळ प्रमाणात कमी होतील.
वैद्यकीय व्यावसायिकांच्या ढासळत्या नीतिमत्तेमुळेही समाजाचा त्या व्यवसाया-बद्दल भ्रमनिरास झाला आहे. कला आणि विज्ञान एकत्रित असलेल्या ह्या व्यवसायाला व्यावसायिकांनी वाणिज्य पातळीवर आणून सोडले आहे. डॉक्टरांचे उंचावलेले राहणी-मान, त्यांचे बंगले, त्यांच्या गाड्या ह्याचे दर्शन लोकांच्या मनात एक प्रकारची सूक्ष्म असूया निर्माण करते. विनाकारण होणाऱ्या तपासण्या, औषधोपचार, ऑपरेशन्स आणि त्याची वाढत जाणारी किंमत ह्याची झळ सामान्य माणसाला बसत असते. पैसा ह्या मूल्याचा वाढता प्रभाव समाजातील इतर घटकांप्रमाणे ह्या घटकावरपण दिसून येत आहे. परिणामी पैशाच्या मागे लागल्यामुळे होणारी नीतिमत्तेची घसरण हा व्यवसाय थोपवू शकला नाही.
औषधी कंपन्यांच्या आर्थिक प्रलोभनाला तो अधिकाधिक बळी पडत आहे. त्यामुळे आधीच महाग असलेली वैद्यकीय सेवा आणखी महाग होत आहे. उत्कृष्ट गुणवत्ता आणि चांगली व्यवसायनिष्ठता असतानादेखील सामाजिक बांधिलकीचा अभाव नव्या पिढीत प्रकर्षाने जाणवत आहे. व्यावसायिकांचे वर्तन परमेश्वरासारखे सोडाच पण साधे माणुसकीचेही असत नाही, अशी प्रतिमा सामान्य माणसाच्या मनात घर करून राहिली आहे. समाज आणि सरकारही अशा वर्तनाला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाठिंबा देत आहे. वैद्यकीय व्यवसायाला ग्राहक कायद्याखाली आणून समाजाने सरकारने व्यवसायाला दुकानदारीचे नियम लागू केले आहेत. ग्राहक-कायदा, वाढती महागाई, शिक्षणाला लागणारी वर्षे आणि पैसा, व्यवसायाला लागणारे वाढते भांडवल ह्यामुळे व्यवसायिकांना आपला व्यवसाय चालविणे अधिकाधिक अवघड होत आहे. विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानाबरोबर असलेली उपकरणे बाद ठरत आहेत. परिणामी निरंतर गुंतवणुकीची डोकेदुखी निर्माण झाली आहे. गुंतवणुकीचा परतावा, व्याज यांची वसुली आणि पुन्हा गुंतवणूक अशा दुष्टचक्रात डॉक्टर सापडले आहेत. त्यातच ग्राहक-कायदा लागू करून डॉक्टरांना दुकानदारी करावयाला समाजानेच लावली नाही काय? ग्राहक-कायदा लागू करून त्यांची सेवा ही कोणत्याहि इतर दुकानासारखीच आहे हे दाखवून दिल्यावर तशाच वर्तनाऐवजी मूल्याधिष्ठित वर्तनाची अपेक्षा करणे समाजाचा ढोंगीपणा दाखवीत नाही काय? पण समाज ढोंगी असो वा नसो, त्याची डॉक्टरकडून अपेक्षा मात्र पारंपरिक मूल्याधिष्ठित वर्तनाची असते. त्याला त्याविपरीत वर्तनाचा राग येत असतो. डॉक्टरबद्दलची पारंपरिक अपेक्षा तो बाळगून असतो. वेळोवेळी त्याच्या अनुभवाला आलेल्या अपेक्षाभंगामुळे त्याच्या मनात राग खदखदत असतो. एखादी घटना या रागाला हिंसेच्या स्पात वाट करून देते.
वैद्यकीय सेवेची व औषधांची वाढती महर्गता ही एक सामान्य माणसाच्या वैफल्याचे कारण बनली आहे. महाग होत चाललेल्या वैद्यकीय सेवेबरोबर वाढत्या औषधांच्या किंमती सामान्य माणसाच्या तोंडाला फेस आणीत आहेत. जवळजवळ अनियंत्रित औषधी व्यवसाय आणि अकारण वाढवलेल्या किंमती, एकाच औषधाच्या निरनिराळ्या कंपन्यांच्या बँडमधील किंमतीतील प्रचंड तफावत, इन्सुलीनसारख्या औषधावर असणारी बहुराष्ट्रीय कंपन्यांची मक्तेदारी, ह्यामुळे औषधे महाग होत आहेत. परिणामी समाजाचा फार मोठा वर्ग या सेवेपासून वंचित होत आहे. मोठमोठी खाजगी रुणालये आणि महागड्या अत्याधुनिक सेवा त्याच्या आर्थिक कुवतीबाहेरच्या आहेत. नवीन आर्थिक धोरणानुसार सरकार खाजगीकरणावर आणि अनुदानातील कपातीवर भर देत आहे. डॉक्टरांचे जागेवर नसणे, त्यांचा खाजगी व्यवसाय, लक्ष्यकेंद्रित सेवाधोरण, मानवी संसाधनाचा दुरुपयोग, ह्या आणि अशासारख्या त्रुटीमुळे प्राथमिक आरोग्य सेवाही सामान्यांच्या उपयोगी राहिली नाही. कोणत्याही समाजाला एखाद्या व्यवसायाशी अस्वस्थ संबंध परवडण्यासारखे नाहीत. समाज, सरकार आणि विशेषतः वैद्यकीय व्यावसायिक ह्यानी वेळीच ह्याचा विचार केला पाहिजे.
देशमुख हॉस्पिटल, उदगीर — ४१३ ५१७