प्राध्यापक रेगे यांचे तत्त्वज्ञान या ग्रथांतील डॉ. सुनीति देव यांच्या ‘विवेकवाद आणि त्याच्यापुढील आव्हाने’ या लेखाला प्रा. रेग्यांनी दीर्घ उत्तर दिले आहे. त्यांच्या सर्वच लिखाणाप्रमाणे हे उत्तरही गंभीर विचाराने परिप्लुत आणि अतिशय व्यवस्थित झाले आहे. त्यातील काही युक्तिवादांना उत्तरे देण्याचा हा प्रयत्न.
१. आरंभी प्रा. रेगे यांनी देवांच्या लेखातील ढोबळ चुका म्हणून दोन गोष्टींचा उल्लेख केला आहे. पहिली गोष्ट म्हणजे विज्ञानाच्या औपन्यासिक-निगामी रीतीत (hypothetico-deduction method) एक अवैध अंश आहे ही. विज्ञानाची रीत औपन्यासिक-निगामी आहे हे खरेच आहे; पण तिच्यातील अवैध अंशामुळे तिचे निष्कर्ष सिद्ध होत नाहीत असे रेगे म्हणतात. तो अवैध अंश म्हणजे उपन्यासाच्या (hypothesis) निकषणात (म्हणजे testing मध्ये) वापरण्यात येणारा औपन्यासिक संवाक्याचा (Hypothetical syllogism) हा प्रकार, म्हणजे उत्तरवाक्याची स्थापना (affirming the consegnent). हा प्रकार तर्कशास्त्राने अवैध मानला आहे. त्यामुळे उपन्यास-परीक्षा अपुरीच राहते. उपन्यास संभाव्य आहे एवढेच आपण म्हणू शकतो. तो सिद्ध होता असे आपण कदापि म्हणू शकत नाही. या गोष्टीचा देवांनी उल्लेख केला नाही हे खरे आहे. पण त्याचे कारण ही गोष्ट तर्कशास्त्राच्या प्रारंभिक पुस्तकातही लिहिलेली असते आणि म्हणून ती सुपरिचित आहे हे असावे, तो दोष त्यांना माहीत नाही हे नसावे असे मला वाटते. नाहीतरी उद्गमनाचे निष्कर्ष नेहमी संभाव्य असतात, कदापि संशयातीत नसतात हे त्यांना मान्य आहेच. असो. वैज्ञानिक पद्धत अनुभवावर आधारित आहे, आणि तिची रीत उद्गमन (induction) आहे, असे देव म्हणतात. त्यावर रेगे म्हणतात की विज्ञानात उद्गमनाचा उपयोग फारसा होत नाही; त्यात वापरली जाणारी रीत म्हणजे औपन्यासिक-निगामी रीत. हे म्हणणे एका दृष्टीने बरोबर आहे. पण अलीकडे ‘induction’ हा शब्द ज्या अनुमानाची साधके (premises) निष्कर्षणास पोषक असतात, पण तो सिद्ध करण्यास अपुरी असतात अशा सर्व अनुमानांसंबंधी वापरण्याची रीत आहे हे रेगे यांना सांगण्याची गरज नाही. त्याप्रमाणे विज्ञानाचा आधार उद्गमन आहे असे म्हणणे समर्थनीय आहे.
२. देवांच्या निबंधातील आणखी एक वाक्य हे आहे. ‘कोणत्याही काळी एकाच घटितक्षेत्राविषयी दोन उपपत्ती विज्ञानात आढळत नाहीत’. त्यावर रेगे पुंजयांत्रिकीतील (Quantum Mechanics) उदाहरण देऊन म्हणतात की प्रकाश लहररूप आहे आणि तो कणस्य आहे हे दोन्ही उपन्यास पुंजयांत्रिकीत आहेत. त्यांच्यापैकी एक चूक आणि एक बरोबर असे दाखविता आलेले नाही. ही गोष्ट खरी आहे. यावर असे म्हणता येईल की एका क्षेत्रात शेवटी एकच उपन्यास शिल्लक ठेवायचा ही विज्ञानाची रीत आहे, आणि तिला अनुसरून आतापर्यंत विज्ञानाची वाटचाल यशस्वीपणे झाली आहे. पुंजयांत्रिकीतील हे उदाहरण सोडून दुसरे उदाहरण वैज्ञानिकांना सापडलेले नाही. कदाचित् पुढे मागे याही क्षेत्रात विज्ञानाला यश मिळेल. अशी आशा अनेक वैज्ञानिक बाळगून आहेत.
