शशिकांत हुमणे, १२, राजीव सह-गृहनिर्माण संघटना, बांद्रा-कुर्ला संकुल, मुंबई — ४०० ०५१
एप्रिल महिन्यात १४ तारखेला डॉ. आंबेडकरांचा जन्मदिवस येतो. त्यानिमित्त एक जुने शुभेच्छापत्र पाठवीत आहे, ज्यात डॉ. आंबेडकरांचे मौलिक विचार आहेत. हे विचार एप्रिलच्या अंकाच्या मुख्यपृष्ठावर छापावे, तसेच नोबेल प्राईझविजेता इलियास कॅनेटी याचे त्याच पत्रातील विचार मे च्या अंकाच्या मुख-पृष्ठावर छापावे.
“ते” आणि “आपण’ हे हिंदुधर्मातील संपूर्ण जातीजमातींचे नाजुक दुखणे आहे. जातीशिवाय हिंदू किंवा हिंदुधर्म नाही. आणि हिंदूंशिवाय जगात इतरत्र कुठेही जाती-वेडेपणा व जाती-मत्सर उपलब्ध नाही. जातीच्या संसर्गरोगाची लागण मुस्लिम आणि ख्रि चन धर्मीयांनाही झाली असल्यास नवल नाही, परंतु या पापाचे धनी सुद्धा हिंदू आणि हिंदुधर्मच आहेत असे खेदाने म्हणावे लागते. ‘हिंदुधर्म’ व ‘हिंदुसंस्कृती’ हे शब्द फार व्यापक अर्थाने ख्ढ झाले असले तरी ते ‘ब्राह्मणीधर्म’ व ‘ब्राह्मणीसंस्कृती’ यांना समानार्थीच आहेत. गेल्या वर्षाभरात ‘घटना समीक्षा आयोग’ या जनहिताच्या विषयावर ‘सुधारका’त कोणीही लिहिले नाही. यावरही चर्चा व्हावी.
डॉ. मुरलीमनोहर जोशी यांच्या मानवी संसाधन विभागाने भारतीय संस्कृतीच्या पुनरुज्जीवनासाठी संस्कृत भाषा सर्व स्तरांवर मोठ्या प्रमाणात रुजू करण्याचा संकल्प सोडला आहे. पाली, प्राकृत, अर्धमागधी यासारख्या प्राचीन, समजायला व शिकायला संस्कृतच्या तुलनेने फार सोप्या असलेल्या भाषा सोडून एकट्या संस्कृत-चाच पुरस्कार करण्याचे कारण काय, यावर वैचारिक मंथन होणे गरजेचे आहे. त्या उपेक्षित भाषांमध्येही विविध प्रकारचे विपुल साहित्य अस्तित्वात आहे.
[श्री. हुमणे यांनी पाठवलेले डॉ. आंबेडकरांचे विचार मुखपृष्ठावर आहेत. कॅनेटी ह्या (१९८१ सालच्या) साहित्याच्या नोबेल पुरस्कृत लेखकाचे विचार शोषण कर्त्यांची शोषितांकडे पाहण्याची दृष्टी कशी असते व शोषण कसे घडते, याच्याशी संबंधित आहेत. ते विचार ‘जळजळीत खरे’ असूनही ते छापणे आवश्यक वाटत नाही. शोषणकर्ते व शोषित यांना त्यांच्यातील संबंधाची जाण कॅनेटींच्या पद्धतीने करून देण्याने समाजातल्या घटकांमधला द्वेषच फक्त वाढेल. समाजघटकांमधले संबंध डॉ. आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या पद्धतीने सुधास्न नव्याने रचले जावे. त्यात द्वेष येऊन नवी रचनाच अवघड होऊ नये. द्वेष समाजाच्या ठिकऱ्या उडवतो, आणि नवी सांधेजोड अवघड करून ठेवतो. अशा त-हेची मांडणी ‘तेजस्वी’ वाटली तरी शेवटी ती आत्मघातकी (self-defeating) ठरायची शक्यता दाट असल्याने मी तिचा पुरस्कार करू शकत नाही.
– संपादक