कार्ल मार्क्स (१८१८ ते १८८३) या व्यक्तीबद्दल मला फारसे आकर्षण नव्हते. मार्क्सवाद व सोविएत रशिया याबद्दल मात्र तसे म्हणता येणार नाही. सर्वांनी वाचला तसा कम्युनिस्ट मॅनिफेस्टो मी पूर्वीच वाचला होता व चांगला वाटला होता. मग मुळात वाचावे या जिद्दीने दास कॅपिटाल वाचायला घेतले, मात्र वाचू शकलो नाही. कारण ते पुस्तक मला बरेच कंटाळवाणे व पुनरुक्तीने भरलेले वाटले. त्यातील सर्व पाने मिळून सार फारतर वीस पानांत काढता येईल असे मला प्रथम वाटले होते.
माझ्या मार्क्सवादी मित्रांचे मात्र तसे नव्हते. ती मंडळी एकत्र बसून एकेका चॅप्टरची पारायणे करीत व त्यावर चर्चा करीत. त्यांच्या या चर्चासत्रांत मी कधी भाग घेतला नाही पण थोडीशी सहानुभूती असल्याने उत्सुकता मात्र होती. मार्क्सवादाला ‘पोथीनिष्ठ’ वा धार्मिक चळवळ मानणारे मला बरेच भेटले. पण त्यांचा विशिष्ट असा आक्षेप काय हे मला कधी कळलेच नाही.
मार्क्स आणि मार्क्सवाद यांचा काय जो संबंध असेल त्यात मला फारसा रस नव्हता. थोडी थोडी वैयक्तिक माहिती मिळायची पण ती एकतर या गोटातून नाहीतर त्या गोटातून. बरे मार्क्स कसा का असेना पण त्याचा वाद तर चांगला आहे ना असे वाटल्याने पुढचा विचार संपायचा. या सर्वांतून मार्क्स नावाच्या व्यक्तीबाबत व त्याच्या काळच्या परिस्थितीबाबत थोडी उत्सुकता ताणली जायची. या दरम्यान इतर बरेच विषय आवडीचे असल्याने त्यात मार्क्सच्या आयुष्याकडे मी कधी बघितलेच नाही. काही दिवसांपूर्वी मी इस्लामचा इतिहास वाचला. लेखक रॉबर्ट पेन याने तो बराच वस्तुनिष्ठ लिहिला असे वाटले. मग मी त्याने लिहिलेल्या इतर पुस्तकांकडे बघितले व त्यात कार्ल मार्क्स सापडला.कार्ल मार्क्सबद्दल एव्हाना (म्हणजे कम्युनिस्ट देशांच्या सरकारांचा -हास झाल्यावर) मला आकर्षण राहिले नव्हते. या व्यक्तीकडे आता मी त्रयस्थ नजरेने बघू शकेन असेही वाटत होते. अशा परिस्थितीत हे पुस्तक वाचायला लागलो. पुस्तक वाचून एकतर माझा भ्रमनिरास होऊ शकला असता किंवा दुसरीकडे मार्क्सवादाच्या आकर्षणात ओढलो जाऊ शकलो असतो. अर्थात इंग्रज माणसाने मार्क्सवर लिहिलेले पुस्तक म्हणजे विरोधातच जास्त जाणार याची थोडी कल्पना होती.
मार्क्सबद्दलची उत्सुकता मला दोन कारणांनी वाटत होती. एक म्हणजे मार्क्सचे स्वतःचे असे वैचारिक योगदान तर दुसरे म्हणजे ‘धर्मसंस्थापकांपेक्षा अनुयायांचा कट्टरवाद’ यात मार्क्सवाद पण येतो का नाही, हा प्र न.
