१.कुटुंबाच्या दोनतीन व्याख्या करणे शक्य आहे. विकेंद्रित समाजव्यवस्थेतील सर्वांत लहान स्वायत्त घटक अशी एक काहीशी राजकीय-व्यवस्थापकीय-व्यावहारिक जगातील व्याख्या होऊ शकेल. विशाल समाजपुरुषाची ती एक छोटीशी घटकपेशी आहे अशी पण व्याख्या होऊ शकते. कुटुंबाची जैविक व्याख्या पण होऊ शकते – नर मादी-पिले अशी.
मानववंशसाखळी ही अखंड, अतूट असली तरी व्यक्ती, कुटुंबे ह्या त्यातल्या सुट्या सुट्या कड्या आहेत आणि त्यांचे महत्त्व आहेच. कुटुंबाची कोणतीही व्याख्या असो, मुलांना वाढविणे ही एक सामाजिक पण व्यक्तिअभिमुख महत्त्वाची बाब आहे, आणि यात आईबाबा, आजी आजोबा, मोठी भावंडे, घरातील नोकरवर्ग, सख्खे शेजारी या सर्वांचा समावेश असतो. एका अर्थाने हे “सामाजिक पालकत्व” आहे. आईवडील अर्थातच मुख्य. पण आजी आजोबा–आईवडील–मुले अशी ही पिढ्यान्पिढ्यांची अखंड साखळी जीवनाचे एक निराळे भान देते. जीवन हे अखंड आहे. प्रत्येक टप्प्यावर मागचे संदर्भ आणि पुढच्या शक्यता असतातच. हल्लीच्या फक्त तो-ती-ते इतक्या लहान कुटुंबांत हे अखंडत्व कुठेतरी हरवते.
समाजाची विभागणी वर्ग, जात, धर्म अशी आजवर व्हायची. सध्या अमेरिकेत ती वयाप्रमाणे होते. माझी एक पुतणी आहे. पाचसहा वर्षांच्या अमेरिकेतील वास्तव्यातून ती परत आली तर समवयस्कांशिवाय इतरांबरोबर वावरताना ती सुरवातीला गोंधळून जायची. सवयच गेली, म्हणाली, इतर वयांच्या माणसांबरोबर राहण्याची, बसण्या बोलण्याची. इथे तर एकाच घरात तीन तरी पिढ्या नांदतात.
२. एकंदर असे दिसते की बालसंगोपनाच्या बाबतीत फार अज्ञान आहे, अनास्थाही आहे. आईबाबा होणे ही एका अर्थाने ओघाने येणारी नैसर्गिक गोष्ट आहे. पण सुजाण पालक व्हायला तयारी करावी लागते. सर्वांत महत्त्वाची तयारी म्हणजे एका व्यक्तीने (शक्यतो आईने किंवा बाबाने) कमीत कमी पाच वर्षे यासाठी पूर्ण वेळ बाजूला काढून ठेवण्याची मनापासून तयारी ठेवली पाहिजे. याचा अर्थ दुसऱ्याने तिकडे ढुंकूनही पाहायचेच नाही. असा नव्हे. मूल एकाकी, एकलकोंडे वाढू नये असे वाटून दोन मुले तीन वर्षांच्या अंतराने होऊ दिली तर सात वर्षे तरी बाजूला काढून ठेवणे आवश्यक आहे. आईने ही जबाबदारी घ्यायची असे ठरले आणि वयाच्या २५ व्या वर्षी विवाह झाला असला तर ३४-३५ व्या वर्षी ती स्त्री आपली व्यावसायिक कारकीर्द पुन्हा चालू करू शकेल. व्यक्तिगत विकासाबाबत म्हणाल तर मुलांना वाढविणे म्हणजे स्वतःच नवा जन्म घेणे असे रोमांचकारी साहस आहे. मुलांना प्राथम्य देणे म्हणजे दुय्यम नागरिकत्व स्वीकारणे असे नसून सामाजिक ऋण फेडण्या-सारखे आहे. जो माणूस मुलांचे संगोपन करणार असेल त्याचे मुलांवर प्रेम तर हवेच पण निसर्गातील प्रत्येक गोष्टीवर हवे. झाडे, फुले, फळे, रंग, आकार, पशुपक्षी, नद्यानाले, डोंगर टेकड्या, आकाश, चंद्र-सूर्य, पाऊस . . . ‘निसर्गाने दिला स्वच्छंद आनंद, केवळ सौंदर्य केवळ आनंद’ असे कवी उगाच म्हणत नाही. ज्याला अशी निसर्ग-भावना आहे त्याला मुलांना खेळविणे, रमविणे हे प्र नच वाटणार नाहीत.
३. शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण आणि अनिवार्यता (compulsion) झाल्यापासून एका अर्थाने ५ ते १५ वर्षांपर्यंतची मुले सरकारने कायद्यानेच आपल्या ताब्यातच घेतल्यासारखे झाले आहे. त्यात अडीच ते पाच वर्षे मुलांना बालमंदिरात अडकवून टाकून पालक आणखी अडीच वर्षे स्वतःहून दुसऱ्याच्या ताब्यात देतात. या सर्व शालेय शिक्षणावर आजपर्यंत भरपूर लिहिले गेले आहे. हे सर्व जमेस धरूलाही असे म्हटले पाहिजे की ही पर्यायी व्यवस्था नसून पूरक व्यवस्था आहे. मूल कुटुंबातच घडत असते. त्याच्या भावभावना, मानसिक जडणघडण, व्यक्तिमत्त्व कुटुंबातच घडते आणि वाढते.
स्वतःहून शिकण्याच्या, या जगात तगण्याच्या फार जोमदार नैसर्गिक प्रेरणा मुलाच्यांत असतात. तुमच्याकडे ते आदर्शासाठी, सुरक्षित आधारासाठी मोठ्या विश्वासाने पाहात असते. ते परस्वाधीन आहे हे खरेच आहे पण त्याला लाचार करू नका. नऊ महिन्यांच्या गर्भाशयातील वाढीनंतर आईच्या पदराखाली, नंतर घराच्या छपराखाली आणि नंतर समाजाला धरून ते स्वतंत्र नागरिक होणार असते. प्रत्येक महिन्या-महिन्याला, मग वर्षावर्षाला त्याची शारीरिक, मानसिक, आंतरिक गरज आणि क्षमता बदलत जाते. ते काही छोट्या आकाराचे मोठे माणूस (pocket size adult) नसते. त्याची शारीरिक प्रमाणे, मानसिक जाणिवा, भोवतालच्या जगाचे आकलन हे सतत बदलत असते. या सर्व क्रियाप्रक्रियांचा आशय फार मोठा असतो. तो आपण आता तपशीलवार पाहू या. यासाठी म्हॉल्फ स्टाईनरच्या वाल्डोर्फ प्रयोगांचा प्रमुख आधार घेतला आहे. रवींद्रनाथ टागोर, मादाम मोंटेसरी, ताराबाई मोडक, पियाजे अशा अनेकांनी खूप उद्बोधक विचार मांडले आहेत. पण ते सर्व बालमंदिर, शाळा यांना पुढे ठेवून मांडले आहेत. इथे पालकांनी काय करायला हवे याचा प्रामुख्याने विचार मांडणार आहे.
