आ.सु.च्या वतीने सर्व चर्चकांचे आभार मानणे आणि काही आणखी खुलासे करणे ही कामे उरली होती. आप्तवचन तुम्ही मानत नाही. पण धर्मग्रंथांतून तुम्ही वेळोवेळी वचने उद्धृत करता हे कसे असा एक आक्षेप या पूर्वीच्या व्याख्यानात, ‘विवेकवाद धर्माची जागा घेऊ शकेल?’ या विषयावर बोलताना घेतलेला होता. आजच्या चर्चेतही श्रद्धेची दृढनि चयाशी गफलत करून टीका झालेली होती. त्या संदर्भात मी म्हणालो : धर्मग्रंथ व धर्मगुरू म्हणतात म्हणून आपण एखादे वचन स्वीकारतो तेव्हा ती श्रद्धा असते. बुद्धिवाद्याचे त्याने समाधान होत नाही. ‘जनीं निंद्य तें सर्व सोडोनि द्यावें । जनीं वंद्य तें सर्व भावें करावें ।।’ ह्या म्हणण्यावर मला प्र न पडतो की एखादी गोष्ट निंद्य का ठरते किंवा वंद्य का समजावी ह्याचे उत्तर येथे नाही. म्हणून मी ते स्वीकारणार नाही. ‘मना बोलणें नीच सोशीत जावें’ हे मला पटते म्हणून मी स्वीकारतो. ‘मना त्वांचि रे पूर्वसंचीत केलें । तयासारिखें भोगणें प्राप्त झालें ।।’ हे मी नाकारतो कारण तो विचार माझ्या समाजपरिवर्तनाच्या विचाराला बाधक आहे.
श्रद्धावादाने निखळ ज्ञानोपासनेला विरोध झाल्याचा इतिहास आहे. कोपर्निकस, ब्रूनो, गॅलिलिओ, डार्विन यांची उदाहरणे याची साक्ष आहे. म्हणून विवेक-बुद्धी शाबूत ठेवावी.
आबा गवांदे यांनी अध्यक्षीय समारोप केला: विवेकवादाबद्दल जी मते व्यक्त झाली त्यात प्रत्येकाचे काहीना काही रिझर्वेशन दिसते. माझेही काही रिझर्वेशन्स आहेत. विवेकवादाला मी स्वस्थ समाज कसा निर्माण करता येईल याचे साधन समजतो. आमच्या सामाजिक धार्मिक मान्यता तपासण्याचा तो एक दृष्टिकोन आहे. आमच्या संस्कृतीत काही पारिवारिक व काही शा वत मूल्ये आहेत त्यांना कायम ठेवून विवेकवाद आम्ही जीवनात उतरवला तर नक्कीच लाभदायक होईल.
डॉ. कमलताई श्रॉफांनी येथे एक इंटलेक्चुअल फोरम झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. मधुकरराव देशपांडे, श्री. म. माट्यांच्या एका लेखाचा हवाला देऊन म्हणाले, लोकमान्यांना तेल्यातांबोळ्यांचे पुढारी म्हणत. लो. टिळक लोकांच्या श्रद्धेच्या बळावर केवढी मोठी श्रद्धा निर्माण करू शकले. विवेकातसुद्धा श्रद्धेला स्थान आहे हे टिळकांच्या उदाहरणावरून दिसते. एखाद्या तत्त्वावर, एखाद्या नेत्यावर लोकांची दृढनिष्ठा असणे, त्यातून जनशक्ती निर्माण होणे असे या प्रकाराबद्दल म्हणता येईल. याला श्रद्धा न म्हणता उपयुक्त निष्ठा म्हणता येईल, या माझ्या खुलाशातून पुन्हा आक्षेप आला. कौस्तुभ लेले यांचा पक्ष असा की तुम्ही उगाच लेष करताहात. या भेदाला तुम्ही म्हणता या पलीकडे काही आधार नाही. तुम्ही श्रद्धा शब्दाची व्याख्या बदलता आहात. हा आग्रह विवेकाला धरून नाही. यावर शास्त्रीय चर्चेत जेथे एका शब्दाचे दोन किंवा अधिक अर्थ (उपयोग) ढ असतात तेथे एक शब्द एकाच अर्थाने वापरणे योग्य असते. विशेषतः मूल्यगर्भ (Value Charged) शब्दांचे बाबतीत हे फार आवश्यक असते. धर्म, नीती, ईश्वर अशा शब्दांचा उपयोग दोन पक्ष वेगवेगळ्या अर्थी करतील तर वाद कधीच संपणार नाही म्हणून आम्ही निष्ठा-श्रद्धा याच अंकातील सुधीर बेडेकरांचा लेखही पाहावा. हा शब्दभेद सुचवतो असा खुलासा मी केला. (पण श्री. लेले यांनी या विषयावर स्वतंत्र लेख लिहिला तर त्याचे सविस्तर उत्तर देता येईल असे वाटते.)
