‘हसरी किडनी’च्या लेखिकेचे नागपूरशी नाते आहे. जन्माने. विचाराने ‘आजचा सुधारक’शी त्यांची माहेरची बांधिलकी आहे. पुस्तकाला आ.सु.च्या संस्थापक-संपादकांचा पुरस्कार आहे. तो त्यांनी आग्रहाने मिळवला आणि पद्मभूषणासारखा मिरवला आहे. ‘अशा प्रकारचे एकमेव पुस्तक’ ही त्यांची प्रशस्ती. विजय तेंडुलकर, सरोजिनी वैद्य यांच्यासारख्या नामवंत सारस्वतांनी तिला संमतिपूर्वक मान मोलावली आहे.
या पुस्तकाचे प्रकाशन १६ जून २००१ या दिवशी झाले. लेखकाला आपल्या पुस्तकाचे जे जे व्हावेसे वाटते ते सर्व सोहळे त्याला लाभले आहेत अशा तेंडुलकरांच्या अभिप्रायासमवेत आलेली प्रकाशनसमारंभाची व्हिडियो कॅसेट अमेरिकेत लगेचच लेखिकेच्या सौजन्याने प्रस्तुत परिचयकर्त्याने पाहिली आहे. तेव्हापासून पुस्तक हाती येईपर्यंत म्हणजे १० ऑगस्टपर्यंत उत्सुकता वाढत गेलेली. नंतरच्या आठदहा दिवसांत हे सुमारे साडेचारशे पानांचे पुस्तक वाचून संपवल्यावर तात्कालिक प्रभावाचा भर ओसरू द्यावा म्हणून काही काळ जाऊ दिला. नोव्हेंबरात पुन्हा एकदा ते वाचले. परवा १६ डिसेंबरला नागपूरच्या माग्रस (माझा ग्रंथ संग्रह) या ग्रंथप्रेमी मंडळीसमोर पुस्तक परिचय करून दिला.
प्रस्तुत परिचयलेख त्या प्रकाराची दुसरी, लघु आवृत्ती आहे. पुस्तकाची कानावर आलेली प्रशस्ती मनोमन पूर्ण पटली आहे. मराठीत या प्रकारचे हे एकमेव पुस्तक असावे.
हसरी किडनी हे पद्मजा फाटकाचे पुस्तक त्यांचे आत्मचरित्र नाही. हे एक संघर्षचित्र आहे.
आत्मकथा त्यात आहे, पण ती ओघाने आलेली आहे. मुख्यतः हे आयुष्यावरचे भाष्य आहे. जीवनाचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न आहे. पद्मजाचा स्वतःला समजून घ्यायचा प्रयत्न आहे. मानसशास्त्र सांगते, ‘स्वतःला समजून घ्यायचे असेल तर जन्मदात्यांना समजून घ्या.’ हे पद्मजाला पटलेले. म्हणून या आत्मनिवेदनात लेखिकेच्या जन्मदात्यांनीही मरणोत्तर हजेरी लावली आहे. संघर्षाशी सामना करताना मनोबळ पुरविणाऱ्या शंतनुराव किर्लोस्कर, पाच कुटुंबीयांची हत्या सोसणाऱ्या पुण्याच्या अभ्यंकर दाम्पत्याची जिजीविषा चित्रित झाली आहे. ‘युवर सपोर्ट ग्रुप इज युवर पॉवर’ म्हणणाऱ्या व्हर्जिनियासारख्या मैत्रिणींची कहाणी आहे. द्रव्यबळाची निपूर भस्न काढणाऱ्या मित्र मैत्रिणींची वर्णने आहेत. एरवी विषयांतर वाटावे असे पुष्कळ काही त्यात आहे. पण पुस्तकाचे मुख्य सूत्र लक्षात घेतले तर ते अनाठायी आले असे वाटू नये. पाल्हाळ हा आपला पिंडप्रकार आहे अशी कबुली लेखिकेने दिली आहे. पण एक किस्सा सांगून लेखिकेने तो सुसह्य केला आहे. एका आफ्रिकन कार्यकर्तीला तिचे चाहते आत्मचरित्रलेखनाचा आग्रह करतात तेव्हा ती म्हणते, First let me tell you about my people. पद्मजाने असेच केले आहे. हे संघर्षचित्र असे मोठे झाले आहे.
