एखाद्या व्यक्तीने पैशासाठी किडनीची विक्री केली अन्य एका व्यक्तीने स्वतःसाठी किंवा मुलीसाठी किडनी खरेदी केली, किंवा अन्य एका व्यक्तीने या व्यवहारात दलाल म्हणून काम केले, किंवा एका सर्जनने विकलेली किडनी काढण्याचे व विकत घेतलेली किडनी बसवण्याचे काम केले, असे ऐकल्यावर सर्व साधारण नागरिकाला सात्विक/नैतिक संताप येतो. हा संताप नुसताच अनाठायी नाही तर अन्यायकारक ही आहे असे मला म्हणावयाचे आहे.
श्रीमंत व्यक्ती आपला जीव वाचण्यासाठी आपल्या संपत्तीचा वापर करून किडनी विकत घेत असते. हा संपत्तीचा गैर किंवा अनावश्यक, दिखाऊ वापर म्हणता येणार नाही. मुलीच्या लग्नावर दोन कोटी रुपये खर्च करण्यापेक्षा, किडनीच्या खरेदीवर केलेला खर्च नक्कीच समर्थनीय आहे. श्रीमंत नसलेल्या व्यक्तीलाही कायमचा डायालिसिस वर खर्च करण्यापेक्षा किडनी कलम करणे स्वस्त पडते, कमी त्रासाचे व अधिक आरोग्यदायी ठरते. फसवणूक नसेल, पूर्ण संमती, माहितीपूर्ण संमती किडनी विकणाऱ्याने दिली असेल, तर श्रीमंत माणूस गरीब माणसाच्या गरिबीचा गैरफायदा घेऊन त्याला लुबाडतो, असे म्हणता येणार नाही.
गरजू व्यक्तीला किडनी मिळवण्याचे अन्य दोन पर्याय म्हणजे किडनीदान व प्रेताची किडनी कलम करणे हे होत. किडनीदानामध्ये नातेवाईक व्यक्ती पैशाची अपेक्षा न करता स्वतःची एक किडनी देते. नातेवाईक व्यक्ती किडनीदान करण्यास तयार नसेल, किंवा त्याची किडनी मॅच न झाल्यास हा मार्ग खुंटतो. प्रेताची किडनी घेण्यासाठी लागणारी पायाभूत व्यवस्था–सुविधा व त्यासाठी लागणारे कायदे आपल्या-कडे नसल्याने हाही पर्याय भारतात उपलब्ध नाही. हे अन्य दोन पर्याय उपलब्ध नसलेल्या व्यक्तीला वैध व उघड व्यवहाराने, उजळ माथ्याने किडनी खरेदी करण्यास बंदी घालणे म्हणजे त्याला मृत्युदंडाची शिक्षाच ठोठावण्यासारखे आहे! किंवा भ्रष्टाचारास/कायदेभंगास उद्युक्त करणे आहे.
आता किडनी विक्रेत्याची बाजू. गरीब व्यक्ती तिला तितक्या महत्त्वाच्या वाटणाऱ्या बाबीवर खर्च करण्यासाठी पैसा मिळवण्यासाठी आपली किडनी विकायला तयार होते. बऱ्याच वेळा हा पैसा त्या व्यक्तीला तिच्या प्रिय व्यक्तीवर औषधोपचार करून तिचे प्राण वाचवण्यासाठी हवा असतो. पैसा उभा करण्याचे अन्य सर्व मार्ग खुंटल्यामुळेच ती व्यक्ती किडनी विक्रीस तयार होते. कायद्याने हा मार्ग बंद करणे म्हणजे त्या व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर गदा आणणे होय, तिला गुन्ह्या शिवाय शिक्षा देणे होय, व जर औषधोपचारासाठी हे पैसे हवे असतील, तर संबंधित आजारी व्यक्तीसही मृत्युदंडाची शिक्षा देण्यासारखे आहे. व्यक्तीचा आपल्या शरीरावरील हक्क हा एक मानवाधिकार मानला पाहिजे.
किडनी विक्रेत्यांच्या आयुष्याला किडनी काढल्याने काही थोडा धोका जरूर संभवतो. पण त्या व्यक्तीला महत्त्वाच्या वाटणाऱ्या गोष्टीसाठी ती व्यक्ती हा धोका उघड्या डोळ्याने स्वीकारत असते. हा धोका मोटर सायकल शर्यतीत भाग घेण्यापेक्षा, पर्वतारोहणापेक्षा, किंवा अग्निशमन दलात काम करण्यापेक्षा किडनी देण्यामध्ये कमीच असतो. शिवाय किडनीदान करण्यातही तितकाच धोका असतो. म्हणून किडनी देण्यात आयुष्याला धोका आहे म्हणून जर त्यावर बंदी घालावयाची तर किडनीदानावरही बंदी घालावी लागेल, व धोकादायक खेळ, क्रीडा प्रकार, व्यवसाय यांवरही बंद घालावी लागेल.
किडनी विकल्याशिवाय आवश्यक पैसा उभा करता येत नाही अशा आर्थिक परिस्थितीत कोणी असू नये, ती अस्तित्वाची एक नीच अवस्था आहे हे खरे, पण अशा अवस्थेत असून किडनी विकण्यावर कायदेशीर बंदी आहे, ही आणखी नीच-तम अवस्था आहे. किडनी विकणे व खरेदी करणे या जर कायदेशीर गोष्टी असतील. तर विक्रेता व ग्राहक यांची गाठ घालून देण्याचे काम बेकायदेशीर कसे होईल? ती ही एक आवश्यक सेवाच आहे. ती नीट पार पाडण्याचे काम कायद्याने एका राष्ट्रीय पातळीवरच्या संस्थेवर सोपवावे. त्या संस्थेने काँप्युटरवर किडनी विकू इच्छिणाऱ्या व खरेदी करू इच्छिणाऱ्या व्यक्तींची, त्यांच्या रक्त गट व पेशी-गटांसह नोंदणी करावी. मॅचिंग करावे. ऑन-लाईन-किडनी-एक्सचेंज स्थापन करून मॅचिंग खरेदी-विक्रीदारांमध्ये भाव ठरवावा व व्यवहार पक्का करावा, सर्व आर्थिक देवघेव एक्सचेंज मार्फत चेकने व्हावी म्हणजे फसवणुकीचे प्रकार होणार नाहीत व खरेदीदारांनाही योग्य मॅचड् किडनीज् मिळातील. मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या व्यक्तींना दोन्ही किडनीज विकण्याची परवानगी असावी, व त्यांची किंमत त्या व्यक्तीच्या मृत्युपत्रांप्रमाणे निर्देशित व्यक्तींना किंवा संस्थांना देण्यात यावी.
“मानवी अवयवांचा व्यापार’ या शब्दसमुच्चयाबद्दल आपल्याला विनाकारणच घृणा वाटत असते. प्रत्यक्षात मानवी अवयवांचा व्यापार हा प्राथमिक मानवाधिकार मानण्यात यावा व तसे कायदे व नियम त्वरित करण्यात यावेत.
२५, नागाळा पार्क, कोल्हापूर