माझ्या मित्रमैत्रिणींनी शिफारस केली म्हणून ‘हरीभरी’ पाहायला गेले. शाम बेनेगल दिग्दर्शक, शबाना आझमी, रजित कपूर, नंदिता दास आदी कसलेले कलाकार वाचल्यावर ‘हरीभरी’ नक्कीच आपल्याला आवडेल असा असणार असे वाटले. शाम बेनेगल कोणती तरी सामाजिक समस्या घेऊन येणार व त्याला आशादायी असे उत्तर सुचविणार ह्याची अपेक्षा होती. (‘अंकुर’मधील लहान मुलाने काचेवर दगड फेकून व्यवस्थेला आपला नोंदवलेला निषेध आठवा.) अन् झालेही तसेच!
प्रश्न जरी केवळ मुस्लिम स्त्रियांपुरताच मर्यादित ठेवला असला तरी ‘शितावरून भाताची परीक्षा’ या न्यायाने त्या समस्येचे सामान्यीकरण करायला हरकत नाही, तेही तेवढेच सत्य ठरेल. सिनेमात पाच स्त्रियांच्या वेगवेगळ्या समस्या दाखविल्या आहेत. त्यातील तिघीजणी साधारण समवयस्क त्यामुळे एका पिढीच्या समजायला हरकत नाही, एक मागच्या पिढीची व एक उमलत्या पिढीची. स्त्री-पुरुष समानता ह्याविषयी आपण कितीही बोलले, लिहिले, वाचले तरी वास्तवात काही बदल झाला आहे असे म्हणवत नाही (काही तुरळक अपवाद वगळता) स्त्रीपेक्षा आपण केवळ ‘पुरुष’ आहोत हाच मुद्दा स्वतःचे श्रेष्ठत्व मिरविण्यासाठी पुरेसा वाटणाऱ्या पुरुषांची संख्या आजही कमी नाही. स्त्रीने केवळ संसार नीट करावा, अपत्यांना जन्म द्यावा, त्यांचे संगोपन करावे, पुरुषाला खूश ठेवावे! हेच तिचे कार्यक्षेत्र, ह्याच तिच्या मर्यादा! आणि हो, वंशाला दिवा देण्याची जबाबदारी तिचीच! आजच्या काळातही स्त्रीला मुलगी होणे वा मुलगा होणे याला पुरुष पूर्णपणे जबाबदार आहे हे न समजलेला रानटी, असभ्य पुरुष हा गजालाचा नवरा! तिला मोठी मुलगी आहे व तिच्या नवऱ्याला मुलगा हवा! तो ती देऊ शकत नाही (ह्यात दोष तिचाच!) म्हणून तिच्याशी पशुवत् वर्तन, घरातून वारंवार हाकलून देणे वगैरे! तिने आपले बोचके उचलावे व माहेरी यावे. माहेरी आई आहे म्हणून माहेर म्हणायचे! नाहीतर एक भावजय खाष्ट, त्या मानाने मोठी पुष्कळच समजूतदार! ती सलमा! सततच्या गर्भारपणामुळे पार चिपाड झालेली! गजालाच्या सोबतीने क्लिनिकमध्ये जाऊन कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन करून आलेली! हे ऐकल्यावर तिचा नवरा मात्र समंजस दाखवला आहे. ‘तू योग्य केलेस’ ही त्याची ह्या कृतीवर व्यक्त केलेली प्रतिक्रिया! परंतु धाकटी काय गहजब करते! ती टिपिकल कर्मठ, कुराणनिष्ठ मुस्लिम स्त्रीचे प्रतिनिधित्व करते. ‘बच्चे अल्ला की देन होते हैं’, ‘तूने बहोत बडा पाप किया’, ‘अल्ला तुझे कभी माफ नहीं करेगा’ वगैरे आक्रस्ताळेपणा तीच करते. तिला एवढेही कळत नाही की दीर, त्याची बायको, त्यांची मुले ह्या युनिटमध्ये आपण उगाच ढवळाढवळ करू नये! अन तीच कृती जेव्हा तिचा नवरा सांगतो की त्यानेही केली, तेव्हा ती चवताळून उठते! अफसाना तिचे नाव! त्यातल्या त्यात तीच कोणत्याही प्रकारच्या समस्यांपासून दूर आहे! पण अज्ञानाने उगाचच स्वतःला दुःखी करून घेते व घर सोडते! ठसक्यात घर सोडल्यावर पुन्हा त्याच घरी परतही येते!
