सगळ्या महाग वस्तू फुकट!
मागच्या लेखांकामध्ये संघटित उद्योग जेव्हा उत्पादन खपवितात तेव्हा ते आपला माल ग्राहकांवर लादत असतात असे एक विधान आहे आणि त्या पाठोपाठ हा लादलेला माल ग्राहकाला फुकट पडतो असे दुसरे विधान आहे. ह्या विधानांचे विवेचन ह्या नंतर करावयाचे आहे.
माणसांच्या मनाची ओढ सुधारलेल्या जीवनमानाकडे आहे हे वास्तव आपण स्वीकारले पाहिजे. पशृंमध्ये आणि माणसामध्ये जो फरक आहे तो हाच आहे. माणूस आपले हातपाय आणि त्यांसोबत आपली बुद्धी वापरून पूर्वी नसलेल्या वस्तू बनवू शकतो. गारगोटीची हत्यारे जेव्हापासून माणूस बनवू लागला, गुहा खोदू लागला, अग्नि सिद्ध करू लागला तेव्हापासूनच त्याचा ओढा सुधारलेला जीवनमानाकडे आहे असे मानावयास हरकत नाही. हा ओढा आमच्या स्वभावाचे स्वाभाविक अंग आहे. हे माणसाचे व्यवच्छेदक लक्षण आहे. माणसाने सुधारलेल्या जीवनमानाची आस बाळगण्यात कसलीही लाज आपणास वाटण्याचे कारण नाही.
सुधारलेल्या जीवनमानाचा उपभोग एकट्याने घेऊ नये, त्यासाठी इतरांचे श्रम वापरू नयेत, त्यांचे शोषण करू नये हे पूर्णपणे मान्य आहे. पण तो वेगळा मुद्दा आहे.
एखादा देश जीवनमान जसजसे सुधारत नेतो तसतशी त्याची लोकसंख्या वाढत जाते. त्या देशातले परस्परावलंबन वाढते. वाढते जीवनमान आणि परस्परावलंबन ह्यांचा अतूट संबन्ध आहे. ह्या परस्परावलम्बनाला श्रमविभाजन — division of labour असे म्हटले जाते. लोकसंख्यावाढीमुळे दीर्घकाळपर्यंत जीवनमान घसरलेले राहते असे उदाहरण वाचनात नाही. काही कुटुंबांमध्ये जीवनमान काही काळ घसरलेले आढळू शकते, पण ते नंतर सुधारते. हे जीवनमान कोणत्या क्षेत्रात परस्परावलंबन वाढले पाहिजे ह्याची समज नागरिकांमध्ये निर्माण होईपर्यंत घसरलेले राहते. घसरलेल्या जीवनमानाचा दोष केवळ लोकसंख्यावाढीवर टाकण्यापूर्वी परस्परावलंबनाची आर्थिक प्रगतीमधील भूमिका पुन्हा तपासणे आवश्यक आहे. जेव्हा खाणारी तोंडे वाढतात तेव्हा देशातील किंवा जगभरातले अन्न धान्याचे उत्पादन निःसंशय वाढलेले असते; इतकेच नव्हे तर औषधोपचाराच्या साधनांत प्रगती झालेली असते. पाकक्रियांच्या पुस्तकांच्या खपात जी लक्षणीय वाढ गेल्या ३०-४० वर्षांत झाली आहे —- त्यांच्या आवृत्त्यांवर आवृत्त्या निघत आहेत, त्याचे कारण अन्नधान्य, तेल, दूध आणि फळे ह्यांचे उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे हे आहे. लोकसंख्या तीनपट झाली असेल तर उपभोग्य वस्तूंचे उत्पादन सहा-आठ पट वाढलेले आहे. पण हे सर्व मुद्दे तूर्त बाजूला ठेवून त्यांचा समाचार पुढे कधी तरी घेऊ.
