जमातवादाविषयीची प्रभावी चित्रफीत:
नव्वदीच्या दशकात जातीय दंगलींमुळे प्रचंड मनुष्य हानी व वित्तहानी झाल्याचे आपण अनुभवले. बाबरी मशिदीला उद्ध्वस्त करण्यातून जमातवादाला उधाण आले. विविध धर्मसमूहांतील टोकाची धर्मांधताही या दशकात प्रकर्षाने जाणवली. राजकीय नेत्यांनी व त्यांच्या पक्षांनी राजकारणासाठी व सत्तेवर येण्यासाठी धर्मश्रद्धांचा पुरेपूर वापर केल्याचेही अनुभवास आले. आक्रस्ताळी व प्रक्षोभक भूमिका घेऊन राजकारण करणाऱ्या या राजकीय नेत्यांनी व राजकीय उद्दिष्टे ठेवून धार्मिक नेत्यांनी जमातवादाला खतपाणीच घातले. या जमातवादाचा, जातीय दंगलींचा, समाजातील सर्वसामान्य नागरिकांवर कसा व केवढा परिणाम होतो हे अत्यंत साक्षेपाने दाखवून देणारी ‘मेरा घर बेहरामपाडा’ ही चित्रफीत नुकतीच बघायला मिळाली.
मुंबईतील बेहरामपाडा हा भाग दंगलींच्या दृष्टीने अत्यंत स्फोटक आहे. दंगलींना तिथून सुरवात होते, तेथील मुस्लिम समाज हा आक्रमक भूमिका घेऊन हिंदूंविरुद्धच्या दंग्यांत पुढाकार घेतो, हिंदुमुस्लिम ऐक्य या भागात शक्य नाही, या वस्तीतील लोकांवर विश्वास ठेवता येत नाही, ही वस्तीच बेकायदा बसविण्यात आली आहे, अशासारखे खूप सारे गैरसमज बेहरामपाडा वस्तीबद्दल पसरविण्यात आले आहेत. हे समज गैरसमज या वस्तीच्या आजूबाजूला राहणाऱ्या वस्त्यांमध्ये टिकून आहेत. या साऱ्या समज गैरसमजांची उकल करण्याचा; या समज गैरसमजांतील सत्य जाणून घेण्याचा एक अभिनंदनीय प्रयत्न मधुश्री दत्ता यांनी केला आहे. त्याबद्दल त्या अभिनंदनास पात्र आहेत. बेहरामपाडा वस्तीतील मुस्लिम समाजातील प्रश्नांचा शोध जसा ह्या चित्रफितीतून घेतला आहे तसाच बेकारी, दारिद्र्य, आर्थिक, सामाजिक व राजकीय मागासलेपण यांचाही वेध घेतला आहे. बेहरामपाड्यासंबंधीच्या उपरोक्त समज गैर-समजांच्या सत्यतेचा शोध घेता घेता भारतीय समाजातील विविध प्रश्नांच्या व्यामिश्र स्वख्याचे दर्शन घडते.
शहरात दंगल झाली तर रोज रोजीरोटीसाठी वस्तीबाहेर जावेच लाग-णाऱ्यांना वस्ती बाहेर जाणेच धोक्याचे ठरते. यामुळे त्या दिवशीचा रोजगार तर बुडतोच शिवाय आधीच्या दारिद्र्यात वाढच होते. बेहरामपाड्यातील जे व्यवसाय हे मुंबईतील गि-हाईकांवर अवलंबून आहेत ते व्यवसाय ही बंद पडण्याच्या अवस्थेत येतात. या आर्थिक अरिष्टाचा संपूर्ण वस्तीवर परिणाम होतो. आर्थिक मागासलेपणा-तून बाहेर पडण्याचा मार्गच खुंटतो. बेहरामपाड्याच्या बाजूच्या वस्तीतील नागरिकांना बेहरामपाड्यातील नागरिकांबद्दल संशय वाटतो. दंगलींची सुरवात तेथूनच होते असे वाटते. या संशयाला वेगवेगळ्या घटनांचे संदर्भ देऊन पुष्टी दिली जाते. ‘आमच्या-वर पेटते गोळे फेकले’, ‘आम्हाला तिथून जाणे धोक्याचे वाटते’ अशा गोष्टी वारंवार सांगितल्या जातात. झोपडपट्टीतून उंचउंच बिल्डिंगांवर आम्ही पेटते गोळे कसे काय फेकू शकतो? असा बेहरामपाड्यातील