२००१ साली झालेल्या जनगणनेनुसार सर्वच भारतात व विशेषतः काही राज्यांत दर हजार पुरुषांमागे स्त्रियांची संख्या ९२७ इतकी कमी झाली आहे व आणखीच कमी होत चालली आहे. त्यामुळे समाजाचे काही मोठे नुकसान होणार आहे, या कल्पनेने भयभीत होऊन अनेक व्यक्ती धोक्याची घंटा वाजवत आहेत.
समाजातील स्त्रियांची संख्या कमी होणे याचा अर्थ प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपात स्त्री-हत्या होत आहे. शास्त्र-तंत्रज्ञानातील सुधारणेमुळे स्त्रीहत्येचे स्वरूप अधिकाधिक सोपे, निर्धोक, वेदनारहित व ‘मानवी’ (Humane) बनत आहे. पूर्वीचे स्त्रीहत्येचे प्रकार असे:
(१) नवजात स्त्री अर्भकाला मारणे — उशीने दाबून, पाण्यात/दुधात बुडवून, जास्त अफू घालून, न पाजून, भरपूर मीठ किंवा विष पाजून, थंडीत उघडे ठेवून, कचरा कुंडीत किंवा अन्यत्र टाकून वा अन्य रीतीने. (तामिळनाडू व राजस्थानमध्ये सर्रास वापर, अन्यत्र कमी प्रमाणात.).
(२) वाढीच्या काळात औषधोपचार न करणे, खायला कमी व कमी प्रतीचे अन्न घालणे, शिक्षण न देणे, सार्वजनिक ठिकाणी सोडून देणे.
(३) वयात येताना वेश्याव्यवसायासाठी मुंबईला पाठवणे –(नेपाळ, सिक्कीम, बिहार, उत्तर प्रदेश), यल्लम्माला सोडणे, देवदासी करणे (कर्नाटक), बालविवाह (सर्वत्र) अरबस्तानात अरबांशी लग्न लावून किंवा न लावता घरकामासाठी पाठवणे. (आंध्रप्रदेश)
(४) जन्मभर अन्न, वस्त्र, औषधोपचार यांत तुलनेने कमी वाटा मिळणे(सर्वत्र).
शास्त्र-तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे हे अमानुष स्त्रीहत्येचे प्रकार बंद होऊन त्यांचे रूपांतर स्त्री-जन्म टाळण्यामध्ये म्हणजे प्रतिबंधात्मक (preventive) उपायां-मध्ये होत आहे. उदाहरणार्थ (१) पुरुषबीजाची निवड वीर्यातील एक्स क्रोमोसोम असलेले वीर्यजंतू काढून टाकून वाय क्रोमोसोम असलेले वीर्यजंतू फलनासाठी वापरणे. (२) गर्भाचे लिंग विविध प्रकारे ओळखून फक्त स्त्री-गर्भाची हत्या करणे. मुळात स्त्री-हत्या जर अटळ असेल तर हे बदल अर्थातच स्वागतार्ह आहेत.
अनेक शतके व विविध भौगोलिक भागांत चालू असलेली ही स्त्री-हत्या मानवी-बुद्धीला बुचकळ्यात टाकणारी आहे. या स्त्री हत्येमागे कोणत्या प्रेरणा, कोणती कारणे असावी? काही स्त्रीवादी चळवळींना वाटते त्याप्रमाणे ही पुरुषी वर्चस्ववादाची परिणती आहे काय? तसे म्हणावे तर स्त्रियादेखील ज्या उत्साहाने या स्त्रीहत्येत भाग घेतात त्याचा अन्वयार्थ लावता येत नाही. स्त्रीजन्म इतका यातनामय, परस्वाधीन व गुलामगिरीचा आहे, की स्त्रियांनाच नवीन स्त्रीला जन्म देणे चुकीचे वाटते —- असे आहे का? तसे असेल तर ते योग्यच नाही का? तसे असेल तर स्त्रीवादी संघटनांनीच काय, सर्वच मानवतावादी व्यक्तींनी स्त्रियांची समाजातील स्थिती सुधारेपर्यंत स्त्रियांना जन्म देऊ नये अशी भूमिका घेणे योग्य! पण तसे दिसत नाही.
हुंडा द्यायला लागू नये म्हणून स्त्रीहत्या होते काय? काही समाजात हे खरे कारण दिसते. पण अशा समाजांमध्ये सतत स्त्रीहत्या होऊन स्त्रियांची संख्या कमी होऊन काही पुरुषांना अविवाहित राहण्याची पाळी येईल व मग हुंड्याची प्रथा आपोआप बंद पडेल. असे होताना का दिसत नाही? लग्नासाठी वधूंची आयात केली जाते की काय याचा अभ्यास व्हायला हवा.