संशोधकांचे संशोधन —- विज्ञानाची कहाणी वाचताना हे वारंवार जाणवते की नावाजलेले शोध व त्याचे संशोधक यांचे योगदान कालानुसार फार मोठे नसते. म्हणजे गॅलिलिओचे जसे नाव आहे त्या बरोबरीने कोपर्निकसचे नाव नाही. न्यूटनचा शोध प्रसिद्ध होण्यापूर्वी हॅली व इतरांनी गुरुत्वाकर्षणावर विचार केला होता. डार्विनचा उत्क्रांतीचा शोधही त्याच वेळेस दुसऱ्याने लावत आणला होता. आईन्स्टाईनच्या आधी टाईम डायलेटेशन माहीत होते वगैरे. हे सगळे सांगून मला या थोर शास्त्रज्ञांना कमी लेखायचे नाही आहे. परंतु त्यांचे मोठे पाऊल पडण्याआधी इतर शास्त्रज्ञांनी केलेले योगदान हे आपण विसरून जाऊ लागलो, हे सांगायचे आहे.
मार्क्सला ज्या विचाराचा जनक मानला जातो त्यातील कित्येक विचार मार्क्सच्या आधीच कोणीतरी सांगितले असतील, असे थोडेफार मला वाटायचे. काही जणांनी तसे मला सांगितलेही होते. मार्क्सने कामगार चळवळ सुरू केली नाही हे मला माहीत होते. मग मार्क्सने नेमके असे काय केले की त्याच्यापासून हा वाद सुरू झाला, हा प्र न मला कधी कधी टोचायचा. काही जणांना दास कॅपिटाल मध्ये त्याचे उत्तर सापडले होते पण मला त्यात फारसा दम वाटत नव्हता.
मार्क्सचे योगदान —- मार्क्सचे एक समाजशास्त्रज्ञ म्हणून असलेले योगदान अशा रीतीने मांडता येईल.
१.धर्म ही अफूची गोळी आहे.
२.आहेरे आणि नाहीरे गटातील संघर्षामुळे होणारे सामाजिक बदल व त्याचे वि लेषण.
३. दोन विरुद्ध (वा वेगळ्या) प्रवृत्तींचा संघर्ष होऊन त्यातून नवीन संकरित प्रवृत्ती (सिंथेसिस) जन्मास येते, या हेगेलच्या सूत्राचा उपयोग करून सामाजिक बदलाचे वि लेषण व त्याचबरोबर येणाऱ्या क्रांतिकारी युगाचे भाकित.
४. जगातील कामगारांनो एक व्हा तुमच्याकडे बेड्यांखेरीज गमावण्यासारखे काहीच नाही.’
त्याची अर्थशास्त्रज्ञ म्हणून जी वि लेषणे नावाजली जातात ती म्हणजे —–
१.कॅपिटॅलिझम मध्ये (म्हणजे सध्याची बाजारशाही) आहेरे आणि नाहीरे यांच्यातील दरी वाढतच जाणार.
२.छोटे उद्योगपती व व्यावसायिक नाहीरे गटात ढकलले जाणार व बड्या उद्योगपतींच्या हाती सर्व आर्थिक सत्ता एकवटणार
३.श्रममूल्यापेक्षा कमी मूल्य देऊनच भांडवलदार हा आपला नफा कमावतो.
याशिवाय भारतीय अर्थव्यवस्थेवर केलेले भाष्य, १८५७ च्या युद्धावर केलेले भाष्य अशीही यादी होऊ शकेल. मार्क्सचे चरित्र वाचल्यानंतर या सर्वांचा नीटसा उलगडा झाला असे काही म्हणता येणार नाही. पण थोडी उत्तरे जशी मिळाली त्याबरोबर थोडेसे इतर ही काही गवसले.
मार्क्सचा जीवनपट
मार्क्सचा जन्म १८१८ साली हाईन या प्रशियाच्या परगण्यात झाला. त्याचे घराणे हे मूळचे ज्यू. त्याच्या घराण्यात बरेच ज्यू धर्मोपदेशक होऊन गेले. त्याच्या वडिलांनी मात्र ख्रिस्ती धर्मात प्रवेश केला. त्यामुळे मार्क्सवर ख्रि चन धर्माचे संस्कार झाले. त्याचे वडील सुस्थितीतील वकील होते. एक मोठी बहीण व इतर बरीच धाकटी भावंडे असा त्यांचा परिवार होता. मोठ्या बहिणीच्या वर्गात असलेल्या ‘जेनी’च्या प्रेमात मार्क्स पडला व त्यांचा विवाह झाला (१८४३). त्याची बायको ही सरदार घराण्यातली होती. १८४१ साली मार्क्सने डॉक्टरेट मिळविली. तत्पूर्वी म्हणजे १८३८ साली त्याचे वडील वारले.