४. शिक्षण म्हणजे नुसती बौद्धिक कसरत झाली आहे असे म्हणत म्हणत पाच (आणि आता तर तीनच) वर्षे नाही झाली तोच आपण मुलाला शाळा, अभ्यास, गृहपाठ, घोकंपट्टी, परीक्षा, गुण, गुणवत्ता यांच्या चरकात घालतो आणि त्याला पुढे येणाऱ्या ‘जीवनकलहासाठी’ तयार करण्याचा आटापिटा करत राहतो. काही शिक्षण-तज्ञांनी आणि बालमानस-शास्त्रज्ञांनी कडक शिस्तीचा अतिरेक (छडी लागे छम छम), मुलांची खेळण्याबागडण्याकडे सहज प्रवृत्ती, अनुभव घेण्याची क्षमता, स्वायत्त होण्यासाठीची धडपड, सृजनात्मक आविष्काराकडे सहज प्रवृत्ती इ. कडे लक्ष वेधले आहे. दोन महायुद्धे अनुभवलेल्यांना तर असे वाटायला लागले की फक्त बालवयातच संस्कार कस्न रसातळाला गेलेल्या मानवजातीला वर आणण्याची आशा आहे. आणि तरीही शिक्षणाचे राष्ट्रीयीकरण झालेच. लष्करी शिक्षणसुद्धा काहींनी सक्तीचे केले —- काहींनी खेळ, व्यायाम, गिर्यारोहण, कवायत, स्काऊट इ. मार्गांनी त्यांत चढाओढ घालून मागच्या दाराने ते आणले. म्हणजे एकूण शारीरिक-मानसिक झापडबंदपणा (regimentation) राहिलाच. या सर्वांतून मार्ग काढत, बालकाच्या नैसर्गिक आंतरिक जीवनाची दखल घेत घेत नवीन मार्ग काढावा लागेल.
५. पर्यावरणच माणसाला घडवत असते —- आनुवंशिकता, आजूबाजूचे वातावरण आणि तगून राहण्यासाठी करावा लागणारा जीवनसंघर्ष यातच मानवी उत्क्रांतीची बीजे आहेत असा काहीसा पूर्वनिश्चितीचा, निव्वळ भौतिक पातळीवरचा विचार डार्विनने मांडला. याचाच आधार घेत मग राष्ट्रवादी, समाजवादी, समाजसत्तावादी सरकारांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आखण्यास आणि त्यानुसार योजना कार्यान्वित करण्यास प्रारंभ केला. शिक्षणाचे सक्तीचे सार्वत्रिकीकरण झाले. त्यात बंदिस्तपणा आणि बांधिलकी आली. अविकसित, मागास समाजघटकांत पहिलीच पिढी शाळेत जाणारी आहे म्हटल्यावर काही गोष्टी अपरिहार्यही झाल्या. शिक्षणाचे स्वरूप अभ्यासक्रमाच्या चौकटीत औपचारिक आणि बंदिस्त झाले. ज्ञानाच्या व्याख्या बदलल्या. सांस्कृतिक, मानववंशशास्त्रीय परंपरा, रूढी, चालीरीती, संकेत, परीकथा, बोधकथा इत्यादींना स्थान उरले नाही.
व्यक्तिस्वातंत्र्य आणि सामाजिक बांधिलकी, व्यष्टी-समष्टी यांची नव्याने मांडणी होऊ लागली. पूर्वीच्या नैसर्गिक परिसरात मानवनिर्मित परिसराची भर पडली. परस्परावलंबनाला पर्यावरणशास्त्रामुळे व्यापक अर्थ प्राप्त झाला. या सर्वांचा थोडा बारकाईने विचार करायला हवा.
