मासिक संग्रह: फेब्रुवारी, २००२

पत्रसंवाद

निखिल जोशी, ‘तत्त्वबोध’, हायवे, नेरळ, (रायगड) — ४१० १०१
_ श्री. दिवाकर मोहनी यांनी आ.सु. डिसेंबर २००१ मध्ये ‘रोजगार आणि पैसा’ या लेखात देव आणि पैसा यांच्यातील साम्य शोधले आहे. असे करताना विश्वास आणि श्रद्धा यांमध्ये गल्लत झालेली दिसते.
एखाद्या गृहीतकावर आधारित अनुमाने खोटी ठरत असल्याचे दिसत असूनही त्या गृहीतकाला कवटाळून बसणे म्हणजे अंधश्रद्धा होय. देव मानणे या वर्गात येते. जोवर अनुमाने खोटी ठरत नाहीत तोवर ते गृहीतक खरे आहे असे मानून सावध व्यवहार करणे ही अंधश्रद्धा नाही. पैसा आहे असे गृहीत धरून केलेले आचरण जर अपेक्षित फल (Result) देत असेल तर, ‘तो कोठे आहे?’,

पुढे वाचा

खरेच देवा तू असशील तर . . .

खरेच देव असता तर जग असे राहिले नसते, हजारो प्राण्यांची कत्तल होऊन त्यांच्या चमचमीत डिशेस बनल्या नसत्या. हिंदू-मुसलमान-शीख-इसाई सगळे गुण्या-गोविंदात नांदले असते, विश्व-व्यापार केंद्राच्या टॉवर्सवर अल-कैदाने हल्ले केले नसते. भ्रष्टाचारी, पाखंडी आणि चोर लोकांना आम्ही नेते केले नसते, पृथ्वीवरच्या काश्मीर नावाच्या स्वर्गात रक्ताचे पाट वाहिले नसते. दुःख, यातना, अन्याय, शिक्षा हे शब्द आपल्या शब्दकोषात नसते, कोवळ्या बालिकांवर थेरड्या नराधमांनी बलात्कार केले नसते. आम्ही कोणाचे चोरले नसते, कोणी आमचे चोरले नसते, रावण, कंस, दुर्योधन, बाबर, औरंगजेब, हिटलर, मुसोलिनी, ओमर, लादेन असले दुष्ट जन्मले नसते.

पुढे वाचा

ऐपत

शिवसेनेला सत्ताधीश होण्याची आकांक्षा निर्माण झाल्यानंतर तिने झोपड-पट्ट्यांतील रहिवाशांची एकगठ्ठा मते मिळविण्याच्या हेतूने मुंबईमध्ये झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी पक्की घरे बांधण्याची एक योजना तयार केली. कोणालाही आपल्या पूर्वीच्या राहत्या घरातला हिस्सा द्यावा न लागता झोपडपट्ट्या नष्ट करण्याची ती कल्पना चांगली होती. पण ती व्यवहारात उतरू शकली नाही. ती व्यवहार्य नाही ह्याचे चांगले भान ती योजना बनविणाऱ्यांना असावे; पण राजकीय पक्षाला काही कार्यक्रम हवा असतो. अशा कार्यक्रमाच्या गरजेपोटी पुष्कळ समस्या चिघळत ठेवाव्या लागतात. राजकीय पक्षांना प्रजेचे मोठे प्र न सोडविण्यात स्वारस्य नसते. ते चिघळत ठेवण्यात असते.

पुढे वाचा

वैद्यकीय व्यवसाय आणि समाज

दिल्लीस्थित आयुर्विज्ञान संशोधनसंस्थेत डॉक्टरला झालेली मारहाण आणि लगेच दोन दिवसांनी ठाण्यात आनंद दिघे ह्याच्या निधनानंतर सिंघानिया रुणा-लयाची झालेली मोडतोड आणि जाळपोळ ह्या दोन घटना वैद्यकीय व्यवसाय
आणि समाज ह्यांच्यातील अस्वस्थ संबंधांवर प्रकाश टाकतात. एकेकाळी समाजाच्या मानास प्राप्त असलेल्या ह्या व्यवसायाला समाजाच्या रोषास सामोरे जावे लागत आहे. प्रतिपरमेश्वर अशी असलेली त्यांची प्रतिमा मलिन झाली आहे. या अस्वस्थ आणि अहितकारक अशा संबंधाचा विचार समाजाने, विशेषतः वैद्यकीय व्यवसायिकांनी, करणे आवश्यक आहे. ___ मारपीट, मोडतोड, जाळपोळ अशा किंवा अशासारख्या हिंसक घटना ह्या सामान्यतः लोकांच्या मनातील असंतोष, अपेक्षाभंग, वैफल्य आणि राग ह्याच्या निदर्शक असतात वैद्यकीय व्यवसायासंबंधी असणारी नाराजी आणि डॉक्टरकडून वारंवार होणारा अपेक्षाभंग हा समाजमनात साठत जातो आणि कुठल्या तरी निमित्ताने (उदा.