समाजाची संपन्नता, लोकसंख्यावृद्धीचा दर अगदी कमी असणे किंवा लोकसंख्येत घट होत असणे, शिक्षणाचा प्रसार भरपूर असणे, एकत्र कुटुंबपद्धती नसल्यामुळे वृद्धापकाळात मुलावर अवलंबून नसणे, स्त्रिया नोकरी/उद्योग करत असणे, या गोष्टी ज्या समाजात आढळतात, त्या समाजांमध्ये स्त्री-हत्या होत नाहीत असे दिसते, व मुलगाच हवा, एकतरी मुलगा हवा असा आग्रहही दिसत नाही. असे दिसते की अनेक शतके चालत आलेल्या व दूरदूरच्या भौगोलिक विभागांमध्ये आढळणाऱ्या या स्त्रीहत्येमागे मूलगामी अशा जैविक प्रेरणा असाव्या. त्या जैविक–प्राणिपातळीवरील प्रेरणा समजून घेण्यासाठी प्राणिसृष्टीत आढळणाऱ्या काही गोष्टींची नोंद घ्यावी लागेल. आर्क्टिक प्रदेशात राहणाऱ्या ‘लेमिंग’ या उंदरासारख्या प्राण्यांची संख्या दर ३–४ वर्षांनी अतोनात वाढते. मग ते मोठमोठ्या झुंडींनी दक्षिणेकडे वाटचाल सुरू करतात व वाटेत नदीनाले, समुद्र लागला तरी थांबत नाहीत व बुडून मरतात. जणू काही सर्व लेमिंग्जनी ठरवले असावे की त्यांच्यापैकी बहुतेकांनी सामुदायिक आत्महत्या करावयाची.
बऱ्याच जातीच्या कोळ्यांची मादी (spider) समागमानंतर नराला खाऊन टाकते. गरोदर मादीला उच्च प्रथिनयुक्त आहार देऊन नर आपल्या पिल्लांची जगण्याची शक्यता वाढवतो असेही म्हणता येईल!
भाटीला इतर बोक्यांपासून झालेली पिल्ले बोका मारून टाकतो — जेणेकरून भाटी परत लगेच माजावर येते व त्याच्यापासून तिला लवकर पिल्ले होऊ शकतात. नव्याने टोळीचे नेतृत्व मिळवणारा नर वानरही असेच करतो. गरह, घार वगैरे पक्षी बऱ्याच वेळा दोन अंडी घालतात. अंड्यातून प्रथम बाहेर येणारे पिलू पुष्कळदा दुसरे अंडे घरट्याबाहेर ढकलून देते. त्यात यशस्वी न झाल्यास आईवडलांनी आणलेले सर्व अन्न स्वतःच बळकावते व दुसऱ्या पिल्लाला उपाशी राहणे भाग पाडते व ते अशक्त झाल्यावर त्याला घरट्याबाहेर ढकलून देते. या त्याच्या वागणुकीला त्याचे आई-वडील कोणताही आक्षेप घेत नाहीत. फारच मोठ्या प्रमाणावर अन्न उपलब्ध असेल तरच दोन्ही पिल्ले वाढून मोठी होतात. अन्यथा एकच पिलू मोठे होणार हाच कायदा!
मांजरीला ४-५ पिले झाली व त्यातील एक आजारी पडले तर ती त्या आजारी पिलाला इतर पिलांपासून लांब कोठेतरी नेऊन ठेवते व नंतर त्याच्याकडे ढुंकूनही पाहत नाही. ते पिलू मग मरते. काही वेळा तर ती त्या आजारी पिलाला खाऊनच टाकते!
वरील सर्व उदाहरणांमध्ये आपण त्या प्राण्यांच्या वागण्याला अमानुष, क्रूर अशी नावे ठेवू. लेमिंग्जच्या वागण्याचा तर आपल्याला काही अर्थच लावता येणार नाही. पण या वागण्यामुळे त्या त्या प्राणिजातीला तगण्यामध्ये (survival), सक्षम राहण्यामध्ये, उत्क्रांत होण्यामध्ये किंवा पर्यावरणाशी जुळवून घेण्यामध्ये काहीतरी फायदा होतच असतो. मानवी भावनांनी, नैतिकतेने अशा वागण्याचे मूल्यमापन होऊ शकत नाही.