एकाएकी दोन्ही मूत्रपिंड निकामी झाल्यानंतर जिवावर आलेल्या गंडांतराशी दोन हात करण्याचा समरप्रसंग हे या पुस्तकाचे निमित्तकारण आहे. संकटमालेचा घटनाक्रम सांभाळून हे निवेदन केलेले नाही. मागेपुढे नेणारे हे निवेदन वाचून वाचक अधून मधून गोंधळात पडतो हे खरे आहे. पण या तत्त्वावर लेखिकेचा विश्वास आहे. लेखनप्रक्रियेबद्दल कामू म्हणतो, ‘It is an act of violence against oneself’ हे लेखनाच्या वाटी जाणाऱ्या कोणालाही पटावे.
देव, दैव, नियती न मानणाऱ्या विवेकवाद्याला बळ पुरविणाऱ्या अगणित हातांचे उतराई व्हायचे आहे. लहान मोठ्या आपत्तींना तोंड देताना लहानमोठ्यांचे अनाहूत साहाय्य लाभले त्याचा ऋणनिर्देश करायचा आहे. हरवलेला आत्मविश्वास पुन्हा संपादन करायचा आहे. या लेखनाला एक उपचारमूल्य (therapeutic value) आहे हेही लेखिकेला जाणवले आहे. त्यातून ही निवेदनपद्धती साकारली आहे. मनोबळ, द्रव्यबळ, लोकबळ यांच्याबरोबर लेखिकेला आणखी एक साहाय्य लाभले आहे. ते आहे विनोदबळाचे. Love, Medicine and Miracles चा लेखक बर्नी सीगल जे म्हणतो ते लेखिकेला आपल्या मनातले वाटावे इतके भावले आहे. ‘No humour is inappropriate’ हे तत्त्व तिने आत्मसात केले आहे. म्हणून तर आपल्या पुस्तकाला तिने ‘हसरी किडनी’ म्हटले आहे. जगू की मरू अशा दुखण्यातून उठल्यावर पुन्हा वाचन-लेखन येईल की नाही या शंकेने व्याकुळ झालेल्या अवस्थेत मनाला उभारी पुरवण्याच्या कामी विनोदी वाङ्मय कसे मदतीला आले याची हकीकत लेखिका सांगते.
‘नागपूरच्या नंदा खऱ्यांनी आणून टाकलेले एक पुस्तक (अनुराग माथुरचे —- Inscrutable Americans) डोळ्यासमोर धरले.’ पुस्तकाची सुरुवातच इतकी विनोदी निघाली की, पुढे वाचून हाताळून त्याची झोळी झाली तरी त्याची रंजकता संपेना, ऋण सरेना. मध्यप्रदेशातील एक गावंढळ विद्यार्थी न्यूयॉर्कला जातो. देहाती इंग्रजी आणि निरागसपणा; तो आपल्या भावाला लिहितो, Beloved Younger Brother, Greetings to the respectful parents. I am hoping all is well with health and wealth. I am fine at my end and hoping your end is fine too … with Gods grace and parents blessing I am arriving safely in America. Kindly assure Mother that I am strictly consuming vegetarian food only though I am not knowing if cooks are Brahmins. I am also constantly remembering Reverand Grand mother’s advice and strictly avoiding American women and other unhealthy habits . . . (पृ. ३२८)
