नव्हें २००१ च्या आ.सु.च्या अंकात ललित गंडभीर यांनी लिहिलेला ‘मातृत्व’ हा विचारांना चालना देणारा लेख वाचला. त्यावर सुचलेले काही विचार असे —-
मातृत्व म्हणजे काय केवळ मुलांना जन्म देणे? पालनपोषणही त्यात येते का? वडलांचा त्यात किती भाग असावा? मुलांचे संगोपन करत असताना मातेची बौद्धिक भूक कशी पुरी करावी? आजच्या समाजाला पडलेल्या प्र नांपैकी हे काही प्र न आहेत.
आपण काळात मागे जाऊन आपला समाज कसा उत्क्रांत झाला ते थोडक्यात पाहू. माणूस पाचेक लाख वर्षात अग्नीपासून अग्निबाणापर्यंत कसा पोचला याची कहाणी नाट्यमय आहे. पण आज धोका संभवत आहे की या सर्वाने दिपून जाऊन माणूस विसरेल की झिलईदार पृष्ठमागाखाली तो एक कपीच आहे. त्याच्या आणि इतर कपींच्या DNA त फक्त २-३% च फरक आहे. तो उत्क्रांतीचा एक नवा प्रयोग आहे, आणि नवी ‘मॉडेल्स’ खूपदा सदोष असतात. जेनेटिक सुधारांच्या खूप पुढे धावणारे सांस्कृतिक बदल, हे या दोषांचे मूळ कारण असेल.
पुरुषांचे गट शिकारीला निघत तेव्हा त्यांच्या मागे राहिलेल्या स्त्रिया इतर कोणत्याही पुरुषांच्या आकर्षणाला बळी पडू शकत. यावर उपाय म्हणजे सामाजिक वागणुकीत एका जबरदस्त युगुल-बंधनाची घडण होणे. अशा बंधनाने सशक्त पुरुषां-मधील लैंगिक स्पर्धा सौम्य होऊन सहकार वाढला. सावकाश वाढणारी अपत्ये सांभाळण्याचे जड काम करण्यासाठी घट्ट विणीच्या कुटुंबाची गरज असते. इतर प्राण्यांमध्येही एका पितराला न झेपणारे संगोपनाचे ओझे वाहण्यास पिल्ले होण्याच्या व वाढण्याच्या काळात घट्टपणे युगुले बांधली जाताना दिसतात. मासे, पक्षी, सस्तन प्राणी, साऱ्यांमध्ये हे आढळते. माणूस हा एकच प्राणी असा आहे की तो वर्षभर कामव्यवहार करतो, व ठराविक असा जननाचा ‘मौसम’ पाळत नाही. मजबूत युगुल-बंधनाची ही आणखी एक निकड असते. मानसशास्त्रज्ञ असेही सांगतात की पुरुषांना त्यांच्या जोडीदारात आईचे स्प दिसते—-युगुल-बंधनाला मजबुती देणारा हा आणखी एक घटक.