३. देव म्हणतात : ‘विज्ञानाचे ताप्तुरतेपण मान्य कस्तही असे म्हणणे खरे आहे की विज्ञानाखेरीज अन्य ज्ञानोपाय आपल्याजवळ नाही’. त्यावर रेगे म्हणतात : ‘वैज्ञानिक ज्ञान हेच खरेखुरे ज्ञान आहे हे मत मला मान्य नाही. विज्ञानाच्या दोन मर्यादा आहेत. (१) माणसांना स्वतःच्या आणि इतरांच्या प्रेरणांचे, उद्दिष्टांचे, इच्छांचे जे ज्ञान असते ते वैज्ञानिक ज्ञान नव्हे. (२) दुसरी मर्यादा — मूल्यांचे ज्ञान. हेही वैज्ञानिक नव्हे हे स्पष्ट आहे’. या मर्यादांविषयी पुढील गोष्टी सांगता येतील (१) आपल्या व इतरांच्या प्रेरणांचे, उद्दिष्टांचे, इच्छांचे आपले ज्ञान वैज्ञानिक नव्हे हे म्हणणे मान्य करावयास हवे. पण त्याचे कारण वैज्ञानिक ज्ञान सार्विक असते, ते विशेषांचे नसते, आणि आपले आपल्या आणि इतरांच्या प्रेरणा, इच्छा इत्यादींचे ज्ञान विशेषांचे असते. आपल्या इंद्रियानुभवासारखे ते विशेषांचे ज्ञान असते. तसे पाहिले तर आपले डोळा, कान इ. इंद्रियांचे ज्ञानही वैज्ञानिक नसते. इंद्रियानुभव हा विज्ञानाचा कच्चा माल आहे, ते विज्ञान नव्हे. (२) मूल्यांचे ज्ञान कितपत ज्ञान आहे हे शंकास्पद आहे. अमुक गोष्ट मूल्यवान आहे असे आपण म्हणतो, पण ते विषयनिष्ठ किंवा वस्तुनिष्ठ (objective) असते हाकाय वादग्रस्त मुद्दा आहे. मूल्य विषयक अवधारणासंबंधी एकमत नाही. तसे इंद्रियानुभवाने कळणाऱ्या गोष्टीत नसते.
४. रेगे विचारतात : ‘वैज्ञानिक ज्ञानाची व्याप्ती काय आहे ? मानवी अनुभवाचे विषय असलेल्या सर्व पदार्थांचे वैज्ञानिक ज्ञान होणे शक्य आहे काव्य? कुणीही मनुष्य ही आत्मभान असलेली अशी वस्तू असते आणि इतर व्यक्तीही याच स्वरूपाच्या व्यक्ती आहेत ही जाणीव तिला असते. माणसांना एकमेकांचे, एकमेकाच्या प्रेरणांचे, हेतूंचे, प्रवृत्तींचे जे ज्ञान असते ते वैज्ञानिक ज्ञानात सामावून घेता येईल का? मानसशास्त्र, समाजशास्त्र इ. शाख्यांनाही विज्ञाने बनण्याची हौस आहे; पण माणसे जे करतात त्याला अर्थ असतो. निसर्गातील घटनांना अर्थ नसतो. निसर्गातील घटनांना कारणे असतात, परिणाम असतात, पण अर्थ नसतो. हा अर्थ वैज्ञानिक परिघात सामावून घेता येईल काय?’
