अज्ञात प्रदेशातून ध्वनी ऐकू आला, माणूस दचकला, आजारी पडला, आजाराचे स्पष्ट कारण कळेना, सबब भूताची कल्पना केली. निरनिराळ्या अज्ञातोद्गम ध्वनींना, हावभावांना, आकाशचित्रांना, रोगांना, दुःखांना, सुखांना, जन्माला व मरणाला एक एक भूत कल्पिले. सुष्ट भुते व दुष्ट भुते निर्माण झाली. त्यांची उपासना सुरू झाली. नंतर रोग्यांची, सुखांची व दुःखाची खरी कारणे व तन्निवारक उपाय जसजसे कळू लागले, तसतशी सुष्ट भूतांची म्हणजे देवांची व दुष्ट भुतांची म्हणजे सैतानाची टर उडून जरूरी भासतनाशी झाली. . . . देवाची आणि देवीची जरूर कोठपर्यंत, तर संकटनिवारणाचे उपाय सुचले नाहीत तोपर्यंत. संकटनिवारणाचे जसजसे जास्त उपाय मनुष्याला सुचतात तसतसा तेवढ्यापुरता देवाला कमीकमी त्रास द्यावयाचा, किंवा तो तो देव काढून टाकून पदभ्रष्ट करावयाचा परिपाठ मनुष्याचा आहे. अशा रीतीने अनेक देव खोटे ठरल्यावर एकच एक देव मनुष्य प्रौढीने कल्पितो व आपणास शहाण्यांचा शिरोमणी समजतो. पण हा एकमेव अद्वितीय देवहि हजारो प्रसंगी उपयोगी पडत नाही.
[विकार-विचार प्रदर्शनाच्या साधनांची उत्क्रांती’ या इतिहासाचार्य राजवाड्यांच्या निबंधातून.]