पुस्तकात योग्य स्थळी नंदा खरे यांचे ऋण मान्य करणे क्रमप्राप्तच आहे. पण प्रास्ताविकातही ताजा कलम जोडून विशेष आभारात त्यांची नोंद करायला त्या चुकत नाहीत. नागपूरच्याच माग्रसचे ‘सूत्रधार श्री. सुधीर देव या आजारात नेमाने मला पत्रे, शुभेच्छाकार्ड, छोटे-मोठे धनादेश, कधी विनोदाचे तर कधी कवितांचे पुस्तक पाठवून मुडात ठेवायला बघत’ (पृ. २०७). असे ऋणमोचन पुस्तकाचा आकृतिबंध (form) ठरवून गेले. त्याचे असे झाले की, मुंबईत माहीम येथे वृद्धाश्रम चालवणाऱ्या श्री. गोहिलांनी वार्धक्यशास्त्राचा किडा लेखिकेच्या डोक्यात सोडला होता. त्या वार्धक्य-शास्त्राचा अधिक अभ्यास करण्यासाठी लेखिका एक शिष्यवृत्ती मिळवून अमेरिकेत ओरेगॉन राज्यात मन्मॉथ येथे गेलेल्या. एके दिवशी पोहणे झाल्यावर एकाएकी पायात वाम आले. तोपर्यंत क्रम्प म्हणजे काय ते माहीत नसणाऱ्या लेखिकेला डॉक्टरांनी—-उपचारकांनी तुमच्या दोन्ही किडन्या नाकाम झाल्या आहेत हे ऐकवले. पन्नाशीला पोचायचेच असलेल्या या निरोगी उत्साहमूर्तीला हा वज्राघात होता. ही गोष्ट एप्रिल १९९१ ची. इष्टमित्रांनी अवसान पुरवले पण तुझ्या देशातला—-‘युवर सपोर्टग्रूप इज युवर पॉवर, गो होम अँड फाइट द डेव्हिल विथ इट’ हा मैत्रिणीचा सल्ला पटल्यामुळे हा खेळाडू तंबूत परतला. जुलायमध्ये भारतात परतल्यावर डिसेंबरपर्यंत नाना चाचण्या, आयुर्वेद, निसर्गोपचार, होमिओपॅथी, अमुक पॅथी तमुक पॅथी असे करण्यात वेळ गेला. शेवटी ठरले की कृत्रिम रक्तशुद्धीकरण (डायलिसिस) आणि ‘मूत्रपिंड रोपण’ (किडनी ट्रान्सप्लाण्ट) हेच दोन पर्याय नाहीतर मरण वाढून ठेवलेले.
जागतिक कीर्तीचे युरॉलॉजिस्ट डॉ. अजित फडके त्यांचे लांबचे भाऊ. त्यांच्या सल्ल्यानुसार ८ महिनेपर्यंत डाकॅलिसिसचे दिव्य पार करून शेवटी १४ ऑगस्ट १९९२ रोजी किडनी ट्रान्स्प्लांट करून घेणे झाले. शरीर बाह्य घटकांना प्रतिकार करते. ही त्याची मूळ प्रतिकारशक्ती क्षीण करण्यासाठी त्याच्यावर औषधांचा मार्गी केला जातो. त्यामुळे एरवी मामुली असणारी सर्दो पडश्याची दुखणीही जीवघेणी बनू लागतात. खच्ची केलेल्या प्रतिकारशक्तीमुळे त्याना एकापेक्षा एक दुर्धर दुखण्यांना तोंड द्यावे लागते. मूत्रपिंडरोपण होऊन पुनर्जन्म झाल्यावर सुरू झाले किंवा वाढलेले आजार अॅनिमिया, न्युमोनिया, हिपेटायटिस बी (काविळीचा आघात) मधुमेह, पक्षाघात, मोतीबिंदू, कर्करोग (१), हिपेटायटिस सी, रक्तदाब, पित्ताशयाचे उच्चाटन, दंतरोग, ग्लौकोमा, डायलिसिस आणि रोपण हे तर मुख्य. त्यामुळे लेखिका म्हणते ‘माझ्या वाढदिवसाऐवजी (१४ नोव्हेंबर १९४३) पुनर्जन्मदिवसापासून (१४ ऑगस्ट १९९२) मोजल्यास आज मी अष्टवर्षीय बालिका आहे. आणि माझ्या पाच मेजर अवयवांपैकी तीन दुरवस्थेत आहेत. (पृ. दहा)’
याप्रमाणे रोजच मरायची तयारी ठेवून आणि अंतर्गत अपंगत्वाचा स्वीकार कस्न लेखिकेला जी एक जीवनसरणी साकारावी लागली तिची हकीकत ‘हसरी किडनी’ मध्ये आहेच, पण आणखी काही आहे. तो आहे आत्मशोध. आत्मपरीक्षण. आयुष्याचा अर्थ लावायची अनिवार्यता.