या ठिकाणी आपण विज्ञानांतील एक भेद लक्षात घ्यावयास हवा. तो म्हणजे नेमकी विज्ञाने (exact sciences) आणि सांख्यिकीय विज्ञाने (statistical sciences) यांतील भेद. सांख्यिकीय विज्ञाने नेमकी विज्ञाने आहेत असा दावा ती करीत नाहीत. त्यांतील नियम सामान्यपणे बरोबर असतात, सर्वदा बरोबर नसतात. उदा. सरासरी मनुष्याचे आयुर्मान अमुक असते असा नियम आहे. त्याचा दावा प्रत्येक मनुष्य अमुक इतकी वर्षे जगतो किंवा जगेल असा नसतो. पण त्यामुळे ते विज्ञान नव्हे असे म्हणता येत नाही. त्याच्यावर समग्र विमाव्यवसाय आधारलेला असतो. किंवा हवामानशास्त्र घ्या. हवेइतके अनियमित काही नाही असे आपण म्हणतो. पण हवामानाचे सांख्यिकीय का होईना, विज्ञान आहे. त्या विज्ञानावर विमानवाहतूक सर्वस्वी अवलंबून असते. त्यामुळे आपल्याला एकमेकांच्या प्रेरणांचे, हेतूंचे जे ज्ञान असते ते वैज्ञानिक असू शकत नाही असे म्हणता येत नाही.
आता हे खरे आहे की तर्कशुद्ध विचार करणे किंवा एखाद्या युक्तिवादातील तार्किक चूक ओळखणे या क्रिया निर्जीव जगातील घटनांसारख्या केवळ नैसर्गिक घटना नाहीत. त्या नैसर्गिक घटना आहेत हे खरे आहे, पण त्या आणखी काही आहेत. तसेच निसर्गाचे नियम डावलून कर्मे करण्याचा एखादा नियम आपण स्वतः बनविणे आणि तो पाळणे ह्या क्रिया मनुष्येतर निसर्गात आढणाऱ्या गोष्टी नव्हेत. समजा रोज पहाटे पाच वाजता उठून कामाला लागणे हा नियम मनुष्य करू शकतो आणि तो पाळू शकतो. या क्रिया म्हणजे केवळ नैसर्गिक घटना नव्हेत. त्या वैज्ञानिक नियमात बसविता येतील काय?
याचे उत्तर आहे ‘येतील, नव्हे येतात.’ मानवी उदा. बौद्धिक आणि नैतिक क्रियासंबंधी काही नियम सांगता येतात. उदा. माणूस निसर्गतः स्वार्थी किंवा स्वहित-साधणारा असतो हा नियम मान्य केला तरी तो कधी कधी परहितार्थ क्रियाही करतो असे दिसते. त्याचा सांख्यिकीय नियम ग्रथित करता येईल किंवा माणसाला शुद्ध युक्तिवाद काय असतो आणि अशुद्ध युक्तिवाद कसा असतो हे माहीत असूनसुद्धा तो अनेकदा स्वार्थाकरिता किंवा सवयीमुळे अशुद्ध युक्तिवादाला मान्यता देऊ शकेल. तेव्हा तर्कशुद्ध विचारावर स्वार्थाचे किंवा अन्य कारणांचे काय परिणाम होतात याचे सांख्यिकीय नियम ग्रथित करता येतील. हे नियम अन्य नियमांच्या संघर्षाने होणाऱ्या घटनांचे द्वितीय स्तरीय नियम असतील. पण म्हणून ते वैज्ञानिक नियम नाहीत असे म्हणता येणार नाही.