माणसांची क्लिष्ट आणि तरल तंत्रज्ञानावर आधारलेली संस्कृती नव्या बाळाच्या पचनी पडण्यास प्रदीर्घ काळ शिक्षण-प्रशिक्षणात जावा लागतो. जर तरुण मुलेमुली जैविकदृष्ट्या जननक्षम होतानाच आपापली कुटुंबे घडवू लागली, तर खूपशा शिक्षणाच्या व प्रशिक्षणाच्या क्षमता वाया जातील. हे टाळण्यासाठी फार लहान वयात मुले न होऊ देण्यासाठी जोरदार सामाजिक दबाव येत असतात. पण दुर्देवाने सांस्कृतिक दबाव माणसांची लैंगिक यंत्रणा थांबवू शकत नाहीत, आणि जर या यंत्रणेला सामान्य वाटेने जाऊ दिले नाही तर त्या यंत्रणा इतर प्रकारांनी व्यक्त होतात. पा चात्त्य समाजातील ‘मुक्त’ लैंगिक व्यवहार, प्रायोगिक सहजीवन-विवाह, हे असे विद्यार्थीदशेत केले जाणारे प्रयोग आहेत. दाट विणींची कुटुंबे महत्त्वाची आहेत, आणि या महत्त्वाकडे दुर्लक्ष केल्याने होणारे परिणाम पुढील तपासण्यांचे निष्कर्ष दाखवतात. “हे एक वि लेषक तथ्य आहे की दोन पितर असलेल्या मुलांचे प्रमाण वाढवले तर एकाच पितराच्या कुटुंबांमध्ये दिसणारे सामाजिक प्र न मंदावतील. अमेरिकनांची विवाहसंस्थेबाबतची अनास्था सामाजिक दुविधा उत्पन्न करते.’ Rutgers विद्यापीठाने राबवलेल्या राष्ट्रीय विवाह प्रकल्पाचा अहवाल सांगतो की अमेरिकेत विवाहसंस्था क्षीण होत आहे. ह्या प्रकल्पाचे संशोधक नोंदतात की अमेरिकेचा ‘विवाह-दर’ कधीही इतका कमी नव्हता. अविवाहित मातांच्या अपत्यांची संख्या दणकून वाढते आहे. घटस्फोटांचे प्रमाण जास्तच राहिले आहे—-आणि अमेरिकन्स पूर्वीइतके सुखी नाहीत. “असा एकही समाज आढळलेला नाही की ज्यात विवाहसंस्था नाही, आणि ज्यात भावी पिढ्यांचे लालनपालन नीटपणे केले जाते,’ असे राष्ट्रीय विवाहसंस्था प्रकल्पाच्या सहसंचालक बार्बरा डॅफो व्हाइटहेड म्हणतात. त्यांचे सहसंचालक डेव्हिड पोपेनो म्हणतात की विवाहसंस्थेची पडझड ही समाजाला महाग न पडणारी निर्विष बाब आहे असे कोणी समजू नये.
विवाह हा ‘सामाजिक डिंक’ बापांना मुलांशी सांधतो. स्त्रीपुरुष आणि मुलांचे शारीरिक, भावनिक आणि आर्थिक आरोग्य यांना मदत करून विवाहसंस्था राष्ट्राचेच आरोग्य सांभाळते. उत्क्रांतिमानसशास्त्रज्ञ सांगतात पुरुष स्त्रियांच्या तुलनेत स्पर्धावृत्तीचे, लैंगिक सहकाऱ्यांबद्दल कमी चोखंदळ, आणि जास्त बाहेरख्याली असतात. ते धाडसी, संधीसाधू, एकारलेला विचार करणारे आणि श्रेणीबद्धता आवडणारे असतात. टोळीच्या आणि भूमीच्या रक्षणासाठी हे गुण आवश्यकच असतात. स्त्रिया सहकाऱ्याच्या निवडीबाबत जास्त विचारी, गुणग्राहक अशा असतात, ज्यामुळे जातिसातत्य (survival of the species ) साधले जाते. स्त्रियांना आणि पुरुषांना सारखीच कौशल्ये असतात, पण स्त्रियांमध्ये स्पर्धावृत्ती आणि महत्त्वाकांक्षा पुरुषांपेक्षा सौम्य असतात. हे बालसंगोपनाला पोषक असे सर्वस्वी जेनेटिक गुण आहेत. स्त्रिया आणि पुरुष यांमध्ये हे मूलभूत फरक असल्याने आणि दोघांच्या भूमिका एकमेकांना पूरक असल्याने त्यांनी एकमेकांची बरोबरी साधण्याचे प्रयत्न करणे योग्य नाही. लिंग जीन्समुळे ठरते आणि म्हणून लिंगभेद राहणारच.
इथे वैद्यकशास्त्राचे निष्कर्ष पाहणे उपयुक्त ठरेल. कॉर्नेल विद्यापीठाची प्राध्यापक सिंडी हेझनने पाच हजार मुलाखतींचे वि लेषण केले. यातील व्यक्ती सदतीस भिन्न सांस्कृतिक गटांतील होत्या व त्यांच्या वैद्यकीय तपासण्याही केल्या गेल्या होत्या. या वि लेषणाने ‘रोमॅटिक’ आदर्शाला आव्हान देत असे दाखवले की जैविक आणि मानसिकदृष्ट्या स्त्रीपुरुष १८ ते ३० महिनेच ‘प्रेमात पडलेले’ असतात. हा काळ भेटणे, जुगणे व अपत्य पैदा करणे यांसाठी पुरेसा आहे. त्यानंतर मात्र धडकती हृदये आणि घामेजणाऱ्या तळव्यांसोबत येणारे प्रेमाचे भरते उत्क्रांतीच्या (जाति-सातत्याच्या) दृष्टीने निस्मयोगी असते. हेझन म्हणते, “प्रेम हा सामाजिक ‘कंडिशनिंग’ने उत्प्रेरित होणाऱ्या मेंदूतील जैवरसायनांच्या संचाचा परिणाम आहे, याला जास्तजास्त पुरावा मिळत आहे.”