रहिवासी प्रश्न विचारतात. या वस्तीतील काही भाग जेव्हा जळून खाक होतो तेव्हा वस्तीतील लोकांना ते बाहेरच्यांचे कारस्थान वाटते. बेहरामपाड्यातील वस्तीतील हिंदूमंदिरातील मूर्तीचे संरक्षण करायला एक मुसलमान धावून जातो तर तोच पोलिसांच्या हाती सापडतो! मूर्तीचे संरक्षण करायला जाणारे मुसलमान मंदिर तोडायला कसे पुढे येतील असा प्रश्न नागरिक उपस्थित करतात! ‘हिंदूंच्या जीवाला इथे धोका आहे’ असे सांगणाऱ्या नागरिकांपाठोपाठ या वस्तीत अनेक वर्षांपासून हॉटेल चालवणाऱ्या ‘हिंदू’ हॉटेल मालकाचे मत ऐकायला मिळते. तो म्हणतो की मला इथे कधीही त्रास झालेला नाही. वस्तीतील निवडक हिंदू कुटुंबांचे मुस्लिम कुटुंबांशी असलेले दृढ संबंध, त्या हिंदूंकडूनच ऐकायला मिळतात. ही वस्ती बेकायदेशीर आहे म्हणून ती वस्तीच हटवली पाहिजे असे वस्तीच्या बाजूच्या फ्लॅटसमधील लोक म्हणतात तर वस्तीतील महिला आपण ती वस्ती कशी उभारली, मातीगोट्यांचा भराव घालून ती जमीन कशी राहण्यासारखी केली व गेल्या ५० वर्षांपासून आपण इथे कसे राहत आहोत, सगळे कर कसे भरत आहोत हे सांगतात. फाळणीचा कालावधी त्यांना हिंदू मुस्लिम दंग्यांसाठी आठवत नाही तर त्यावेळी अत्यंत गलिच्छ अशा या जागी आपल्याला कसे राहावे लागत होते व आपण तरीही कसे घर बांधले या कारणांवरून आठवतो! महिलांच्या विविध समस्या त्यांच्याच शब्दांत पुढे येतात. समज गैरसमज व त्यासंबंधीची विविध समाजघटकांची त्यातही विशेषतः हिंदूमुस्लिमांची प्रतिक्रिया त्यांच्याच भाषेत ऐकायला मिळणे, अनुभवायला मिळणे हीच या चित्रफितीची मोठी जमेची बाजू आहे. जमातवादामुळे निर्माण होणाऱ्या सामाजिक आर्थिक समस्यांचा आढळ चित्रफीत बघताना होतोच पण त्याचबरोबर विविध राजकीय पक्षही कसे जमात-वादी राजकारण करतात हेही लक्षात येते. विविध समाज-घटकांतील गैरसमज दूर करण्याऐवजी त्या गैरसमजांनाच कसे खतपाणी घालायचे, त्यातून सत्तेचे राजकारण कसे करायचे व हे राजकीय पक्ष कसे घडवून आणतात याचे विदारक वास्तव चित्रफितीच्या स्यात आपल्यासमोर येते. या सर्व गोष्टी बघता बघता चित्रफितीच्या शेवटच्या भागातील एका मुद्द्याची चर्चा जमातवादाच्या एका मुख्य कारणाचा परिचय कस्न देते. ही वस्ती बेकायदेशीर आहे व म्हणून ती हटविली पाहिजे असे म्हणणाऱ्यांचेही साधारणतः ३ गट आहेत. एका गटाच्या मते ही वस्ती खेळासाठी राखून ठेवलेल्या जागेवर असल्याने ती हटविली पाहिजे. शासनाला ही जागा रेल्वेसाठी हवी आहे. तर तिसरा गट या जागेची वाढत जाणारी किंमत लक्षात घेत आहे. ह्या गटात आहेत बिल्डर्स. त्यांना ही जागा हवी आहे! ही मोक्याची जागा मिळाल्यास भरपूर पैसा कमावता येईल असा बिल्डरांचा विचार आहे! त्यासाठी बिल्डर प्रयत्नशील आहेत. जमातवादाची ही आर्थिक बाजू दाखवून चित्रफीत संपते. प्रेक्षकाला जमातवादाचे ‘विश्वरूप दर्शन’ या ४०-४५ मिनिटांच्या वेळात घडते.
