(नोम चोम्स्की |Noam Chomski] हे मॅसॅच्युसेट्स तंत्रविज्ञान संस्थेत भाषाविज्ञानाचे प्राध्यापक आहेत. अमेरिकन परराष्ट्रधोरणाचे परखड टीकाकार म्हणून त्यांची कीर्ती आहे. ११ सप्टेंबर २००१ च्या घटना आणि त्यांचे संभाव्य पडसाद याबद्दल बेलग्रेडच्या एका रेडिओवाहिनीने चोम्स्कींची मुलाखत घेतली. तिच्यातील काही उतारे टाईम्स ऑफ इंडियाने २४ सप्टेंबर २००१ ला प्रकाशित केले. त्यांचा हा सारांश —-) तुम्हाला हल्ले का झाले असे वाटते?
ओसामा बिन लादेनला वाटते की १९९० मध्ये अमेरिकेने सौदी अरेबियात तळ स्थापणे, ही रशियाने अफगाणिस्तानावर केलेल्या आक्रमणाचीच आवृत्ती होती. मुळात इस्लामी धर्मस्थळे असलेल्या धर्मसंरक्षक सौदी अरेबियावरच्या या अतिक्रमणा-नंतर ओसामा आणि त्याचे ‘अफगाण’ साथी अमेरिकाविरोधी झाले. त्या भागातल्या राजवटी ओसामाला भ्रष्ट, जुलमी आणि इस्लामशी फटकून असलेल्या वाटतात. ह्या तालिबाननंतर सर्वांत कट्टर मूलतत्त्ववादी समजली जाणारी सौदी राजवटही येते. अमेरिकेने या राजवटींना मदत करणे ओसामाला आवडत नाही. इस्रायली सेनेने पस्तीस वर्षे चालवलेले पॅलेस्टाईनवरचे आक्रमणही अमेरिकेच्या मदतीनेच चालू आहे. कुर्दी बंडखोरांवर विषारी वायूने हल्ले करणारा इराकचा सद्दाम हुसेनही अमेरिकेचा मित्रच होता. नंतर इराक मधले लाखो नागरिक उद्ध्वस्त झाले तेही अमेरिका-ब्रिटन युतीच्या हल्ल्यांमुळेच. गरीब आणि जुलूम सहन करणाऱ्या बहुतांश लोकांत ह्या साऱ्यामुळे कडवटपणा उपजतो. त्यातून निघालेल्या वैफल्यातून आणि संतापातून हे हल्ले घडले. अमेरिकेला आणि पा चात्त्य देशांना मात्र या कहाणीची एक वेगळी, ‘सुखावह’ आवृत्तीच स्वते. दोन्हीकडच्या कठोर आणि पाशवी वृत्तीच्या लोकांना हे वाढते हिंसाचक्र आवडते, हे बाल्कन घटनांमधून दिसलेच आहे. अमेरिकेच्या अंतर्गत धोरणांवर याचा काय परिणाम होईल?
आम्हाला मदत करा नाहीतर नाशाला तयार व्हा, अशी निवड करायला अमेरिका सांगते आहेच. ह्या हल्ल्यांशी संबंधित कोणाही व्यक्तीवर किंवा देशावर शक्तीचे प्रयोग करायचा अधिकारही काँग्रेसने राष्ट्राध्यक्षांना दिलाच आहे. कोण गुंतले आहे या हल्ल्यात, हेही राष्ट्राध्यक्षानेच ठरवायचे आहे. हेच सूत्र निकाराग्वाने वापरलेले ह्या लोकांना (अमेरिकन काँग्रेस) चालले असते का? जागतिक न्यायालयाने अमेरिकेला निकाराग्वावरचा ‘बेकायदा बलप्रयोग’ थांबवायला सांगितले होते. (यूनोच्या) सुरक्षा परिषदेनेही न्यायालयाचे आदेश सर्वांनी पाळावे असा ठराव पारित केला होता. आणि तो (अमेरिकेचा निकाराग्वाविरुद्धचा) दहशतवाद ह्या हल्ल्यांपेक्षा खूपच विनाशकारी होता. तुम्हाला अमेरिकेचे बाकी जगाबाबतचे धोरण मूलतः बदलेल असे वाटते का? अमेरिकेचा पहिला प्रतिसाद तरी तीच द्वेषमूलक धोरणे तीव्र करण्याचा होता. सर्वांत युयुत्सू गटाची धोरणे वापस्न देशांतर्गत सैनिकीकरण वाढवून सामाजिक सुविधा कमी करण्याचाच प्रतिसाद होता. हे अपेक्षितच होते. हिंसेचे चक्र नेहेमीच सर्वांत दमनकारी कृत्यांकडे जात असते. पण असे होणे अटळच आहे असे नाही. पहिल्या आघातानंतर लोक अमेरिकन प्रतिसादाला भीत आहेत. तुम्हाला ही भीती वाटते का?