आशादायी शेवट म्हटले आहे तो म्हणजे नजमाच्या बाबतीतला! गजालाची ही मुलगी, बाप घरी फरफटत नेतो काय, पुन्हा आणून टाकतो काय (वंशाच्या दिव्याच्या अपेक्षेने पुन्हा बोहल्यावर चढणार असतो हा, म्हणून). नजमाला शाळेत जायला, शिकायला आवडते. तिला ‘टीचर’ व्हायचे आहे. पण उपवर(?) झाली म्हणून थोराड स्थळ तिची काकू सुचविते, परावलंबी म्हणून गजालाही नाइलाजाने संमती देते, ह्यात नजमाशी काहीच सल्लामसलत नाही. तिच्या आयुष्याची ती सूत्रधार नाहीच मुळी. तिने आयुष्य कसे जगायचे हे अन्य कोणीतरी ठरविणार! सुदैवाने, त्याच वेळी तिची आजी (हिची समस्या म्हणजे तरुणपणी तिचे प्रेम एकावर असते परंतु अकल्पितपणे निर्माण झालेल्या पेचामुळे तिला लग्न मात्र दुसऱ्याशीच करावे लागते) कॅन्सरने आजारी आहे असे डॉक्टर सांगतात व त्याचे कारण कोवळ्या वयात वारंवार लादले गेलेले मातृत्व हे होय! तेव्हा गजाला खाड्कन जागी होते (म्हणून वर ‘सुदैवाने’ म्हटले) व आपल्या मुलीला (जी हिरमुसून खाटेवर झोपलेली असते) शाळेत जाण्याची परवानगी देते. अन् हे फुलपाखरू आनंदाने, नाचत, बागडत, गाणे गात, आशादायी जीवनाच्या अपेक्षेने वाटचाल करते. येथे चित्रपट संपतो.
स्त्रियांच्या समस्यांना प्राधान्य देणारे काही हिंदी, मराठी चित्रपट जरूर निघाले आहेत. परंतु ते पाहताना मनात सतत वास्तवात दिसणारा विरोधाभास खटकत असतो. एका टोकाला अवकाशात भ्रमण करणारी, ज्ञान-विज्ञान तंत्रज्ञानात भरारी मारणारी स्त्री आणि दुसऱ्या टोकाला भर रस्त्यात चारचौघांच्या समक्ष जिचा खून होतो, सात वर्षांची मुलगी जिच्यावर बलात्कार होतो, वर्गात बसलेल्या प्रेयसीची निघृणपणे हत्या होते, एखादीवर सामूहिक बलात्कार होते, एखादीला केवळ संशयापोटी उभे जाळले जाते, एखादीला जादूटोणा करते म्हणून तिची नग्न धिंड काढून दगडाने ठेचून मारले जाते, स्वतःच्या मुलीवर बापच बलात्कार करतो, हे सर्व वाचले की मन विषण्ण होते. स्त्रीची, पर्यायाने समाजाची प्रगती होते की अधोगती हेच समजत नाही.
अलीकडे तर मला स्त्रियांच्या समस्यांसंबंधी लिहिलेली पुस्तके, लेख, चित्रपट देखील पहावेसे वाटत नाहीत. स्वतः स्वतःच्या विचारांप्रमाणे आयुष्य जगावे. बस! खरोखरच स्त्री-पुरुष समानता आम्हाला समाजात रुजवायची असेल तर दोन गोष्टी व्हायला हव्यात. एक म्हणजे स्त्रीने स्वतःकडे बघण्याचा देहनिष्ठ दृष्टिकोन सोडायला हवा व दोन, पुरुषांनी स्वतःचा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा! स्त्री म्हणजे केवळ भोगवस्तू हा विचार वरवर पुरोगामी असणाऱ्या पुरुषांच्याही अंतर्यामी दडलेला असतो. ह्या दोन्ही गोष्टी केव्हा घडतील माहीत नाही पण असे कधी तरी घडेल या अपेक्षेने नजमासारखे स्वप्नात रमायला माझे मन तयार नाही.
३/४, कर्मयोग अपार्टमेंट, सुशीला बलराज मार्ग, धंतोली, नागपूर — ४४० ०१२