[शिवसेनेचे नेते आनंद दिघे ठाण्याजवळ एका अपघातात जखमी झाले. इस्पितळात उपाय योजना होत असतानाच ते वारले. ह्यात वैद्यांचा हलगर्जीपणा आहे असे मत बनवून शिवसैनिकांनी ते अद्ययावत खाजगी इस्पितळ नष्ट केले. ह्या घटनेबद्दल डॉक्टर जोशी लिहितात . . .]
वैद्यकक्षेत्रातील लोक व इतर विचारवंत यांनी शिवसैनिकांचा फक्त निषेध करणे पुरेसे नाही. सामाजिक विकृती व त्यांवरील उपाय शोधणे व ते अंमलात आणणे हा वैद्यकीय पेशांचा हेतूच असायला हवा.
काही वर्षांपूर्वी आजचा संतप्त भारतीय या मथळ्याच्या एका (मासिकातील) लेखात असे सुचवले होते की सामाजिक राग व असंतोषाचे नियमन करणाऱ्या पारंपारिक ‘सुरक्षा झडपा’ नष्ट होत असल्याने आजचे तणावपूर्ण जीवन हिंसाचाराच्या उद्रेकांपर्यंत जाऊन पोचते. जुलाय–सप्टेंबर ९६ मध्ये दिल्लीच्या द इंडियन जर्नल ऑफ पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन ने ‘मुक्तीचे धोरण व सामाजिक चिंता’ (‘लिबरेशन पॉलिसी अँड सोशल कन्सर्न’) नावाचा विशेषांक काढला होता. त्यात म्हटले होते की “स्त्रिया व भूमिहीन मजूर, मग ते ग्रामीण असोत की नागरी, हे सध्या सर्वाधिक त्रासात आहेत. उधळ्या समारंभांची बकाली, सामाजिक जीवनातील हावरटपणा, स्वाभिमान आणि स्वावलंबनाच्या भावनांचा -हास, अपार विषमता, या साऱ्या बाबी लोकांच्या भावना-सद्भावनांना सतत आणि तीव्रपणे खटकतात. राजकारणाचे गुन्हेगारीकरण, गुन्हे जगताचे राजकीयीकरण आणि दोघांचेही व्यापारीकरण ह्या साऱ्यांबद्दल सामान्य माणसांच्या मनात घृणा उत्पन्न झाली आहे.” मी अशी आशा करतो की समाजशास्त्री नव्या आर्थिक धोरणांच्या सामाजिक परिणामांचा सर्वांगांनी विचार करतील आणि या प्रकारच्या (दिघे-प्रकरण) उद्रेकांवर इलाज शोधतील.