मार्क्सचा सहकारी म्हणून ज्याला ओळखले जाते त्या एंगल्सची भेट १८४४ साली झाली. याच सुमारास मार्क्सचे जर्मन (प्रशियन) राज्य सुटले. पहिल्यांदा पॅरिस, बेल्जियम व शेवटी इंग्लंड (१८४९) असा निर्वासिताचा प्रवास झाला. मार्क्सचे इंग्रजी फारसे चांगले नव्हते. जर्मनी सुटल्यावर आर्थिक परिस्थितीपण चांगली नव्हती. इंग्लंडमधील वास्तव्य बहुतकरून एंगेल्सने केलेल्या अर्थसहाय्यातून चालले. याशिवाय मार्क्सने न्यूयॉर्क ट्रिब्यून या वर्तमानपत्राचा युरोपियन वार्ताहर म्हणून काम पाहिले.
मार्क्सने खूप लिखाण केले तसाच तो एक दर्दी वाचकही होता. तरुणपणात त्याने कविताही केल्या व एक कवि अशी त्याची ओळख त्याला आवडे. विविध वृत्तपत्रांचा मालक व संपादक या नात्याने त्याने बरेच जहाल व प्रचारकी लिखाण केले. ज्या कामगार वर्गाचा (व त्यांच्या हुकुमशाहीचा) तो पुरस्कर्ता त्या कामगारांप्रमाणे त्याने कधीच अंगमेहनतीचे वा कुठल्या कलाकुसरीचे काम केले नाही. याशिवाय त्याने कधीतरी भांडवलशाहीच्या शेअरबाजारात पैसे गुंतवले होते. एंगल्सचा कारखाना होता. वर त्याने इंग्लंडच्या पोलिसांना गुप्त मंडळींची माहिती पुरविल्याची नोंद आहे. परंतु एकंदर जीवनपटात अशा (अमार्क्सवादी) गोष्टी अपवादानेच आढळतात.
या उलट त्याच्या युरोपातील वास्तव्यात त्याचे वागणे हे एखाद्या कम्युनिस्टा-सारखे होते. स्वतःला वारसा हक्काने मिळालेले घबाड त्याने क्रांतीच्या चळवळीस देऊन टाकले होते. सतत कामगारवर्गाच्या क्रांतीचे तत्त्वज्ञान सांगणारे त्याचे लिखाण राज्यकर्त्यांना खुपत असे. हा वृत्तपत्रव्यवसाय नेहमी आतबट्याचा असे. त्यावर जप्ती येई.
अशाच एका वेळी मार्क्सने एक अंक पूर्णपणे लाल शाईत काढला होता. त्याने प्रत्यक्ष तुरुंगवास जरी फारसा भोगला नसला तरी त्यास ठिकठिकाणी हद्दपारीची शिक्षा झाली होती.