धर्म-कर्म, व्रत-वैकल्य न मानणाऱ्या पाखंडी विवेकवाद्याला कोणती उपासना, ए फ्री मॅन्स वर्शिप म्हणून ग्राह्य आहे हे स्वानुभवाच्या बळावर लेखिकेला शोधायचे आहे, आपल्या वाचकांना सांगायचे आहे. या दृष्टीने हे पुस्तक असाधारण आहे. एकमेव आहे.
व्यक्तिस्वातंत्र्य हा विवेकवादाचा प्राण आहे. ज्याचा निर्णय त्याने घ्यावा, हा व्यक्तिस्वातंत्र्याचा सोपा अर्थ. याचा धडा पद्मजाला जन्मदात्यांकडून मिळालेला. लहान-पणी नववीत असताना एक दिवस शाळेत जायचा कंटाळा आला. “आई, आज शाळा बुडवू का?” आई म्हणाली, “तू आता पुरेशी मोठी आहेस. अभ्यास किती झाला, न गेल्याने नुकसान किती होणार याची कल्पना तुलाच असणार. तुझा तू निर्णय घे. एक का चार दिवस घरी राहीनास.’ हा किस्सा सांगून लेखिका म्हणते, ‘एका दिवसाच्या वर माझी बुट्टी लांबली नाही.’
व्यक्तिस्वातंत्र्याच्या तत्त्वातून दुसरे तत्त्व निष्पन्न होते स्वाधार. आपल्याला वाटते त्यापेक्षा माणसाची स्वतःला आधारभूत होण्याची, सभोवतालच्या जगातून आधार कमावण्याची कुवत अफाट असते. काल्पनिक, अर्धकाल्पनिक आधारांवर अवलंबून राहण्यापेक्षा आयुष्याची निरर्थकता मान्य करण्यात शहाणपण आहे. मानव-जीवनातील अन्याय्य व्यवस्था लाईफ इज अनफेअर हे सत्य, कठोरपणे स्वीकारणे भाग पडते. श्रद्धावान माणसेही ईश्वरेच्छेला मध्ये घालून शेवटी हेच करतात. __पोथ्या पुराणांच्या, धर्मग्रंथांच्या अपुऱ्या उत्तरावरच समाधान मानावे लागणार असेल तर आपणच आपली आधारवचने घडवली पाहिजे, निवडली पाहिजेत. अशा निर्णयावर लेखिका आली आहे. त्या म्हणतात, “मी नास्तिक नाही, पण धार्मिकही नाही. त्यामुळे रिफ्लेक्स म्हणूनही ‘देवा रे!’ तोंडून निघत नाही.’ (पृ. २०)
धर्म मानत नाही, देवही नाही मग त्या, ‘नास्तिक नाही’ असे का म्हणतात. नास्तिक शब्दाचा दुसराही एक अर्थ तत्त्वज्ञानात असतो. नास्तिको वेदनिंदकः । वेदप्रामाण्य जो मानत नाही तो नास्तिक. पण पद्मजाला हा अर्थ अभिप्रेत नसावा. दुसऱ्या एका ठिकाणी आपल्या वडिलांकडून घेतलेल्या पंचमूल्यांच्या संस्काराचा तपशील त्यांनी दिला आहे. (१) Sceptic Mind (२) Intellectual Honesty (३) Consistency (४) Empathy and (५) Atheism. वामन आबाजी मोडक या मुंबई बॉम्बे युनिव्हर्सिटीच्या पहिल्या