गेली शे-पाचशे वर्षे माणूस विज्ञान-तंत्रज्ञानाच्या जोरावर निसर्गाशी फटकून वागू लागला आहे. पण त्यापूर्वी त्याला निसर्गाशी जुळवूनच राहावे लागत होते. निसर्गाशी जुळवून घेण्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे आपली व पाळीव प्राण्यांची संख्या आपल्या पर्यावरणाच्या धारणक्षमतेपेक्षा अधिक वाढू न देणे. त्यामुळेच की काय, तिबेट, नेपाळ वगैरे डोंगराळ व नापीक भागांत कुटुंबातील सर्व मुलांनी एकाच स्त्रीबरोबर लग्न करण्याची चाल होती. नवरे कितीही असले तरी एकाच स्त्रीला मुले होणार असल्याने लोकसंख्या मर्यादित राहत होती. त्याचबरोबर अनेक मुले भिक्षु बनून अविवाहित राहत. मुलांइतक्याच मुली जन्मत असल्या पाहिजेत. मग अनेक मुली अविवाहित राहत असल्या पाहिजेत —- किंवा विवाहयोग्य वयापूर्वीच त्या मरत असल्या पाहिजेत —- त्याबद्दलची अजून काही नक्की माहिती उपलब्ध झाली नाही.
तिबेटी मेंढपाळ दर तीन-चार वर्षांनी एकत्र जमत, व त्यांच्याकडील मेंढ्या व याक यांची मोजदाद करत व एका ठराविक संख्येपेक्षा जास्त असलेले प्राणी मास्न टाकत. कारण तेथील पर्यावरणाचे अधिक प्राणि-संख्येने नुकसान होणार असे त्यांना परंपरागत संचित शहाणपणाने माहीत होते. आपल्याकडेही धनगर लोक दरवर्षी ठराविक दिवशी कोणत्यातरी देवीच्या ठिकाणी जमून अनेक मेंढरांचा संहार करतात. खाण्यासाठी एका वेळी इतकी मेंढरे मारण्याचे कारण नसते. वाया जाण्याचे प्रमाण मोठे. आता देवीचे कारण दिले तरी मुळात ही प्रथा पर्यावरणरक्षणासाठी प्राणिसंख्या कमी करण्यासाठी सुरू झाली होती, अशी शंका आहे. याच धर्तीवर, विपन्नावस्थेत, पर्यावरणाच्या धारणक्षमतेपेक्षा जनसंख्या वाढण्याचा धोका निर्माण झाल्यावर सर्व समाजानेच–अबोध समाजमनानेच–सामूहिक पातळीवर पण बौद्धिक–वैचारिक स्तरावर नसलेला–असा स्त्रीहत्येचा निर्णय घेतला आहे की काय? जन्मजात प्रवृत्तीच्या (instinct) च्या पातळीवर हा निर्णय आपो-आपच झाला असावा. चालू परिस्थितीला हा जीवशास्त्रीय प्रतिसाद (Biological Response) असावा. या निर्णयामुळे पुनरुत्पादनाचा वेग कमी होईल व जनसंख्येचा भार कमी होईल असा कार्यकारणभावाचा जाणीवपूर्वक विचार या प्रतिसादामागे नाही. लेमिंग्ज ज्याप्रमाणे विचारपूर्वक आत्महत्या करत नाहीत, तो निर्णय त्यांच्याकडून सामूहिकरीत्या घेतला जातो —- कसा माहीत नाही, त्याचप्रमाणे आपल्या समाजाकडून हा निर्णय विचारपूर्वक, जैविक पातळीवरच घेतला गेला आहे, असे मानावे लागते. तरच इतक्या मोठ्या संख्येने स्त्री-पुरुष, भावनांची व नैतिकतेची कदर न करता स्त्रीहत्येचा निर्णय कसा घेऊ शकतात याचा अन्वयार्थ आपण लावू शकतो. समाजातील संपन्न, शिक्षित, जन्मदर कमी झालेला वर्ग या निर्णयापासून फटकून राहतो, त्यात सहभागी होऊ शकत नाही —- उलट इतरांच्या अमानुष वागणुकीने बुचकळ्यात पडतो. स्त्रीहत्येचा निर्णय घेणाऱ्या स्त्री-पुरुषांनी हा निर्णय जाणीवपूर्वक, वैचारिक पातळीवर घेतलेला नसल्याने त्यांनाही त्याचे समर्थन करता येत नाही. पण कायद्याने किंवा बंधनांनी ही वागणूक बदलता येणार नाही हे ही नक्की, त्यामुळे गर्भ–लिंग–चिकित्सेवर बंधने आणून काही फायदा होणार नाही. व्यक्ती त्यातून मार्ग काढतीलच.
(टीप — मी स्त्रीहत्येचा समर्थक नाही. फक्त वास्तव परिस्थितीचा अन्वयार्थ लावण्याचा हा एक प्रयत्न आहे.)
२५, नागाळा पार्क, कोल्हापूर — ४१६ ००३