सुबोध शहांचे म्हणणे असे की Rationalism युरोपात तीनशे वर्षे पुरस्कारला जातो आहे. भारतातही गेली दोन शतके त्याचा उच्चार होत आहे मग तो लोकांना पटत का नाही? भारतातही आणि परदेशस्थ भारतीयांतही. यावर मी उत्तर दिले की युरप–अमेरिकेतही त्याने जनमानसाची मोठी पकड घेतली आहे असे नाही. आणि भारतात तर सश्रद्ध समाज फार मोठा आहे. खरी गोष्ट अशी आहे की विचारस्वातंत्र्य, उच्चार स्वातंत्र्य, जीविताचे स्वातंत्र्य हे प्रत्येक मनुष्याचे नैसर्गिक अधिकार आहेत. हा विचार १८ व्या
शतकात पुढे आला. व्हर्जिनिया डिक्लेरेशन ऑफ राईट्स (१७७६) आणि फ्रेंच Declaration of the Rights of Man and of the Citizen इ. स. (१७८६) यांनी हा व्यक्तिस्वातंत्र्याचा — Rationalism चा Romantic Movement म्हणून उद्घोष केला. या अर्थी विवेकवाद हा तीनशे वर्षे जुना नाही. (भारतात रामदासांनी, मुकुंदराजांनी किंवा शंकराचार्यांनी ‘विवेक’ शब्द वापरला हे कोणी नाकारत नाही. पण त्याचा अर्थ अगदी भिन्न आहे.) श्री. फडके खुलासा करतात की, लहान बालकांना गुरू आणि पिता सांगतो ते सत्य ही व्याख्या सांगतात. तीच मुले मोठी झाली की, सत्य म्हणजे यथातथ्य, असे शिकतात म्हणून शब्दाचा एकच एक अर्थ सदासर्वदा धरून ठेवता येत नाही. संदर्भ महत्त्वाचा आहे. श्री. अशोक विद्वांस म्हणाले: प्रोफेसर कुलकर्त्यांनी समकालीन महाराष्ट्रातील समाज-परिवर्तनाच्या दोन विचारप्रणालीवर जे (२६ एप्रिल रोजी) व्याख्यान दिले तेव्हापासून मला हा प्र न अस्वस्थ करीत आहे. मला जे समजले ते असे की प्रोफेसर रेगे धर्म न टाकता धार्मिक सुधारणांच्या मार्गे सामाजिक सुधारणा आणण्याच्या पक्षाचे आहेत. बदल त्यांनाही हवा आहे पण तो गोडीगुलाबीने व्हावा असे वाटते. रेग्यांचे हे म्हणणे थोडेफार पटण्यासारखे असले तरी प्र न पडतो की, How much sugar coating is desirable? कारण दि. य. देशपांडे आणि मे. पुं. रेगे या दोघांच्या मूलभूत धारणांमध्येच (basic concepts) फरक आहे. एक विचारप्रवाह श्रद्धावाद मानणारा आणि दुसरा तो नाकारून त्याच्या जागी विवेकवाद बसवणारा. इतका फरक असल्यावर एका पक्षाने, दुसऱ्याबद्दल तुम्ही म्हणता तेही खरे असेल अशी गुळमुळीत भाषा वापरणे म्हणजे beating about the bush होईल.
बोडस, लेले या श्रद्धावाद्यांनी हरकत घेतली की, श्रद्धावादी मनुष्य विवेकवादी नाही असे तुम्ही का समजता? तेव्हा विद्वांसांनी खुलासा केला की, ज्ञानेश्वर, तुकाराम-विवेकानंद यांची नावे घेऊन बोलणे विवेकवादात बसत नाही. एखादी गोष्ट स्वतःच्या बुद्धीला पटेल अशी असेल किंवा तिची सत्यता Scientifically established proof ने सिद्ध होईल तरच ती मान्य करायची एरवी नाही.
ह्या संदर्भात रेगे — देशपांडे यांच्या भूमिकांचा मी प्रस्तुत सभेत उपस्थितांच्या माहितीसाठी संक्षेपाने पुनरुच्चार केला : तो असा:
प्रा. रेगे एकोणिसाव्या शतकातील न्या. मू. रानड्यांप्रमाणे हिंदूधार्मिकपरंपरा लवचीक मानतात. धर्मसुधारणेच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन साधता येईल असा आशावाद बाळगणारे ते तत्त्वज्ञ होते, तर प्रो. दि. य. देशपांडे आगरकरांप्रमाणे धर्म आणि देव या कल्पनांची हानिकारकता दाखविणारे, परंपरावाद्यांची मने दुखतील की काय याची पर्वा न करणारे, शल्यक्रिया आणि धक्कातंत्राचा अवलंब आवश्यक मानणारे तत्त्वज्ञ आहेत. धर्म नको, देव नको असा त्यांचा कडवा पक्ष आहे. रेगे मात्र महिम्नस्तोत्रातील मंत्राप्रमाणे मानवतेचा — परतत्त्वाचा स्पर्श होण्याचे विविध मार्ग आहेत असे म्हणणारे तत्त्वज्ञ होते.
वरील समग्र हृदयसंवाद घडवून आणण्याचे सर्व श्रेय अशोक विद्वांस या दुर्लभ कार्यकर्त्यांचे तर मार्मिक टिपणे घेण्याचे श्रेय डॉ. बंडू फडके आणि पुष्पा गोवंडे यांचे. त्यांना धन्यवाद. 4400 Ave N Apt 156,
Galveston TX 77550, U.S.A.