अमेरिकेतील न्यू जर्सीमध्ये झालेले मेळाव्यातील प्र. ब. कुळकर्णी यांच्या वृत्तांताबद्दल हे पत्र लिहीत आहे. पुढची चर्चा आचार्य रेगे व प्रो. दि. य. देशपांडे यांच्या मतभेदाविषयी आहे. आचार्य रेगे यांचे मत ‘धर्मसुधारणेच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन साधणे योग्य असे होते.’ तर प्रो. दि. य. देशपांडे हे ‘समाजास’ “धर्म, देव हानिकारक असल्याने समाजसुधारणेसाठी विवेकवादाकडे समाजास वळवावे’ ह्या (कडव्या) मताचे आहेत.
या विषयावर मेळाव्यात झालेल्या चर्चेत मला दोन मुद्दे उपस्थित करायचे आहेत.
१. गेल्या शतकात चीन व रशियात कम्युनिस्ट क्रान्ती झाली. रशियात ७४ वर्षे (१९१७ ते १९९१) व चीनमध्ये १९५० ते आजतागायत कम्युनिस्ट तत्त्वांना अनुसरून जनतेला निधर्मी करण्याचे महाप्रयत्न झाले. सक्तीने धार्मिक वृत्ती नाहीशी करता येत नाही हे खरे आहे. तरी सुद्धा सोव्हिएत रशियात निधर्मी वातावरणात तीन पिढ्या लहानाच्या मोठ्या झाल्या. धार्मिक वातावरणात वाढलेली पिढी अस्ताला गेली. चीनमध्ये एक तरी पिढी धर्मविहीन वातावरणात लहानाची मोठी झाली. असे असताना रशियात कम्युनिस्ट सरकार कोसळताच धर्माचे पुनरुज्जीवन होत आहे. चीनमध्ये राजकीय दबाव एवढेच नव्हे तर तुरुंग, टॉर्चर याची भीती असताना ‘फुलॉन गाँग’ या नावाची बौद्ध धर्माची मननप्रधान शाखा मूळ धरून पसरत आहे.
निधर्मी वातावरणात रशियात, चीनमध्ये जनता विवेकवादी झाल्याचे आढळत नाही. रशियात कम्युनिस्ट धाक नाहीसा होताच अराजकता फोफावली आहे. चीनच्या कम्युनिस्ट राजवटीबद्दलच्या बातम्या वाचून ‘तिथे विवेकवादाचा प्रभाव पडला आहे’ असे वाटत नाही.
२. व्हॅल्यू सिस्टिम अॅनॅलिसिस थिअरीनुसार समाजातील ७५ ते ८० टक्के व्यक्ती नियमपालक (conformist) व टोळीयुगातील मानसिकतेच्या (Tribalistic) असतात. हे लोक लेखी नियम, धार्मिक नियम किंवा एका व्यक्तीची आज्ञा पाळतात. थोडक्यात समाजातील प्रचलित नीतिमूल्ये व मतप्रणालीनुसार ते जीवन व्यतीत करतात. त्याविषयी फारसा विचार ते करत नाहीत.
उरलेल्या २५ टक्क्यांत स्वयंकेंद्री (egocentric) व मॅनिप्युलेटिव्ह यांची संख्या प्रत्येकी ५ टक्क्याच्या आसपास असते. ह्या प्रवृत्तीच्या व्यक्ती सोयीप्रमाणे धार्मिक अथवा निधर्मी होतात. स्वार्थ हीच त्यांची प्रेरणा असते. जनतेतील समाजहितवादी (sociocentric) व अस्तित्ववादी (existentialist) ५ टक्के असलेल्या व्यक्ती सर्वसाधारणपणे विवेकवादी असतात. त्यातले समाजहितवादी आपल्या ध्येयावर केंद्रित झालेले असतात. त्यांना धर्म, देव यांची फारशी फिकीर नसते. थोडक्यात पा चात्त्य समाजात विवेकवादी लोकांचे प्रमाण १० टक्क्याच्या आसपास आहे. (पा चात्त्य, कारण ही आकडेवारी पा चात्त्य देशातली आहे) प्रामुख्याने विवेकवादी असा समाज अथवा देश ह्या जगात अस्तित्वात आहे असे मला वाटत नाही. भारतासारख्या धर्माचा पगडा असलेल्या देशात (मी विवेकवादी असले तरी) प्रा. रेगे यांचा धर्मसुधारणेतून समाजपरिवर्तनाचा मार्ग मला योग्य वाटतो. आर्थिक स्थैर्य व मुक्तपणे इच्छा असेल त्या विषयाचा अभ्यास करण्याची मुभा असताना अमेरिकेत विवेकवादी विचारसरणी रूढ झाल्याचे मला आढळत नाही. विवेकवादी विचारसरणीचा प्रचार करण्यासाठी आणखी काय करावे लागेल हे मला समजत नाही.
[वरील लेखातील व्हॅल्यू सिस्टिम अॅनॅलिसिस चर्चेला कसे लागू पडते हे स्पष्ट नाही. बरे, शंभर टक्के समाज विवेकनिष्ठ करणे, हे आमचे फार दूरचे ध्येय आहे, याकडेही दुर्लक्ष नको.
– संपादक 65, Oxford Road,
Newton, MA 02459-2407, U.S.A.