या चित्रफितीत जमातवादाच्या प्रश्नाचे विविध पैलू, जमातवादाला बळी पडणाऱ्यांच्याच तोंडून ऐकायला मिळतात आणि ते प्रेक्षकाला हादरवून टाकतात आणि विचार करायलाही भाग पाडतात हेच या चित्रफितीचे यश आहे.
सर्वसामान्य जनतेला हिंसा, संघर्ष, नको असतात. कारण अशा गोष्टी त्या जनतेचे अस्तित्वच संपवून टाकायला कारणीभूत ठरतात. सर्वसामान्यांना जीवन-जगण्यासाठीच खूप संघर्ष करावा लागत आहे. त्या संघर्षात जमातवादामुळे अजून एका संघर्षाची भर पडणे त्यांना नको असते हे चित्रफीत बघताना वारंवार जाणवते. मात्र परस्परांबद्दलचे समजगैरसमजांचे वाढत जाणारे प्रमाण याच सर्वसामान्यांना राजकारण्यांच्या हातचे बाहुले बनवते. याच सर्वसामान्यांना परस्परांशी लढवायला राजकारण्यांनाही सोपे जाते. एरवी गुण्यागोविंदाने सहजीवन जगणारे मग एकमेकांचा जीव घ्यायला तयार होतात. त्याचा सर्वात जास्त परिणाम हा स्त्रिया व लहान मुलांवर होतो. हे सारे या चित्रफितीने अत्यंत प्रभावीपणे समोर आणले आहे. परस्पर सौहार्द, व परस्परांसंबंधीचे गैरसमज दूर करण्याची कोणतीही प्रभावी यंत्रणा वस्तीपातळीवर दिसत नाही. पोलीसांनी स्थापन केलेल्या समित्या असल्या तरीही तिचे स्वरूप हे पुन्हा शासनकेंद्रीच राहणार. त्याऐवजी विविध जन-समुदायांनी पुढाकार घेऊन अशा समित्या स्थापन करणे, जागरूक नागरिकांनी या उपक्रमात सक्रिय सहभागी होणे आवश्यक वाटते. जमातवादाला पोषक असे वातावरण निर्माण होणे तरी यामुळे टाळता येईल.
या चित्रफितीतून आणखीही काही गोष्टी स्पष्टपणे प्रेक्षकाचे लक्ष वेधून घेतात. या चित्रफितीचा उपयोग लोकांना जमातवादाच्या प्रश्नाचे गांभीर्य पटवून देण्यासाठी निश्चितच होईल. त्याचबरोबर निवडणुकीतही या चित्रफितीचा उपयोग होऊ शकतो. बहरामपाडा परिसरातील जमातवादाला शिवसेना हाच एकमेव पक्ष कसा पुरेपूर जबाबदार आहे, शिवसेनेसारखे बहुसंख्यकांच्या व्होट बँकेकडे लक्ष देणारे पक्षच जमातवादाला पुरेपूर कारणीभूत आहेत हे अत्यंत प्रभावीपणे दाखवून दिले आहे. बहुसंख्यकांचेच समज हे कसे चुकीचे असतात हेही ही चित्रफीत दाखवून देते. मुस्लिम जमातवादी पक्ष व त्यांच्या कारवाया बहिरामपाड्यात नाहीतच हेही लक्षात येते. बहिरामपाड्या भोवतीच्या बहुसंख्य हिंदू लोकांच्या गैरसमजांमुळेच सर्व प्रश्न निर्माण होतात हा चित्रफितीतून प्रकर्षाने समोर येणारा मुद्दा ‘हिंदूंना’ विचार करायला भाग पाडतो!
आपले निधार्मिकत्व जाणीवपूर्वक जपणाऱ्या दिग्दर्शिका मधुश्री दत्ता या ‘हिंदू’ आहेत याची जाणीव त्यांना कशी करून देण्यात आली याचा त्यांनी सांगितलेला अनुभव थक्क करणारा होता. तुम्हाला आवडो किंवा न आवडो, तुम्हाला कितीही अमान्य असले तरीही तुमचा धर्म समाज विसरत नाही या दाहक वास्तवाचा प्रत्यय मधुश्री दत्ता यांना आला. तो श्रोत्यांना विचार करायला प्रवृत्त करणाराच ठरला.
निर्मल अपार्टमेंटस्, चितळे मार्ग, धंतोली, नागपूर — ४४० ०१२