पदवीधरांपैकी एक—-या मूळ पुरुषापासून पद्मजाचे वडील वसंतराव मोडक तिसरे, पद्मजा चवथी आणि मुले पाचवी—-अशा पाच पिढ्या पाखंडी निघाल्या असे त्या तेथे स्पष्ट नोंदवतात—-वडिलांनी ‘पुरविलेले मूलाधार मला आणि माझ्या कुटुंबीयांना आत्यंतिक अनुभवांना तोंड देताना निदान कमी पडले नाहीत’२ अशी ग्वाही त्या देतात. ‘माणसे मुळात चांगलीच असतात. वाईट विकृत माणसेसुद्धा सतत आणि सगळ्यांशी वाईट वागत नसतात . . . असे माझे अनुभवजन्य मत आहे’ (पृ. १७) असा विश्वास त्यांना सिनिक होऊ देत नाही. “दैवी शक्तीपेक्षा माझ्यातल्या आणि माझ्या सांगातींमधल्या वेड्यावाकड्या माणुसकीवर माझा विश्वास आहे” (पृ. २९०) असे त्या जतावतात. मनुष्यजीवनातली ही भावात्मक बाजू त्या स्वीकारतात. म्हणून बहुधा आपण नास्तिक नाही असे म्हणत असाव्यात.
मित्र-मैत्रिणींचे अतोनात लोकबळ लाभल्याबद्दल त्या कृतज्ञ आहेत. एके ठिकाणी त्या म्हणतात ” ‘अनकंडिशनल लव्ह’ असते का, असावे का, मला माहीत नाही. अनकंडिशनल सपोर्ट मात्र मी अनुभवला.” (पृ. ८४) सर्व संकटकाळात आपल्याला ‘सयामी साथ’ पुरवणाऱ्या दीपा गोवारीकर यांचे ऋणवर्णन त्यांनी पुस्तकात जागोजागी केले आहे. तरी ते पुरेसे ठळकपणे झाले नाही याची खंत त्यांनी ‘घडाभर तेल’ या प्रास्ताविकात केली आहे. (पंधरा) सबंध गोवारीकर कुटुंब, तिघेही गोवारीकर बंधू, गाझियाबाद (दिल्ली)ची बालमैत्रीण कुंदा बनसोरे यांच्या मैत्रीची गाथा तर कुंदाष्टक म्हणावी अशा शैलीत ‘मनाचे लोक’ या प्रकरणात त्यांनी गायली आहे. पुस्तकाच्या बाळंतपणाबरोबरच लेकीच्या माहेरपणाचाही पत्कर आपणहून घेणाऱ्या विद्या विद्वांसांबद्दल लिहिताना त्यांची लेखणी अशीच हळुवार होते. सबंध पुस्तकात मित्र ऋणाचा इतका निर्देश जागोजाग जाणीवपूर्वक केला आहे की त्याला ‘मैत्रायण’ असे तिसरे उपशीर्षक द्यायला काही हरकत नसावी. श्रुत-योजनाची (allusion) त्यांना इतकी हौस आहे की, ‘मित्रसहस्रनाम’ हा शब्दप्रयोग त्यांना कसा सुचला नाही याचे नवल वाटते. बहुधा त्यात धार्मिक गुणार्थ (connotation) जरा जास्त आहे म्हणूनही ते टाळले असावे. मात्र आपले पति ‘शशिकांत’ या सहस्रनामाच्या धन्याला त्यांनी शेवटचे नाव दिले ते आहे डांके शोन जर्मन भाषेत Danke Shoen चा अर्थ होतो, Thank You!