अर्थव्यवहार मानवी जीवनाचे एक अत्यंत महत्त्वाचे अंग आहे. त्याचबरोबर आपल्या देशातील काही लोकांचे अठराविश्वे दारिद्र्य हे एक कठोर वास्तव आहे. काहींची चैन आणि काहींची उपासमार सहृदय विचारवंतांना उरातल्या शल्यासारखी बोचते. ह्या परिस्थितीमधून बाहेर पडण्यासाठी अनेकांनी विविध उपाय सुचविले आहेत. तेवढ्यासाठीच १९०८-९ मध्ये गांधीजींनी हिंदस्वराज्य हे एक छोटेखानी पुस्तक लिहिले. खादी ग्रामोद्योगांमागील तत्त्वज्ञान त्या पुस्तकात ग्रथित केले आहे. आपणाला शोषणमुक्त जीवन जगावयाचे असेल तर आपल्या समाजरचनेत भूदान-यज्ञ मूलक ग्रामोद्योग-प्रधान अहिंसक क्रान्ति केल्याशिवाय, ग्रामस्वराज्य आणल्याशिवाय, गत्यन्तर नाही असे गांधीविचारावर निष्ठा ठेवणाऱ्यांचे प्रतिपादन आहे. प्रस्तुत लेखमालेच्या द्वारे खादी-ग्रामोद्योगांचा सार्वत्रिक स्वीकार केल्यामुळे आपले आर्थिक प्र न सुटतील काय, आपल्या देशातील विषमता नष्ट होईल काय हे आपण तपासून पाहत आहोत.
प्रस्तुत लेखासोबत डॉ. उल्हास जाजू ह्यांचा ‘खादीचे नवसर्जन’ हा लेख साम्ययोग साधना ह्या पाक्षिकामधून उद्धृत करीत आहोत. डॉ. जाजूंनी हा लेख माझ्या खादीवरच्या लेखांना उत्तर म्हणून लिहिलेला नाही. म्हणून त्यांना त्यांच्या लेखात पुढे काही ना काही भर घालावीशी वाटेल. त्यांनी त्यांच्या उपरिनिर्दिष्ट लेखाला पूरक आणखी लेख आजचा सुधारक साठी लिहावे अशी त्यांना आणि अन्य वाचकांना साग्रह प्रकट विनन्ती आहे. त्यांच्या आणि श्री. प्रियदर्शन पंडित ह्यांच्या लेखांच्या अनुषंगाने गरज वाटल्यास मी पुन्हा लिहीन. ही एक गंभीर प्रकट चर्चा आजचा सुधारकच्या वाचकांपुढे ठेवावी आणि त्यांनी आपापले निष्कर्ष काढावे. ते पुन्हा आजचा सुधारकमध्ये प्रकाशित व्हावे, त्यायोगे अर्थकारणावर एक सर्वांगीण चर्चा होऊन आपणा सर्वांच्या समग्र अर्थव्यवहारासंबंधीच्या कल्पना व समज स्पष्ट व्हावे. खादीचे केवळ निमित्त घेतलेले आहे.
प्रत्येक आर्थिक व्यवहार अथवा विनिमय चार पाच प्रकारे होऊ शकतो.
१. वस्तूच्या मोबदल्यात वस्तू,
२. वस्तूंच्या मोबदल्यात पैसा,
३. पैशाच्या मोबदल्यात वस्तू,
४. श्रमाच्या मोबदल्यात पैसा,
५. पैशाच्या मोबदल्यात पैसा,
६. श्रमाच्या मोबदल्यात वस्तू.
पैसा हे माध्यम बाजूला ठेवून आर्थिक व्यवहारांचा विचार केल्यास ते बहुदा वस्तूच्या मोबदल्यात वस्तू आणि श्रमांच्या मोबदल्यात बस्तू असाच स्वरूपाचे असतात. वस्तू ह्या कच्चा माल आणि पक्का (उपभोग्य) माल अशा दोन प्रकारच्या असतात परंतु फक्त पक्का मालच अंतिम ग्राहकाच्या उपयोगाचा असतो. किती श्रमांच्या मोबदल्यात पक्का (उपभोग्य) माल उपभोक्त्याला मिळतो ह्यावर त्या मालाचे खरे विनिमय मूल्य ठरावयाला हवे. पैशाच्या रूपातली वस्तूची किंमत भ्रामक असते हे पुढे स्पष्ट करण्याचा यत्न करीत आहे. पहिल्या प्रकाराच्या विनिमयाला आपण वस्तु-वस्तुविनिमय असे नाव देऊ. दुसऱ्या प्रकारच्या विनिमयासाठी खाजगी मालकीची आवश्यकता असते त्याप्रमाणे संचयाचीही असते. वित्ताचा आणि वस्तूंचा संचय करता येत असल्यामुळे आणि त्यांची मालकी एकाकडून दुसऱ्याकडे जाऊ शकत असल्यामुळे उपभोक्त्याच्या उपभोगाशी त्यांचा मेळ घालताना चुका होतात. ह्या उलट प्रत्यक्ष श्रमांचा संचय करता येत नसल्यामुळे केवळ श्रम-वस्तुविनिमयामध्येच श्रमाचे वाढत्या घटत्या उपभोगाशी जे नाते असते —- ज्यामुळे एखाद्याची वास्तविक श्रीमंती आणि दारिद्र्य समजते —- त्याचे दर्शन घडू शकते. सध्याचे पारंपरिक अर्थशास्त्र पैशाच्या मोबदल्यात वस्तु म्हणजे वित्तवस्तु-विनिमयाचाच किंवा ज्या ज्या क्षेत्रांत पैसा आहे त्याचाच अभ्यास करते. त्यामध्ये श्रमवस्तुविनिमयाचा पुरेसा विचार होत नाही. मला अर्थव्यवहाराचे जे स्वरूप दाखविण्याची इच्छा आहे त्यासाठी पैशाचे माध्यम मला दूर सारावयाचे आहे. श्रम आणि त्याच्या मोबदल्यात उपभोग एवढाच सीमित व्यवहार मला मोजावयाचा आहे.