मार्क्स व धर्म
शिक्षणाने तत्त्वज्ञ असलेल्या मार्क्सवर हेगेलचा मोठा प्रभाव होता. मात्र या प्रभावाचा त्याला कधीच बोजा वाटला नाही. म्हणूनच तो हेगेलच्या पुढे जाऊन ‘डायलेक्टिक मटीरियलिझम’चा निर्माता झाला. यापूर्वी मात्र त्याच्यावर धर्माचा प्रभाव होता. घराण्यात धर्मोपदेशकांची परंपरा, वडिलांचा हेतुपुरस्सर ख्रि चन धर्माचा स्वीकार हे पाहता हा प्रभाव नैसर्गिकच मानला पाहिजे. तरुणपणातच हा प्रभाव ओसरला. एक नास्तिक विचारवंत म्हणून ओळखले जाण्याची ही पहिली पायरी होती. त्याचा नास्तिक विचार हा कुठल्या प्रसंगाची प्रतिक्रिया म्हणून न येता तो पूर्ण विचारांती आला होता. आणि म्हणूनच की काय धर्माकडे त्याचा कडवटपणे पाहण्याचा दृष्टिकोण नव्हता. मार्क्सने ‘धर्म ही अफूची गोळी आहे’ असे म्हटलेले जगप्रसिद्ध आहे पण ती गोळी कुठल्यातरी तारेत न नेता दुःखमय जीवनात वेदनाशमन करते असे त्याचे म्हणणे होते.
मार्क्सवादाचा जनक
युरोपातील औद्योगिक क्रांतीनंतर जशी उद्योगांची व राष्ट्रीय संपत्तीची वाढ झाली तशीच कामगारवर्गातही झाली. मोठ्या प्रमाणात लोकांनी (म्हणजे गरीब लोकांनी) आपले व्यवसाय सोडून कारखान्यांकडे धाव घेतली. अर्थात हे करण्यात त्यांचा सांपत्तिक फायदा होताच परंतु त्याबरोबर भरपूर काम, कमीत कमी सुविधा, धोकादायक कामे, बालमजुरी वगैरे गोष्टी होत्या. हा कामगारवर्ग हळूहळू संघटित होत होता व ठिकठिकाणी संघर्ष करीत होता. भांडवलशाहीत कामगारवर्गाची पिळवणूक होते हे सांगायला मार्क्सची गरज नव्हती, तर ते त्यांना उमगलेले सत्य होते.
मार्क्सच्या समकालीन पूधाँ नावाच्या विचारवंताचे ‘संपत्ती म्हणजे काय : चोरी’ हे वाक्य प्रसिद्ध होते. ‘जगातील कामगारांनो एक व्हा’ हे वाक्य देखील मूळचे मार्क्सचे नाही. ‘लीग ऑफ द जस्ट’ नावाच्या पक्षाचे ते ब्रीदवाक्य होते. या इंग्लंडमधील पक्षात युरोपवासी मार्क्स हा एक तात्पुरता कार्यकर्ता होता. मार्क्सच्या विपन्नतेमुळे किंवा हुशारीमुळे त्यास या पक्षाची विचारसरणी व मॅनिफेस्टो लिहायचे काम मिळाले. या संधीचे त्याने सोने करून कम्युनिस्ट मॅनिफेस्टो लिहिला. एक वर्गविहीन समाज निर्माण करण्याचे स्वप्न त्यात होते. ह्या मॅनिफेस्टोपासून मार्क्सवादाची सुरवात झाली असे नि िचतपणे म्हणता येईल. परंतु तो अशा काळी लिहिला गेला की थोड्याच काळात (१८४८) युरोप मध्ये ठिकठिकाणी क्रान्ती होऊन राज्यकर्ते बदलले गेले. आणि काही काळ हा जाहीरनामा विस्मृतीत गेला.
‘कम्युनिस्ट पक्षाचा जाहीरनामा’ ही मार्क्सवादाची सुरुवात मानली तर दास कॅपिटल ही त्याची परिणती मानली पाहिजे. दास कॅपिटलचा पहिला भागच मार्क्सच्या आयुष्यात प्रसिद्ध झाला होता. त्यानंतर विस्कळित लिखाणातून संपादन करून एंगल्सने इतर खंड प्रकाशात आणले. या सर्व लिखाणात वि लेषणात्मक विचार मोठ्या प्रमाणात आहे. पण सकारात्मक, किंवा कामगार वर्गाचे राज्य आल्यानंतर काय करावे याबद्दल जवळ जवळ काहीच नाही. या दृष्टीने ‘मार्क्सवाद’ या विचारसरणीस जसा मार्क्सपूर्व व समकालीन विचारवंत व पुढाऱ्यांचा हातभार होता त्याचप्रमाणे मार्क्सच्या नंतरचे लेनिन व स्टॅलिन यांचाही हातभार होता. मार्क्सने या दोघांमधील एक महत्त्वाची पायरी म्हणून काम केले.
