पत्रसंवाद

विजय वर्षा, ‘चार्वाक’, अमृत कॉलनी, भू-विकास बँकेमागे, करंजे, सातारा
आस्तिक माणूस अंधश्रद्धाळू असतो, हे विधान खटकणार असले तरी ते सत्य आहे. कारण दैनंदिन जीवनात माणूस वागताना पावलोपावली त्याच्या अंध-श्रद्धाळूपणाचा ‘प्रत्यय’ येतो.
घरी देवपूजा करून सुख, शांती समाधान, धन संपत्ती, असे बरच काही देवाकडे मागून कामाला बाहेर पडतो. परंतु रस्तोरस्ती दिसणाऱ्या देखल्या देवाला दंडवत घातल्याशिवाय पुढे जात नाही. कारण आपण मागितलेले मागणे देवाच्या स्मरणात राहण्यासाठी येता जाता सारखा दंडवत घालत असतो. ज्याने स्वतःवरचा विश्वास गमावलाय तो देवावर विश्वास ठेवण्याचा नाहक प्रयत्न करतो.
घरात देवघर असूनसुद्धा आस्तिक माणूस देवळाच्या दारात रांगेत उभा असतो. जागृत देवस्थान शोधत असतो. घरातील देव निद्रिस्त असतात की काय? नवस करणे, बकरे, कोंबडे बळी देणे, अशाप्रकारे लाच देवून देवाला प्रसन्न करून घेण्याचा प्रकार अंधश्रद्धाळू नाही तर काय?
मी आस्तिक आहे, हे सांगण्यासाठी व्यक्तीची त्याचबरोबर व्यक्तीसमूहांची म्हणजेच समाजाची चढाओढ लागलेली असते. म्हणूनच प्रत्येक सण (हिंदूचा) हा घरातला सण न राहता तो रस्त्यावरचा महोत्सव होऊ लागला आहे. त्यामुळे गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दीपावली यासारखे सण प्रदूषण आणि समाजविघातक प्रवृत्तींना प्रोत्साहन देणारे ठरत आहेत. गणेशोत्सवातील ध्वनिप्रदूषण आणि निर्माल्याचे व मूर्तीचे पाण्यात होणार पाणी प्रदूषण, वाढू लागले आहे. म्हणूनच न्यायालयांना ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी आदेश काढावे लागले आहेत.
श्री. दिवाकर मोहनी यांनी संपादकीयामध्ये सांगितल्याप्रमाणे आस्तिकतेचा देव मानण्याचा फायदा व्यक्तिगत पातळीवर प्रतिष्ठेसाठी होतो. परंतु त्याचा सामाजिक फायदा अत्यल्प असतो. तर तोटाच जास्त असतो. हे खरे आहे. आता राजकारणी मंडळी गणेशोत्सव, नवरात्रोत्सव यासारख्या धार्मिक उत्सवांना वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यात तरुणवर्ग जास्त अंधश्रद्धाळू व आस्तिक बनत चालला आहे. कोणताही राजकीय नेता अगर पुढारी तरुणांच्या नोकरी, व्यवसायाच्या प्र नाकडे लक्ष देत नाही. हे अंधश्रद्धाळू समाजाला समजत नाही.
अंधश्रद्धेतून अन्याय सहन करण्याची सहनशक्ती वाढते. म्हणूनच प्रस्थापितांना राजकारण्यांना अंधश्रद्धाळू समाज हवा असतो. प्रथम अंधश्रद्धाळू आस्तिक समाजातील अंधश्रद्धा नष्ट करणेची गरज आहे. त्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती सारखी स्वयंसेवी संस्था महाराष्ट्रात कार्य करीत आहे. आस्तिकांच्यात विज्ञान, निर्भयता, नीति व चिकित्सा या संकल्पना रुजवणे आवश्यक आहे. नाहीतर धर्ममार्तंड लादेन सारखे दहशतवादी निर्माण करीत राहतीलच. त्यासाठी आस्तिकांनी आता अंधश्रद्धाळू न राहता चिकित्सक बनले पाहीजे.

भ. पां. पाटणकर, ३–४–२०८, काचीगुडा, हैदराबाद — ५०० ०२७
नोव्हेंबर अंकावरील माझ्या प्रतिक्रिया अशा : पुढील विधाने मला निरीक्षणावर आधारलेली दिसत नाहीत :
(अ)”तुम्हा कितीही पाप करा, देव ते पोटात घालील या विश्वासामुळे लोक एकमेकांचे . . . नुकसान करतात” (पृ. २८४)
(ब) “सुख पाहता जवापाडे दुःख पर्वताएवढे . . . बहुधा सर्वांचाच अनुभव याहून वेगळा नसावा’ (पृ. २९१) (क) “देवालये अन्नछत्रे घालताहेत आणि दारिद्र्याला उत्तेजन देताहेत” (पृ. ३०१) (ड) “परावलंबन, दुय्यम स्थान . . . यामुळे आया वैतागलेल्या असतात’ (पृ. २९७)
१. मला स्वतःला पुष्कळ माणसे पुष्कळदा आनंदी दिसतात सर्व आया वैतागलेल्या किंवा काही आया सर्वदा वैतागलेल्या असेही दिसत नाही. तेव्हा दुःखाचे पारडे फार जड नसेल असे माझे अनुमान जास्त समर्थनीय वाटते. संत आणि कवी यांची दुःखे वेगळी. त्यातून तत्त्वज्ञान व काव्य जन्मते.
२. ‘भारतापुढील पर्याय’ या लेखात ‘भारतापुढे फारसे पर्याय नाहीत’ अशी कबुली असल्यामुळे त्या लेखातली हवाच निघून गेली आहे. तालिबान व अल कायदा यांच्या विरुद्ध अमेरिकेने जी उग्र कारवाई सुरू केली आहे तिच्यामुळे मुस्लिम जगतात बरेच आत्मपरीक्षण सुरू झाले आहे. त्यामुळे मुस्लिम कट्टरवाद निवळेल व यथावकाश भारताला या सुधारणेचा फायदा होईल अशी एक आशा मी बाळगतो. केव्हातरी मुस्लिम जग बदलेलच. आणखी किती दशके ते तसेच राहणार. “जातात कुठे’ असा एक शब्दप्रयोग मी तुम्हाला पाठवलेल्या एका पत्रात केला होतात. तोच इथे ही करतो.

दिनकर गांगल,
माणसाच्या दुर्बलतेतून देवाचा जन्म झाला असे आपण म्हणतो. हा दुबळेपणा नाहीसा झाला तर देव नष्ट होईल. आपल्या प्रयत्नांची ही दिशा असायला हवी ना? उलट, माणूस अधिकाधिक असुरक्षित, एकांतिक होताना दिसतो आहे. याबद्दलची काळजी आपल्या लेखनातून व्यक्त होत असलेली जाणवली नाही. [श्री गांगलांनी आमच्या लिखाणातील उणेपण पुरे करावे, ही जाहीर विनंती!
– संपादक

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.