[Cheryl Benard ही ऑस्ट्रियन स्त्री विएनातील एका संशोधन-संस्थेची संचालिका आहे. प्रामुख्याने स्त्री प्र नांबाबत जर्मन भाषेत लिहिणाऱ्या या लेखिकेची ‘मर्डर इन पेशावर’ (लेखन १९९८) ही कादंबरी नुकतीच पेंग्विन बुक्स, इंडियाने प्रकाशित केली. मुळात सामान्य गुन्हेगारकथा असलेल्या या कादंबरीत १९९८ च्या जरा आधीच्या पाक-अफगाण सीमेच्या स्थितीचे विवेचन आहे.
मॅलोन ह्या अमेरिकन व्यापाऱ्याला काही कारणाने एका अफगाण निर्वासितांच्या शिबिरात लपावे लागते. तिथे त्याची हमीद या आपल्या आईसोबत राहणाऱ्या सात वर्षांच्या ‘पोरक्या’ मुलाशी मैत्री होते. आता . . .]
हमीदला मॅलोनबद्दल काळजीही वाटते. त्याच्या झोपडीत शस्त्रे नाहीत. एकही शस्त्र नाही. कधीही न ऐकलेली, अतळ अशी ही स्थिती. हमीदला जाणवते की हा नवा मित्र काही अत्यंत खास अशा परिस्थितीत अडकला आहे, पण नेमकी परिस्थिती समजत नाही आहे. खरेच काही फार वाईट मॅलोनच्या हातून घडले असते तर तो वाचू शकला नसता, मारलाच गेला असता.
हा नवा मित्र भित्रा असणार. मोठ्या शरीरात सशाचे काळीज असणार. हमीदच्या माहितीतले सर्व पुरुष अधूनमधून संतापाने, चिडीने हिंस्र होतात. हा नाही ‘स्फोटक’ होत. भित्रेपणा, हत्यारे नसणे, सारे लढाईतून पळपुटेपणाच्या निदानाला बळ पुरवते. ह्या विचाराने हमीद दुग्ध्यात पडतो. लढाईतून पळून येण्याइतके घृणास्पद, नामर्दगीचे इतर काहीच हमीदला माहीत नाही. पण खोलवर कुठेतरी हमीदला मॅलोनबद्दल सहानुभूती वाटते. त्याच्या वयाच्या मुलांनाही धर्मयुद्धात भूमिका । वठवाव्या लागतात. साताठ वर्षांच्या मुलांना मोठे पुरुष खास प्रशिक्षण केंद्रांमध्ये नेतात. कधीकधी त्यांना शहीदही व्हावे लागते. योद्ध्यांच्या आधी या मुलांना भू-सुरुंग (mines) पेरलेल्या क्षेत्रात पाठवतात. सुरुंग फुटला की पोरगा शहीद होतो. बाप आपल्या मुलांनाही अशा शहादतीच्या मार्गावर पाठवतात, पूर्ण सद्भावनेने. बापही शहीद व्हायला तयार असतात, पण ते सुरुंगाने ‘उडले’ तर ते लढू शकत नाहीत. लहान मुले लढू शकत नाहीत. ते मोठ्यांना लढायची संधी देऊ शकतात.
हमीदने शिबिरातल्या बायकांना याविषयी बोलताना ऐकले आहे. बायकांना ही सैनिकी तंत्रे पुरुषांना वाटतात तशी ‘कल्पक’ वाटत नाहीत. बाप साताठ वर्षांच्या मुलांना नेऊ लागतात तेव्हा बायका रडून-भेकून आडव्या येतात. मुलांना मिठ्या मास्न, देवाचे नाव घेऊन, पैगंबराची कन्या फातिमा हिचे नाव घेऊन त्या बापांना मुले न नेण्यासाठी विनवतात. त्या बापांशी भांडायलाही तयार होतात, पण पुरुष त्यांना फटकास्न दूर सारतात. मग या रडणाऱ्या बायकांचे इतर बायका सांत्वन करतात.
[हमीदचा एक वेगळाही अनुभव असा . . .]
मी चुकून तुम्हाला भासवले असेल की हमीदला मॅलोन हा एकच मित्र आहे. असे नाही. तरुणांचा एक मोठा गटही हमीदला जाणतो. नाही, ते हमीदला भू-सुरुंग शोधायच्या कामात भरती करू इच्छित नाहीत. त्यांनाही धर्मयुद्ध चालवायची पद्धत घृणास्पद वाटते. भ्रष्टाचार, भोंदूपणा आणि गटबाजीबद्दल त्यांना तिरस्कार वाटतो. शिबिरातून फेरी मारताना दिसणारी घाण आणि बकाली त्यांच्या हृदयांना घरे पाडते. आहेत कोण हे तरुण? विद्यार्थी आहेत, यांत्रिकी, वैद्यक आणि विज्ञान शिकणारे. फावल्या वेळात ते पवित्र कुराणाचा अभ्यास करतात. रंजक पुस्तक आहे, ते. मानसशास्त्री रोशंक’ तपासणीत कागदावरल्या शाईच्या डागांमध्ये आकृत्या शोधायला सांगतात, तसे इथे होते. पाच जण एकच पान वाचून त्यात पाच वेगवेगळी चित्रे पाहतात. तुम्ही कसे जगता, तुम्ही कसे आहात, यावर तुम्हाला दिसणारे चित्र ठरते. हे तरण आदर्शवादी, संतप्त . . . तरुण आहेत. त्यांना कुराणात अंगार, श्रद्धा आणि क्रांती दिसते. वसतिगृहांमध्ये राहणारी ही मुले शिबिरात बराच वेळ घालवतात. ते शिक्षक व्हायला तयार असतात. तंबू ठोकून, मुलांना एकत्र करून, मुलामुलींना वेगवेगळ्या रांगांमध्ये बसवून, मुलींचे दुपट्टे सुशीलपणे ‘रचून’ ते त्यांना कुराणातल्या ऋचा शिकवतात. मोठ्याने म्हणायला लावतात. गरजूंना पैसे देतात. त्यांनी फॅनन* थोडासा वाचलेला असतो, मार्क्स मात्र मुळीच वाचलेला नसतो. ते दुर्बळांचे संरक्षक अशी स्वतःची प्रतिमा घडवतात.
तुमच्यामाझ्यासारख्या स्त्रियांची आयुष्ये ह्या तरुणांच्या अखत्यारीत फार मजेची असणार नाहीत. पण अनेक स्त्रियांची आयुष्ये सुधारतील. विधवांना शिधा मिळेल. दवाखाने आणि शौचालये स्त्रियांनाही उपलब्ध असतील. शिबिरातले प्रस्थापित ह्या तरुणांकडे दुर्लक्ष करतील. ही चूक असेल, त्यांची. लवकरच ही मुले काबूलकडे कूच करतील आणि जुन्या नेतृत्वाला विटलेले ‘अनुयायी’ लोंढ्यांनी ह्या नव्यांच्या मागे जातील. सध्या मात्र ही मुले कुराण वाचवाहेत आणि हमीदसारख्या पोरक्यांची डोकी थोपटताहेत.
[*फ्रांत्झ फॅनन हा या पुस्तकाचा अल्जीरियन लेखक. कास्मो, चे गेव्हारा वगैरेंचा समानधर्मी.
हे ‘तालिबान’च्या जन्माचे वर्णन आहे. ‘तालिबान’ म्हणजे विद्यार्थी संघटना —-अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, नॅशनल स्ट्रडंट्स यूनियन ऑफ इंडिया, स्टूडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया वगैरेंसारखी युवक संघटना!]