५. रेग्यांना महत्त्वाचा वाटणारा एक प्र न म्हणजे ‘मनुष्याचे निसर्गाशी नाते काय आहे’ हा. पण प्रामाणिकपणे बोलायचे तर हा प्र न मला निरर्थक वाटतो. माणसाचे निसर्गाशी नाते आहे म्हणजे काय? बहुतेक पृथ्वी जड आणि निर्जीव आहे; आणि उरलेली वनस्पति, प्राणी आणि मनुष्ये याची बनलेली आहे. सामान्यपणे बोलायचे तर पृथ्वी माणसाविषयी पूर्ण निर्विकार आहे. तिचे माणसाशी कसलेही नाते नाही. नाते हा शब्द मला वाटते दोन चेतन व्यक्तींमधील परस्परसंबंधाचा वाचक आहे. यावर रेगे म्हणतात की मनुष्य ज्ञाता आहे, पृथ्वीला वेगवेगळे आकार देणारा कर्ता आहे. मनुष्य ज्ञाता आणि कर्ता आहे हे खरे आहे. पण म्हणून त्याचे निसर्गाशी नाते आहे असे म्हणणे कितपत आकलनीय आहे ? रेगे मनुष्याच्या निसर्गाशी असणाऱ्या नात्यांविषयी सतत बोलत असतात. पण माझे जर निसर्गाशी एखादे नाते असेल तर निसर्गाचेही माझ्याशी नाते असले पाहिजे. पण निसर्गाचे मनुष्याशी नाते आहे असे म्हणणे हा भाषेचा दुरुपयोग आहे.
६. रेगे म्हणतात : ‘धार्मिकतेचा, अध्यात्माचा प्रांत धूसर आहे; पण विश्वाचा समग्र मानवी अनुभव घेतला, तर या अनुभवाचा अविभेद्य असा तो प्रांत आहे. विश्वाला माणसाकडून जो प्रतिसाद मिळतो त्यात दृश्य, इंद्रियगोचर जगापलीकडे असलेल्या आणि ह्या जगाला आधारभूत असलेल्या अशा तत्त्वाची जाणीव हा एक अनिवार्य घटक असतो. दृश्य जग अप्रतिष्ठित आहे, पण स्वयंभू, प्रतिष्ठित असे तत्त्व आहे, आणि दृश्य जग त्याचा मर्यादित आविष्कार आहे. या अतीत तत्त्वाशी माणसाचे साक्षात् नाते जोडणारा असा एक घटक मानवी व्यक्तीमध्ये आहे . . . हा घटक म्हणजे माणसाची स्वाभाविक धार्मिकता.’
रेग्यांचा स्वाभाविक धार्मिकतेवर भर आहे. पण स्वाभाविक धार्मिकता म्हणजे काय? मला वाटते त्यांना अपेक्षित अर्थ “जे शिकावे लागत नाही, विनाप्रयत्न निर्माण होते ‘ते’ असावे. त्यांचे म्हणणे असे दिसते की मनुष्य आपोआप धार्मिक होतो पण हे खरे आहे काय? पण ते खरे आहे असे मानले तरी त्याला रेग्यांना अभिप्रेत महत्त्व आहे असे सिद्ध होत नाही. अनेक समजुती स्वाभाविक आहेत. उदा. मनुष्याला भीति स्वाभाविकपणे वाटते; पण त्या वाटण्याला काही अतीत किंवा गूढ अर्थ आहे असे म्हणता येत नाही. त्यामुळे रेग्यांचा ‘स्वाभाविक’ या विशेषणाचा उपयोग व्यर्थ वाटतो. तसेच मनुष्याच्या धार्मिकतेला रेगे देतात तो अर्थ देणे निराधार आहे. हे जग अप्रतिष्ठित आहे असे धार्मिक मनुष्य मानतो असे रेगे म्हणतात. पण त्याचा अर्थ काय? कोणत्या अनुभवामुळे ते अप्रतिष्ठित आहे असे वाटते? मनुष्याला हे जग सोडून जाणे अप्रिय असते. पण त्यामुळे दृश्य जग अप्रतिष्ठित कसे होते? आणि त्याच्या आधाराला एक प्रतिष्ठित असे तत्त्व आहे या म्हणण्याला आधार काय?”
