कार्यालयीन यंत्रांमुळे सध्याच्या कामांचे स्प जास्त वेगवान, बिनचूक, नियमित आणि कार्यक्षम व्हावे, अशी अपेक्षा होती. टंकलेखक (typewriter) म्हणजे नवा आणि सुधारित कारकून. गणनयंत्र (calculator) म्हणजे नवा आणि सुधारित हिशेबनीस—-जो माणसांची हिशेबाची कामे आ चर्यकारक वेगाने आणि कार्यक्षमतेने, विद्युद्वेगाने करील, असा. आणखी हत्यारे, आणखी अवजारे, आणखी पुरुष कर्मचाऱ्यांसाठी. पण जेव्हा टंकलेखक, झेरॉक्स यंत्रे, टेलेफोन स्विचबोर्ड्ज, गणनयंत्रे, संगणक आणि अनेक पंच्ड-कार्ड यंत्रे प्रत्यक्षात कार्यालयांमध्ये अवतरली तेव्हा पुरुष कर्मचाऱ्यांच्या जागा स्त्रिया आणि यंत्रांची जंजाळे घेऊ लागली. स्त्रियांची बोटे जुन्या ‘हस्तकांच्या’ हातांपेक्षा स्वस्ताईने व नेमकेपणाने कामे करीत. विसाव्या शतकाच्या सुरुवातीचे कुशल कारकून नामशेष झाले, आणि कामगार-भरतीच्या जाहिरातींचे रकाने ‘शालांत परीक्षा उत्तीर्ण मुली, अनुभवाची गरज नाही’, अशा नोंदींनी भरले जाऊ लागले. अशा (अननुभवी पण साक्षर) मुलींना काही आठवड्यातच बिले बनवणे, कार्ड पंच करणे, हिशेब ठेवणे, कागदांना फायलींमध्ये लावणे, असली कौशल्ये शिकवता येऊ लागली. त्यांचे कामाचे वेग आणि कार्यक्षमता पुरुष कर्मचाऱ्यांना मागे टाकू लागली. एक नोंद आहे, ‘ती वारभर काँप्टोमीटर नोंदी ॲरिथोमीटरने बिलांमध्ये घेऊन सहज सहा माणसांइतके काम करते.’ एकोणीसशे तीस सालापर्यंत अमेरिकेच्या कार्यालयांमधील स्त्रियांची संख्या वीस लक्षांजवळ होती, आणि प्रथमच हा आकडा पुरुषांच्या संख्येपेक्षा जास्त होता. एकोणीसशे छप्पनमध्ये साठ लाख पांढरपेशे कामगार होते, आणि एकूण रोजगारीत स्त्रियांची संख्या १९०० सालच्या संख्येच्या चौपट होती. एकोणिसाव्या शतकात अनेक कंपन्यांची टंकलेखनयंत्रे बाजारपेठेसाठी झुंजत होती. हॅमंड, रँडल, कोलंबिया, हेरिंग्टन, इत्यादी. पण अखेर १८६७ साली क्रिस्टोफर लॅथम स्कोल्सने भंगार सामानातून घडवलेले यंत्र सर्वांत लोकप्रिय ठरले. रेमिंग्टन कंपनीने सुधारलेल्या या यंत्राचे परिणाम दूरगामी होते. स्कोल्स म्हणाला, ‘सगळ्या जगाचे मला माहीत नाही . . . पण मी स्त्रियांकरता काहीतरी करू शकलो आहे. त्यांना नेहेमीच फार मेहेनत करावी लागलेली आहे, रोजगारी मिळवायला. ह्या यंत्राने त्यांचा रोजीचा प्र न सोपा व्हायला मदत होईल. हाताने लिहिणे हस्तकलेसारखे आणि पुरुषी होते. टंकलेखन बोटांच्या ठशांसारखे आणि स्त्रियांचे होते. एका इंग्रज बाईने पॅरिसमध्ये मिनिटाला नव्वद अक्षरे टंकलेखित केली—-हाताने लिहिण्याच्या दुप्पट वेग होता, हा. आता मजकूर हा डोळे आणि हात यांच्या समन्वयाने हाताळला जात नव्हता. आता तरफांचे ठोके आणि संवेदना महत्त्वाच्या ठरत होत्या. हात, डोळे आणि लेखणी यांच्या दाट विणी-तून घडणारे काम आता अंकबद्ध, डिजिटल पद्धतीने यंत्राच्या अनेक भागांमध्ये वाटले गेले.
[इंग्रजीत ‘अंक’ आणि बोटे या दोन्हींसाठी , डिजिट, हा शब्द वापरतात. कामांचे तुकड्यांमधले वाटप, आणि कामासाठी बोटांचा वापर, ह्या दोन्हीला परिणामच म्हणायचे! —- संपा.]
टंकलेखनाच्या डिजिटल कडकडटाने हस्तलेखनाची आदरपूर्ण शांतता भंगली. हस्तलेखनाने भाषेला दृष्टिगम्य सांकेतिक रूप दिले होते. आता ही नवी यंत्रे स्वतःचेच संगीत घडवू लागली. टंकलेखन शाळा मुलींना तालात टंकलेखन करायला शिकवू लागल्या. ह्या तालाचा ना शब्दांच्या उच्चारांशी संबंध होता, ना अर्थांशी. त्याचा संबंध होता तबल्यासारख्या तालवाद्यांशी आणि नृत्याशी. टंकलेखनाची गुणवत्ता मोजली जाई, ती बिनचूकपणा आणि वेगाच्या मापदंडांनी. आणि या बाबी तालबद्धतेनेच साध्य होतात—-मिनिटाला शब्द, मिनिटाला मात्रा, बोटांच्या ठोक्यांचा कडकडाट, तरफांची खटखट, दर ओळीअखेरची ‘कॅरेज रिटर्न’ची घंटा. [Sadie Plant या स्त्रीवादी प्राध्यापिकेने स्त्रिया आणि नवी तंत्रसंस्कृती यावर ‘Zeros + Ones’ हे पुस्तक लिहिले आहे (१९९७, फोर्थ इस्टेट, लंडन). त्यातील हा उतारा आहे.
समाजसुधारणांच्या ‘तात्त्विक’ प्रयत्नांची दखल आवर्जून घेतली जातच असते. पण बरेचदा नवे तंत्रज्ञान ‘अल्लाद’ समाजपरिवर्तन घडवून जाते ते धड जाणवतही नाही—-पण अगंवळणी पडते. वरचा उतारा ह्याचे एक उत्तम उदाहरण पुरवतो. —- संपादक]