प्रथम अगदी लगतच्या वातावरणाचा विचार करू या. नवजात अर्भकाला देखील प्रेम, स्पर्श कळतात, अवहेलना कळते, एकाकीपण जाणवते. शांत हळुवार संगीत आणि कर्कश गोंगाट यातला भेद जाणवतो. सातव्या वर्षापर्यंत मुले नुसतीच तुमच्या हावभावांचे, बोलण्याचालण्याचे अनुकरण करतात असे नाही, त्यांना तुमच्या अंतर्यामीची बैठकही जाणवत असते आणि तीही त्यांच्यांत भिनत जाते. त्यांना स्वतःची निवड करता येत नाही किंवा स्वतःची परिस्थितीही निवडता येत नाही. आई-वडिलांचे हास्यविनोद, कडाक्याची भांडणे, प्रसन्न वातावरण या सगळ्यांचे परिणाम त्यांच्या शरीरावर आणि मनावर होत असतात. घरचे भाविक वातावरण, स्तोत्र-पूजापाठ, त्यांच्या भावजीवनावर ठसा उमटवितात. एकदा दुधाचे दात पडले की त्याच्यात पहिला बदल घडून येतो. तेथून पुढे १३-१४ वर्षांपर्यंत त्याच्यातला कलाकार कार्यरत राहतो. चित्रे काढणे, रंगांची पखरण करणे, चालू राहते. स्वतंत्र बुद्धी, संकल्पशक्ती जाणवायला लागते. हस्तकला, चित्रकला, पाठांतर, गाणे, लयतालनृत्य यांना भरपूर वाव द्यायला हवा. नुसते ज्ञान डोक्यात कोंबाण्याचा प्रयत्न करू नये. या वयात वास्तवाचे भान, सौंदर्याचे भान व तत्सम जाणिवा जागृत होत असतात. ह्यांच्यापुढे आदर्श लागतात. याच वयात त्यांचे आंतरिक जीवन समृद्ध होत असते. दुर्दैवाने आजच्या व्यावसायिक आणि अन्य उपक्रमांचे स्वरूप रोजगाराच्या (wage earning) अंगाने झाले आहे, निर्मितीच्या अंगाने नाही. त्यामुळे शिक्षणात सृजनाचा आनंद नाही की सामाजिक आशय नाही.
प्रत्येक मुलाचा स्वाभाविक कल, स्वभावधर्म वेगळा असतो. कोणी आपलेच खरे करणारे, कोणी अती उत्साही उतावीळ, कोणी लाजाळू आत्मरत, कोणी लयतालात रमणारे, असे अनेक प्रकार असतात. शारीरिक क्षमताही भिन्न भिन्न असतात. शाळेच्या सार्वत्रिक शिस्तीत हे सगळे पाहणे शक्य नसेलही, पण पालकांनी याचा विचार करायलाच हवा.
६. कलेची आवड —- लहान बाळाच्या शरीराला आपण गच्च दुपट्यात गुंडाळतो. त्याला हातपायपण हलवता येत नाहीत. आता अलिकडे त्याला मोकळे सोडतात. हातपाय हलवायला देतात. तसेच त्याचे अवखळ मन उड्या मारत असते, इकडे तिकडे सतत खेळू पहाते, नाचू बागडू पाहते. त्याला मात्र आपण आजही धाकात ठेवतो, दडपून टाकतो. हे सर्व शिस्तीच्या नावाखाली होते. पण शिस्त आणि दडपून टाकणे (discipline v/s oppression) यांत फरक आहे. वास्तविक मूल सतत शिकू पाहत असते.
सात ते चौदा वर्षांच्या काळात मुलांचा कलेकडे ओढा असतो. त्यांना तालात नाचायला आवडते, रंगांचे आकर्षण असते. त्यांना खडू, पेटी, रंग कागद द्या आणि त्यावर मनसोक्त चिरखडू दे. त्याला एखादे वाद्य द्या. काय वेडे वाकडे वाजवायचे ते वाजवू दे. आणि हो, अधून मधून त्याच्या कलाकृतीचे कौतुकही करायला विसरू नका. त्याचे काल्पनिक चित्र त्याच्याकडूनच समजून घ्या. तो पुढे मोठा कलाकार होईल न होईल. पण त्याचे कलेशी, सर्जनशीलतेशी, सौंदर्यदृष्टीशी कायमच सख्य जडेल. पुढे आयुष्यात त्याला त्याचा फार निराळा आनंद मिळेल. नुसत्या एकांगी, कोरड्या बौद्धिक जीवनाचा तोल सावरायला मदत करेल.