दृश्य जग अप्रतिष्ठित आहे आणि या जगाला आधारभूत असणारे एक प्रतिष्ठित जग आहे या विधानाचा विचार करा. प्रतिष्ठित म्हणजे अनंत काळ टिकणारे आणि अप्रतिष्ठित म्हणजे अल्पकाल टिकणारे असे त्या शब्दांचे अर्थ आहेत काय? पण तसे असेल तर अनंत काल टिकणारे काही आहे ह्या म्हणण्याला आधार काय? ही पृथ्वी, तिच्यावरील सागर, तिच्यावरील दाट वनस्पतिसृष्टि या गोष्टी लक्षावधि वर्षे टिकून आहेत आणि तिच्याहून अधिक टिकाऊ आणखी काही दाखविणे कठीण आहे. निदान कोट्यवधि ताऱ्यांचे बनलेले हे तारामंडळ तर अब्जावधि वर्षे ध्रुव असे टिकून आहे. मग हे दृश्य जग अप्रतिष्ठित आहे या म्हणण्याला अर्थ काय?
आता व्यक्तीचे जीवन अल्पकाल टिकणारे आहे हे खरे; पण त्यामुळे हे दृश्य जग अप्रतिष्ठित होत नाही. व्यक्तीचे जीवन अल्पकाल टिकणारे आहे असे कोणी म्हटले तर ते समजू शकते. पण खरे म्हणजे व्यक्तीचे जीवन अतिशय अनि िचत असते. हे शोचनीय आहे आणि त्यावर सतत उपाय शोधून त्यांचा वापर करणे चालू आहे : आजच व्यक्तीची आयुर्मर्यादा पूर्वीपेक्षा कितीतरी वाढलेली आहे, आणि जीवन सुरक्षित आणि सुखी आणि दीर्घायुषी करण्याचे उपाय मोठ्या प्रमाणात शक्य झाले आहेत. आणि या प्रगतीला मर्यादा घालणे कठीण आहे. कदाचित् मृत्यू ही गोष्ट भयकारी नसून उलट स्वागतार्ह असेल. निरोगी, सुखी दीर्घायुष्य भोगल्यानंतर जेव्हा मन समाधानी होते आणि शक्ती क्षीण होतात, त्यावेळी कदाचित् वृद्ध माणसे मृत्यूचे स्वागत करतील. अकाली संपणारे आयुष्य दुर्दैवी खरेच; पण त्याच्यामागे अनंत काळ टिकणारे अस्तित्व आहे असे मानले तरी ते खरे आहे हे आपल्याला कळू शकत नाही. मृत्यूपासून कोणालाही सुटका नाही. अतीतवाद्यालाही नाही!
७. ‘चिंतनशील माणसाला विश्वाविषयी स्वाभाविकपणे पडणारे प्र न अर्थशून्य म्हणून झटकून टाकण्याची फॅशन वि लेषण तत्त्वज्ञानात ढ आहे’ अशी रेग्यांची तक्रार आहे. ते म्हणतात, ‘हे प्र न माणसांना पडतात उदा. काळाला आरंभ आहे का? काहीच अस्तित्वात नाही असे म्हणणे शक्य आहे किंवा काहीतरी असणारे अनिवार्य आहे? जे नसणे शक्य होते, पण जे प्रत्यक्षात अस्तित्वात आहेत अशा पदार्थाचा समूह म्हणजे विश्व का? मग या विश्वाला बूड नाही का?’ आता समजा या प्र नांचा गंभीरपणे विचार करायचे ठरविले तर काय दिसते? असे लक्षात येते की त्या प्र नांना निर्णायक उत्तरे नाहीत. म्हणून वि लेषक तत्त्वज्ञ जे म्हणतात की ते प्र न विचारणे चूक आहे ते बरोबर असू शकेल. किंवा त्यांना उत्तरे नाहीत याची आणखी काही कारणे असू शकतील. म्हणून त्या प्र नांकडे दुर्लक्ष करण्याची पद्धत पडली आहे. त्याबद्दल वि लेषक तत्त्वज्ञाला दोष देण्यात काय हशील आहे? ज्यांना त्यांना उत्तरे देणे शक्य आहे असे वाटते त्यांचे हात कोणी धस्न ठेवले नाहीत.
