२००१ साली झालेल्या जनगणनेनुसार सर्वच भारतात व विशेषतः काही राज्यांत दर हजार पुरुषांमागे स्त्रियांची संख्या ९२७ इतकी कमी झाली आहे व आणखीच कमी होत चालली आहे. त्यामुळे समाजाचे काही मोठे नुकसान होणार आहे, या कल्पनेने भयभीत होऊन अनेक व्यक्ती धोक्याची घंटा वाजवत आहेत.
समाजातील स्त्रियांची संख्या कमी होणे याचा अर्थ प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपात स्त्री-हत्या होत आहे. शास्त्र-तंत्रज्ञानातील सुधारणेमुळे स्त्रीहत्येचे स्वरूप अधिकाधिक सोपे, निर्धोक, वेदनारहित व ‘मानवी’ (Humane) बनत आहे. पूर्वीचे स्त्रीहत्येचे प्रकार असे:
(१) नवजात स्त्री अर्भकाला मारणे — उशीने दाबून, पाण्यात/दुधात बुडवून, जास्त अफू घालून, न पाजून, भरपूर मीठ किंवा विष पाजून, थंडीत उघडे ठेवून, कचरा कुंडीत किंवा अन्यत्र टाकून वा अन्य रीतीने.