७. भाषेची गंमत —- अगदी पाळण्यापासून मुलाच्या कानी शब्द पडत असतात, आई भावंडांच्या निरर्थक बडबडीपासून ते अंगाईगीतांपर्यंत. या सर्वातला तो आश्वासक प्रेमळ आवाज मुलाला धीर देतो, त्याला मानसिक अस्वस्थतेपासून, एकाकीपणाच्या भावनेपासून सावरतो. पण पुढे जेव्हा मूल नेहमीची भाषा शिकायला लागेल तेव्हा मात्र ही बोबडी, लाडेलाडे भाषा थांबवा. नाहीतर पुढे बरीच वर्षे त्याला या लाडिकपणातून बाहेर पडायला लागतील. मूल समाजात वावरायला लागेल तेव्हा हे कसे चालेल? मात्र याचा अर्थ पुस्तकी भाषा, प्रमाण भाषा त्याच्या माथी मारा, असे नव्हे. बोलीभाषा हीच खरी मातृभाषा. भाषा ही माणसामाणसांचे नातेसंबंध जोडणारी, एकमेकांना समजून घेणारी जिव्हाळ्याची शक्ती आहे. किती निरनिराळ्या वातावरणांतून मुले शाळेत येत असतात. कोणाचे आईवडील धावतपळत कामावर गेलेले असतात. कोणाच्या घरात आदळ आपट झालेली असेत. कोणाला प्रेमाने, चुचकास्न आजीने तयार केलेले असते, कोणाला दाईने कोरडेपणाने व्यवस्थित सगळी तयारी करून दिलेली असते. मुलांना हे सगळे कळते. त्यांना बोलणाऱ्याच्या आवाजातील चढउतार जाणवतात. कवितावाचन, नाट्यवाचन, संवाद, कथाकथन, प्रवासवर्णन . . . अनेक अंगांनी भाषा त्यांच्यापर्यंत पोहोचायला हवी. या लहान संस्कारक्षम वयात त्यांना कर्कश, कचाकचा भांडणाची, टोचून बोलणारी भाषा ऐकवाच कशाला?
८. खोटे बोलणे आणि शिक्षा —- आपल्या नैतिकतेला नेहमीच अधून मधून धक्के बसत असतात. त्याची मुळे वास्तविकतेत असतात. सर्वच नातेसंबंधात परस्पर विश्वास, भरवसा, अवलंबिते (आधार) असत्वच. यात ज्यावेळी थोडा बिघाड होतो तेव्हा मूल खोटे बोलते. पण त्या खोटे बोलण्यात दुसऱ्याला फसविण्याच्या हेतूपेक्षा भीती आणि असुरक्षिततेची भावनाच जास्त असते. छडीने फोडून काढणे हा यावर उपाय होऊ शकत नाही. कधी कधी तर ज्याला आपण खोटे बोलणे म्हणतो ती बालकाने आपल्या कल्पनारम्यतेतून रचलेली गोष्ट असते. तुम्हाला कपबशीतून भातुकलीचा चहा मिळतोच ना. आपल्या सुप्त इच्छा आणि कल्पकता यांचा असा मेळ मुले घालत असतात. खरे म्हणजे ‘make-beleive-world’ चा असा उपयोग मोठी माणसेपण करत असतात. (‘सायबाला असा फैलावर घेतलाय’) तडातडा बोलणे, उपदेशाचे डोस पाजणे, बारिकसारीक गोष्टींसाठी आपली इज्जत पणाला लावणे, यांची परिणामकारता फार लवकर संपुष्टात येते. घरात गावभरच्या कुचाळक्या आपण करणार, शिक्षक, शिक्षण यांवर तोंडसुख घेणार, ‘घरात नाहीत’ असे खोटे सांगायला सांगणार . . या अशा दुतोंडी वागण्याने मुले पार गोंधळून जातात.
