उषा गडकरी, २५७, शंकरनगर, नागपूर — ४४० ०१०
जुलै २००१ च्या अंकात श्री. ग. के. केळकर यांची पुण्याच्या ‘सकाळ’च्या १८ मे २००१ च्या अंकात श्री. यशवंत पाठक यांनी ‘नैवेद्य’ या शीर्षकांतर्गत केलेल्या लिखाणासंबंधातली प्रतिक्रिया वाचली. ती मला मननीय वाटली.
विवेकवादानुसार मेंदू, बुद्धी व मन यांचा परस्पर संबंध काय? असा प्र न समोर आल्यास विवेकवादी ‘मन’ या संज्ञेला कुठलाही शास्त्रीय वा वैज्ञानिक आधार नसल्यामुळे ‘मना’ला मोडीत काढतील. परंतु आपला प्रत्यक्ष अनुभव आपणास या बाबतीत वेगळी प्रचीती देतो. एखाद्या व्यक्तीने अत्यंत आपुलकीने, जिव्हाळ्याने व प्रेमाने आपले स्वागत केले; विचारपूस केली, आपली दखल घेतली व एखाद्याने केवळ शिष्टाचार म्हणून आपल्या संबंधात काही गोष्टी केल्या तर पहिल्या व्यक्तीच्या कृतीचा आपल्या एकूणच व्यक्तिमत्त्वावर सकारात्मक परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. ती आपुलकी केवळ वरपांगी असेल तरीही त्या प्रकारच्या बेगडी वागण्याची स्पंदने दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचत असतात. मनापासून, अंतःकरणापासून, काळजा-तून उमटलेले उद्गार, कृती यांना मनुष्याच्या एकूणच व्यवहारात अतिशय महत्त्वाचे स्थान आहे.
हाच धागा पकडून जर आपण आपल्या काही धार्मिक कृत्यांमागची श्रद्धा लक्षात घेतली तर एक गोष्ट स्पष्ट होते व ती म्हणजे कोणत्याही श्रद्धेपोटी केलेल्या कृत्यात एकप्रकारची सचोटी, प्रामाणिकपणा, प्रांजळपणा, आदराची भावना दडलेली असते. जोपर्यंत या धार्मिक श्रद्धेतून समाजाला घातक असा गोष्टी निर्माण होत नाहीत तो पर्यंत या भावनेतून केलेल्या कृतींना एक निचित मूल्य, महत्त्व तर असतेच परंतु बाह्य व आंतरिक पर्यावरणावरसुद्धा त्याचा नि िचत असा प्रभाव पडल्याशिवाय राहत नाही. ज्या सर्वश्रेष्ठ परमेश्वराने (किंवा निसर्गाने) हे अन्नब्रह्म आमच्यासाठी निर्माण केले त्याला कृतज्ञतापूर्वक प्रथम नैवेद्य अर्पण करून मग बाकीच्यांनी ते सेवन करण्यामध्ये त्याग, संयम, धैर्य, शुद्धता, पावित्र्य, मांगल्य या सर्वच घटकांचा अनायासेच परिपोष होतो. म्हणूनच पृथ्वीतलावर असलेल्या असंख्य समाजसमूहात पूर्वापार चालत आलेल्या रीतिरिवाजांमागील मनोभूमिका योग्यत-हेने समजून घेतली पाहिजे. तिच्यातील अनावश्यक क्वचित अन्याय्य भागाचा त्याग करून बाकीच्या बाबींचा सहर्ष स्वीकार केला पाहिजे. विशेषतः त्यांना सरसकट अंधश्रद्धा असे संबोधून जीवनातून हद्दपार केल्यास आपले जीवन फारच रुक्ष, शुष्क, भाव-विरहित आणि कोरडे झाल्या-शिवाय राहणार नाही.
