. . . ती तरुण मुले वेडावली होती. ती कोणत्याही सार्वजनिक नळावर पाणी पीत हुंदडत होती. मार खात होती. स्पृश्य जगाच्या कपाळावरील आठ्यांकडे उपहासाने पाहात होती. कोणत्याही देवळात शिरत होती, आणि डोक्यावर घाव घेत होती. देवाच्या मायेची पाखर घेऊन, बेडरपणे स्पृश्य जगाच्या नरड्याशी झोंबू पाहणाऱ्या रागीट नजरांशी नजर भिडवीत होती. पण अखेरीस त्या देवदर्शनाने त्यांची पोटे भरली नाहीत. त्या स्पृश्यांच्या नळावर पाणी पिऊन त्यांचे समाधान झाले नाही. मग ती समाधानासाठी माणसांकडे पाहू लागली. त्यांना तीनच माणसे माहीत होती. गांधीबाबा, दादा आणि आबा. आता त्यांच्या नजरांना पूर्वीचा पिंपळाच्या पारावरील माश्या हाकीत बसणारा आबा दिसतच नव्हता. त्यांना धाडसी, पराक्रमी, स्वराज्य मिळवणारा, सत्यधर्मी, सगळ्यांसाठी प्राण पणाला लावणारा आबा दिसत होता.
[विभावरी शिरूरकरांचे ७ मे २००१ रोजी निधन झाले. त्यांच्या बळी या कादंबरीतील हा उतारा, अस्पृश्यतानिवारण कायद्याला ‘गुन्हेगार’ जातींमधील तरुणांचा प्रतिसाद दाखवणारा.]