मूल जसे वाढत जाते तसतशा त्याच्या संवेदनाही बदलत जातात. वास्तवातले अंतर्विरोध त्याला दिसायला लागतात. आता आतापर्यंत देवाधर्मांच्या नावाखाली, पापपुण्यांच्या संकल्पनांवर आधारित काही सुसंगत मांडणी करता येत होती. गेल्या काही दशकातील अंतराळ, जीवोत्पत्ती, अणुविज्ञान–संशोधनातील माहिती लक्षात घेता निदान वाढत्या वयातील मुलांवर तरी आता हे संस्कार करणे अवघड झाले आहे.
तेव्हा बरोबर-चूक, योग्य-अयोग्य, शिक्षा हे सर्व फार फार अवघड प्रकरण आहे. शिक्षेचा उद्देश काय? वठणीवर आणणे? की योग्य मार्गदर्शन करत करत सुधारणे? आणि सुधारणा हा उद्देश असेल तर सहानुभूती, परिस्थितीला तोंड द्यायला शिकवणे, हिंमत देणे हे करायला हवे. नाहीतरी शिक्षा ही काय शरीराला, माणसाला इजा करण्यासाठी का असते? मुलाचे वय, त्याचा एकंदर आवाका, समजून घेऊन शिक्षा द्यायची. काही वेळा एक चांगली चापटी (थोबाडीत नव्हे) अबोल्यापेक्षा, उपवासापेक्षा खूप बरी. मुलांना जाणीव होतेच आणि ती ते केव्हाच विसरतात. उगीचच काल्पनिक, आज्ञाधारक (obedient आणि submissive यातही फरक आहे) मुलाशी आपल्या मुलाची तुलना करू नका. आणि अशी आदर्श, मिळमिळीत मुले काय कामाची? कधी कधी शिक्षा करायची वेळ येणे हा पालकाचाही पराभव असू शकतो.
९. वडीलकी, अधिकार, आज्ञाधारकपणा, फाजील लाड —- आपल्या यावरच्या कल्पना उगाचच फार अवास्तव असतात. खरडपट्टी आणि चोप यांनी काही होत नाही. सर्कशीतल्या घोड्याला ‘चाबूक आणि बक्षीस’ या तत्त्वावर आपण तयार करतो. आपल्याला माणसातले माणूसपण काढून टाकून त्याचे ओझ्याचे गाढव तयार करायचे आहे का? लष्कर, राजकीय पक्ष, धार्मिक मठ, इथे या गोष्टी करतात. तिथे शिक्षण नसतेच. असते नुसती वैचारिक कवायत. अशा वातावरणात बौद्धिक वाढ खुंटतेच. मुलांपुढे प्रत्यक्ष आदर्श ठेवावे लागतात, उपदेशाचे घुटके नाही. आईवडिलांनी आपले मतभेद, वादविवाद मुलांसमोर उघडे करू नयेत. ज्या नम्र आज्ञाधारक मुलांना अशा आदर्शाचे मार्गदर्शन लहानपणी मिळत नाही त्यांना पुढे स्वातंत्र्य आणि मुभा मिळूनही त्यांच्या वापर करता येत नाही आज्ञाधारकपणाच्या नावाखाली ती पडेल झालेली असतात. स्वत्व गमावून बसलेली असतात.
त्याच बरोबर मुलांचे फाजील लाडही उपयोगाचे नाहीत. आई वडील दोघेही नोकरी करत असले की अपराधी भावनेतून, सुबत्तेतून असे फाजील लाड होतात. काळ्या पैशातूनही हे होते. First generation विद्यार्थ्यांचेही कौतुकापोटी असे लाड होतात. ढीगभर कपडेलत्ते, खेळणी, चावट खाणे म्हणजे संगोपन नव्हे. त्यासाठी वेळच काढावा लागतो आणि सहानुभूतिपूर्वक जबाबदारीनेच मुलांना पुढे न्यावे लागते. (अपूर्ण)
६, सुरुची, संत जनाबाई पथ, पूर्व विले पार्ले, मुंबई — ४०० ०५७