माणसाचे जीवन खऱ्या अर्थाने संपन्न, समृद्ध, श्रीमंत करावयाचे झाल्यास अंतःकरणाच्या अतिखोल प्रदेशात वाहणाऱ्या झऱ्यांच्या झडपा उघडल्याच पाहिजेत. तेव्हाच रखरखीत. वाळवंटातला प्रवासही सुखद झाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारच्या जीवनपद्धतीत विज्ञानाचा अधिक्षेप होत नाहीच शिवाय समग्र जीवनाचे मर्मही गवसल्याशिवाय राहत नाही.
[संपादकीय पाहावे]
कृ. रा. लंके, ४९८, पर्वती, आदित्य सोसायटी पुणे — ४११ ००९
विवाहासंबंधी श्री. दिवाकर मोहनी यांनी लिहिलेले लेख वाचले. श्रीमती मंगला सामंत यांनी उत्क्रांतिवादापासून स्त्री-जीवनाचा आढावा स्त्री-पर्व या त्यांच्या निबंधात घेतला आहे. विवाहासंबंधी त्यांनी केलेली ही टिपणी. “विवाहसंस्थेने जे दिले नाही, त्यापेक्षा जे काय दिले ते जास्त भयावह आहे. विवाहसंस्थेने औरस, अनौरस, बेवारशी मुले असे संततीचे प्रकार निर्माण केले. विवाहातून ‘वैधव्य’ ही नवी स्थिती उदयास आली. विवाहित, अविवाहित, परित्यक्ता, घटस्फोटिता अशा पद्धतीने विवाहाने स्त्रियांचे अनैसर्गिक प्रकार निर्माण केले. कुमारीमातृत्व, बलात्कारित मातृत्व, विवाहित मातृत्व अशा प्रकारे वर्गवारी कस्न, विवाहाने अस्सल मातृत्व कलंकित केले. स्त्रियांवर शरीरविक्रय करण्याची वेळ आणली. त्यांची मुले समाजाने अव्हेरल्यामुळे गुन्हेगारी जगात प्रचंड वाढ झाली. गुन्हेगारीतून पुन्हा अत्याचार, बलात्काराच्या चक्राने वेग घेतला. विवाहामुळे बलात्कारास एक हेतू प्राप्त झाला. त्यातून भ्रूणहत्येला चालना मिळाली. विवाहसंस्थेने अनेकांचे माणूस म्हणून जगण्याचे अधिकार हिरावून घेतले. पुरुषतुलनेत स्त्रियांची किंमत कमी करण्याचा जो भयावह प्रयत्न केला गेला, त्यामुळे मुलींची सर्रास हत्या होऊ लागली. जन्मतःच त्यांना मारून टाकण्यात येऊ लागले. अशा रीतीने जे निसर्गाला अजिबातच अभिप्रेत नाही, जे निसर्गात इतर प्राणिजातीत कुठेही घडत नाही आणि जे मानवजातीतही हजारो सहस्रके कधी घडलेले नव्हते, ते या पितृ-प्रधान व्यवस्थेने घडवून आणले.
एका पितृत्वाच्या अट्टाहासापायी, स्त्री-पुरुष संबंधाबाबत खोट्या नैतिक कल्पना उभ्या करून जी व्यवस्था आणली गेली, तिने बाकीची सर्व नैतिक व्यवस्था आणि समतेची मूल्ये अक्षरश: धुळीस मिळवली. विकासाच्या भ्रामक कल्पना बाळगून अशा रीतीने मानवी जीवन विनाशाकडे प्रवास करू लागले.”
(स्त्री-पर्व, लेखिका — मंगला सामंत, पहिली आवृती ०८–०३–२०००, सुगावा प्रकाशन)
सूचना
१. मागील अंकात नोंदल्याप्रमाणे हा अंक ३२ पानांचा आहे. २. येत्या अंकात ‘स्त्री : पुरुष प्रमाण’ (सुभाष आठले), ‘विक्रम आणि वेताळ’ (भरत मोहनी), ‘शिक्षणाचे स्वातंत्र्य’ (रमेश पानसे), ‘अर्थनीतीमागील वास्तवता आणि वैचारिका’ (गं. रा. पटवर्धन), ‘खादी’ (दिवाकर मोहनी) व इतर लेख असतील.
— संपादक