स्वतः पद्मजानेही आपल्या ‘मजेत’ या टोपणनावाची उपपत्ती सांगितली. तिसरे ‘रोज मरे’ (Rose Murray) हे नाव कसे घेतले तेही वाचण्यासारखे आहे. पद्मजा हे नाव अमेरिकनांना उच्चारता येईना म्हणून व्हर्जिनियाने त्याचा सोपा संक्षेप ‘मजेत’ असा, फ्रेंच शब्दाने करून दिला. पद्मजा एके दिवशी शर्वरी या आपल्या कन्यकेला सांगते, “मी आता तिसऱ्यांदा नाव बदललेय . . . पद्मजाला काही होत नाही; ‘मजेत’ही मजेत असते; जे काय होते ते त्या ‘रोज मरे’ ला!” या विनोदबुद्धीमुळे पद्मजाने कधी आपला Joy of Existence गमावलेला नाही. आपल्याला गावलेला आयुष्याचा अर्थ पद्मजाने असाच हसत खेळत सांगितला आहे. कलावंतासारखे लेखणीचा कुंचला करून हे जीवनभाष्य तर्ककर्कश युक्तिवादांनी ‘साध्यं सिद्धम्’ असे मांडलेले नाही तरी आपल्याला अंतर्मुख करण्याची शक्ती त्यात आहे. एकच उदाहरण सांगतो कधीकधी मृत्यूच्या काठावर उभ्या असलेल्या रुणाला शब्दांची जरूरी असते अन् स्पर्शाचीही, हे सांगून लेखिका म्हणते “मुलांपासून बालमैत्रिणींपर्यंत कोणीच म्हणेना—-तू मरायचे नाही, तू आम्हाला हवी आहेस . . .” (मग) “मी माझ्या भोवतालच्या उमद्या माणसांच्या उमद्या वाक्यांचेच हिरवे कोंब करून घेतले” (पृ. २९६) नेहमीप्रमाणे चाटूक्तीची उलटापालट करून त्यांनी सिद्धान्त मांडला की, Water is thicker than blood’. इतर अनेक सुभाषितांसारखे (Blood is thicker than water) हेही प्रत्येकाने स्वतःच्या मनाशी तपासून पाहावे (पृ. २०७). संस्कृत सुभाषितांबद्दल पद्मजाची तक्रार आहे की ती अर्धसत्य असतात—-त्यांच्यात संदिग्धता असते. मात्र स्वतः तिला उकितांबद्दल (उक्ती–quotations) अनिवार हौस दिसते. त्याबाबतीत तिने लहान थोर भेद केला नाही. सर्वत्र बालादपि सुभाषितं ग्राह्यम् ही वृत्ती ठेवली आहे. त्यामुळे रसेल-काम, नॉर्मन कझिन-बी सीगल यांच्या बरोबर म.द. हातकणंगलेकर, रविन थत्ते, सदूकाका यांची हजेरी लावली आहे. ‘मी विसरा’ या आध्यात्मिक सांगीचा भावार्थ डॉ. रविन थत्ते सांगतात “तुमच्या ‘मी’ ला योग्य जागी ठेवून, प्रॉपर पस्पेक्टिव्हमधून पाहा.’ (पृ. अकरा). योग्य जागी म्हणजे कोठे आणि कोणता पस्पेक्टिव्ह प्रॉपर याचा बोध होण्यात आमच्या-सारख्या वाचकाला अनंत अडचणी दिसतात. तसेच म. द. हातकणंगलेकरांच एक वाक्य “आयुष्य ही वृत्तीने घ्यायची गोष्ट आहे” त्याबद्दल हे तमाम तात्पुरत्या आणि व्यापक, अटळ आणि न सुटणाऱ्या प्र नांना एकच समग्र उत्तर ठरण्याची त्याची ताकद मला जाणवली’ (पृ. ९२) असे त्या म्हणतात तेव्हा कमी कविमनाचा वाचक बुचकळ्यात पडतो. येथे थत्ते, हातकणंगलेकरांबद्दल मला मुळीच अनादर नाही, असायचे कारण नाही, हे आवर्जून सांगितले पाहिजे.
कविमनाच्या पण एका विवेकवादिनीचे हे जीवनभाष्य आहे असे वर जे म्हटले ते यामुळेच.
१६, शांतिविहार, चिटणवीस मार्ग, सिव्हिल लाइन्स, नागपूर — ४४० ००१