प्रियाराधनाच्या सुरुवातीलाच फक्त उद्दीपित होणारा हा रसायनसंच असा—- (१) डोपामीन, जे मध्यवर्ती मज्जासंस्थेला उद्दीपित करते; (२) फेनाइलथायामीन हेही मज्जा-उद्दीपक आहे; (३) ऑक्झिटोसीन, जे यूटेरसचे आकुंचन आणि दूध घडवण्यात मदत करणाऱ्या हॉर्मोनच्या रूपात पिट्यूटरी ग्रंथीत साठवले जाते. पण ज्याप्रमाणे दारुड्यांना हळूहळू कमी प्रमाणात प्यायलेली दारू ‘चढेनाशी’ होते, तसेच ‘उत्साही’ प्रेमीही या रसायनांच्या परिणामांना सरावतात. दोनेक वर्षात या रसायनांचा परिणाम संपून माणसे ‘सामान्य’ होतात, असा हेझनचा निष्कर्ष आहे.
या दोनेक वर्षांत प्रेमी जोडपे ‘भंगलेले’ तरी असते किंवा स्थिरावून त्यांचे ‘प्रेम’ हे केवळ सवयीच्या रूपात परिवर्तित झालेले असते. या चित्रात मुलेही असली तर हे सरावणे जास्त प्रकर्षाने जाणवते. कधी नव्याने अपत्ये होण्याची इच्छा झाली तर ही रसायने पुन्हा एकदा कार्यरत होतात; पण हे तसे दुर्मिळ निरीक्षण आहे. काही जणांना मात्र हा रसायनसंच वारंवार अनुभवण्याचे व्यसन जडते. मग ते खरेच प्रेमात पडतात—-किंवा रसायने त्यांना तसे भासवतात. किशोरवयात (teenage) आयुष्यातली पोकळी भरून काढण्यासाठी घडणारी प्रेम ही एक मनोविकृती आहे (psychosis), पण ती इतरही वयात घडू शकते. तीनेक वर्षे एकत्र घालवल्यावर प्रेमाची जागा स्नेहभाव घेतो. आणि दीर्घकाळाच्या विचारात तो भावच जास्त महत्त्वाचा असतो.
जोडप्यांनी एकदोन वर्षे एकत्र काढून आपले एकमेकांशी जुळते का हे ठरवूनच कुटुंब वाढवण्याचा विचार करावा. जरी पहिला प्रेमाचा ‘जोर’ ओसरला, तरी वेगळ्या शब्दाने जोडप्याच्या एकत्रपणाच्या मर्माचे वर्णन करता येईल. कंटाळा घालवायचे इतरही मार्ग लोक शोधतातच.
एका ब्रिटिश मानसशास्त्राच्या मते आपल्या बाळांशी दाट विणीचे संबंध घडवायला ज्यांना जड जाते अशा स्त्रियांचे प्रमाण पा चात्त्य औद्योगीकरण झालेल्या देशांमध्ये सामान्य अपेक्षेपेक्षा जास्त आहे. अगदी टोकाच्या घटनांमध्ये तर यातून मुलांचे मृत्यूही होतात. बाल आणि तरुणांच्या मानसोपचारासंबंधीच्या हांबुर्गमधील एका परिषदेत इयान ब्रॉकिंग्टन हा मानसोपचारतज्ञ म्हणाला, “आईचे अपत्यप्रेम आनुवंशिकतेने येत नाही, तर त्यासाठी कठोर प्रयत्नांची गरज असते.” बर्मिंगहॅममध्ये १९७५ पासून तो दवाखाना चालवत आहे व त्याला अपत्यप्रेम जड जाणाऱ्या अनेक स्त्रिया भेटतात. जर मूल ‘नियोजित’ नसेल तर कधीकधी गर्भारपणातच अपत्य त्याज्य वाटू लागते व स्त्रिया भ्रूणाला इजा व्हावी म्हणून स्वतःच्याच पोटावर मारून घेतात. त्यांना अपत्याविषयी आपलेपणाची भावना न जाणवता भ्रूण हा पोटात वाढणारा कॅन्सर वाटू लागतो. पण ब्रॉकिंग्टन सांगतो की सामाजिक सल्लागारांची चर्चा, आईने व मुलांनी एकत्र खेळण्याचे उपचार (therapy) यातून जवळपास निरपवादपणे असे दुरावे दूर करता येतात.