ज्या उद्योगांमध्ये उत्पादन वाढते ठेवण्याची सोय आहे, तशी त्यांची रचना आहे त्या उद्योगांमध्ये झालेले उत्पादन आपणास सर्वांस कसे विनामूल्य मिळते ते एका पद्धतीने समजावून देता येईल. गेल्या तीस-चाळीस वर्षांत आपले सर्वांचे राहणीमान थोडेफार सुधारले आहे, आपली लोकसंख्या तिप्पट झाली असली तरी ते वाढलेले आहे हे नाकबूल करता येत नाही कारण ती आपणा सर्वांच्या अनुभवाची गोष्ट आहे. पूर्वी फक्त श्रीमंतांकडे ज्या वस्तु असत त्या आता मध्यमवर्गीयांपर्यत पोचल्या आहेत. आणि मध्यमवर्गीयांनाच पुर्वी उपलब्ध असलेली साधने उदा. सायकल, रेडियो, विजेचे दिवे आणि पंखा मनगटी घड्याळ, वगैरे आज खेड्यापाड्यांपर्यंत घरोघर पोचल्यासारखी आहेत. कारण एका बाजूला त्या वस्तूंचे उत्पादन भराभर वाढले आहे, त्याचबरोबर पुष्कळांची ऐपत आपण वाढवून दिलेली आहे. एखाद्या देशामधले उपभोग्य वस्तूंचे उत्पादन जसे वाढते तशी देशवासियांची ऐपत वाढवून द्यावी लागते. ऐपत वाढविण्याअगोदरच जर उत्पादन भरमसाठ वाढले तर मंदी येते. मंदी आल्यास तिचे भयंकर परिणाम घडून येतात. वाढत्या उत्पादनाबरोबर जर चलन वाढू दिले नाही तर वस्तु स्वस्त होतात. (चलनाच्या पूर्वीइतक्याच मात्रेत त्यांचा विनिमय करावा लागतो.) त्यांची विक्री किंमत कमी होते. उत्पादन करताना जितका खर्च पैशांच्या रूपात होतो त्यांपेक्षा विक्री किंमत कमी आल्यास पैशाच्या रूपात तोटा होतो. नफा (पैशांच्या रूपातील) मिळविण्यासाठी चालविलेला कोणताही उद्योग सातत्याने तोटा सहन करू शकत नाही. पण हे सारे तूर्त असो. उपभोगाचे श्रमांशीच प्रमाण पाहिले पाहिजे, पैशाने नको हे सांगतासांगता थोडे विषयान्तर झाले.
श्रमांच्या मोबदल्यात उपभोग मोजला गेल्यासच वाढत्या राहणीमानामध्ये आपल्याला ज्या वस्तु पूर्वी मिळत नसत, अनुपलब्ध असत त्या मिळू लागतात तेव्हा त्या फुकट मिळतात हे समजते. असा उपभोग घेता यावा म्हणून सगळे लोक एकमेकांना पगार वाढवून देतात, महागाईभत्ते देण्यात येतात. वस्तु कर्जाऊ देतात इतकेच नव्हे तर कर्जावर व्याज घेत नाहीत. स्वतःचे सरकार असेल तरच उत्पादनाला प्रोत्साहन देता येते, चलनामध्ये वाढ करून घेता येते आणि वाढत्या उत्पादनाचे लाभ सर्व प्रजेला मिळू शकतात. परतंत्र देश स्वतंत्र देशांपेक्षा नेहमीच दरिद्री असतात.