प्रत्येक शहाण्या माणसाने भ्यायलाच हवे. आज हल्ल्यांना मिळालेला प्रतिसाद ओसामाला वरदान वाटला असणार. हिंसाचाराचे चक्र नेहेमीच्याच वाटांनी पण खूपच जास्त प्रमाणात फिरेल. आजच अमेरिकेने पाकिस्तानला भूकमरीच्या जवळ असलेल्या अफगाणांची रसद तोडायला सांगितले आहेच. हे घडले तर दहशतवादाशी कसलाही संबंध नसलेले लक्षावधी लोक मरतील. अमेरिका पाकिस्तानला लक्षावधी तालिबानग्रस्तांना मारायला सांगते आहे. हा सूडही नाही, तर त्यापेक्षा खूप खालच्या नैतिक स्तरावरची क्रिया आहे. अमेरिका ह्या शक्यतेचा (निरपराधांचे मरण) उल्लेखही जाताजाता, कुठलीही टीकाटिप्पणी न करता करत आहे. त्यामुळे अनेकांच्या ते लक्षातही येणार नाही. (जवळपास अनुल्लेखाने मारण्याचा हा प्रकार.) मला खात्री आहे की अमेरिकन जनतेला त्यांच्या नावाने होत असलेल्या कृतींची चाहूल जरी लागली तरी ते भीतीने आणि घृणेने ग्रस्त होतील. इतिहासाकडे पाहणेही उपयुक्त आहे. पाकिस्तानने अमेरिकनांना हवे तेच केले (तर तालिबान्यांसारख्या इतर देशांतर्गत शक्तींकडून) तीही राजवट उलथून पडेल, ही शक्यता आहे. आणि ह्या राजवटीकडे अण्वस्त्रे आहेत. ते सगळे भूप्रदेश ग्रस्त होईल, अगदी खनिज तेल-उत्पादक देशांपर्यंत. आपण बहुतांश मानवी समाजाला ध्वस्त करू शकणाऱ्या युद्धाबद्दल बोलत आहोत. ओसामा मारला गेला तरी त्याचा आवाज सर्व इस्लामी क्षेत्रांत ध्वनिफिती दृश्यफितींमधून गुंजत राहील. शहीद म्हणून तो इतरांना स्फूर्ती देणारे दैवत होईल. एक लक्षात घ्या, की वीस वर्षांपूर्वी एका आत्मघातकी ट्रकबाँब चालकामुळे जगातील सर्वांत मोठे सैन्य लेबनानमधून माघारे आले, कारण त्या ट्रकने एक अमेरिकन सैनिकी ठाणे नष्ट झाले. ११ सप्टेंबरने जग बदलेल?
त्या हल्ल्यांची कार्यपद्धती आणि प्रमाण परिचित आहे, पण लक्ष्य मात्र नवे आहे. १८१२ नंतर पहिल्यानेच अमेरिकन भूमीवर हल्ला होत आहे किंवा हल्ल्याची शक्यता आहे. अमेरिकन वसाहतींवर हल्ले झाले आहेत, पण राष्ट्राच्या भूमीवर मात्र नाहीत. ह्या (१८१२ नंतरच्या) काळात अमेरिकेने स्थानिक (रेड इंडियन) लोकांना जवळपास नष्ट केले आहे, अर्धा मेक्सिको जिंकून घेतला आहे, आसपासच्या देशांमध्ये हस्तक्षेप केला आहे, हवाई आणि फिलिपाईन्स जिंकले आहे —- शेकडो फिलिपीनोंना मास्न. गेल्या अर्धशतकात तर जगभर बल वापस्न अगणित लोकांना मारले आहे. आता बंदुका-तोफा उलटीकडे रोखल्या गेल्या आहेत.
प्रमाणाने नव्हे तर लक्ष्याच्या निवडीने ही घटना इतिहासात नावीन्यपूर्ण आहे. आता पा चात्त्य देश काय करतील, हे फार महत्त्वाचे ठरणार आहे. (त्या) श्रीमंत आणि सबळ देशांनी त्यांची शेकडो वर्षांची परंपरा चालवत हिंसाचार केला तर एकूण हिंसाचक्राला गती मिळून गंभीर आणि दूरगामी परिणाम होतील. अर्थातच हे अटळ नाही. जागृत झालेली जनता स्वतंत्र लोकशाही समाजांमध्ये धोरणांना मानवी आणि सन्माननीय दिशा देऊ शकतेच.