८. विज्ञानानिष्ठ व ईश्वरावर विश्वास यात विरोध आहे असे देव म्हणतात. त्यावर रेगे म्हणतात की अनेक थोर वैज्ञानिक ईश्वर मानणारे होते. उदा. न्यूटन आणि मॅक्स्वेल. पण त्यांचा काळ विज्ञानाच्या आरंभाचा होता. त्यावेळी वैज्ञानिक पद्धतीचे स्वरूप स्पष्ट झालेले नव्हते. विशेषतः ज्याला समर्थक पुरावा असेल तेवढेच सत्य म्हणून स्वीकारायचे असे म्हटले की ईश्वराचे अस्तित्व मान्य करणे ही गोष्ट वैज्ञानिक भूमिकेला सोडून झाली हे मान्य करावे लागते. न्यूटनचे धार्मिक असणे ही गोष्ट त्याच्या विज्ञानाशी पूर्ण असंबद्ध होती. तिचा विज्ञानाशी मुळीच संबंध नव्हता. पण म्हणून त्याची ईश्वरावरील श्रद्धा समर्थनीय होती असे म्हणता येत नाही.
९. लेखाच्या शेवटी शेवटी रेग्यांनी रसेलचे एक दीर्घ अवतरण दिले आहे. त्याविषयी ते म्हणतात की जी जीवनसरणी रसेल यांना श्रेयस्कर वाटते ती धार्मिक आहे. कदाचित् रसेलला श्रेयस्कर वाटणारी जीवनदृष्टी आणि धर्मवाद्याला श्रेयस्कर वाटणारी जीवनदृष्टी यात काही साम्य असेल. पण त्या दृष्टींच्या मागचा विचार अतिशय भिन्न आहे. गणितात उत्तराला स्वतंत्र महत्त्व नसते; ज्या रीतीने ते उत्तर आले आहे तिला महत्त्व आहे असे गणिताचे शिक्षक म्हणतात हे सर्वांच्या परिचयाचे आहे. विशिष्ट सात, आत्मकेंद्रित प्रकृतीपेक्षा सार्विक, अनन्त आणि अपक्ष प्रकृती श्रेयस्कर आहे असे ते म्हणतात. ही दृष्टीची बिशालता, निःपक्षपातीपणा हे गुण नि िचतच श्रेयस्कर आहेत. पण ती दृष्टी आपल्याला प्राप्त होण्याकरिता श्रद्धा, अतीतवादी श्रद्धा आवश्यक नाही हे रसेलच्या उदाहरणावरून दिसून येते. म्हणून रसेलला अभिप्रेत असलेली वृत्ती अतिशय भिन्न आहे.
या संदर्भात रेगे म्हणतात, ‘ज्याचा धार्मिकतेत अनुप्रवेश झाला आहे त्याला बाहेरून पाहणाऱ्याला वाटणारी विसंगती वाटत नाही. तो तिचा स्वीकार करून आपल्या वाटेने पुढे जातो. . . . सर्व गूढांची उकल करणे हे आपले काम नव्हे; विहित मार्गावरून न ढळणे एवढेच आपले काम आहे, अशी त्याची वृत्ती असते’. पण रसेलची ही वृत्ती नाही. समोर येईल त्या गूढाची उकल करणे, निदान ज्यांची उकल शक्य आहे त्यांची उकल करणे, आणि ज्यांची शक्य नसेल तीही पुढे मागे शक्य होईल असे म्हणणे ही त्याची वृत्ती होती. तिच्यात शेवटपर्यंत फरक पडला नाही. म्हणून रसेलच्या उताऱ्याचा धार्मिक वृत्तीला समर्थनार्थ उपयोग असमर्थनीय आहे.