क्रांतीचा प्रणेता
मार्क्सच्या तत्त्वज्ञानात वारंवार क्रांती दिसते. कम्युनिस्ट विचारसरणीत क्रांती ही मुख्य असली तरी ती असलीच पाहिजे असे नाही. कामगारवर्गाची सत्ता होण्यासाठी जसा क्रांती हा मार्ग आहे तसाच लष्करी आक्रमण (पूर्व युरोप), लोकशाही मार्गाने सत्ताप्राप्ती हेदेखील मार्ग आहेतच. मार्क्सच्या लिखाणात व चळवळीत मात्र क्रांती हाच एक मार्ग दिसतो. बूर्जा राज्यक्रांत्या अल्पायुषी ठरतील पण कामगारवर्गाची क्रांती ही दीर्घकाळ टिकून एक निराळी व आदर्श समाजव्यवस्था निर्माण करील असा त्याचा होरा होता. ही आदर्शव्यवस्था आपोआप तयार होईल कारण कामगारवर्गाच्या क्रांतीतून पिळवणूक करणाऱ्या वर्गाची संपत्ती कामगारांकडे जाईल, असे त्याचे म्हणणे सांगता येईल.
मार्क्सचे हे म्हणणे त्याच्या काळाकडे बघितल्यास जास्त समजते. फ्रेंच राज्य-क्रांतीनंतर राजाची घराणेशाही जरी संपली तरी राज्यव्यवस्थेत व समाजव्यवस्थेत खूप फरक पडला नव्हता. यानंतर त्यापासून स्फूर्ती घेऊन विविध देशात (युरोपीयन) क्रांती घडवून आणण्यासाठी चळवळी उभारल्या गेल्या. यातून जरी लोकशाही जन्माला येत होती तरी एकंदर लोकशाही शैशवातच होती. एक वृत्तपत्रकार म्हणून मार्क्सचा ‘वृत्तपत्रां’च्या हक्काला एक लोकशाहीवादी या भूमिकेतून पाठिंबा होता. मात्र विविध कारणांनी तत्कालीन लोकशाही लोकांची नव्हती व ती काही अपवाद वगळता अल्पायुषी ठरली होती. या पार्श्वभूमीवरही मार्क्सची क्रांती व त्यापुढील राज्यव्यवस्था यांची उकल होते.
मार्क्सवाद एक धर्म
बऱ्याच लोकांना मार्क्सवाद हा एक धर्म वाटतो. भांडवलशाहीच्या अंताचे भाकित, चिरंतन व न्याय्य राज्यव्यवस्था, पोथीनिष्ठता ह्या गोष्टी कयामत, स्वर्ग व प्रेषित यांच्यासारख्याच दिसतात. पण ही तुलना येथेच संपते. मार्क्सचा भविष्यवाद याच सृष्टीसाठी आहे. मार्क्सची पोथी ही विचारप्रवृत्त करणारी आहे, श्रद्धा ठेवून जगण्यासाठी नाही. भांडवलशाहीच्या अंताचे भाकित मात्र यापेक्षा वेगळे आहे. या भाकितास अपवाद नाही, आणि खरा कम्युलिस्ट त्याच आशेवर असतो, असे म्हणता येईल.
मार्क्समध्ये हा धर्म किती दिसतो? या प्र नाचे उत्तर कठीण आहे. मार्क्सच्या जीवनाकडे पाहिल्यास मात्र गुस्पेक्षा चेले कट्टर असावेत असे वाटते. आणि असे असेल तर यावर मार्क्सचे चरित्र वाचणे हा एक उतारा ठरू शकतो.
बी ४/११०१ विकास कॉम्प्लेक्स, कॅसल मिल कॉम्पाउंड, (प िचम) ठाणे – ४०० ६०१