एक विजेचे उदाहरण घेतले की हा मुद्दा स्पष्ट होईल. घरोघर वीज वापरली तेव्हा आपल्या राज्यातल्या प्रत्येक घरात वीज पोचविण्याची प्रतिज्ञा सरकारने घेतलेली असते. त्यासाठी आवश्यक ती सर्व साधने बनविण्याला सरकार प्रोत्साहन देते – ती साधने आपल्या देशात बनत नसतील तर परदेशातून आणते आणि घरोघर वीज पोचते. वीज घरात आणण्यासाठी कोणालाही पूर्वीपेक्षा एक तासदेखील अधिक श्रम करावे लागत नाहीत. विजेचा पुरवठा मिळविण्यासाठी जास्तीचे श्रमतास खर्चावे लागत नाहीत उलट ती घरात खेळू लागल्याबरोबर पाणी उपसते, दळण दळते, पंखे फिरविते आणि ती कामे करण्यासाठी पूर्वी लागणारे श्रमतास कमी करते. ग्राहकाच्या फुरसतीच्या वेळात भर घालते म्हणजेच संपत्तीत वाढ करते, श्रीमंती वाढवते. कारण ग्राहकांचे श्रम तेवढेच राहतात आणि कारखाने मालाचे उत्पादन भराभरा करतात–सायकली, मनगटी घड्याळेच नव्हे तर रिफ्रेजरेटर्स आणि वॉशिंग मशीन्स, मोटारी. सारे कसे आपणास फुकट मिळते.
ही संपत्तीमधली वाढ परस्परावलंबनाने शक्य होते. ह्या उलट आपण स्वावलंबनाचा आश्रय घेत असतो तोपर्यंत उत्पादनात वाढ करावयाची झाल्यास त्याच प्रमाणात परिश्रमांमध्येही वाढ करावी लागत असते. उत्पादनात वाढ करण्यासाठी यन्त्रांचा वापर आवश्यक आहे इतकेच नव्हे तर यन्त्रांची शक्ती वा उत्पादकता वाढती ठेवणे आवश्यक आहे. यन्त्रांचा वापर करावयाचा नसला तरी श्रमविभागणी करणे अत्यावश्यक आहे.
श्रम कमी कस्न उपयोग वाढविण्याचा माणसाचा स्वभाव औद्योगिक क्रान्तीनंतर घडलेला नाही. सगळ्या प्रगत देशांमध्ये म्हणजे जेथे कृषि आणि वस्त्रविद्या अवगत होती, तेथे केवळ शिकार करून आणि कंदमुळे गोळा करून उदरनिर्वाह होत नव्हता. तेथेही काही प्रमाणांत श्रमविभाजन होतेच. स्वावलंबन तत्त्व म्हणून मान्य केल्यावर आम्हाला परावलंबन आणि परस्परावलंबन ह्यांत सीमारेषा वा विभाजन रेषा आखताच येत नाही. ती विभाजन रेषा अतिशय धूसर होते. त्यात वैयक्तिक आवडनिवडीला वाव राहतो आणि दंभ माजतो. स्वावलंबनामुळे अहंकार वाढतो. परावलंबनामुळे लाचारी येत असली तरी परस्परावलंबनाचे मर्म समजल्यानंतर इतरांविषयी कृतज्ञतेचा भाव मनात निर्माण होतो. स्वावलंबनाचा सर्वांत हानिकारक परिणाम जर कोणता असेल तर आपल्या परिघाबाहेरच्या लोकांविषयी परकेपणा वाढतो. उदा. खेड्यांना शहरांविषयी आणि शहरातल्या सरकारविषयी. सर्वोदयाला अन्त्योदयाचे स्वरूप आल्याबरोबर आपपरभाव वाढीस लागतो. आपसांत आपपरभाव वाढणे हा स्वावलंबनाचा पराभवच आहे. आपल्याला संघटित उद्योगांमध्ये निर्माण झालेल्या वस्तु विनामोबदला-विनामूल्य–फुकट–मिळतात हे मान्य केल्याबरोबर त्याचे एकंदर अर्थव्यवहारांच्या आकलनावर अतिशय गंभीर परिणाम होतात. पूर्वीचे सारे संदर्भच बदलतात. त्याविषयी पुढच्या लेखांकात.
मोहनीभवन, खरे टाऊन, धरमपेठ, नागपूर — ४४० ०१०