मानसोपचारतज्ञ सांगतात की मुले व तरुण यांच्या मनोविकारांचे एक कारण आई-बाप-मुले अशा ‘न्यूक्लिअर’ पारंपारिक कुटुंबाचा -हास हे आहे. जर्मनीत (उदाहरणार्थ) ४० टक्के शालापूर्व मुले एकाच पितरासोबत राहतात.
मानवेतर प्राण्यांच्या अभ्यासातूनही यावर प्रकाश पडतो. जर लोकसंख्यावाढीमुळे दाटी वाढत गेली, तर एका टप्प्यावर सर्वच सामाजिक रचना (संस्था) कोलमडतात. आजार, अपत्यांना मास्न टाकणे, मारामाऱ्या, स्वतःला इजा करून घेणे, असे सारे घडू लागते. अखेर इतके मृत्यू होतात की दाटी आटोक्यात येते—-मधला काळ मात्र पराकोटीच्या हाहाकाराचा असतो. आपली जीवजातही अशा विकृत दाटीच्या जवळ पोचते आहे. आपण स्वस्थ राहणे आता परवडण्यातले नाही.
एकूण चित्र असे आहे की मानवजात आपल्या मूलभूत जैविक प्रेरणांशी एकनिष्ठ राहिली आहे आणि कल्पनातीत वाटावीशी तंत्रवैज्ञानिक प्रगतीही या निष्ठेला ढळवू शकलेली नाही. माणसांची सामाजिक-लैंगिक वर्तनपद्धती जवळपास अबाधित राहिली आहे. विज्ञान-काल्पनिकांमध्ये वर्तवलेली ‘भाकिते’—-बालक-शेती, सामूहिक कामव्यवहार, निवडक व्यक्तींनाच प्रजननाचा हक्क देणे, शासकीय नियंत्रणाने श्रम-विभागणी करणे, इ. खरी ठरलेली नाहीत. आजही अंतराळवीर यानातून अवकाशात झेपावताना आपल्या बायकोमुलांचीच छायाचित्रे खिशात ठेवतो. पण बर्दाड रसेल ‘मॅरेज अँड मॉरल्स’ या ग्रंथात म्हणाला, “जसजशी माणसे जास्त सुसंस्कृत होत जातात तसतशी एकाच जीवनसाथीसोबत जगण्याची त्यांची क्षमता घटत जाताना दिसते.” आपण इतर प्राण्यांसारखेच उत्क्रांत झालो आहोत. जास्तीत जास्त (टिकाऊ) प्रजा मागे सोडणे, या एकाच खेळात जिंकण्यासाठी आपण घडत आलेलो आहोत. या घडणीच्या खुणा आपल्या मनांमध्ये खोलवर रुजलेल्या आहेत. पण आपण उच्च नैतिक ध्येये धुंडाळून त्यांजकडेही प्रवास करत असतो. ही ध्येये आपल्यात खोलवर रुजलेल्या डार्विनीय (उत्क्रांतिदत्त) ध्येयांशी सुसंगत नसतात. अशा दोन ध्येयांमध्ये नैतिक निवड करणे, हे मनुष्यप्राण्याचे इतर जनावरांच्या संदर्भात सर्वात नवी वाट चोखळणे असेल. पाहू या, मानवजातीला ह्यात किती यश येते ते.
८ कांचनयश, धंतोली, नागपूर ४४००१२