पुढे वाचा

विक्रम, वेताळ आणि आधुनिक शेख महंमद

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. झाडावरचे प्रेत त्याने खांद्यावर टाकले आणि आपली पावले त्याने स्मशानाच्या दिशेने वळवली. थोडे अंतर जाताच प्रेतातील वेताळ त्याला गोष्ट सांगू लागला. . . .
राजा, कोणे एके काळी केकय देशात सत्यवान नावाचा एक ब्राह्मण राहत होता. केकय देशाची परिस्थिती तशी वाईटच होती. अर्ध्याहून अधिक प्रजा अत्यंत दरिद्री होती. देशाची लोकसंख्या जशी भरमसाठ होती, तशीच तेथील बेकारी देखील. शेती सगळी पावसावर अवलंबून असलेली आणि लोक आळशी व अज्ञानी त्यामुळे इतर उद्योगधंदेही मरगळलेले.
सत्यवान देखील देशातल्या बहुसंख्य प्रजेप्रमाणे गरिबीतच आयुष्य कंठत होता.

पुढे वाचा

मला सापडलेला कार्ल मार्क्स

कार्ल मार्क्स (१८१८ ते १८८३) या व्यक्तीबद्दल मला फारसे आकर्षण नव्हते. मार्क्सवाद व सोविएत रशिया याबद्दल मात्र तसे म्हणता येणार नाही. सर्वांनी वाचला तसा कम्युनिस्ट मॅनिफेस्टो मी पूर्वीच वाचला होता व चांगला वाटला होता. मग मुळात वाचावे या जिद्दीने दास कॅपिटाल वाचायला घेतले, मात्र वाचू शकलो नाही. कारण ते पुस्तक मला बरेच कंटाळवाणे व पुनरुक्तीने भरलेले वाटले. त्यातील सर्व पाने मिळून सार फारतर वीस पानांत काढता येईल असे मला प्रथम वाटले होते.
माझ्या मार्क्सवादी मित्रांचे मात्र तसे नव्हते. ती मंडळी एकत्र बसून एकेका चॅप्टरची पारायणे करीत व त्यावर चर्चा करीत.

पुढे वाचा

फलज्योतिष विज्ञान का नाही?

[विद्यापीठ अनुदान आयोगाने (विअआने) वैदिक फलज्योतिष हा विभाग सुरू करण्यासंबंधीचे निवेदन’ एका परिपत्रकातून केल्यानंतरच्या चर्चेची एक महत्त्वाची कडी म्हणून मराठी विज्ञान परिषदेने (मविपने) ‘फलज्योतिष विज्ञान आहे का?’ यावर एक विशेषांक काढला (नव्हेंबर २००१). सात ‘ज्योतिर्विदां’नी मते मांडल्यावर त्यांच्या युक्तिवादाचा वैज्ञानिक वृत्तीच्या समर्थकांकडून प्रतिवाद केला गेला. हा पूर्णच अंक वाचनीय आहे, पण त्यातील जयंत नारळीकरांच्या लेखातील ‘फलज्योतिष हे विज्ञान का नाही?’ हे प्रकरण कळीचे आहे. ते मविपच्या सौजन्याने पुनर्मुद्रित करत आहोत.]

विअआने हा अभ्यासक्रम सुरू करायचे म्हटल्यावर भारतातील वैज्ञानिकांनी विरोधाची एक आघाडी उघडली आहे, ती फलज्योतिष वैदिक आहे की नाही या संबंधी नसून तिला विअआ विज्ञानाचे रंगरूप देऊ इच्छितो यासाठी आहे.

पुढे वाचा

सांप्रदायिक दंगे: एक अभ्यास

विभूति नारायण राय यांनी ‘सांप्रदायिक दंगे और भारतीय पुलिस’ नावाचा एक प्रबंध लिहिला आहे. हैदराबादच्या पोलीस अकादमीने श्री रायना यासाठी विद्यावृत्ती दिली होती. राय यांचा अभ्यास इंग्रजी राजवट येण्याआधीच्या काळापासून सुरू होतो. राज्यसत्ता पोलिसांकरवी दंगे हाताळत असते. दंगेखोरांविरुद्ध बळाचा वापर, अहवालांमधून सत्य परिस्थिती नोंदणे, दंगखोरांना पकडणे, तुरुंगात ठेवणे, न्यायासनापुढे उभे करणे, अशा साऱ्या व्यवहारात पोलीस किती निःपक्षपणे वागतात, हा प्रबंधाचा विषय आहे.
सांप्रदायिकता आणि त्यातून उपजणारे दंगे केवळ ब्रिटिश साम्राज्यवादामुळे सुरू झाले असे रायना वाटत नाही. असे मत त्यांना अतिसुलभीकृत वाटते.

पुढे वाचा

विश्व म्हणजे निसर्ग

आता थोडक्यात असे म्हणता येईल की प्रत्यक्षप्रमाणाच्या आवाक्यात जे जे येऊ शकेल ते ऐहिक; प्रत्यक्षाच्या आणि प्रत्यक्षाधिष्ठित अनुमानाच्या आवाक्यात. प्रत्यक्षप्रमाणाने वस्तूच्या अंगी असलेल्या ज्या गुणधर्मांचे आणि शक्तींचे ज्ञान आपल्याला होणे शक्य आहे तेवढेच काय ते गुणधर्म आणि शक्ती वस्तूंच्या ठिकाणी असू शकतात. जे काही अस्तित्वात आहे त्याचे संपूर्ण स्वरूप फक्त अशा गुणधर्मांचे आणि शक्तींचे बनलेले असते. ह्या स्वरूपाच्या वस्तूंचा समग्र समुदाय म्हणजे निसर्ग असे जर म्हटले तर इहवादी सिद्धान्त असा मांडता येईल : विश्व म्हणजे निसर्ग. निसर्गापलि-कडचे असे विश्वात काही नाही.

पुढे वाचा